बेरंग - भाग २

Submitted by अनंत ढवळे on 30 July, 2016 - 11:39

यंदाचा उन्हाळा खूपच तापदायक दिसतो आहे. संध्याकाळ तशी आल्हाददायक असते. दिवसभर पण नुसती काहिली. करोडोंची कंत्राटं पास करत असलो तरी आपण काम करतो ते या जुनाट सरकारी ऑफिसात. इथे एअर कंडीशनिंग नाही. डेझर्ट कूलर दिवसभर आवाज करत सुरू असतात पण जीवाची काहिली काही कमी होत नाही. झक मारली न सरकारी नौकरी धरली. नाहीतर सदाकाकाचा मोठा मुलगा. कुठल्याशा कंपनीत चांगल्या हुद्द्यावर आहे. सांगतो की दिवसरात्र भन्नाट एसी सुरू असतात. स्वतःच्या केबिनमध्ये बसून काम करतो निवांत. बरेचदा तर घरूनच काम करतो. शिवाय अधून मधून परदेशातही जातो. जिथे जाईल तिथले फोटो आपल्याला आवर्जून पाठवतो. त्याच्या भाषेत बोलायचं झालं तर जीवनाचा आनंद लुटतो. हे फोटो बिटो आपल्याला उथळपणाचे लक्षण वाटते एरवी, पण ह्या भावाचे मात्र कौतुकच वाटते. मागे पुढे परदेशातच स्थाईक होइन म्हणत असतो. बाकीचे नातेवाईक हटकतात, पण आपण त्याची नेहमीच पाठराखण करतो. मागे त्याने त्याच्या ऑफिसातले काही फोटो दाखवले. चकचकीत, निळसर काचेरी उत्तुंग इमारती. विचार आला, आपण इथे बक्कळ पैसा मिळवतो पण निव्वळ भंगारात काम करतो आहोत. इमारतीतली लिफ्ट कधीच चालू नसते. सगळ्या जिन्यांच्या भिंती लोकानी पानाच्या पिचकार्या टाकून टाकून रंगवलेल्या. शासन लवकरच बजेट काढणार आहे म्हणताहेत, या इमारतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी. कराल बाबा पण तोवर वैताग आहे. शहरातली प्रचंड गर्दी टाळत टाळत इथवर पोचेतो कंटाळायला होतं. त्यात हा जीवघेणा उकाडा. सरकारी कामांची तगतग, दिवसभर भेटायला येणारे लोक, मंत्र्यांचे दौरे आणि वैतागवाण्या इतर अनेक गोष्टी. त्यात आता कुठलातरी सरकारी महोत्सव आला आहे. साहेबाला यात भारी रस. सगळे नियोजन त्याच्याच हातात आहे. त्याच्याबरोबर आपण आणि चंद्या आहोतच. शिवाय सगळी यंत्रणा. साहेब तर साहेब, त्याचा बापही या बाबतीत भलताच रसिया. आजकाल तोही येऊन बसतो ऑफिसात. मोठमोठ्या गप्पा हाणतो. नको तिथे नाक खुपसतो. नवी पिढी तत्ववादी नाही म्हणत असतो. आम्ही कशी कामे केली पहा म्हणतो. एक पैसा घेतला नाही कुणाचा कधी न काय काय. आपण शांतपणे ऐकून घेतो, काही बोलत नाही; पण चंद्या खूपच वैतागतो. एकतर सध्या पैसा मिळत नसल्याने तो निव्वळ कावलेला असतो आजकाल. त्यात सरकारी कार्यालयांची दुनिया छोटीच; कोणी कुठल्या योजनेत किती मलिदा दाबला ह्याची नेटकी माहिती सगळ्यांकडे असते. एक दिवस साहेबाचा बाप फारच रंगवून आपल्या साधेपणाच्या गोष्टी सांगत होता. बराच वेळ त्याची लामन सुरू होती. शेवटी चंद्याकडून राहावले नाही. म्हणाला साहेब आपण आम्हास वडीलधारे. पण आपण आणि तडपल्लीवार साहेबांनी मिळून उभे तिरना धरण लुटून खाल्ले हे अक्ख्या दुनियेला माहिती आहे. साहेबाचा बाप यावर चाटच पडला. संतापून जो निघून गेला तो पुन्हा ऑफिसकडे फिरकलाच नाही. आपण चंदयाला म्हटलो, चंद्या तुझ्या जिभेला हाड नाही, पक्का अवकाळी आहेस. कधी कुणाची उतरवशील नेमच नाही. पण हे काम जबरी केलंस गड्या. म्हातारा जाम इरिटेटींग आहे. बरा कटवला त्याला. अर्थात साहेबाचा बाप नसला तरी साहेब होताच. हा महोत्सव म्हणजे घरचं कार्य असल्यासारखा लगबगीने फिरत होता पाची दिवस महोत्सवाच्या शामियान्यांमधून. परत आपला परिचय करून द्यायचा कलाकारांसोबत. हे अमुक साहेब, तमुक साहेबांचे नातू. मोठे कलाकार आहे. आपण काय कमी कलाकार आहोत का असे यावर चंद्या हळूच बोलायाचा आणि आपण जाम हसायचो. बरं या कलाकार मंडळींचा थाटही भारीच. एकदा एक उस्ताद आले ते एकदम हळदी रंगाचा तलम झब्बा घालून. तोंडात विडा रंगलेला. गळ्यात पिवळी धम्मक सोन्याची साखळी. सोबत चार पाच प्रौढ बायकांचा घोळका. आपण चंद्याला म्हटलो, साला तू नुसताच तब्ब्येतीने रसिया. असं पिवळं धमक राहाता आलं पाहिजे गड्या ! ह्यावर चंद्या नेहमीच्या स्टाईलीत बकाबका हसला. त्यात ह्या उस्ताद साहेबांनी भलं मोठं लेक्चर दिलं. संस्कृती आणि परंपरा, आपला इतिहास. मग त्यांच्या गुरूच्या गोष्टी नि ह्यांच्या गुरूभक्तीच्या. अनेकदा कानाला हात लावत होते. आपण अशावेळी फार बोलत नाही. ऐकून घेतो. कोण जाणे खरंच मोठा माणूस असावा. आपण मूर्खासारखे काही बोलून तोंडघशी पडायचो. आपला चिंतकाचा पिंड नाहीच, पण बर्‍याच गोष्टी पटत नाहीत आपल्याला. या उस्तादांबद्दल्ही असंच झालं. आपण बराच वेळ ऐकत राहिलो आणि मग काहीबाही सांगून तिथून निघते झालो. आपला साहेब एरवी समजदार, पण त्याला प्रसिद्ध लोकांसोबत मैत्री करण्याचा मोठाच सोस.आता तर त्याच्या उत्साहाला धुमारेच फुटले होते. काहीबाही बोलत होता उगाच मध्ये-मध्ये. मध्येच आपला महागडा मोबाईल दाखवत आपण किती संगीत ऐकले आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता. नको तिथे वाह वाह म्हणत होता. हे उस्ताद आपल्या क्षेत्रात पोचलेले. मनातल्या मनात साहेबाला मूर्खात काढत असावेत असे त्यांच्या सूचक हास्यावरून वाटत होते. या उस्ताद लोकाना अशा उथळ पण महत्वाच्या चाहत्यांची भारीच गरज असते. कलाकार असो वा सरकारी नोकर. शेवटी प्रत्येकालाच पोट आहे. प्रत्येकाला आपापले दुकान चालवायचे आहेच. भूक ही मूलभूत गरज. त्या नंतर येते ती धनेषणा आणि कामेषणा. या नंतर येणारी सामाजिक महत्वाकांक्षा माणसाला अनेक गोष्टी करायला लावते. उथळांसोबत उथळ होणे ही त्यातलीच एक. त्या रात्री त्या विशिष्ट गराड्यात आपणही बराच वेळ उथळ होते झालो. जगराहाटीला सामील होऊन वाहते झालो. असो.

