एक गोंधळ - टिप कोणाला? किती द्यावी? वा देऊ नये? हे कसे ओळखावे?

Submitted by ऋन्मेऽऽष on 1 September, 2016 - 11:51

आजच्या तारखेला !

जेव्हा मी एकटाच नाक्यावरच्या हॉटेलात जातो आणि हलकाफुलका नाश्ता करतो तेव्हा एकही पैसा टिप देत नाही.

जेव्हा मी एकटाच जातो आणि जेवल्यासारखे हादडतो तेव्हा पाच रुपये फक्त/- टिप ठेवतो.

जेव्हा मी मित्राला घेऊन नाश्ता करायला जातो तेव्हा दोघांचे मिळून एक जेवण असा हिशोब करत पाच रुपये टीप ठेवतो.

जेव्हा मित्राला घेऊन जेवण करायला जातो तेव्हा एकूण दहा रुपये टीप ठेवतो.
अर्थात पाच मी देतो. पाच मित्राला द्यायला लावतो.

आता गर्लफ्रेंड Happy

गर्लफ्रेंडबरोबर जेव्हा केव्हा एखाद्या साध्या हॉटेलात जातो, आणि साधी चहा पिऊन बाहेर येतो (जे आजवर कधीच झाले नाही ती गोष्ट वेगळी) तरीही टिपची किमान मर्यादा पाचची दहा मध्ये बदलते.

जेव्हा तिच्याबरोबर जेवण करायला जातो, तेव्हा टिपची किमान मर्यादा दहाची वीस मध्ये बदलते.
(आता कळलं गर्लफ्रेंड असली की पैसे कसे खर्च होतात)

जेव्हा मी गर्लफ्रेंडबरोबर एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये जातो, म्हणजे जिथे जेवायला बसल्यावर मांडीवर पांघरायला फडके आणि जेवण झाल्यावर हातपाय बुचकळायला गरमागरम लिंबूपाणी आणून देतात, जिथे पिण्याचे पाणीही ‘साधा की मिनरल वॉटर?’ असे अदबीने विचारतात, आणि आपण निर्लज्जासारखे ‘साधा’ म्हटले तरी काचेच्या वळणदार ग्लासातून थंडगार पाणीच आणून देतात, जिथे समोरच्याला ईंग्रजी ‘ई तरी येतो की नाही याचा जराही तपास न घेता ‘काय जेवणार?’ सारखे क्षुल्लक प्रश्नही ईंग्रजी भाषेत विचारतात, जिथे जेवणात एखादा केस आला तरी दिसू नये ईतपत अंधारमय वातावरण करतात आणि फोकस ताटावर नाही तर खाणार्‍यांच्या तोंडावरच राहील याची दक्षता घेतात, ईत्यादी सोयीसुविधा न मागता पुरवणार्‍या मोठ्या हॉटेलात जेव्हा जातो, तेव्हा हा किमान दहाचा आकडा किमान वीस ते तीस मध्ये बदलतो. कारण बिलाचा आकडा फुगवत त्या तुलनेत दहा वीस रुपयांची टिप ठेवायला आपल्यालाच लाज वाटावी याची काळजी हॉटेलवाल्यांनी स्वत:च घेतलेली असते.

जेव्हा आम्ही एखाद्या स्पेशल ओकेजनसाठी सेलिब्रेट करायला जातो तेव्हा टिपचा आकडा गर्लफ्रेंड स्वत:च ठरवते. तो दरवेळी चढत्या क्रमाने वेगवेगळा असतो.

आजकाल तर मी तिला किती ओळखू लागलोय याची परीक्षा घ्यायला जेवण झाल्यावर तीच मला लाडात विचारते, "रुनम्या, आज किती टिप ठेवशील?"
आणि जर मी तिच्या मनातला आकडा बरोबर ओळखला तर ती खुश होत मला आलिंगन देते.

