दर्जेदार मनोरंजनाचा हंगामी पुरवठा - मदारी (Movie Review - Madaari)

Submitted by रसप on 23 July, 2016 - 03:27

मांजर, हे तसं पाहायला गेलं तर भित्रं. हूल दिली तरी पळून जाणारं. पण मांजराला जर एका खोलीत, एखाद्या कोपऱ्यात लोटलं तर ते काय करतं ? त्याला जर पळायला वाव राहिला नाही, तर ते शरणागती पत्करत नाही, हार मानत नाही. अश्या वेळी तो छोटासा प्राणी अतिशय आक्रमक होतो आणि प्रतिहल्ला चढवतो. धारदार व अणकुचीदार नखं आणि दात त्याच्याकडे असतातच. म्हणूनच म्हणतात की, 'पहले हाथ से बिल्ली मारना !' कारण जर 'पहले हाथ से' - पहिल्या प्रयत्नात - ते घडलं नाही, तर दुसरा प्रयत्न मांजर करू देत नाही.
हलाखीतून वर आलेला, संघर्ष करून टिकून राहिलेला एखादा सामान्य माणूस 'बाय चॉईस' एक मांजर बनलेला असतो. तो मत देतो आणि आलेलं सरकार स्वीकारतो. तो सिस्टीम जसं सांगेल, तसंच वागतो. त्याच्या भोवती चाललेले गैरव्यवहार त्याला जाणवत असतात, पण आपल्यापुरतं शांततापूर्ण आयुष्य जगण्याकडेच त्याचा कल असतो. कारण आजचं सुरक्षित आयुष्य त्याने एका होलपटीनंतर मिळवलेलं असतं, ते त्याला सॅक्रिफाईस करायचं नसतं. आपलं घर, कुटुंब, मित्रमंडळी ह्यांतच त्याला स्वारस्य असतं. देशाभिमान, धर्माभिमान, भाषाभिमान वगैरे बाणेदार मुद्दे राजकारणाच्या पटावरील प्यादयांच्या चाली असतात. त्याला ना त्या खेळात रस असतो, ना चालींत. तो ह्या पटाकडे लक्षही देत नाही. त्याचा भातुकलीचा खेळ स्वतंत्रपणे चाललेला असतो. पण ह्या पटावरच्या खेळातला एखादा उन्मत्त हत्ती किंवा सत्तांध वजीर आपला पट सोडून, भातुकलीत थैमान घालून डाव उधळून लावतो, तेव्हा मात्र ह्या सामान्य माणसातलं भित्रं मांजर कोपऱ्यात लोटलं जातं आणि प्रतिहल्ला केला जातो. तो जीवाचा विचार करत नाही, अस्तित्वाची फिकीर करत नाही. कारण ते असंही संपल्यातच जमा असतं. 'सर पे कफन' बांधून तो धिप्पाड शत्रूला बेजार करतो.

ही कहाणी आपण अनेकदा पाहिलेली आहे. मसाला कमी-जास्त केला गेला, बदलला गेला असेल; पण मूळ ऐवज तोच. 'मदारी'चं वेगळंपण हेच की इथल्या निर्मल कुमार (इरफान खान) मधलं भित्रं मांजर जेव्हा एक दिवस आक्रमक होतं, तेव्हा तो त्याचा प्रतिहल्ला नियोजनबद्धपणे करतो. तो कुठल्याही अचाट हाणामाऱ्या वगैरे करत नाही. इथे उत्कंठा ताणणारे पाठलाग नाहीत, धुंवाधार गोळीबार नाही. जुळवाजुळव, योगायोग आहेत, पण जितपत 'सिनेमॅटिक लिबर्टी' सहज दिली जाईल, तितपतच.

download_2.jpg

"बाज़ चूज़े पर झपटा, उठा ले गया. कहानी सच्ची लगती है, अच्छी नहीं लगती. बाज़ पर पलटवार हुआ. कहानी सच्ची नहीं लगती, लेकिन खुदा कसम बहुत अच्छी लगती है"
- अशी ही कहाणी पडद्यावरील प्रत्येक कलाकाराच्या दमदार अभिनयाने जिवंत केली आहे.

