फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन?? कुणासाठी?

Submitted by शर्मिला फडके on 20 February, 2009 - 15:42

आपल्या स्वत:च्या ’लिहिण्याशी’ आपण शंभर टक्के प्रामाणिक आहोत, आपल्याला पटेल तेच आपण लिहिले आहे असे एकदा गृहित धरल्यावर (आणि हे गृहित धरणे ही लेखनाच्या संदर्भातली मिनिमम रिक्वायरमेन्ट आहे) ते जे काही बरं/वाईट हातून उमटलं आहे ते आपलं ’क्रिएशन’ आहे ह्या भावनेतून इतर कोणाचीही पर्वा न करता त्या कलाकृतीच्या मागे ठामपणे उभे रहायला हवेच ना लेखकाने? किंवा कोणत्याही कलाकाराने?
लोकं कौतुक करतात, डोक्यावर घेतात तसेच कधी कधी प्रखर टीका करतात, वादळं उठवतात. प्रसंगी कलाकाराची ह्यात बदनामीही होते. मनस्वी कलाकाराच्या कलाकृती अनेकदा समाजातील सामान्यांना ’कळत’ नाहीत. त्याचे चुकीचे अर्थ लावले जातात किंवा कधी कधी लोकांच्या भावना दुखावल्या (?) म्हणून ते भडकतात.
आणि जर असे झाले तर कलाकाराने/लेखकाने काय करायचे?
लोकांच्या भावनेचा ’मान’ राखत कलाकृतीला वा-यावर सोडायचे? डिसओन करायचे?
जसे डॉ.आनंद यादवांनी केले?
’संतसूर्य तुकाराम’ ही कादंबरी त्यांनी ’मागे’ घेतली ही बातमी इतकी धक्कादायक वाटतेय मला. मी ती कादंबरी वाचलेली नाही. त्यात काय वादग्रस्त आहे माहीत नाही. पण समाज टीका करतोय त्याला घाबरुन, संमेलनाध्यक्षपद जाईल या भितीपोटी आपल्या प्रामाणिकपणाशी जी प्रतारणा केलीय, कातडीबचावूपणा केलाय तो कहर आहे.

कलाकाराचे स्वातंत्र्य,फ़्रीडम ऑफ़ एक्सप्रेशन वगैरे प्रकार मानणारा समाज तर अस्तंगत झालेला आहेच. आणि त्याची बूज राखणारा, त्यासाठी लढणारा कलावंतही म्युझियम पीस झाला आहे.

तेंडूलकर,तस्लिमा,रश्दी किंवा हुसेनचं कौतुक वाटतं मग अशा वेळी. खरंच मानलं त्यांना.
जिवावर उठणारी टीका/बदनामी/फ़तवे या सा-याला धुडकावून लावत, भलेही त्यासाठी परागंदा व्हावे लागले तरी बेहत्तर पण त्यांच्या कलाकृतीशी ते एकनिष्ठच राहिले. कलाकाराच्या स्वायत्ततेचा त्यांनी मान राखला.
डॉ.आनंद यादव निदान माझ्या मनातून साफ़ उतरलेत. त्यांच्या कादंबरीने कोणाची किती बदनामी झाली माहीत नाही पण ती ’मागे’ घेऊन त्यांनी मराठी साहित्याचा मात्र नक्किच अपमान केला आहे.

[ माफ करा हे नक्की कुठे टाकायचे कळले नाही. हे ठिकाण योग्य नसेल तर मार्गदर्शन करा प्लीज. ]

गुलमोहर: 

मग काय ज्याप्रमाणे पुण्यातल्या भांडारकर ग्रंथालयाला जसे जाळले तसे दुसरे काहीतरी जळू द्यायचे का?
काही लोक एकदम भडक माथ्याचे असतात. नुसते उठसूठ राडा करणे येते, त्यांना काय शिकवणार विचारस्वातंत्र्य, संशोधन? उगीच वेळेचा अपव्यय.

दुसरे असे की इतक्या जुन्या व्यक्तीच्या चारित्र्यावर आता शिंतोडे उडवून काय मिळाले त्यांना? त्याने काय इतिहास बदलतो? नि संत तुकारामांना लोक त्यांच्या अभंगांसाठी मानतात. ते आता बदलणार थोडीच? नि बदलावे अशी तर त्या लेखकाची अपेक्षा नव्हती ना? मग काय साधले लिहून?

विचारस्वातंत्र्य हे काही मौलिक सुधारणा होतील या आशेने देण्यात आलेले आहे. उगाच विचारस्वातंत्र्य आहे म्हणून काहीतरी प्रक्षोभक लिहायचे नि प्रसिद्धी मिळवायची? हुसेनपेक्षा जास्त थोर चित्रकार असतात, त्यांना 'तसली' चित्रे न काढता सुद्धा स्वतःचे कौशल्य दाखवता येते. पण मुद्दाम प्रक्षोभक गोष्टी करून प्रसिद्धी मिळवायची याला काय अर्थ आहे?

म्हणजे आपला सिनेमा सेन्सॉर ने पास केला नाही म्हणून मग तो काळ्या बाजारात जास्त पैशाने दाखवायचा, असले उद्योग करणार्‍यांबद्दल आदर वाटावा का?