हल्ली खरेच मी वरचेवर तिच्या मनातला आकडा ओळखू लागलोय हे आलिंगनाच्या वाढलेल्या संख्येवरून (आताच हे वाक्य लिहिता लिहिता) मला जाणवले आहे.

असो, तर बिल छोटे की मोठे त्यानुसार टिपही छोटी की मोठी ही मेंटेलिटी आम्हा दोघांचीही आहे. भले आमची छोट्यामोठ्याची व्याख्या भिन्न का असेना.
पण बेकार सर्विस दिली तर टीप कमी द्या किंवा देऊच नका हे माझे मत आहे. जे तिला कधीच पटत नाही.
तिच्यामते टीप आपण आपली शान जपायला देतो. सर्विस कशीही असो, आपली शान तर कायम तीच असते ना. मग झालं, टीप सुद्धा त्याला साजेशीच द्यावी.

होम डिलीव्हरीबाबत बोलायचे झाल्यास, दहा रुपये हा आजच्या तारखेला माझा फिक्सड् आकडा आहे. त्याला टिप न समजता संबंधित व्यक्तीला आपल्या घरापर्यंत एक फेरी मागावी लागते त्याचा मेहनताना म्हणून मी ते देतो.

हे झाले हॉटेलचे,
आता थोडक्यात ईतर

टॅक्सीवाला भला माणूस वाटला तर त्याचे बिल राऊंड अप करत चार-आठ रुपयांची शिल्लक न घेणे हे टीपसदृश्य काम मी करतो.

रिक्षावाल्यांना मी कधीच टिप देत नाही. किंबहुना एक सुट्टा रुपयाही सोडत नाही.
कदाचित दक्षिण मुंबईकर असल्याने टॅक्सीवाल्यांबद्दल एक आत्मीयता वाटत असावी जी रिक्षावाल्यांबद्दल वाटत नसावी. बाकी विशेष काही कारण नाही.

सलूनमध्ये आयुष्यात एकदाच टीप दिली आहे.
का? केव्हा? कशाला उगाच ..
ते या लेखात तुम्ही वाचू शकता. - http://www.maayboli.com/node/53197
हिला माझी रिक्षा ऐवजी टॅक्सी म्हणालात तर जास्त आवडेल.

बाकी चायपाणी हा वेगळा विषय आहे. ते कोणाला किती द्यायचे हे ना मला समजत, ना माझ्या गर्लफ्रेंडला. घरी असलो तर मी माझ्या आईच्या किंवा वडिलांच्या तोंडाकडे बघतो. तेच काय ते ठरवून देतात.

असो, तर ही झाली प्रस्तावना,

आता एक ताजा अनुभव ज्यामुळे हा धागा सुचला.

पुन्हा शीर्षक लिहितो,
एक गोंधळ - टिप कोणाला? किती द्यावी? वा देऊ नये? हे कसे ओळखावे?

ऑनलाईन शॉपिंगच्या फंदात मी हल्लीच पडू लागलोय. बरेचसे पार्सल कामाच्या दिवसांमध्येच येतात जेव्हा मी ऑफिसला असतो. ते आई कलेक्ट करते. गेल्या रविवारी मात्र मी एकटाच घरी होतो. पार्सल आले. मी स्वत: साईन करून घेतले. खरेदी करताना कॅश ऑन डिलीव्हरी सिलेक्ट केले होते. तर त्याचे ३९५ रुपये फक्त झालेले. मी चारशे रुपये, शंभरच्या चार नोटा त्या कुरीअरबॉयच्या हातात सरकावल्या आणि राहू दे म्हणालो. तरी तो पाकिटात पाच रुपये चिल्लर शोधू लागला. मला वाटले, त्याला माझे ऐकू आले नसावे. म्हणून मी त्याला पुन्हा मोठ्याने म्हणालो, अरे राहू दे. तसे तो आणखी त्वेषाने पाकिट शोधू लागला आणि कुठल्याश्या कोपर्‍यातून त्याने पाच रुपयांचे नाणे शोधून काढलेच. बस्स त्याच त्वेषात मग त्याने ते माझ्या हातात कोंबले. अगदी माझ्या भावी सासर्‍याने माझ्या गर्लफ्रेंडचा हात माझ्या हातात द्यावे तसे अगदी माझा हात आपल्या हातात घेत त्यावर टाळी मारल्यासारखे ते चिकटवले. अर्थ साफ होता. त्याला माझे हुशारी मारत टिप देणे आवडले नव्हते आणि त्याला मला हे आपल्या कृतीतून दाखवून द्यायचे होते. माझा त्याला दुखवायचा हेतू नक्कीच नव्हता, पण तरीही तो दुखावला होता आणि त्याचा बदला म्हणून त्याने मला दुखावले होते. आय मीन माझा हात दुखावला होता.

