आणू नकोस व्यत्यय बहरात वादळांच्या!

Submitted by सत्यजित... on 11 August, 2016 - 07:21

खबरी तश्या अताही येतात वादळांच्या...
मी एकटाच हल्ली शहरात वादळांच्या!

घालू नकोस रुंजी कानात वेदनेच्या...
आणू नकोस व्यत्यय बहरात वादळांच्या!

दारांस चौकटींचा आधार सापडावा...
झालो तसा हवाली निष्णात वादळांच्या!

मैलागणीक अंतर सरते असेच नाही...
कुठली दिशा कुणाची वेगात वादळांच्या!

घुमते अजून बंदिश ‘खोलीत' मैफिलीच्या...
कुठला न ‘राग' कळतो मौनात वादळांच्या!

बदलून कात थकलो दररोज मी परंतू...
खाणा-खुणा तरीही अंगात वादळांच्या!

झाली अता-अताश्या ही जिंदगी सुरंगी...
प्रतिमा चितारली मी रंगात वादळांच्या!

—सत्यजित

Group content visibility: 
Public - accessible to all site users