नको भुलू जाहिरातींना !

Submitted by मुंबई ग्राहक पं... on 2 August, 2016 - 02:11

ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी बनवलेल्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी ग्राहकांनीच एकत्र येऊन या विरोधात आवाज उठवला पाहिजे. नाहीतर जाहिरातीचे युग आहे असे म्हणत या अतिरंजीत, खोटे दावे करणा-या जाहिरातींचा भडीमार होत राहणार. त्यासाठी अ‍ॅडव्हर्टायझिंग स्टॅण्डर्ड कौन्सिल ऑफ इंडिया कार्यरत आहे. त्यांनी अ‍ॅप्सवरून तक्रार करण्याची सोय केली आहे. जाहिराती विरोधात तक्रार नोंदवा आणि त्याचा पाठपुरावा करा. जाहिरात ही ६५ वी कला आहे असे समजले जाते. जाहिरात कंपन्यांनी ही कला धनप्राप्तीसाठी अवगत करून घेतली आहे.
stock-photo-11534101-sales-advertisements-collage[1].jpgभारत हा एक प्रगतशील, जास्त लोकसंख्या असलेला तसेच जगातील सर्वात जास्त, जवळजवळ ६५ टक्के तरुणवर्ग असलेला देश आहे. इथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांना व्यापारासाठी भरपूर वाव आहे. असे असले तरी स्पर्धाही तितकीच आहे. त्यामुळे या कंपन्यांना आपले उत्पादन इतरांपेक्षा वेगळे व जास्त चांगल्या प्रतीचे कसे आहे, हे पटवून देण्यासाठी जाहिरात या साधनाचा आधार घ्यावा लागतो.

स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपलेच उत्पादन उत्तम हे ठासून सांगताना या जाहिरातीचा ब-याचदा तोल सुटतो. पाहणा-या ग्राहकाला ते कळत नाही पण त्याचा दुष्परिणाम जाहिरात बघणा-यावर म्हणजेच ग्राहकावर होतो.

जाहिरात करण्यासाठी रेडिओ, वृत्तपत्र, चित्रपटगृह, होर्डींग्स्, कार्यक्रमाची स्पॉन्सरशीप तसेच बस, ट्रेन व इंटरनेटचे महाजाल या सर्वाचा वापर केला जातो. यापैकी टिव्ही हे माध्यम अतिशय प्रभावशाली माध्यम आहे. कारण आज देशातील सर्वस्तरातील लोकांपर्यत टीव्ही पोहोचलेला आहे. या माध्यमाद्वारे दृकश्राव्य पद्धतीने प्रसारित केलेल्या जाहिराती थोडय़ाच वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचू शकतात.

जाहिरातीच्या प्रसारणासाठी काही नियम व कायद्याचे बंधन आहे.

जसे की या जाहिराती सत्याला धरून असाव्यात, त्यातील दावे शास्त्रीयदृष्टय़ा सिद्ध करता यावेत, तसेच स्त्री देहाच्या अश्लील प्रदर्शनास बंदी व जात-धर्म, देश यांचा अपमान करण्यासही जाहिरातींना बंदी आहे. याशिवाय मद्याच्या जाहिरातींनाही मनाई आहे.

या कायद्याचे व नियमांचे पालन जाहिरात करताना केले जाते का, याचे उत्तर काही जाहिराती बघताना तरी नाही असेच येते. एखादे ब्रॅण्ड नेम, सेलेब्रिटी यांना घेऊन बनवलेल्या जाहिराती दाखवताना पंचलाईनचा वापर केला जातो. तसेच लहान मुलांचा वापरही मोठय़ा प्रमाणात केला जातो. लोकसंख्येच्या १/२ भाग पंधरा वर्षाखालील मुलांचा आहे, मुले दिवसातून तीन तास व सुट्टीच्या दिवसात तीन ते सात तास टीव्ही बघतात, असा सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे.

याचाच फायदा घेऊन जाहिरात बनवताना लहान मुलांना लक्ष्य केले जाते. मुलांनी शाळेत जाताना डब्यात काय न्यावे, मधल्या वेळेत किंवा सुट्टीत मुलांना काय द्यावे हे दाखवताना मुलांचाच वापर करून जाहिराती चित्रीत केल्या जातात. चपातीला केवळ जाम लावून रोल करून नेला की मुले पटापट डबा संपवतात, मधल्या वेळात पटकन होणा-या चायनीस नुडल्स् मुलांना आया पण खुशीने देतात. या वाढीच्या वयात मुलांना लागणारी भाज्या, कडधान्ये यातील पोषणमूल्ये रोज जाम/नुडल्स् खाऊन मिळतील का? या व्यतिरिक्त या पदार्थातील साखरेचे जास्त प्रमाण, कृत्रीम रंग, प्रिझर्वेटिव्ह याचा दुष्परिणाम शरीरावर होणार तो भाग वेगळाच.