काही अभिनेत्यांची शैली त्यांनी निभावलेल्या व्यक्तिरेखेवर भारी काही वेळेस पडत असते. इरफान खान त्यांपैकी एक आहे, असं माझं (टीकात्मक) मत आहे. ह्याचा अर्थ असा नाही की कुठेही तो जराही कमी पडतो. खरं तर काही ठिकाणी तो भावनिकही करतो. त्याने साकारलेला निर्मल कुमार अख्खा सिनेमाभर कुणाशीही ना मारामारी करत नाही की कुणाला भिडत नाही. फक्त एकदाच तो एकच कानाखाली लगावतो आणि तेव्हढंच पुरून उरतं. ह्यावरुन 'इंटेन्सिटी' लक्षात यावी.
ही कमाल जितकी स्वत इरफानची तितकीच लेखक-दिग्दर्शकाच्या स्टोरी टेलिंगचीही आहेच.
दिग्दर्शक निशिकांत कामतनी आजपर्यंत बनवलेले सर्व सिनेमे एक तर रिमेक्स तरी आहेत किंवा 'आधारित' तरी. 'मदारी'ही अपवाद नाहीच. अश्या सूडकथा शेकडो सिनेमांतून आलेल्या आहेत. त्यामुळे आणि मध्ये आलेल्या आचरट 'लै भारी'मुळे कामतांकडून तश्या सीमित अपेक्षाच असतील. त्यामुळे 'मदारी' जरी पुनर्कथनात्मक वाटला, तरी हरकत नसावी !
'जिमी शेरगिल' पुन्हा एकदा सहाय्यक भूमिकेत दिसतो. प्रत्येक वेळी त्याचा सिनेमा पाहताना त्याच्या भूमिकेला काही तरी वजन, महत्व असेल असं वाटतं आणि प्रत्येक वेळी निराशाच वाट्याला येते. त्याने साकारलेला सीबीआय ऑफिसर चांगला झाला आहे. पण त्या व्यक्तिरेखेला विशेष असा वावच नाहीय. इतर सहाय्यक कलाकार -तुषार दळवी, उदय टिकेकर, इ. - पेक्षा जास्त लांबीची भूमिका, इतकाच दिलासा.
अगदी छोट्याश्या भूमिकेत जयंत सावरकर आहेत. एकच प्रसंग त्यांना वाव देणारा आहे, पण तेव्हढ्यातही म्हातारा काळीज पिळवटतो !

दोनच गाणी आहेत. 'मासूम सा..' हे गाणं खूप छान आहे. आजकालच्या ट्रेंडनुसार वरच्या पट्टीत असलेलं हे गाणं मनात, ओठांवर रेंगाळत राहतं. दुसरं गाणं 'डमा डमा डम..' असं काहीसं आहे. त्या आचरट धिंगाण्याला खरं तर 'गाणं' म्हणणंच चूक आहे. अतिशय संतापजनक थर्ड क्लास काम आहे ते. जर ते विशाल भारद्वाजचं असेल तर लाजिरवाणं आहे. आणि जर 'सनी-इंदर बावरा' नामक बैलजोडीचं असेल, तर अनेक भिकार संगीतकारांच्या पंक्तीत अजून दोघे भिकारी बसले आहेत, असं समजू. हे गाणं अविस्मरणीय छळवाद मांडतं. इतका की 'मदारी' मला तरी ह्या अत्याचारासाठी लक्षात राहील. मला कधी कधी कळत नाही की एक सिनेमा बनवण्यासाठी इतकी मेहनत हे लोक घेतात. मग एखादा भाग इतका सुमार असल्याचं त्यांना मान्य कसं होतं ? की सरसकट, एकजात कुणालाही संगीताची सामान्य जाणही राहिलेली नाही ? एका उंचीवर सगळं नाट्य पोहोचलेलं असताना हा कर्णकर्कश्य, फाटक्या गळ्याचा असह्य धांगडधिंगा सुरु होतो आणि अक्षरश: विचका करतो. (ह्या गाण्यामुळे प्रेक्षकाच्या मनातलं भित्रं मांजर चवताळून उठतं आणि सिनेमावर प्रतिहल्ला चढवतं !)

कहाणीत काही अर्धवट सुटलेले धागे आहेत, काही 'लूपहोल्स'ही आहेत. त्या सगळ्यासकट 'मदारी' हा एकदा पाहाण्यासारखा निश्चितच आहे. आजच्या जमान्यातल्या सिनेमांचा 'युएसपी' असलेला भडकपणा इथे नाही. वास्तव जरी रंजकतेने सादर केलं असलं, तरी वास्तवदर्शनाच्या अट्टाहासापोटी हिंसा, वासना वगैरेतली कुठलीही नग्नता इथे नाही. हा थरार तुम्हाला बेचैनही करणार नाही. पण जर दर्जेदार मनोरंजनाची एक तीव्र निकड असेल तर 'हंगामी मदत' म्हणून 'मदारी' पुरेसा आहे !

रेटिंग - * * *

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2016/07/movie-review-madaari.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

येस्स! म्हणजे कथा वाटली तशीच असावी बहूदा.
डायरेक्टर कडून फार आशा नाहीतच (त्याचा मुंमेजा सोडला तर बकी यथातथाच) पण इरफान व जिमीसाठी पाहणार नक्की.

