ती....अशीही !!

Submitted by सुप्रिया जाधव. on 31 July, 2016 - 22:15

दिवसाढवळ्या, भर बाजारात
रणरणत्या दुपारी
तिच्या मुलाच्याच वयाच्या मुलाने जेव्हा
दोन-तिनदा बिनदिक्तपणे डोळा मारला तिला
तेव्हा...

सरकन आलेली ओंगळवाणी शिसारी बळेच झटकत
दत्त म्हणुन त्याच्या समोर उभी ठाकत
त्या कमावलेल्या उभ्या-आडव्या बलदण्ड शरीरावरच्या
निगरगटट चेहर्यावरील किळसवाणे भाव असलेल्या डोळ्यात
तिने सर्वप्रथम निरखला आपला पेहेराव

डगळसर कोपरांपर्यन्त बाह्या दुमडलेला चौकटीचा शर्ट आणि जीन्स !
स्वतःमागे त्याची गर्लफ्रेंड नाहीय ना ?
ह्याची खातरजमा झाल्यावर विचारती झाली
काय रे बाबा ...काही प्रॉब्लम ??

चाट पडलेल्या, गडबडलेल्या त्याने
सुरू केला कांगावा...
डोळा लवत असल्याचा,
ऑर्डर केलेल्या ज्युसची वाट पहात फोनवर बोलत उभा असल्याचा
तिने शांत-करारी आवाजात तिची माफी मागण्याच फर्मान सोडलं
पण तरूण सळसळत रक्त, सहजासहजी नमेल तर शपथ !!

कुणालाही काहीही समजायच्या आत
ठेवून दिली तिने एक सणसणीत चपराक
त्याच्या गुळगुळीत दाढ़ी केलेल्या
चिकण्या-चोपडया गालावर !
तितक्याही स्पर्शाची भयंकर घृणा वाटली तिला

त्याने केलेली गयावया तिच्यापर्यन्त पोहोचण्याआधीच
तोंडाचा पट्टा सोडत
पायातली चप्पल तुटेस्तोवर
जीवाच्या आकांताने
तिने सुरू केली त्याची धुलाई !

काय नव्हते त्या आवेशात ?
आजवर बस, रेल्वे, शेयर रिक्शातिल हेतुपुरस्सर झालेले स्पर्श
बैंक, सिनेमा, त्रंबकेेश्वराच्या रांगेतली घसट
चौथीतल्या गणिताच्या गुरूजींचा नको तिथे फिरलेला हात
शेजारच्या डॉक्टरदादाने मागून मारलेली मिठी
मामीच्या भावाचा संधीसाधूपणा..

रस्ता स्तब्ध !
पुतळ्यागत थिजलेली, बोबड़ी वळालेली माणसं

सुपरबाईकवर जाणाऱ्या पाठमोर्या त्याला बघताना
पुन्हा एकवार उचंबळुन आले तिच्यातील सुप्त मातृत्व
ह्यावेळी मात्र....
डोळ्यांच्या ओलसर कडा पुसत
तुटकी चप्पल पायात सरकवत
तिनेही सुरू केली गाड़ी..

सवयीचा रस्ता आक्रमण्यासाठी !

सुप्रिया

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशावादी आणि स्फुर्तीदायक आहे हे काव्यात्मक स्फुट.
सर्व स्रियांनी असं व्हायला हवं. तुटेनात का ४-५ चपला...
बायका डेंजर असतात हे अशा मोजक्या स्त्रियांमुळे समाजात रूजलं तरी बरेच गुन्हे होणार नाहीत.

एक किस्सा आठवला म्हणून लिहिते, मी आणि माझी मैत्रिण खरेदी करताना ग्रीन बेकरी बाहेर खात उभ्या होतो, तिथे ट्रॅफिक हवालदारने दुचाकीवाल्याला पकडले होते आणि दोघांची हुज्जत सुरू होती, मागे बसलेल्याला काही काम नव्हते.. त्याने मला डोळा मारला... मी इतकी खवळले... त्या ट्रॅफिक हवालदाराला सांगितलं पोलिसांसमोर उभं राहून हा असले धंदे करतोय. मग त्याने त्याच्या सिनियरला बोलवून आणले. मला सुद्धा त्याला २ थोबाडीत लावाव्या वाटत होत्या पण मी माझे हात का घाण करू? सिनियर इन्स्पेक्टरने चौकित तक्रार दाखल करायची असेल तर चला ताई असे म्हणल्यावर मी म्हणलं त्याला दोन लाथा घाला आणि घरी पाठवा.
त्या दिवशी पहिल्यांदा मला समाधान वाटलं, कारण त्या अगोदर कुणी पुसट हात लावला, डोळा मारला, तर त्याला उलट जाब विचारण्याचं धाडस माझ्यात नव्हतं.

बायका डेंजर असतात हे अशा मोजक्या स्त्रियांमुळे समाजात रूजलं तरी बरेच गुन्हे होणार नाहीत.>>>. बरोबर

छान लिहिलय Happy

खुप छान लिहिलंय. आपण नुसता जाब विचारला तरी घाबरुन गप्प बसतात हे मुर्दाड.

सुपरबाईकवर जाणाऱ्या पाठमोर्या त्याला बघताना
पुन्हा एकवार उचंबळुन आले तिच्यातील सुप्त मातृत्व
ह्यावेळी मात्र....
डोळ्यांच्या ओलसर कडा पुसत
तुटकी चप्पल पायात सरकवत
तिनेही सुरू केली गाड़ी..

सवयीचा रस्ता आक्रमण्यासाठी !

हेही आवडले.