एकंदरीत वाईट वाटले. अश्यावेळी सॉरी तरी काय आणि कसे बोलावे हे समजले नाही. माझे नेमके चुकले म्हणावे तर पुढच्यावेळी एखादा गरजू खरेच अश्या सर्विसच्या बदल्यात टिपची अपेक्षा ठेऊन असेल आणि मी याच भितीने त्याला दिली नाही, तर त्या बिचार्‍याचे उगाच नुकसान व्हायचे. तर उलटपक्षी पुन्हा असा प्रकार करताच आणखी एखादा दुखावला जायचा. बस्स म्हणूनच नेमकेपणा ठरवायला हा धागा काढलाय. टिप कोणाला? किती द्यावी? वा देऊ नये? हे कसे ओळखावे?

आयुष्यात कधीतरी कोणालातरी टीप दिली असेल, वा कोणाकडून घेतली असेल तर ईथे जरूर प्रतिसाद द्या.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक अजून उगीच काढलेला आणि स्वतःची मते कशी बरोबर हे ठसवण्यासाठी काढलेला धागा.

असो टिप हा इंग्रजी शब्द कशाकरिता वापरला आहे. कारण पोलिसांचे खबरी पण पोलिसांना टिप देतात. मराठी प्रतिशब्द सांग मग पुढे लिहायचे कि नाही ते विचार करेन.

Tip = To insure promptness

नरेशजी आता याचे नेमके मराठी तुम्हीच मला सांगा. मला जनरल नॉलेज अंतर्गत फुल्लफॉर्म तेवढा माहीत आहे.

अमेरिकेत आल्यापासुन हा प्रश्न मला सतावत आहे.

२० वर्ष सिंगापुर मध्ये राहिलो तेव्हा हा प्रश्न कधीच आला नाही कारण ह्याचे उत्तर सरकारनीच दिले होते. सिंगापुर मध्ये टिप देणे हे कायद्यानुसार " strongly discouraged" आहे . त्यामुळे कधीच कुणाला टीप दिली नाही.

त्याआधी भारतात उत्पान्न एवढे कमी होते की टीप देउच शकत न्हवतो.

ऋ, तो फुलफॉर्म जनरल नॉलेज नाही तर उगाच अ आणि अ आहे.
म्हंजे india /post इत्यादींच्या फुलफॉर्मसारखा.

मराठीत टीपला काय म्हणतात माहित नाही कारण चिरीमिरी आणि चहापाणी यात थोडे निगेटिव फिलींग येते.
म्हणजे चुकीचे काम करतोय असे.
'हात ओले करणे' असाही एक शब्दप्रयोग आहे.

आमच्या गावात 'खुशी' / बक्षिशी हे शब्द वापरतात टीप साठी.