जिमी हळुहळु मॅच्युर होत जातोय आणी त्याचे बहुतेक सगळेच रोल चांगले होताहेत. (यहाँ मुव्हीपासून मेबी)

कथा वाटली तशीच आहे, पण एक चांगले केलेय, मांजराकडे जशी नख्या आणि दात ही अस्त्रे आहेत तशीच माणसाकडे विचारशक्ती. त्यामूळे योजनाबद्ध रितीने जर रीअ‍ॅक्ट झाला असेल तर ते योग्यच. खुपदा अशा चित्रपटात, अन्याय झालेली व्यक्ती, अचाट रितीने एकदम शक्तीशाली होते.

जिमी चा फगली बघितला का ? चॉकलेट चेहरा असूनही त्याने वेगळ्या भुमिका केल्या, ते चांगले झाले. त्याच्याबरोबरचे मुहोब्बते मधले ते दोघे... असोच.

कबाली बघितला का ?

रसप... तूम्ही जुन्या जमान्यातल्या गाण्यांवर पोसले गेला आहात.. या नव्या गाण्यांचा तूम्हाला त्रास होतो, हे वाचून खुप आनंद झाला... रुनम्या म्हणालाच होता, कि असली गाणी म्हणजे वॉशरुमला जायची सोय असते.

>> कबाली बघितला का ? <<

नाही. मला रजनीपट आणि सलमानपट ह्यांच्यात दर्जात्मक फरक जाणवत नाही आणि रजनीकांत (माणूस म्हणून कितीही ग्रेट असला तरी) पाहवत नाही. त्यामुळे सहज शक्य असलं तर पाहतो त्याचे सिनेमे. Sad

>> रसप... तूम्ही जुन्या जमान्यातल्या गाण्यांवर पोसले गेला आहात.. या नव्या गाण्यांचा तूम्हाला त्रास होतो, हे वाचून खुप आनंद झाला... <<

मलाही आनंद वाटतो की मी आजच्या गाण्यांवर पोसला गेलो नाहीय. निकृष्ट आहाराने सुदृढ तब्येत कशी बनणार ना ?
Happy

दिग्दर्शक निशिकांत कामतनी आजपर्यंत बनवलेले सर्व सिनेमे एक तर रिमेक्स तरी आहेत किंवा 'आधारित' तरी. >>>> Dombivali Fast आणि मुंमेजा ओरिजिनल नाहियेत?

'डोंबिवली फास्ट' चं कुठल्या तरी इंग्रजी सिनेमाशी साधर्म्य आहे. मला नाव आठवत नाही. गुगल करा, मिळेल.

'मुंमेजा' ओरिजिनल असेल. पण तेव्हढी लिबर्टी द्या की मला ! Sad

हे कबालीचे समीक्षण वाचून रसप शैलीचीच आठवण झाली.

http://www.loksatta.com/manoranjan-news/blog-on-rajinikanth-1272123/

रसप लोक तुमच्या शैलीला अंगी बाणवत आहेत. अभिनंदन.

रसप... तूम्ही जुन्या जमान्यातल्या गाण्यांवर पोसले गेला आहात.. या नव्या गाण्यांचा तूम्हाला त्रास होतो, हे वाचून खुप आनंद झाला...
+१११११

<<दिग्दर्शक निशिकांत कामतनी आजपर्यंत बनवलेले सर्व सिनेमे एक तर रिमेक्स तरी आहेत किंवा 'आधारित' तरी>> दिग्दर्शक निर्मात्यांकडे कथा घेऊन जातो का निर्माता दिग्दर्शक कडे कथा घेऊन जातो आणि त्याला दिग्दर्शकांची सूत्र देतो. निर्माता जर दिग्दर्शकाकडे गेला तर त्याला त्यांनी ( निर्मात्याने ) दिलेल्या कथानकावरच दिग्दर्शन करावं लागत ना?

सुजा | 25 July, 2016 - 15:13 नवीन
<<दिग्दर्शक निशिकांत कामतनी आजपर्यंत बनवलेले सर्व सिनेमे एक तर रिमेक्स तरी आहेत किंवा 'आधारित' तरी>> दिग्दर्शक निर्मात्यांकडे कथा घेऊन जातो का निर्माता दिग्दर्शक कडे कथा घेऊन जातो आणि त्याला दिग्दर्शकांची सूत्र देतो.

>>
दोन्ही !

पाहिला. मस्त. नक्कीच आवडला.
एक नायक म्हणून इरफान तितकासा आवडत नाही पण, त्याचे चित्रपट खरोखर 'ह टके' असतात. ते मला प्रिय आहेत.
२ गाण्यांबाबत लेखकाशी सहमत.
३ मराठी कलाकारांच्या भूमिकाही झकास.
अगदी छोट्याश्या भूमिकेत जयंत सावरकर आहेत. एकच प्रसंग त्यांना वाव देणारा आहे, पण तेव्हढ्यातही म्हातारा काळीज पिळवटतो ! >>> + १ लाख !
दिग्दर्शन चांगले वाटले बुवा.
तू-नळीवर असल्याने पुन्हा एकदा तरी नक्की बघेन .