मराठी माणसा झोपलाच राहा

Submitted by मिरिंडा on 25 July, 2016 - 11:58

मराठी माणसा झोपलाच राहा
पॅसे मिळविण्या मात्र तत्पर राहा

घरिदारी अन बाजारीही
जातीपातीचे राजकारण करी
नको तेथे अध्यात्म लावुनी
विसरुनी जा तू दिव्य लक्ष्मी

हरलास जरी जीवनी तू
अध्यात्माचे धडे गिरवी तू
वास्तवाचे भान सोडुनी
नवा मार्ग शोधू नको तू

मिळणाऱ्याचा द्वेष करी तू
बाणा आपुला सोडू नको तू
बदलू अथवा पेटू नको तू
आस प्रगतीची ठेवू नको तू

जुने सारे संत पकडुनी
कीर्तन भंडारे करी तू
मंदिरांपुढे रांग लावुनी
वेळ आपुला व्यर्थ दवडी तू

वाद घाल तू जयंत्यांवरी
शासकीय तिथी दिनांकांवरी
इतिहासाच्या मंथनातले
शोध कधीही सहन न करी

महापुरुषांचे कार्य विसरुनी
जीवन त्यांचे उघड करी
चविष्ट चर्चा अन संघटना
निर्माण करी वेळ दवडण्या

स्वतःचीच पाठ थोपट तू
शेजाऱ्याची अडचण दिसता
कधी शेजारी कधी बाजारी
चालत जा तू नाकापुढती

Group content visibility: 
Public - accessible to all site users