शर्मिला, खरं आहे. घाबरतात आणि घाबरण्यासारखी परिस्थिती असते - दोन्ही दुर्दैवी बाबी आहेत.
परवा स्लार्तीने या विषयावर चांगला लेख लिहीला होता, त्यावरून कळलं याबद्दल.

झक्कीकाकांना अनुमोदन. मुळात समाजमन दुखावले जाईल अशी कृती करावी का? काही सत्ये कटु असतात पण ती विसरणेच योग्य असते. विशेषतः संत तुकारामांसारख्या विभुतीच्या बाबतीत तरी. कटु सत्ये बोचणार नाहीत अशा मार्गानेही अधोरेखीत करता येतात. किमान हुसैनचे तरी मी अजिबात कौतुक करणार नाही. मी धर्मांध नाही..पण हिंदु देवदेवतांचे नग्न चित्रण करणार्‍या या महान (?) चित्रकाराने हे कलास्वातंत्र्य मुस्लीम व्यक्तिरेखा चितारताना का घेतले नाही? हा प्रश्न उरतोच.
आणि नग्नताच म्हणली तर ती राजा रवीवर्म्याच्या चित्रातही होतीच की पण ती कुठेही खुपली नाही, बोचली नाही. कारण त्यांचे सादरीकरण पुर्णपणे समाजमनाचा विचार करुन केलेले होते.

<<विचारस्वातंत्र्य हे काही मौलिक सुधारणा होतील या आशेने देण्यात आलेले आहे. उगाच विचारस्वातंत्र्य आहे म्हणून काहीतरी प्रक्षोभक लिहायचे नि प्रसिद्धी मिळवायच >>
१००% सत्य आणि मनापासुन अनुमोदन. कोणी त्याचा गैरफायदा घेणार असेल तर त्याचा विरोध केलाच पाहीजे.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

रातराणीचा सुगंध पलंगावर पडल्या पडल्यादेखील घेता येतो. पण तुळस वृंदावनातच राहते, तिच्यापुढे आपल्याला उभंच राहावं लागतं.

http://maagevalunpahataana.blogspot.com

कादंबरी 'मागे' घेण्याचा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे.अशा कृतीचे दोन अर्थ होऊ शकतात,एकतर लेखकाला स्वतःलाच आपल्या मताशी प्रामाणीक राहता येत नाही आणी त्याने जाणूनबुजून केवळ प्रसिद्धिसाठी हा खोडसाळपणा केला होता.किंवा प्रामाणिक असूनही विरोधी मताला ठामपणे तोंड देण्याची त्याची हिंमत नाही.दोनीही कारणे निंदनीय आहेत
आणी दुटप्पी हुसेनचे उदाहरण तर अजिबात देऊ नका,त्याच्या 'मिनाक्क्षी' सिनेमात कोणत्यातरी गाण्याने 'अल्पसंख्य' समाजाच्या भावना दुखावल्यावर त्याने तो पटकन काढून घेतला होता (नाहीतरी तो कोण बघणार होते!)
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

झक्की आणि विशाल ह्यांस १००% अनुमोदन.

मी आनंद यादव ह्यांची कादंबरी वाचली नाही आहे. पण मला असा प्रश्न पडतो कि तुकाराम हे काही शतकांपूर्वी होऊन गेले. खरं-खोटं कुणालाच इथे माहीती नाही, मग कशाला उगिचच असे उलट सुलट लिहायचे? त्यांनी अर्थात संशोधनकरुन हे लिहीले असावे, पण संशोधनासाठी जो आधार वापरला तो १००% खरा कशावरुन?
मग जी गोष्ट काहिशे वर्षांपूर्वी होऊन गेलेली आहे, ज्याचे साक्षीदार आता कुणीच हयात नाही आहेत त्या विषयी जनमानसात असलेल्या तुकारामांच्या प्रतिमेला तडा जाईल असे लिहुन काय साध्य होते लेखकाला?
मला नाही समजु शकत.

अर्थात मी हे आधिच मान्य करते कि मी ते पुस्तक वाचलेले नाही आहे, आणि त्यामुळे जी प्रतिक्रीया दिली ती वर्तमानपत्र आणि इतर ठीकाणचे वाचुन दिली आहे.

मला फक्त असे लिहीण्यामागचे प्रयोजन आणि उद्देश नाही समजु शकत जी गोष्ट आपण स्वतः पाहीलेलीच नाही आहे त्याविषयी उगिचच कुठले तरी ऐतिहासिक कागदपतत्रे प्रमाणमानुन खळबळजनक लिहायचे.

मी स्वतः मुलतत्ववादी नाही (fanatic) नाही, पण तरीही मलादेखिल एम्.एफ. हुसैन ह्यांची हिंदु देवदेविकांवरील चित्रे हि कुठेतरी deliberate attempt वाटतात. त्यात काही खुप क्रिएटीव्हीटी उतु चालली आहे असे वाटत नाही.

