ओला कचरा - सुका कचरा

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 August, 2016 - 11:44

सध्या मी जिथे टेंपरवारी मुक्कामाला आहे त्या सोसायटीमध्ये ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळा काढायचा असा प्रकार नव्यानेच चालू झाला आहे.
पण सोसायटीतील सर्वच रहिवाशी या प्रकाराबद्दल अनभिज्ञ आहेत.
म्हणजे, कुठला कचरा ओला कचर्‍यात मोडतो आणि कश्याला सुका कचरा म्हणावे याबाबत सर्वांचाच गोंधळ आहे.

उदाहरणार्थ, जेवणाचे खरकटे ओल्या कचर्‍यात जायला हवे याबाबत कोणाचे दुमत नाही. पण बाहेरून पार्सल मागवलेल्या अन्नाच्या पिशव्या, डबे, कागदी थैल्या, दही-श्रीखंडाचे डबे, वगैरे सुक्या कचर्‍यात टाकायच्या की ओल्या कचर्‍यात जमा करायचे याबाबत लोक अजून संभ्रमात आहेत. येथील सेक्रेटरीच्या मते त्या पिशव्या आणि डबे धुवून वा पुरेसे साफ करून सुक्या कचर्‍यात टाकाव्यात. पण सोसायटीतील मध्यमवर्गीय रहिवाश्यांच्या मते हा त्रास आहे, आणि त्याऐवजी साफसूफ न करता त्या पिशव्या/डबे ओल्या कचर्‍यात टाकायचे की सुक्या कचर्‍यात ठेवायचे एवढेच काय ते सांगा असा आग्रह आहे. एका द्रुष्टीने पाहता साहजिकच आहे म्हणा. कालपर्यंत बिचारे मस्त पावसाळी वातावरणाचा आनंद उचलत समोरच्या भटाकडून बटाटेवडे अन भज्या आणून त्यांचा सोफ्यावर ऐसपैस पसरून आस्वाद घेत होते आणि पोटाची तुंबडी भरताच सोफ्यावरूनच बसल्याबसल्या त्या पुडक्याला डस्टबिनचा रस्ता दाखवत होते. पण आता मात्र खाऊन झाल्यावर त्या वड्यांसोबत कागदाला लागलेला त्याचा चुरा झटका, उरलेली चटणी आणि तळलेल्या मिरच्या वेगळ्या करा. मग ती शिल्लक एका डब्यात टाका, तर ते साफसूफ केलेले पुडके बाजूला ठेवा. कोणी सांगितलेय एवढे...

आज सकाळी तर कहर वाद झाला. लहान मुलांचे डायपर सुक्या कचर्‍यात टाकायचे की ओल्या कचर्‍यात यावरून घमासान पेटलेले. काही बायकांच्यामते तो ओला कचरा होता, कारण त्यात मलमूत्र असते. पण येथील सफाई कामगार बाईंच्या मते तो सुका कचरा होता. तिने त्यांच्यासमोर तो डायपर ओल्या कचर्‍यातून काढून सुक्या कचर्‍यात टाकले आणि वर त्या बायकांना असेही ठणकावले की तुम्ही पुन्हा डायपर ओल्या कचर्‍यात टाकला तर पुढच्यावेळी तुम्हालाच सर्वांसमोर हात घालून तो ओल्या कचर्‍याच्या डब्यातून काढून सुक्या कचर्‍यात टाकायला लावेन. एक दोन बायका तिच्याशीही सहमत होत्या. मनापासून सहमत होत्या की ईतर बायकांशी स्कोअर सेटल करत होत्या त्यांचे त्यांनाच ठाऊक. मी तो वाद अगदी जवळून बघत होतो, पण मला माझे मत प्रदर्शित करता येत नव्हते की साधी मान डोलावता येत नव्हती. कारण मी स्वत: सुद्धा कन्फ्यूज होतो की डायपर नक्की ओल्या कचर्‍यात येतो की सुक्या कचर्‍यात. कारण आमच्यावेळी अशी काही पद्धत नव्हती.

असो, तर एकंदरीत चारपाच दिवस सतत वाद होत आहेत. तसेच ईथे कोणाकडेही, अमुकतमुक ओला कचरा आणि अमुकतमुक सुका कचरा, हे अधिकारवाणीने सांगता येईल अशी माहिती नसल्याने वादाचा निवाडाही होत नाहीये.
तर, लोकांच्या सवयी बदलतील तश्या बदलतील, पण मायबोलीवरच्या कोणाकडे अशी पद्धत राबवली जात असेल तर थोडक्यात पण सविस्तर काय सुका अन काय ओला हे सांगत काही जास्तीच्या टिप मिळतील का... धन्यवाद! ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कारण मी स्वत: सुद्धा कन्फ्यूज होतो की डायपर नक्की ओल्या कचर्‍यात येतो की सुक्या कचर्‍यात. कारण आमच्यावेळी अशी काही पद्धत नव्हती.>>
छान!