कित्येकदा जाहिरातीतून मुलांच्या तोंडात वडीलधा-यांना उद्धटपणे बोलणारे संवाद दिले जातात. जसे की मुलगा आपल्या वडिलांना विचारतो, ‘तुम समझते नही हो क्या?’ सतत चालू असणा-या या जाहिरातीतून मुलांवर खाण्यापिण्याचे व वागण्याचे काय संस्कार केले जातात? देशाची पुढील पिढी सुदृढ सुसंस्कृत कशी बरे बनेल?

लिक्विड सोपची जाहिरात दाखवताना जास्त वेळ घेऊन स्वच्छ हात धुणा-या विद्यार्थ्यांला दुसरा विचारतो. ‘तुझा साबण स्लो आहे का?’ या इथे साबणाचा मळ काढण्याचा गुणधर्म न दाखवता त्याचा उल्लेख ‘स्लो’ असा करून दिशाभूल करण्यात आली आहे. त्याच ब्रॅण्डचा बेदिंग सोप एका नव्या रूपात येऊ घातला आहे. त्यात ‘चांदीचे शक्तीशाली संरक्षक’ असा दावा केला आहे. (आंघोळीच्यावेळी काही क्षणच अंगावरून फिरणा-या साबणातला जो काही चांदीचा अंश असेल तो संरक्षक कसा असू शकेल?) प्रत्यक्षात काय ते बाजारात साबण आल्यावरच कळेल.

परंतु तो परिणामकारक आहे हे दाखवताना त्याची तुलना लाडवावरील चांदीच्या वर्खाशी केली आहे, जो अ‍ॅल्युमिनिअमचा ही असू शकतो. (लाडवाच्या किमतीत चांदीची किंमत आकारली असतीच). तसेच चांदीच्या चमच्यातून बाळाला पाणी पाजण्याच्या परंपरेचा केलेला उपयोग, ग्राहकांना पटकन् आकृष्ट करणारा ठरतो. शिवाय ही तुलना सुप्रसिद्ध नायक/नायिका करतात त्यामुळे ग्राहकावर त्याचा निश्चितच प्रभाव पडू शकतो. ज्याचा परिणाम साबणाची किंमत प्रचंड मोठी आकारण्यास होऊ शकतो.

हेल्थड्रिंकची जाहिरात करताना, त्याचा प्रयोग मुलांच्यावर केला आहे व तो सकारात्मक झाला आहे असे दाखवतात, पण पोटभर धड अन्न न मिळणा-या मुलांच्यावर हा प्रयोग होतो का? हे कोण पडताळून पहाणार? तसेच तो जाहिरात करूच शकत नाही, त्यामुळे डॉक्टरांचा कोट घालून एखादा कलाकार डॉक्टर बनतो. हा खोटेपणा सामान्य प्रेक्षकास कळतोच, असे नाही.

मद्याच्या जाहिरातींवर मनाई असल्याकारणाने सोडा, स्पोर्ट्स् ड्रिंक किंवा मिनरल वॉटर या नावांखाली मद्याच्या जाहिराती दाखवल्या जातात. या संदर्भात ग्राहक संरक्षण कायद्यातील जाहिरात विषयक तरतुदींचा सखोल अभ्यास करून, मुंबई ग्राहक पंचायतीने जो ऐतिहासिक निर्णय मिळवला, तो महत्त्वाचा आहे. त्यावेळी ‘युनायटेड ब्रेवरिज्’ या मद्याच्या जाहिराती रेल्वेच्या डब्यावर लावण्यात आल्या होत्या. या विरोधात संस्थेने यशस्वी न्यायालयीन लढा दिला, आणि पाठपुरावा करून त्या काढायला लावल्या.

