गझल

Submitted by डॉर्सी on 18 August, 2016 - 08:18

दुनियेला मी दावत नाही घाव कधीही
आणत नाही खोटा खोटा आव कधीही

माणुस मिळतो स्वस्तामध्धे, महाग वस्तू
राजकारणी कोठे बघतो भाव कधीही

किती असावी खोल मनाची जखम,दिलेली
मला न घेता आला याचा ठाव कधीही

प्रेम ,भावना ,मदत ,ऐकता, आपुलकी पण,
मला न दिसले स्वप्नांमधले गाव कधीही

नावानंतर तिच्या कुणाचे नाव असू दे
ना विसरावे मनात मझे नाव कधीही

नियती जे जे खेळ म्हणाली खेळत गेलो
अर्ध्यावरुनी कुठे सोडला डाव कधीही

माझी किंमत कधीच त्यांना कळली नाही
लावत गेले हवे हवे ते भाव कधीही
--डॉर्सी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://www.maayboli.com/node/59781

येथे तुम्ही विचारल्यानुसार लिहीत आहे.

दुनियेला मी दावत नाही घाव कधीही
आणत नाही खोटा खोटा आव कधीही<<<< आव मुळातच खोटा असतो. त्यात खोटा हा शब्द दोनवेळा घेऊन आठ मात्रा खर्च होत आहेत. त्यांचा विनियोग शेर अधिक गहिरा करण्यासठी होऊ शकेल. दाखवत चे दावत हे रूप शक्यतोवर वापरू नये (असा अलिखित संकेत आहे).

माणुस मिळतो स्वस्तामध्धे, महाग वस्तू
राजकारणी कोठे बघतो भाव कधीही<<<< स्वस्तामध्ये असे लिहा. दोन ओळींंमधील संबंध क्षीण वाटत आहे.

किती असावी खोल मनाची जखम,दिलेली
मला न घेता आला याचा ठाव कधीही<<< दुसरी ओळ चांगली आहे. पहिल्या ओळीतील 'दिलेली' शब्दामुळे 'कोणी दिलेली' ह्याचा (निदान अस्पष्ट) उल्लेख असायला हवा अशी अपेक्षा निर्माण होते. एक तर ही अपेक्षा निर्माण होऊ नये असे काहीतरी करा किंवा कोणी दिली ह्याचा अस्पष्टसा उल्लेख तरी करा.

प्रेम ,भावना ,मदत ,ऐकता, आपुलकी पण,
मला न दिसले स्वप्नांमधले गाव कधीही<<<< एकता असे लिहा, ऐकता नव्हे. आपुलकी शब्दानंतर आलेला 'पण' अनावश्यक होत आहे. तेथे दोन मात्रांचा एखादा अधिक प्रभावशाली शब्द योजता येतो का बघा. दुसरी ओळ छान!

नावानंतर तिच्या कुणाचे नाव असू दे
ना विसरावे मनात मझे नाव कधीही<<<< पहिल्या ओळीतील कुणाचे हे खरे तर कुणाचेही असे असायला हवे. तसे करण्यासाठी ओळ 'नावानंतर तिच्या हवे ते नांव असू दे' अशी करता येईल. दुसर्‍या ओळीत 'तिने माझे नांव मनातून विसरू नये' असा आशय स्वच्छपणे उतरत नाही. ओळी सुबक व्हाव्यात इकडे कल ठेवायला हवा. (माझे ह्या शब्दाचे चुकून मझे झालेले दिसत आहे, टायपो)

नियती जे जे खेळ म्हणाली खेळत गेलो
अर्ध्यावरुनी कुठे सोडला डाव कधीही<<< छान शेर! अर्ध्यावरुनी ऐवजी अर्ध्यावरती अधिक चपखल होईल.

माझी किंमत कधीच त्यांना कळली नाही
लावत गेले हवे हवे ते भाव कधीही<<<< शेरात रदीफ अनावश्यक होत आहे. असे होता कामा नये. 'कधीही' हा शब्द प्रत्येक शेरात समर्थनीय ठरायला हवा (ह्या गझलेत). तसेच, 'हवे हवे ते' ह्या शब्दसमुहात एक 'हवे' हा शब्द भरीच होत आहे. अर्थात, 'हवे ते' आणि हवे हवे ते' ह्यातील अर्थछटा थोडी वेगळी आहे हे ठीक, पण ह्या विशिष्ट शेरात तुम्ही ती 'हवे ते' ह्याच अर्थाने वापरल्यामुळे एक 'हवे' भरीचा ठरतो. तेथे अधिक गहिरा शब्द योजता येईल का बघा.

शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

गझलेला शीर्षक असायची खरे तर गरज नसते, पण आपल्याच सोयीसाठी एखादे शीर्षक देऊन ठेवलेले बरे पडते. सगळ्यांच्याच गझलांचे शीर्षक जर गझल असे झाले तर गोंधळ होईल. शक्यतो मतल्याची पहिली ओळ शीर्षक म्हणून द्यावी, त्यामुळे गझल नीट आठवते. हा प्रतिसाद विशेष करून मुशायर्‍यात गझल सादर करण्याच्या अंगाने दिलेला आहे. आंतरजालावर सगळे काही आरामात शोधता येते हे ठीकच!

मी लिहलेल्यांपैकी पहिली गझल आहे ही सर

म्हणून प्रतिसाद हवा होता
आपण छान लिहिता म्हन्णून मागून घेतला

माझ्या प्रवासात मी कुठ्वर आलो आहे हे समजण्यासाठी पहिली लिहिलेली गजल टाकणे योग्य वाटले