लोकेतिहासकार रा. चिं. ढेरे

Submitted by वरदा on 15 July, 2016 - 00:16

आज हा लेख लोकप्रभामध्ये प्रसिद्ध झाला आहे. त्यातील टंकनाच्या चुका दुरुस्त करून इथे देत आहे. मूळ लेख http://www.loksatta.com/vishesha-news/dr-r-c-dhere-1267274/ इथे वाचता येईल
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महाराष्ट्रात अनेक नामवंत विद्वान इतिहाससंशोधक होऊन गेले. इतिहास-भारतविद्येच्या विविध उपक्षेत्रांमध्ये त्यांनी आपला अमिट असा ठसा उमटवला आहे. पण महाराष्ट्रातील, आणि पर्यायाने भारतातील, इतिहासलेखनाच्या कार्यपद्धतीतच मूलगामी बदल करणारे असे तीन थोर इतिहासकार या मांदियाळीत प्रामुख्याने उठून दिसतात. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, दामोदर धर्मानंद कोसंबी आणि रामचंद्र चिंतामण ढेरे. तिघेही ‘प्रस्थापित’ संशोधनव्यवस्थेच्या बाहेरचे!

राजवाड्यांनी राष्ट्रवाद जोपासतानाही इतिहासलेखनासाठी सबळ लिखित पुराव्यांचा आग्रह धरला आणि अशी अस्सल कागदपत्रे जमवून, संपादित करून, सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयुष्य वेचले. मात्र कालांतराने लिखित कागदोपत्री पुराव्याच्या चौकटीतच बरेचसे इतिहास संशोधन अडकून पडले. या झापडबंद दृष्टिकोनातून इतिहास संशोधन-लेखनाला बाहेर काढलं ते कोसंबी आणि ढेरे यांनी. कोसंबींनी लोकधर्म, लोकदेवता यांचा अभ्यास करताना कागदपत्रांची कास न धरता पुरातत्त्वीय अवशेष, मिथक कथा, अर्वाचीन लोकपरंपरा अशा विविध पुराव्यांच्या स्रोतांची मदत घेऊन अभिजात परंपरेच्या बाहेरच्या, सहसा क्षुद्र समजल्या जाणाऱ्या देवतांचा आणि त्यांच्याशी निगडित समाजांचा अभ्यास केला. मात्र यात अभिजात आणि लोकधर्म असे दोन वेगळे भाग गृहीत धरून हे विश्लेषण केलेले आढळते.

ढेर्‍यांनी मात्र कुठल्याही एका सैद्धांतिक दृष्टिकोनात अडकून न पडता इतिहास संशोधन कसे सर्वागीण पद्धतीने करता येऊ शकते त्याचा वस्तुपाठ घालून दिला आहे. फक्त प्रस्थापित वर्चस्ववादी विचारसरणीतून आलेल्या संस्कृत/प्राकृत अभिजात ग्रंथ-विचार परंपरेचे परिशीलन करून लोकधर्म-देवता यांचा इतिहास लिहिता येत नाही हे तोपर्यंत भारतीय इतिहासलेखनात मान्य होत होते. परंतु दैवतविज्ञान सर्वागीण पद्धतीने आकळून घ्यायचे असेल तर लोकधर्म आणि वर्चस्वी अभिजात धर्मपरंपरा असा विच्छेद गृहीत धरून संशोधन करून उपयोग नाही, तर अगदी वैदिक परंपरेपासून सुरू करून सर्व प्रकारची स्थलपुराणे/स्थलमाहात्म्ये, देवतामाहात्म्ये, मिथककथा, मध्ययुगीन काव्ये, शिलालेख, ताम्रपट मंदिरे-शिल्पे, इतर पुरातत्त्वीय पुरावे, दंतकथा, अर्वाचीन उपासना परंपरा आणि याचबरोबर कधीही कुठेही ग्रथित न झालेल्या लोक-कलाकारांच्या मौखिक परंपरा, काव्ये, त्यांच्याकडच्या विविध दंतकथा/मिथके अशा सर्व प्रकारच्या पुराव्यांचे सटीक विश्लेषण करणे अत्यावश्यक आहे हे प्रथम ढेर्‍यांच्या इतिहासलेखनातून दिसून आले. हे सगळे पुरावे-त्यांची सत्यासत्यता-तपासून घ्यायच्या पद्धती वेगवेगळ्या. सहसा इतिहासकार एका पद्धतीच्या पुराव्यावर, बहुतांशी लिखित आणि कालदृष्टय़ा पक्का करता येण्यासारखा पुरावा, जास्त भर देऊन इतर पुरावा-स्रोतांचा पुरवणीसारखा वापर करतात. मात्र ढेर्‍यांच्या लेखनात प्रत्येक पुराव्याला सारखेच महत्त्व देऊन काटेकोर चिकित्सा केलेली आढळते.