जज्याचे नैसर्गिकरीत्या सहज विघटन होईल तो ओला कचरा. बहुतेक निसर्गनिर्मित जिन्नस.
Manufactued ते ते सुका कचरा.
कागद दोन्हींत मोडतो. शक्य तिथे सुक्या कचर्यात. प्लास्टिक सुक्याच कचर्यात.
पण लोक ओला कचरा प्लास्टिकच्या पिशवीत घआलून टाकतात.

सुका कचरा = पुनर्वापर (रिसायकल) करतायेण्याजोगा कचरा. यात प्लॅस्टिक, धातू (मेटल) , काच, कागद/ पुठ्ठा यापासून केलेल्या वस्तू येतील. (तेल लागलेले कागद यात टाकू नये)
आमच्या शहरात वरील कचऱ्यात समाविष्ट न होणाऱ्या गोष्टीचे आणखी दोन भाग होतात
१. कंपोस्ट : ज्या वस्तू विघटीत होऊन चटकन मातीत रुपांतरीत होतात (स्वयंपाकघरातील कचरा जसे भाज्याची देठ, हाडं, इ.)
२. गारबेज: या सगळ्यात न येणाऱ्या वस्तू. डायपर इकडे.
तुमच्याकडे हे दोन भाग नसतील तर पुनर्वापर न करता येणारा तो सगळा ओला कचरा. ओला हा गोंधळात टाकणार शब्द आहे. त्याचा पाण्याशी संबध नाही.

पॉलिथिन पिशव्या गोळा करणाऱ्या स्पेशल ठिकाणी त्या टाकाव्या. कारण पुनर्वापरयोग्य करण्यासाठी काही विशिष्ट सुविधा लागतात. अन्यथा प्लास्टिक पुनर्वापर करण्याच्या यंत्रात त्या अडकतात.

बरेच ठेकेदार हा वल्ला सुख्खा शेव्टी एकत्रच करतात जल्ला फिदीफिदी >>>> हो हाच अनुभव आहे तरी ही मी वेगवेगळाच करते

आमची कचरावाली ओला सुका वेगळा करून भंगारवाल्याला विकायची.
त्यांनी नाही केलं तर कचरावेचक लोक करतात हे काम. स्त्रीमुक्ती संघटना अशा कचरावेचकांना प्रशिक्षण आणि ओळखपत्र देते. पण त्यांचे प्रमाण किती असणार? त्यांचे = अशा कचरावेचकांचे.

साती,
ते वाक्य माझ्या आईच्या तोंडचे. मला माझ्या बालपणी असे म्हणायचे होते. गैस नसावा.

२. गारबेज: या सगळ्यात न येणाऱ्या वस्तू. डायपर इकडे.
>>>
सध्या तरी असे आणखी दोन भाग नसल्याने डायपर प्रश्न अनुत्तरीतच राहणार तर.

असो, मी थोडा गूगलसर्च केला. त्यातून मला माझ्या अल्पबुद्धीने आढळलेली गाईडलाईन अशी. सर्वप्रकारचे अन्नपदार्थ, खाण्याच्या गोष्टी या ओला कचरा. ईतर सारे सुका कचरा. आता यात काय काय बसवता येईल हे बघायला हवे.

आमच्या सोसायटी मध्ये ३ प्रकार आहेत

१। कंपोस्ट करण्याजोगा कचरा, उरलेले अन्न, भाज्यांचे देठ वगैरे

२। पुनर्वापर (रिसायकल) करण्याजोगा कचरा. कागद, प्लास्टिक, खोके इत्यादी

३। वापरलेले डायपर, सॅनिटरी नॅपकिन, कंडोम, खाद्यपदार्थ लागलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या इत्यादी

जर कन्फ्युजन असेल तर तिसऱ्या प्रकारात टाका अश्या सूचना आहेत. कारण पहिल्या दोन प्रकारात भेसळ चालत नाही. पहिला आम्ही सोसायटी मधेच रिचवतो. दुसरा "ग्रीन रद्दीवाला" म्हणून एक आहे त्याला विकतो आणि तिसरा सरकारी डंपिंग मध्ये पाठवतो.

साधारण फक्त १० ते २०% कचरा सरकारी डंपिंग मध्ये जातो. तो पण वर्तमान पत्रामध्ये गुंडाळून प्लॅस्टिकच्या बॅग मध्ये टाकतात लोकं मग सफाई कामगारांना हाताळायला सोपं जातं

आता एक्सपायरी डेट संपलेल्या औषधांचं काय करायचं असा प्रश्न विचारताहेत काही जण. सरकारी डंपिंग मध्ये टाकणं चुकीचं आहे आणि रद्दीवाला घेत नाही.

