चंद्रावळ नार ..

Submitted by अजातशत्रू on 12 September, 2016 - 22:30

रंगरूपाची तू खाण चंद्रावळ नार ! बांधा कमनीय अंग अंग भरदार
मासुळी डोळ्यात इष्काचं जहर, नागिणी भुवयांचे बाण टोकदार
गुल्कंदी ओठावर प्रेमाचा बहर, उफाणल्या देहात भरतीची लहर !

सैल अंबाड्यास कैफ केवड्याचा, भाळी टिळा लालबुंद कुंकवाचा,
गालांचा स्पर्श मोरपिसाचा, चाफेकळी नाकास छंद मोरणीचा
छातीस भार उन्नत उरोजाचा, मख्मली पोटास गंध नाभीचा !

साजिरया हातात शोभती बिल्वर, तन्मणी खोडाची गळयात सर
देखण्या दंडावर बाजुबंदाची नजर, कानामध्ये सोनझुबे डौलदार
आव्वळ चोळीवर रुळे गोफ चंद्रहार, कंबरपट्ट्यात कैद कटीभार

हिरे कंकण ल्येते सारजा नार, गच्च पोटरयांचे वळण घेरदार
मंजुळ वाजती पैंजण घुंगरू फार, शिंदेशाही तोड्याचा नाजूक भार
देहात वारं जणू अश्व बेदरकार, चालताना होई काळजावर वार !

कर्नाटकी चोळीला जरतारी धार, थुईथुई नाचती पैठणीवरचे मोर
हिरवंगार चुडं लाजंत होती चूर, स्वर्गीची अप्सरा की जन्नतची हूर
मी मदनबाण तू मेनकेचा अवतार, शस्त्र लागे कशाला तूच तलवार !!

रंगरूपाची तू खाण चंद्रावळ नार ! बांधा कमनीय अंग अंग भरदार......

- समीर गायकवाड.

http://sameerbapu.blogspot.in/2016/09/blog-post_86.html

9.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users