त्या बदलत्यात आठ दिवस ‘नैसर्गिक पेय हेच उत्तम पेय’ आहे, अशा स्वरुपाच्या जाहिराती कंपनीच्या खर्चाने करण्यास भाग पाडल्या. हे खरच प्रशंसनीय आहे. ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी बनवलेल्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी ग्राहकांनीच एकत्र येऊन या विरोधात आवाज उठवला पाहिजे. नाहीतर जाहिरातीचे युग आहे असे म्हणत या अतिरंजीत, खोटे दावे करणा-या जाहिरातींचा भडीमार होत राहणार. त्यासाठी अ‍ॅडव्हटायझिंग स्टॅण्डर्ड कौन्सिल ऑफ इंडिया कार्यरत आहे. त्यांनी अ‍ॅप्सवरून तक्रार करण्याची सोय केली आहे. जाहिराती विरोधात तक्रार नोंदवा आणि त्याचा पाठपुरावा करा.

नुकताच ‘युथ सर्वे’ या सर्वेक्षणा अंतर्गत ७७ टक्के तरुणाई फेसबुक व ६४ टक्के तरुणाईसाठी ट्विटरप्रिय आहे, असा अहवाल प्रसिद्ध झाला. या माध्यमाद्वारे ही तरुणाई सेलेब्रिटीजना सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देऊ शकेल काय? त्यासाठी याच तरुणाईने जाहिराती योग्य कोणत्या आणि आक्षेपार्ह कोणत्या, हे अभ्यासपूर्वक जाणून घेतले पाहिजे.

- रंजना मंत्री, मुंबई ग्राहक पंचायत

दैनिक प्रहार मध्ये पुर्वप्रकाशित.

सदर लेख मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभागाच्या http://punemgp.blogspot.in या ब्लॉगवरही प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवर या पुर्वीचे असे ग्राहक माहितीचे लेख आपणांस वाचता येतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलांना तर हमखास टारगेट केलं जातं ह्या जाहीरातीत.>>>>> +१
मला तर अजुनही कळत नाही.विथाऊट बॉर्नव्हिटा दुध पिनार्या आधी च्या लोकांना व्हिटामीन डी नसेल का मिळत ??? Uhoh

१. कॉम्प्लान्/हॉर्लिक्स पिऊन मुलाची उंची इतर पेयांच्या दुप्पट वाढली.(यापुढे पोरांची उंची वाढवायला या पेयांत टेस्टरोस्टोन वगैरे ग्रोथ हार्मोन(नाव चुकले असेल) टाकली तर आश्चर्य मानू नये.कोण किती लवकर पोराला ताणून किती जास्त लांब करतो याची ही रेस आहे.)
२. हे न पिणार्‍या मुलांना लटकूराम म्हटले जावे.
३. छोटा भीम चे प्रॉडक्ट कसे मिळाले विचारणार्‍या पोराला 'सनफिस्ट नुडल्स नही खाते क्या, पता नही' वगैरे हिणवणे.
४. फ्लॅट स्क्रिन टिव्ही नसलेल्या(पण त्यांच्या दृष्टिने भारी मोठा टिव्ही असलेल्या) माणसाला 'अंकल का टिव्ही डब्बा' असे धोनीने आणि मग बाकी सर्व मुलांनी म्हणणे.
५. पाँडस/घरातली जनरिक पावडर लावणार्‍या प्रत्येक पुरुषाला तो ही पावडर लावताक्षणीच ट्रान्स जेंडर बनून लाऊंजरी घालून बाई बनेल असे काहीतरी चित्र डोळ्यासमोर आणणे.
६. 'चॉकलेट खाल्ले तर आई ओरडत नाही का' विचारणार्‍या कोचची 'तू ब्रश करतोस तरी आई ओरडते का, नीट पेस्ट वापरत नाहीस का' म्हणून उलटी हेटाई करणे.
७. आल्पेनलिबी जेली ची आजोबा मुलाची जाहीरात.

मला जाहिरात म्हणून साने गुरुजींचे पाठ द्या असं म्हणायचं नाही पण थोडे एथिक्स हवेत.
मला ती एक कोणत्यातरी मसाल्याची/तुपाची जाहिरात आवडायची.ज्यात 'उत्कृष्ठ मसाले बनवणारे तुमच्यानंतर पहिले आम्हीच' अशा काहीतरी लाईन होती.

बोर्नव्हिटा च्या 'तो जिंकतो, मी त्याला मुद्दाम जिंकवून देत नाही' या थीम च्या सर्व जाहिराती छान आहेत.
जागि रे च्या पण आवडायच्या.
ती दोन लहान मुलगे बागेत डी वर वेड्यावाकड्या कॉम्पीटिशन करत असतात ती पण आवडते.