सहवास

Submitted by महेश भालेराव on 27 September, 2016 - 02:08

सहवास

कस्तुरीच्या बनाचा ,श्रुंगारल्या मनाचा
सहवास आठवे तुझा , त्या धुंदिल्या क्षणांचा

व्याकुळता तृषेने , प्रेमातल्या जगी या
मी शोधिता विसावा ,भारावल्या जगी या
वर्षाव तूच केला , गंधित सुमनांचा
सहवास आठवे तुझा , त्या धुंदिल्या क्षणांचा

तू बाण रोखलेले, तुझिया नयनधनुचे
अन स्पर्श चंदनी ते, मृदू रेशमी तनुचे
स्वर्गीय त्या सुखाचा , तो खेळ भावनांचा
सहवास आठवे तुझा , त्या धुंदिल्या क्षणांचा

जी सुप्त ओढ होती , दडुनी मनात माझ्या
आली फुलून राणी , हृदयात आज तुझिया
व्यापुनी आसमंत , त्या आतुरल्या कणांचा
सहवास आठवे तुझा , त्या धुंदिल्या क्षणांचा

महेश बाळकृष्ण भालेराव

Group content visibility: 
Public - accessible to all site users