जपान मधे डायपर ओल्या कचर्‍यात टाकतात पण टाकण्या आधी त्यातली पॉटी शक्यतो टॉयलेट मधे फ्लश करतात तसेच सॉस जॅम लोणचे वैगरेच्या बाटल्या धुवुन कच र्‍यात टाकतात ओल्या सुक्या कचर्‍याचे वेग वेगळे वार असतात ठराविक प्रकारच्या कचर्‍याच्या बॅगा मिळतात त्यात कचरा भरावा लागतो फर्निचर सायकल किंवा मोठे सामान फेकायचे असेल तर त्यांना फोन करुन सांगायला लागते व ते फेकण्याचे पैसे द्यावे लागतात

13533077_1044092389012539_4725126116655165667_n.jpg13528892_1044092965679148_8526129810025899782_n.jpg

हे येथिल डस्टबिन चे दोन फोटो..

बॉडी फ्लुइड्स, एक्स्क्रीटा, एक्स्पायर्ड मेडिसीन्स, घरी वापरलेल्या इन्शुलिन सिरिंजेस, सुया, इ. हे बायोमेडिकल हॅझार्डस वेस्ट मधे मोडणारे प्रकार आहेत. याच्यासाठी वेगळी कॅटॅगरी करायला हवी. याच्या डिस्पोजलचे व सेग्रिगेशनचे मार्गही वेगळे असतात.

"डिस्पोजेबल" डायपर्स, सॅनिपॅड्स या दोन्ही बाबींच्या कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न फार मोठा व किचकट आहे (यावर काही चर्चाही घडून गेलेल्या आहेत, सापडल्या की लिंकवतो). या दोहोंत वापरलेले अ‍ॅब्सॉर्बंट मटेरियल अजिबात बायोडिग्रेडेबल नसते. शिवाय त्यात आजारी बाळे / व्यक्तींपासून निघणारी उत्सर्जने असतील तर त्यातील जंतू, जीवाणूंमुळे तो एक मोठा पब्लिक बायोहॅझार्ड बनतो. डायपर वा सॅनिपॅड दवाखान्यातून फेकलेत तर त्यासाठी वेगळी व्यवस्था आहे. व हा कचरा घेऊन जाण्यासाठी डॉक्टरांकडून पैसे वसूल केले जातात. (कचर्‍याचे वजन्/बेड संख्या इ. नुसार) सामान्य घरांतून निघणार्‍या अशा कचर्‍याबद्दल अशी कोणतीही व्यवस्था नाही.

पूर्वी घरांत वापरलेली दुपटी / 'घड्या' धुवून, उन्हात सुकवून परत वापरली जात, हा प्रकार माझ्यामते जास्त "सॅनिटरी" होता.

छान माहिती कांदाजी.

पूर्वी घरांत वापरलेली दुपटी / 'घड्या' धुवून, उन्हात सुकवून परत वापरली जात, हा प्रकार माझ्यामते जास्त "सॅनिटरी" होता.
छान मुद्दा मांडलात.

विषय महत्वाचा आहे..@टग्या अभिनंदन आपले आणि आपल्या सोसायटीचे. बाकी असले अनुभव (महाराष्ट्रातील) वाचाय आवडतील, बदल होतोय हि खूप आनंदाची बाब आहे.

आता एक्सपायरी डेट संपलेल्या औषधांचं काय करायचं असा प्रश्न विचारताहेत काही जण.
>>>
परवाच माझ्या रूममेटने एका बाटलीतील टॅबलेटस ओल्या कचर्‍यात टाकत रिकाम्या बाटलीची सुक्या कचर्‍यात वासलात लावली. सफाई कर्मचार्‍यांनीही यावर आक्षेप न घेता पास केले.

हल्ली आमच्याकडे कुठलाही कचरा टाकताना `ओला की सुका' असा खेळ चालतो. आज आम्हाला घरातल्या एका कोपर्‍यात महिलेचे केस सापडले, म्हणजे नक्कीच घरकाम करणार्‍या मावशींचेच असतील. `या कचरा काढायला येतात, की करायला येतात', असा डायलॉग मारत मित्राने तो केसांचा पुंजका कागदाच्या चिमटीत पकडून माझ्यासमोर धरला, आणि मला विचारले, `रुनम्या हा ओला कचरा की सुका कचरा?... मलाही चटकन उत्तर नाही सुचले. अखेर आमच्या फंड्यानुसार भारतात केस खात नाहीत असे म्हणत आम्ही त्याला त्या कागदासह सुक्यात जमा केला Happy