दिवसाशी ओळ्ख

Submitted by पल्ली on 15 July, 2016 - 04:01

चार चौघांसारखा दिसणारा
एक साधा सुधा सरळ दिवस..
कोरे करकरीत कपडे घालून आला,
मन्द सुगंध मानेजवळ शिंपडलेला...
काय काय स्वप्नं पडली रात्री?
असं विचारुन माझ्या रूटीनवर
हक्कानं स्थिरावला.
कालच्या दिवसासारखाच्
हाही माझाच आहे,
असं समजून मीही त्याला बसू दिला.
कालच्या दिवसाची जाताना जी तऱ्हा झाली,
ती तेवढी लपवून ठेवली समंजसपणानं...
कालच्या दिवसाची फुलं हरवली होती,
शर्ट फाटून गेला होता कुंपणात अडकून..
डोळे धुळीने भरले होते,
उपाशीपोटीच गेला बिचारा...
माझाच असला तरी
काही करू नाही शकले त्याच्यासाठी,
आता आज हां आलाय...
सळसळत्या उत्साहात.
ह्याची तरी आज नीट ओळख करून घेऊ,
कालच सारं आवरून ठेऊ.
आज मीपण तयारीनिशी सज्ज आहे...
-पल्लवी देशपांडे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users