आणि जर असे झाले तर कलाकाराने/लेखकाने काय करायचे?
लोकांच्या भावनेचा ’मान’ राखत कलाकृतीला वा-यावर सोडायचे? डिसओन करायचे? >> कदाचित असे असेल कि "जनी वंद्य ते सर्व भावे करावे, जनी निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे."

बहुतेकांनी मूळात वादग्रस्त काय होते ते वाचले नाहिये. वर्तमानपत्रात बातमी आली म्हणून "काहितरी असावे बहुधा" असे धरून आपापले मत बनवले गेले आहे. यादवांना संशयाचा फायदा द्यायलाही कोणी तयार वाटत नाही. "तेंव्हा झाले ते बस्स झाले" ह्या उद्द्विग्नतेमधून त्यांनी मागे घेतली असेल कदाचित. शेवटी ते कारण देत नाही तोवर बाकी सगळ्या फक्त speculations असणार. त्यावर मते मांडण्याला माझ्यासाठी तरी काहिच अर्थ नाही.

<<माझ्यासाठी तरी काहिच अर्थ नाही.>>
अहो आसामी, तुम्ही एव्हढे जुने मा. बो. कर नि तरी तुम्ही असे म्हणता? म्हणजे आम्हाला काही माहित नाही म्हणून आम्ही आमची मते द्यायची नाहीत? मतस्वातंत्र्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे व तो आम्ही बजावणारच. आम्हाला काही समजत असो वा नसो. शिवाय केवळ ज्यांना अक्कल आहे त्यांनीच लिहावे असा काही मा.बो. चा कायदा नाहीये (धन्य देवा). कीबोर्ड बडवणारे हात तसेच रक्तबंबाळ झाले तरी आम्ही लिहायचे थांबवणार नाही, ही दगडावरची रेघ, त्रिवार सत्य, अंतिम सत्य सुद्धा!!
Happy

<<"तेंव्हा झाले ते बस्स झाले" ह्या उद्द्विग्नतेमधून त्यांनी मागे घेतली असेल कदाचित>>

कदाचित् बरोबर आहे, आजकाल म्हणजे काय 'राडा' खेरीज दुसरे काहीहि करण्यास बरेच लोक असमर्थ असतात. त्यांना विचारस्वातंत्र्य, कलास्वाद इ. गोष्टी काय कप्पाळ समजणार? म्हणजे तुकारामाला जसे सोने चांदी मृत्तिकेसमान, एका विठ्ठलाची भक्ति खरी! असे वाटायचे तसे त्यांना कला, मतस्वातंत्र्य म्हणजे मृत्तिकेसमान, 'राडा' च खरा. शहाण्या माणसांना कळते रबर केंव्हा ताणायचे नि केंव्हा सोडायचे.

पण नाहीतरी तुकारामाने जे गैर केले असे त्यांनी म्हंटले आहे, ते जर गाळून टाकून इतर भाग तसेच ठेवले तरी 'कलाकृतीला' बाधा येणार आहे का? खरेच त्यात काही वाचण्याजोगे असेल तर लोकांना वाचायला हरकत नाही. फक्त तेव्हढ्या कारणावरून सबंध पुस्तक मागे घ्यायचे म्हणजे केवळ ते लिहिण्यासाठीच पुस्तक लिहीले होते, की त्यात आणखी काही वाचनीय, मननीय आहे? जसे फक्त राडा करणारे लोक असतात, त्यापेक्षा खरे जाणकार जास्त असावेत, अशी आशा आहे. त्यांना पुस्तकात काही चांगले दिसले तर ते पण फापटपसार्‍याकडे दुर्लक्ष करतील.

एखाद्या भल्या माणसाला थोडा कमी भला ईतिहास असु शकतो हे आपल्या लोकांन्ना पटले तर शप्पथ ! भला माणुस जन्मत्।च भला नसला तर ती गोष्ट त्याच्या भलेपणात अधिक भर घालते असे मला वाटते. जसा वाल्मिकी शिकारी होता म्हणुन वाल्मिकींचे रामायण लिहायचे नाहि ?! त्या रामायणात देखिल त्याचा उल्लेख केला असेल पण म्हणुन त्याचे महत्व कधी कमी झाल्याचे माझ्या स्मरणात नाहि.

तसेच या कादंबरी मधे जर तुकारामांच्या विषयी काहि "अ-संत" लिहिले असेल आणि ते त्यांच्या आयुष्याच्या काहि काळामधे खरे देखिल असेल तरी त्यात गॅर काय आहे ? किंबहुना त्याच्या पार्श्वभुमीवर त्यांचे संतत्व अधिक उठुन दिसेल अस माझा निकष आहे. कारण बहुतांशि समाजाला "-" कडुन "+" कडे जाण्याची शिकवण अधिक जरुरिची असते... जन्मत्।च संतत्व मिळालेल्या व्यक्तिंचे कारण मला वाटते वेगळे असते... पण समाजात फक्त ज्ञानेश्वर झाले असते तर संस्क्रुती मुळापर्यंत पोचायला फारच काळ लोटला असता... त्यासाठी साक्शरतेचा प्रसार करणारे सामान्यातुन असामान्य झालेले तुका पण हवेतच...