अरे ऋन्म्या टीप महत्वाची की गफ्रेचं आलिंगन महत्वाचं हे आधी ठरवं , जर टीप दिल्यामुळे गफ्रे आलिंगन देत असेल तर कशाला मागेपुढे बघतोयस टीप देण्यासाठी ? Proud

बाकी काही असो पण नव्या पिढीतील यंग व डायनॅमिक मुलेही आलिंगन सारखे शुद्ध मराठी शब्द वापरतात हे पाहून मराठी च्या भवितव्याची काळजी कमी झाली.

हग केलं असं मराठीत लिहताना लिहायला विचित्र वाटतं ना, म्हणून आम्ही अजूनही अलिंगनच लिहितो.
मिठी पण मारू शकतो म्हणा.
पण मिठीत अलिंगनातला तो निरागस भावरतपणा नाही.
Wink

मला वाटत टिप द्यायला काही हरकत नसावी..
टिप हि साधारण पणे सर्व्हिस क्षेत्रा मधे देतात वा दिलेली आहे...

जर आपल्याला एखादी सर्व्हिस आवडली, म्हणजे त्या व्यक्तीने त्याच्याकडुन अपे़क्षित कामा पेक्शा जास्त काही केल आपल्या साठी वा जे काही केला ते खुप वा मनापासुन आवडल तर टिप द्यायला हरकत नसावी..

मी अत्ता पर्यन्त तरी २०% (जेवढ बिल आहे ) च्या जवळपास टिप दिलेली आहे ..
उ.दा
- टॅक्सी वाल्याने डिकी मध्ये प्रवासाची बॅग ठेवली वा काढुन दिली..
- हॉटेल मध्ये जेवण व सर्व्हिस आवडली...
- सलुन मध्ये हेअर कट आवडला...

साहिल शहा,
त्याआधी भारतात उत्पान्न एवढे कमी होते की टीप देउच शकत न्हवतो.
>>>
टीप देणे के लिये ऐपत नही नियत चाहिये Happy
(चक दे मधील शाहरूखच्या आवाजात ताकद नही नियत चाहिये असे वाचावे)

माझ्या लहानपणी आमची परिस्थितीही बेताचीच होती. हॉटेलात मोजकेच जाणे व्हायचे आणि घरी दोन रुपयांत बनणारा चहा तिथे आठदहा रुपये मोजत पिणे हा तर अपराध समजला जायचा. पण त्यातही माझी काटकसरी आई टीप न चुकता ठेवायची. "जाऊ दे, ते लोकं आशेवर असतात", हा तिचा ठरलेला डायलॉग जो तिच्या या काटकसरी स्वभावाविरुद्ध वागण्याचे समाधान करायचा. आणि वडील तर उधळपट्टीच असल्याने "त्यांच्या पगारात हे गृहीत पकडले असते" म्हणत दोन-पाच रुपये जास्त ठेवायचे.

ऋ, तो फुलफॉर्म जनरल नॉलेज नाही तर उगाच अ आणि अ आहे.
>>
साती, ओह खरेच. पण मस्त जमलाय.

श्री, काहीही हं. आपल्या गर्लफ्रेंडचे आलिंगन घ्यायला लोकांना टीप द्यायची याला काय अर्थंय..

जिज्ञासा, भारी लिंक आहे. ईंग्लिश बघत पास करणार होतो पण रोचक आकडेवारी आहे. खखोदेजा.

विजय कुलकर्णी,
आलिंगन या शब्दात अश्लीलता डोकावत नाही. माझे आणि माझ्या गर्लफ्रेंडच्या पवित्र नात्याची शुद्धता कायम राहावी यासाठी मी तो शब्दप्रयोग योजला आहे. बाकी त्यात मातृभाषेचा गोडवा आहेच हे कबूल.

माझे आणि माझ्या गर्लफ्रेंडच्या पवित्र नात्याची शुद्धता कायम राहावी >> अबब ! कसले भारी / बोजड शब्द वापरतोस रे. मला एकदम सखाराम गटणेची आठवण झाली.

