मुबांगा रिसॉर्ट, अंगोला

Submitted by दिनेश. on 20 July, 2016 - 05:00

आफ्रिका असा सरसकट शब्द आपण वापरत असलो तरी हा फार मोठा खंड आहे आणि त्यात तितकीच विविधताही आहे. त्यातही पूर्व आफ्रिका, पश्चिम आफ्रिका ( हे दोन्ही सब सहारन भाग असले तरी ) मधेही खुप फरक आहे.

पूर्व आफ्रिकेत म्हणजे केनया, टांझानिया आणि युगांडा मधे पूर्वापार पर्यटक जात आहे, त्यामूळे त्यांना मिळणार्या
सोयी तर उत्तम आहेतच शिवाय स्थानिक लोकांना पण पर्यटकांची सवय आहे. त्या मानाने पश्चिम आफ्रिकेत
या सोयी तितक्याश्या उपलब्ध नाहीत.

आता आता कुठे या देशात पर्यटक यायला लागले आहेत.

केनयात असताना, या सुखसोयी असल्याने माझे भरपूर भटकणे झाले. शिवाय तिथला भारतीय प्रभाव हा एक
मह्त्वाचा घटक आहे. म्हणजे कुठल्याही मोठ्या गावात गेलात तर तिथे किमान एक तरी देऊळ आणि गुरुद्वारा
असणारच. तिथली देवळे हि खर्या अर्थाने देवालये आहेत, कारण आलेल्या अतिथीचे मनापासून स्वागत तर होतेच
शिवाय जेवणाचीच नव्हे तर राहण्याचीही सोय होऊ शकते. आणि तीसुद्धा विनामोबदला. अशी देवळे आणि
गुरुद्वारे आम्हाला फार आधाराची वाटत.

केनयात ( आणि बाकिच्या पूर्व आफ्रिकन देशात ) भाषेचा प्रश्न येत नाही आणि वाहतुकीच्या सोयीदेखील बर्‍या
आहेत.

इथे अंगोलात आल्यापासून माझे भटकणे फारच कमी ( जवळ जवळ नसल्यातच ) झाले. इथे सुंदर निसर्गाची
वानवा आहे असे नाही, पण तो मी फक्त विमानातूनच बघत आलोय ( मी वेगवेगळ्या विमानकंपन्यांच्या विमानाने
इथे आलोय हे तर आहेच, पण एमिरेटसचे विमानही प्रत्येकवेळी वेगवेगळ्या रुटवरुन येते ) अनेक जलाशय, नद्या
दिसतात पण नवल म्हणजे मानवी वस्ती दिसत नाही.

तर गेल्या आठवड्यात असेच एक धाडस केले. आम्ही काही मित्र मिळून एका तळ्याकाठी सहलीला गेलो होतो.
तिथे रिसॉर्ट आहे हे माहित होते, पण त्याचे दर काय आहेत, आणि खाण्याची काय सोय आहे त्याची नेमकि
माहिती नव्हती ( आमच्या गटात दोघे जण शाकाहारी ), म्हणून जेवणाची सोय आमची आम्हीच केली होती.

आधी तिथे आदल्या रात्री जाऊन रहायचा प्लान होता, पण त्याचे बुकिंग मिळाले नाही.

पण तिथे गेल्यावर सुखद धक्का बसला. केनयातील रिसॉर्टचे एक स्टँडर्ड आहे ( त्या जागेतले ब्रिटीशकालीन
फर्निचर, राहण्याची व इतर सोय ) अगदी तसेच आम्हाला या मबुंगा रिसॉर्ट मधे दिसले.
तळ्याकाठी अनेक हट्स होत्या आणि त्यातील सोयी उत्तम होत्या. मूळात त्यांची बांधणी आणि डिझाईनही उत्तम होते.
आतमधे गेल्यावर रेस्टॉरंट मधे जाणे अनिवार्य होते, त्यामूळे तिथे फक्त पेयपान केले. मग त्या तळ्याच्या किनारीच
असलेल्या दुसर्या एका निवांत ठिकाणी जाऊन आमचे जेवण जेवलो.

