श्रीमंत.....

Submitted by पल्ली on 15 July, 2016 - 03:57

खुप सारे श्रीमंत भेटले आज
नेहमीच्या चालण्याच्या रस्त्यावर.. ,
तरुणाईनं उधाणलेली बोगन वेल,
झाडाच्या सोनेरी आठवणी,
बदामाची रक्तवर्णी पानं,
कालचा सुगंधी अनुभव
मिटून घेत असलेली रातराणी,
मोहरु पाहत असलेल्या शुभ्र कळ्या,
असंख्य क्षणांनी सुरकुत्यांचं
शहर वसलेले एक आजोबा,
त्यांच्या सोबत त्याना गाठू पहाणारी
त्यांची बायको नावाची प्रेयसी...
उन्हाचं सांडलेलं केशर...
केयर टेकरला फिरायला नेणारा
हस्की देखणा कुत्रा 'मुकी'
दिवसभर बॉसचं ऐकणारा
आत्ता बायकोला ऐकवणारा एक,
"अगं काय सांगू तुला!"
असं म्हणून बरंच काही मैत्रिणीला सांगू पहाणारी
एक कथा भंडार,
काही विसावु पहात असलेल्या सावल्या....
आणि अर्थातच मी.
इतके सारे होते इथेच, रोजच.
नेहमीच्या चालण्याच्या रस्त्यावर,
खुप सारे श्रीमंत भेटले आज.
--पल्लवी देशपांडे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users