कोणावाचुन आडत नाही

Submitted by निशिकांत on 12 August, 2016 - 01:26

खुशाल चेंडू जगात कोणी
कोणासाठी थांबत नाही
चंगळवादी जगी कुणाचे
कोणावाचुन आडत नाही

गतकालाचे सोनेरी क्षण
आठवतो अन् गुदमरतो मी
आयुष्याच्या सायंकाळी
इतिहासातच गुरफटतो मी
वर्तमान वांझोटा आहे
विशेष कांही घडत नाही
चंगळवादी जगी कुणाचे
कोणावाचुन आडत नाही

टोच नसावी तरी टोचते
काळजास का शल्य एवढे?
कुणी न उरले, उडून गेले
जीवनात जोडले जेवढे
एक कवडसा उजेडही पण
देव अताशा धाडत नाही
चंगळवादी जगी कुणाचे
कोणावाचुन आडत नाही

खचून गेलो कष्ट करोनी
रोज कमवण्या दोन भाकरी
धीर द्यावया कुणी म्हणाले
जीवन आहे एक लॉटरी
वाट पाहिली युगेयुगे मी
कधी निघाली सोडत नाही
चंगळवादी जगी कुणाचे
कोणावाचुन आडत नाही

स्वैराचारी नव्या पिढीला
उपदेशाचे किती वावडे !
पाश्चांत्त्यांच्या अनुकरणाचे
स्तोम माजले आज केवढ !
मूग गिळोनी गप्प बसावे
परंपरा मी सोडत नाही
चंगळवादी जगी कुणाचे
कोणावाचुन आडत नाही

आज ठरवले ललकारावे
जीवनास निधड्या छातीने
अंधाराला कशास भ्यावे
मंद तेवणार्‍या ज्योतीने?
भीक मागण्या देवापुढती
हात अता मी जोडत नाही
चंगळवादी जगी कुणाचे
कोणावाचुन आडत नाही

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users