अगदी शेवटचे काही किलोमीटर्स सोडले तर रस्ता उत्तम होता. गुगल वर शोधतच गेलो होतो ( पाट्या नव्हत्या )
परीसर अगदी रम्य होता. पण पूल सोडला तर फार काही आकर्षणे नव्हती. काही हरणे मुक्तपणे फिरत
होती. ( ही जात नव्हे पण एका वेगळ्या जातीची, मोठ्या शिंगांची हरणे, हि अंगोलाची राष्ट्रीय प्राणी आहेत.)

इथले पक्षी मला बुजरे वाटले. त्यामूळे फोटो नीट काढता आले नाहीत. ( केनयातले पक्षी धटींगण आहेत. चक्क फोटो काढण्यासाठी पुढे पुढे करतात. ) लुआंडाच्या परीसरात बाओबाब म्हणजेच गोरखचिंचेची असंख्य झाडे आहेत. तिथेही होतीच.

मला कौतूक वाटले ते रिसॉर्टच्या परिसरात जोपासलेल्या भाजीच्या मळ्याचे. इथली जमीन सुपीक आहेच आणि
पाणीही मुबलक त्यामूळे भाजीपाला, लावला तर उत्तम होऊ शकतो. मला वाटतं त्या रिसॉर्टची गरज भागेल
एवढा भाजीपाला तिथे नक्कीच पिकत असेल.

रस्त्याची कल्पना यावी म्हणून काही रस्त्याचे फोटो देतोय, पण यापैकी बरीच जमीन हि पडीक आहे. ( शेती
वगैरे होत नाही. )

तर हे तिथले फोटो....

1 आमच्या कॉलनीतली कण्हेर

2 जास्वंद

3 पेरुचा केक ( आणि माझा मित्र )

४) जाताना वाटेत

5 जाताना वाटेत

6

7 रिसॉर्ट वरची शेती

8 रिसॉर्ट परीसर

9 बाओबाब

10 झोपडी !!

११ पांढरी लिली

12 ) हरण ( अशी ७/८ होती तिथे )

13 निवडुंगाची फुले आणि त्यावरचा किडा

14) तळ्याकाठचे घर

15 गोरख चिंच

16 तिथला परीसर

17 घर, हि घरे भाड्याने मिळतात. रिसॉर्टचाच भाग आहेत. आत सर्व सुखसोयी आहेत

18 हे तिथले पाळीव पक्षी

आणि हे त्याचे पिस

19 निवांत जागा

20 ही पण निवांत जागा

21 तळ्याच्या काठावरची बाके

22 तळे ( आम्हाला त्या वेळा गाठता आल्या नाहीत पण इथला सुर्योदय आणि सुर्यास्त सुंदर दिसत असावा )

23 तळे

24 इथे सुगरणीसारखे घरटे बांधणारा एक पिवळा पक्षी असतो. त्याचे घरटे सुबक आकाराचे नसते आणि तो गवतही वेगळेच वापरतो. Cape Weaver ( सौजन्य : इंद्रा )

हा तो पक्षी...

25 आफ्रिकन आर्ट

26 एक वेगळे फळ.. झाड आणि पाने पेरुच्या सारखी असली, तरी वेगळे फळ होते हे

27 निळे रानफूल

28) मोठ्या डोळ्यांचा एक पक्षी ( नाव सांगेना !!! ) Senegal Thick-knee ( सौजन्य ; ईन्द्रा )

29 वेगळीच पांढरी फुले, ज्या पाकळ्या वाटताहेत, तिच फुले आहेत.

30 गवताच्या पातीवरच्या मुनिया.. तरी यावर चौथा भिडू येऊन बसतो, मग पाते वाकते, मग सगळे भुर्र उडून जातात.. त्यांचा आवडता खेळ.