हा महोत्सव एका मोठ्या वास्तूच्या पायथ्याशी होता. मागे भला मोठा भव्य पहाड. लोक त्याला खडक्या पहाड म्हणत. आपण शामियाना सोडून बाहेर आलो. तिथून चालत चालत मागच्या मोकळ्या मैदानात. मध्यरात्रीची वेळ, शामियान्यातून येणारा वीजदिव्यांचा प्रकाश आणि वर चंद्र चांदण्यांचा सावकाश उजाळा. या उजेडात मागचा पहाड प्रचंड दिसत होता. धीरोदात्त. हजार गोष्टी गिळून घेऊन स्थितप्रज्ञासारखा उभा. आपण किती किरकोळ आहोत ह्याची जाणीव त्यावेळी प्रकर्षाने झाली. बहुतेक गोष्टी आपल्या समजण्यापलिकडच्या. निव्वळ अनुमेय, अपरिमेय. आपण उगाचच पहाडाच्या उंचीचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला न मग ओशाळलो. ह्या धीरोदात्त अपरिमेयापुढे आपण निव्वळ मोजण्याइतपतच आहोत.अशा वेळा मोठ्या कठीण असतात. माणूस उगाचच नको त्या गोष्टींबद्दल विचार करू जातो. क्षणभरात डोळ्यांपुढून काय काय फिरून जातं. आपल्या लुटुपुटूच्या लढाया. आपले जय पराजय. चुकलेली हजार गणितं, प्रेम, संभोग, नाती, गोती आणि इतर हजारो गोष्टी. आणि मग एक नीरव शांतता जिच्यात सगळं काही वितळून जातं. उजेड पडण्याचा किंवा आपले सामर्थ्य नाहीसे होण्याचा क्षण. एरवी आपण या सामर्थ्यावर गुपचूप अहंकार बाळगून असतो. माझं शरीर माझ्या ताब्यात आहे. माझी परिस्थिती माझ्या नियंत्रणात आहे. मी सावध आहे. हा अहम मोठा आणि तीव्र असतो. या अशा अनाथ वेळा मात्र सगळ्याच गोष्टींचा विलय घडवून आणतात. उरत असाव्यात त्या ढोबळमानाने फक्त डोंगरापलिकडच्या गोष्टी.आपण त्या निर्व्याज प्रहराचा अनुभव घेतला कितीतरी वेळ. तासाभराने भानावर आलो ते मोबाईलची घंटी ढणाणा वाजली म्हणून.
( क्रमशः ; संपूर्णतः काल्पनिक ; प्रुफ्रिडिंग झालेले नाही)
- अनंत ढवळे
पहिला भाग :

