सिंधूसंस्कृती

Submitted by _सचिन_ on 21 August, 2016 - 02:51

मी गेली काही वर्षे बॅडमिंटन खेळतोय. नेमकी वर्षे न सांगता "काही" वर्षे ह्या साठी सांगतोय की नेमकी वर्षे सांगायला मला संकोच वाटतो. मी जितकी वर्षे खेळतोय तितक्या वर्षांची हल्लीची मुले खूपच सरस खेळतात. पण तो खेळ खेळत असल्यामुळे खूप चांगलं खेळता येत नसेल तरी बऱ्यापैकी उमजू लागलाय. मागे कोणीतरी येथेच ह्या खेळाला हिंसक खेळ असा म्हणाला होता. ते एका दृष्टीने बरोबर पण आहे. खांदे, घुडगे, पाठ, टाच, कोपर ह्या खेळाचे लगेच बळी पडू शकतात. स्पर्धात्मक खेळ करताना ह्याला लागणारा स्टॅमिना डेव्हलप होण्यासाठी काही वर्षे नाहीतर एखादी पिढी जाऊ द्यावी लागते.
म्हणूनच परवाचा सिंधूजय हा एक अतिशय आगळावेगळा विजय वाटला. हो विजयच. तक्त्यावर जरी मारिन विजयी दिसत असली तरीही. सिंधूच तिथपर्यंत पोहोचणं हाच एक विजय होता. भारताची आत्तापर्यंतची संस्कृती ह्या खेळाला आजिबात पोषक नव्हती. मुलींवरील बंधन वगैरे कदाचित आता तेवढी नाहीयेत पण भावनात्मक आघाडी वर आपण अजूनही पिछाडीवर आहोत. चरबी वाढू नये ह्यासाठी जेथे एकेक ग्राम चा विचार करावा लागतो तेथे आमच्या आया "सणाला एक पुरणपोळी खाल्ल्याने काही फरक पडत नाही" असं अगदी इमोशनली सुनावतात. माझ्याच संघातील दुसरा खेळाडू पुढे जातोय म्हणून त्याच्या वर एखादी गेम करू शकतात. खेळायला कोर्ट, लाईट, सुविधा हव्या असतील तर काय आणि किती दिव्य पार पाडावी लागत असतील त्याला तर गणतीच नाही. ह्या सगळ्यावर मात करून, कितीतरी सुखांचा त्याग करून येथ पर्यंत पोहोचणं ह्यातच मोट्ठा विजय आहे. रोज पहाटे 4 ला उठून तासोंतास सराव करणे, बाहेरच अन्नपाणी ह्याचा पूर्ण त्याग, फोन tv ह्यापासून कित्येक मैल लांब (आम्हाला व्हाट्सअँप पासून सुद्धा 10 मिनिट बाजूला होता येत नाही), नातेवाईक नाही, पार्टी नाही कि सोशल लाईफ नाही. बस्स खेळ आणि खेळ.
कोर्ट वरचा तिचा त्वेष, एनर्जी लेव्हल, आणि आपण जिंकू शकू हा आत्मविश्वास अगदी थक्क करणारा होता. माझ्या देशाचा एक खेळाडू देशासाठी एवढा लढतोय ही भावनाच प्रचंड सुखावणारी होती.
काल इथे (लंडन ला) एका कोर्ट वर गेल्यावर ह्याच मॅच चा विषय चालू होता. तेथे एक गोरा कोच दुसर्याला ही मॅच बघितली नाही म्हणून शिव्या घालत होता आणि कळस म्हणजे 10 मिनिट अखंड इंडियन गर्ल च कौतुक (त्याला नक्की नाव आठवत नव्हतं), मी नंतर त्याला नाव सांगितल्या वर ज्या कौतुकाने त्याने बघितलं की बस्स!
हा तिच्या चिकाटीचा जसा विजय होता तसाच गोपीचंदच्या श्रमाचा देखील. तो विजय होता प्रचंड मेहनतीची तयारी ठेवणार्या आजच्या पिढीचा आणि सायनाने दाखवलेल्या स्वप्नांचा. भारतात आता एक वेगळ्या सिंधूसंस्कृतीचा उदय होतोय ह्यात शंका नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा! खूप मनातलं लिहीलंत.