31 सुकलेले बोंड

32 केसाळ फुले

33 हा पण एक वेगळाच पक्षी ( आकाराने चिमणी एवढाच होता. पाठ लालसर तपकिरी होती ) Barn Swallow ( सौजन्य : ईन्द्रा

34 गवताचा तूरा

35 रिकामा ग्लास ( जाणकारांना एवढे पुरे !!! )

36 तळ्यातली होडी.

37 एका काटेरी झाडावरच्या मुनिया

38 तळ्याकाठच्या होड्या

39 जांभळट गुलाबी फुले

40 तळ्याकाठचा तूरा

41 केसाळ गोंडा

42 तोच तूरा, वरुन

43 हा छोटा निळा पक्षी इथे सगळीकडे दिसतो. याला बघून मला निंबुडा निंबुडा गाण्याची आठवण येते नेहमी.
Blue Waxbill ( सौजन्य : ईन्द्रा )

44 या वाटेने आम्ही गेलो होतो ( तिथे एक निवांत जागा होती, तिथेच जेवलो वगैरे )

45 परतीचा रस्ता

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर सफर,:स्मित:

अफ्रिकेतील बर्‍याचश्या देशातील पडीक जमिन सुपिक असल्या कारणानेच, बहुतेक भारत सरकारने तिथे व्यवसायिक शेती करायचा निर्णय घेतला असावा.

मस्त.

एक प्रश्न : आफ्रीकेत कोणत्या भागात सुरक्षिततेचा प्रश्न आहे? आमच्या आधीच्या कंपनीत एक आफ्रीकन कस्टमर होता तो त्याच्या एंड कस्टमर कडे रीजेक्शन्स आले की जाम वैतागायचा. त्याचे म्हणणे होते की कंप्लेन्ट अटेंड करायला त्याला स्वतःची गाडी घेऊन, बंदुकधारी सुरक्षा रक्षक वगैरे ताम झाम करावा लागतो त्यामुळे परवडत नाही. हे लूटमारीचे प्रकार आफ्रीकेच्या नेमक्या कोणत्या भागात होतात?

आभार, अजूनही मला संपादन करता येत नाहीये. आता रात्री घरूनच करेन.

प्रसाद,

इथे जमीन मुबलक आहे पण शेतीचे तंत्र माहित नाही या लोकांना. इस्रायल ने काही प्रयोग सुरु केले आहेत. भारताला नक्कीच वाव आहे.

अंकु, त्या निळ्या पक्ष्याला बघून मला निंबुडा निंबुडा हे गाणे आठवते. इथे खुप दिसतात हे पक्षी, पण फोटो काढू देत नाहीत.

जाग्यावं....

तसा सुरक्षिततेचा प्रश्न सर्वच देशात आहे, त्या मानाने इथिओपिया सुरक्षित आहे. ( त्यांच्यावर कधीही कुणीही राज्य करु शकले नाही ) पुर्वी शांत असणारे उत्तर आफ्रिकन देश आता दशहतवादाने पिडलेत. पण म्हणून रोजचे व्यवहार अडतात असे होत नाही.

दिनेश,

मस्तच आहेत फोटोज.
अंगोलात वातावरण कसे असते? आपल्यासारखे ३ ऋतू असतात का?
उन्हाळा, हिवाळा पावसाळा? कसा असतो? लोकल ट्रान्स्पोर्ट कसे आहे?
ह्या रिसॉर्ट मध्ये तुम्ही काय खाल्ले? पदार्थ पाहून तुम्हाला त्यातले कंटेंट्स कळतात काय?
तुम्ही शाकाहारी आहात, चुकून कधी मांसाहार झालाय का तुमच्याकडून?

रिसॉर्ट लई भारी..

द्या आता उत्तरं Proud

व्वा, इथे फोटो दिल्याबद्दल धन्यवाद.
काही फोटोत अगदी आपल्या इकडच्यासारखे "प्लॉटिंग" केल्यासारखी कुंपणे दिसताहेत Proud

हाय दक्षे,

आपल्याकडे जसा मौसमी पाऊस असतो तसा भारताबाहेर क्वचितच असतो. आपला हिमालय आपले ऋतू ठरवतो, तसे इथे समुद्रातले प्रवाह ( गरम किंवा थंड ) इथले हवामान ठरवतात. त्यामूळे ऋतू वगैरे नसतात.
याबाबत आणखी एक मजा म्हणजे आपल्याकडे पावसाशी संबंधित राग किंवा गाणी असतात, त्या आपल्या भावना
या लोकांना कळत नाहीत. यांची शेती ( असलीच तर ) पावसावर अवलबून नसते.