http://www.maayboli.com/node/59512

https://www.facebook.com/anant.dhavale.9/posts/1127840983955820

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही लिहिलेलं काही पहिल्यांदाच वाचत्येय.
खूप छान लिहिता .
खूप मोठे लेखक आहात किंवा होणार आहात नक्कीच.
मायबोलीवर ही कथा/कादंबरी लिहिल्याबद्दल धन्यवाद!

साती + १ . ही कथा रंगत जाणार यात शंका नाही. भाग थोडे मोठे अन सातत्याने टाका जमल्यास. म्हणजे काय वाचकांचा रस टिकून राहिल अन लिंक राहिल.

रंग चढत चाललाय... येऊ द्या पुढचा भाग!

काल्पनिक लिखाणातही तत्वचिंतनाचा मार्ग सोडलेला नाही हे आवडले.

ढवळे साहेब,

दोन्ही भाग खरंच छान झाले आहेत. अनघा जी म्हणताहेत, त्या प्रमाणे ही कथा रंगत जाणार यात शंका नाही. कृपया भाग थोडे मोठे अन सातत्याने टाका.

-प्रसन्न

हाही भाग मस्त... Happy
पण सरकारी कर्मचार्याच्या दृष्टीकोनातुन फारच अलकांरीक,थोडी अवघड भाषा वाटते आहे.

अनाथ वेळा >>> प्रचंड आवडला हा शब्दप्रयोग. शेवटचा पॅरा निव्वळ क्लासिक झालाय. अगदी 'नीट' आहे तुमची शैली, त्यामुळे छोट्या भागामुळेही शॉट बसतोय.

अनुमेय - याला काही अर्थ आहे की त्यात प राहिलाय?