" वरचेवर तिच्या मनातला आकडा ओळखू लागलोय हे आलिंगनाच्या वाढलेल्या संख्येवरून (आताच हे वाक्य लिहिता लिहिता) मला जाणवले आहे. " >>

अरेरे, दुर्दैवे आहे. मनात टिपेचे आकडे सोडून आणखीही काही असेल, ते ओळखायला शिक. थोडक्यात अलिंगन का मिळते? त्याचा रूट कॉज शोध. खरे तर तो एका वेगळ्या बाफचा विषय आहे. तो काढ म्हणजे तिकडेच उत्तर देऊ.

हे सगळंच फार थोर आहे. म्हणजे टिपा दिल्यानंतर टिपेचे अलिंगन - आणि लोकांना "अलिंगन कसे मिळवावे" त्याची टिप !

<<< आजकाल तर मी तिला किती ओळखू लागलोय याची परीक्षा घ्यायला जेवण झाल्यावर तीच मला लाडात विचारते, "रुनम्या, आज किती टिप ठेवशील?"
आणि जर मी तिच्या मनातला आकडा बरोबर ओळखला तर ती खुश होत मला आलिंगन देते. >>> ऋन्म्या लेका हे तुझचं वाक्य आहे की रे , तु जर टीप देणं बंद केलं तुला आलिंगन मिळेल का ? Wink

श्री, नाही मिळणार, पण तरीही हे तात्विकदृष्ट्या चुकीचेच आहे ना.
तसेच एखाद्याला टिप देण्यामागचा हा काही उदात्त हेतूही झाला नाही.
एनीवेज, सिंगापूरची लोकं लकी आहेत या बाबतीत. फुकटात आलिंगन!

मोरपंखी,
मी अत्ता पर्यन्त तरी २०% (जेवढ बिल आहे ) च्या जवळपास टिप दिलेली आहे ..
>>>>
म्हणजे दोघांचे जेवणाचे बिल साधारण ६००-६५० च्या घरात जाते तेव्हा १००-१२५ रुपये टीप ठेवणे जरा जास्तच नाही का झाले हे?
वरच्या एका लिंकवरही असेच १५-२० टक्के आकडे होते. परदेशात दिली जाते का एवढी टीप?

तसेच एखाद्याला टिप देण्यामागचा हा काही उदात्त हेतूही झाला नाही.
एनीवेज, सिंगापूरची लोकं लकी आहेत या बाबतीत. फुकटात आलिंगन! >> अस कर ना तू टीप म्हणून वेटर, डीलिव्हरी मॅन, टॅक्सीवाल्याला आलिंगन देत जा (ह्ग लिहिणार होतो पण त्यात शुद्धता वाटणार नाही) ... Lol

>>>>
म्हणजे दोघांचे जेवणाचे बिल साधारण ६००-६५० च्या घरात जाते तेव्हा १००-१२५ रुपये टीप ठेवणे जरा जास्तच नाही का झाले हे?
वरच्या एका लिंकवरही असेच १५-२० टक्के आकडे होते. परदेशात दिली जाते का एवढी टीप?

>>>

१५-२० टक्के टीप दिली जाणे हे आपल्यावर अवलम्बुन आहे... "जर आपल्याला एखादी सर्व्हिस आवडली" तरच...मी तरी देतो...
मला अस वाटत त्या क्षेत्रा मध्ये काम करताना कदाचीत..टीप मधुन मिळनारा इन्कम (सरासरी) पकडुन त्याचा पगार ठरवत असतील..(म्हणजे टीप हा मासीक पगारा व्यतरीक्त गृहीत धरलेला इन्कम असेल..)

असामी, टीपच्या बदल्यात आलिंगन. म्हणजेच जादू की झप्पी. मुन्नाभाई चित्रपटाच्या प्रभावाखाली घेऊन झालीय. पण तो काळ वेगळा होता. तेव्हाची माणसं साधी होती. आता तसे केल्यास लोकांची बुभुळे विस्फारतील. त्यापेक्षा गर्लफ्रेंडलाच आलिंगन देणे सामान्य वाटेल. अर्जुना, हि घे टीप आणि हे बघ आलिंगन!