<< चरबी वाढू नये ह्यासाठी जेथे एकेक ग्राम चा विचार करावा लागतो तेथे आमच्या आया "सणाला एक पुरणपोळी खाल्ल्याने काही फरक पडत नाही" असं अगदी इमोशनली सुनावतात.>> अगदी अगदी.

खूप छान लिहिलेत. मेडलसाठी किती वर्षे आधीपासून आणि किती कठोर कष्ट घ्यावे लागतात हे अधिकाधिक पुढे यायला हवे.

इथे खेळाडू टॉपला पोचला कि त्याच्या आरत्या सुरु होतात, त्याजागी अगदी शहरपातळीवरून सुरवात करून लोकांनी खेळणार्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. दीपा, सिंधू आज खेळत नाहीत तर गेली 6,7 वर्षे या मुली वेगवेगळ्या पातळीवर बक्षिसे कमावताहेत. पण भारतीय जनतेला हि नावे तेव्हाच प्रात:स्मरणीय झाली जेव्हा पदकांची पाटी कोरी राहिली आणि ह्या मुलींकडून अपेक्षा निर्माण झाल्या. या मुलींना आज जो पाठिंबा मिळतोय, आर्थिक मदतीची जी शक्यता निर्माण झालीय ती मदत आणि पाठिंबा जेव्हा यांनी सुरवात केली तेव्हाच मिळाला असता तर आज चित्र वेगळे असते. दीपाने स्कुटर सीटवर प्रॅक्टिस केली हे हल्लीच वाचले. आपले एवढेही बजेट नाहीये का कि खेळाडूंना बेसिक सामग्री मिळू नये?

अभिनव बिंद्राने स्वबळावर सुवर्णपदक जिंकले तेव्हाही अशीच क्रीडाप्रेमाची अशीच लाट आलेली. पण ते तेवढेच. त्यानंतर कुठेही मोठ्या प्रमाणावर गुणवत्ता हेरून ती विकसित करण्याचे प्रयत्न झाल्याचे दिसले नाही. माजी खेळाडूंनी ज्या अकॅडेमीज सुरु केल्यात त्यातून खेळाडू घडताहेत पण त्या अकॅडेमीज सगळ्यांना परवडणाऱ्या नाहीयेत. खेळणारी मुले जिथे आहेत तिथे त्यांना अकॅडेमीत दिले जाणारे प्रशिक्षण आणि फॅसिलिटीज सरकारने स्वतः द्यायला हव्यात. त्या ऑलिम्पिकपासून ह्या ऑलिम्पिकपर्यंत काहीही फरक पडलेला नाही हे नुकतेच बिंद्राने केलेल्या एका वक्तव्यावरून लक्षात येते.

सिंधू संस्कृती नक्कीच निर्माण होईल. फक्त सरकार आणि लोक दोघांनीही आपली मानसिकता बदलायला हवी.

अगदीच बरोबर साधना
भारताचे मेडल्स कमी दिसत असले तरी ह्या खेळाडुना ज्या स्ट्रगल मधुन जावे लागते तितके कदाचीतच दुसर्या खेळाडुना जावे लागत असेल

>>>>इथे खेळाडू टॉपला पोचला कि त्याच्या आरत्या सुरु होतात, त्याजागी अगदी शहरपातळीवरून सुरवात करून लोकांनी खेळणार्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. <<<<

+ १

=====

लेख आवडला.

लेख आवडला. सिंधू अप्रतिम खेळली. क्रिकेटनंतर पहिल्यांदा वेड लावलं या सामन्याने.
अवांतर : शिर्षकावरुन आर्य आणि आर्यतेर संस्कृतीवर लेख आलाय असं वाटलं. Sad

-दिलीप बिरुटे

छान लेख, पदक हुकलेल्या, किंवा स्पर्धेत भागही घेऊ न शकलेल्या खेळाडूंच्या काही कहाण्या पुढे येताहेत. ( काल तर एका चिमुरडीने प्रवासाला पैसे नाहीत म्हणून आत्महत्या केल्याची बातमी होती ) भारतात या सर्व क्रिडाप्रकारांचा अवेअरनेस आला तर निदान या खेळाडूंचे आर्थिक प्रश्न तरी सुटावेत.