लोकल ट्रान्सपोर्ट म्हणजे टॅक्सी, बसेस वगैरे असतात. पण त्यांची अवस्था वाईट असते. जरा जास्त पैसे दिले तर उत्तम वाहन मिळू शकते. आमच्यासाठी कंपनीच्या गाड्या असतात. आमचा कधी लोकल ट्रान्स्पोर्ट शी संबंध येत नाही.

या रिसॉर्ट मधे आम्ही काहीच खाल्ले नाही ( घरुन जेवण नेले होते, ते दुसर्‍या ठिकाणी जाऊन खाल्ले ) पण साधारणपणे मला रंगरुपावरुन, वासावरुन पदार्थाचे घटक कळतात. अनोळखी पदार्थ मी सहसा खात नाही.

अगदी लहानपणी मी नॉन व्हेज खाल्ले आहे ( ४ वर्षाचा असे पर्यंत ) सर्व चवी लक्षात आहेत. याबाबतीत माझी फसगत होणार नाही सहसा.

राज, मला पण पेरुचेच वाटले होते ते झाड. पण फळ वेगळे होते. इथल्या बाजारातही कधी फळ बघितले नाही मी ते.

मस्त मस्त मस्त!

सातव्या फोटोत ते बुजगावणे आहे ना? भाजीच्या मळ्यात आपल्याकडे बुजगावणे बघितले नाहीये. बुजगावणे सहसा धान्याच्या शेतात असते.

१९ व्या फोटोत डाव्या खालच्या कोपर्‍यात जे बाजल्यासारखे आसन आहे ते लय भारी आहे. तिथे बसून समोर तळ्याकडे बघत बसायचे - अगदी रिकामटेकडेपणाने, सोबतीला मालिनीताईंचे किंवा लताचे सूर! माझी पण समाधी लागेल Happy

२२ आणि ३८ फोटो अतिशय आवडले.

निव्वळ आनंद नो जळजळ - कारण तुम्ही बनवलेल्या जेवणाचे फोटो नाहीयेत. Happy

दिनेशदा,
मस्त वर्णन आणि फोटो !!!
केनयातले पक्षी धटींगण आहेत. चक्क फोटो काढण्यासाठी पुढे पुढे करतात.>>> Lol
फोटो २२ आणि २३ खूपच छान आलेत !!!!!

वाह मस्तं प्रसन्न फोटोज..
अनोखी फुलं आणी रंगीबेरंगी पक्षी.. वॉव..केसाळ फुले, पातीवरच्या मुनिया... पाळीव पक्षी, कच्च्या गोरख चिंचा... होड्या, तलाव, झाडं, सीनरी सर्वच किती गोड!!!
त्या हरणाच्या( मलाही चिंकारा वाटतोय) बरगड्या दिस्ताहेत.. गवत की कमी???
असे धाडस लौकर लौकर करत जा..म्हंजे आम्हाला असे छान छान फोटो पाहायला मिळतील..
( अवांतर-अंगोला ला येऊन मला गेम मीट ट्राय करायचंय!! Lol )

दिनेशदा, रिसोर्ट मस्त आहे आणि तुम्ही काढलेले फोटो देखील! >> +१

प्रचि २४ Cape Weaver असावा
प्रचि २८ Senegal Thick-knee
प्रचि ३३ Barn Swallow
प्रचि ४३ Blue Waxbill

एकसे एक फोटो आहेत. ते तळ्याकाठचे घर अतिशय आवडले. मुनिया, तो निळा पक्षी, निवान्त तळ्याकाठच्या त्या होड्या वै सगळच सुन्दर! Happy

Pages