अवांतर - धागा आलिंगनात अडकला आहे. बाहेर आला तर भलं होईल.

मोरपंखी ओके. रक्कम जरा जास्त वाटली ईतकेच. पण आपल्यासारखा विचार करणारी लोकं वाढली तर चांगलेच आहे. माझ्यासारखे बॅचलर सुद्धा ऑफिस नंतर पार्टटाईम जॉबचा विचार करू शकतात. ओवरटाईमच्या निम्मे सुटले तरी हरकत नाही. दिवसभर केलेले तेच रटाळ काम पुढे ताणण्यापेक्षा वेगळा अनुभव चांगला.
पण हॉटेलच, कारण बार मध्ये काम करणे माझ्या तत्वाच्या आड येईल. एखाद्याच्या ग्लासात दारू ओतत त्याला पी बाबा म्हणने जमणार नाही..

'क्रोध को पालना सीख बेटे' असे अमरीश पुरी सनी देओलला घायलमध्ये की घातकमध्ये सांगतो. त्यानंतर सनी देओलला समजत नाही की क्रोधाला पाळायचे कसे. मग त्याला ही साईट सापडते आणि हा धागा सापडतो. मग तो धागा वाचून मुठी वळतो. चेहरा हिंस्त्र करतो. ओठ पिळवटतो. स्वतःभोवती गरागरा फिरतो. एकवीस उड्या मारतो वाकड्यातिकड्या! आणि नंतर हसत सुटतो. मग ओरडायला लागतो. "पाळला रे पाळला, मी क्रोध पाळला, पाळला रे पाळला, मी क्रोध पाळला".

खरे आहे बेफिकीरजी,
सनी देओल असो वा सनी लिओन, दोघांचे सारेच चित्रपट सारखेच वाटतात. घायल की घातक पटकन समजत नाही. पण आपण म्हणता तो कदाचित घातक असावा. घायलमध्ये अमरीशपुरी चड्डा वकील दाखवला होता.

https://m.youtube.com/watch?v=Z-qV9wVGb38

हे बघून आलास काय ऋ

हॉटेलात गेल्यावर टीप द्यायची की नाही हे पहिल्या पाच मिनिटांत ठरवतो.

किती द्यायची हे बिल पाहून व एकंदरीत सर्व्हिस कशी मिळाली त्यावरून.

साधारण 10% च्या आसपास देतो.

त्याविषयी स्वतः काही नियम ठरवलेत. उगाच उपकार केल्याचा आव आणि फील येऊ नये. वर चांगल्या सर्व्हिसचा योग्य मान राखला जावा इतकेच.

बऱ्याच बार मध्ये वेटर आधी धड ढुंकून पाहत नाहीत पण बिलाची वेळ आली की उगीच दहावेळा पाणी देणे, पाण्यात बर्फ टाकणे असले उद्योग करतात. त्यांना 'नो टीप'!

एखाद्याच्या ग्लासात दारू ओतत त्याला पी बाबा म्हणने जमणार नाही..
>>
बारमधल्या वेटरचे नाही, बारटेंडरचे काम आहे.
बारटेन्डिग हे काम नसून एक कला आहे.

समोरच्याचा वकुब ओळखून त्याने आॅर्डर केलेल्या पेयात योग्य प्रमाणात सोडा/बर्फ/ज्यूस इत्यादी मिसळुन परफेक्ट ड्रिंक बनवणे हे काही येरागबाळ्याचे काम नोहे!

रूनम्या,
"बलवंतराय के कुत्ते" विसरलास. बाकी सनीपाजीला मध्ये आणू नको. अन्यथा पाजींजे सगळे जड संवाद फेकून मारेन.

Pages