तसे बघायला गेले तर ढेर्‍यांच्या अनेक पुस्तकांचे विषय आपल्या रोजच्या धर्मजीवनाशी, आपल्याला माहीत असलेल्या किंवा ऐकलेल्या लोकपरंपरांशी निगडित. त्यांची सुरुवातीची पारंपरिक लोककला, लोकदैवते, शक्तिपीठे यावरची पुस्तके व लेख म्हणजे नंतर विस्तृतपणे लिहिल्या गेलेल्या पुस्तकांची बैठक व झलक होते हे लक्षात येते. या विषयांवर इतके मोठे संशोधनात्मक ग्रंथ होऊ शकतात हे मराठी समाजमनाला त्यांच्यामुळेच बहुधा प्रथम लक्षात आले असावे. आपल्याला इतक्या जवळून परिचित असलेल्या या देवतांचा इतिहास म्हणजे महाराष्ट्र आणि संलग्न आंध्र-कर्नाटक या प्रदेशाचे भाग यांच्या एकत्रित सांस्कृतिक ताण्याबाण्याचा, सामाजिक अभिसरणाचा गेल्या दीड-दोन हजार वर्षांचा लेखाजोखा आहे, फक्त धर्मेतिहास नव्हे, हेही ढेर्‍यांनीच आपल्याला प्रथम दाखवून दिले. विठ्ठल, लज्जागौरी, खंडोबा, दत्तात्रेय, तुळजाभवानी, शिखर शिंगणापूर, कोल्हापूरची महालक्ष्मी, नाथ संप्रदाय यांचे इतिहास लिहून ढेर्‍यांनी पूर्ण महाराष्ट्राच्या गेल्या हजार वर्षांच्या सांस्कृतिक इतिहासालाच पालाण घातले आहे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा.

सर्व प्रकारच्या पुराव्यांची काटेकोर चिकित्सा, त्याला धरून उमजलेल्या तथ्याचा निर्भीड पाठपुरावा याशिवाय त्यांच्या लेखनाचा, संशोधनाचा आणखी एक महत्त्वाचा गुण म्हणजे अभिनिवेश-रहित लिखाण. कुठल्याही एका वैचारिक, सैद्धांतिक चौकटीत स्वत:ला बंदिस्त न करून घेता कितीही सनसनाटी वाटणारे निष्कर्ष लिहितानाही ढेरे अतिशय तटस्थपणे, कुणालाही दुखवणार नाही अशा भाषेत लिहीत. मग ते विठ्ठलाच्या मूळ मूर्तीविषयी असो, किंवा भोसले कुळाचे लागेबांधे गोपसमाजाशी जवळच्या होयसळ-यादव कुळाशी आहेत हा निष्कर्ष असो. सध्याच्या प्रांतीय-जातीय-सांस्कृतिक अशा नाजूक अस्मितांच्या काळात हे तटस्थ, वस्तुनिष्ठ लिखाण संशोधक आणि वाचक या दोन्ही गटांनी आदर्श घेण्यासारखे असेच आहे.त्यांच्या संशोधनामुळे आतापर्यंतच्या सांस्कृतिक इतिहासलेखनातील अनेक गृहीतके बदलावी लागली. आज महाराष्ट्राचा इतिहास लिहिताना ढेर्‍यांचे कुठलेच संशोधन वगळून चालणार नाही इतके मूलगामी आणि इतके अफाट काम त्यांनी केले आहे.

ढेर्‍यांच्या लेखनावर सहकारी संशोधक, इतिहासकार यांचा एक बारीक आक्षेप आहेच. आणि तो म्हणजे ढेर्‍यांनी फार सखोलपणे सैद्धांतिक मांडणी केली नाही. सर्व प्रकारचे पुरावे मांडणे, काटेकोर चिकित्सा करणे आणि त्यातून येणारे निष्कर्ष मांडणे यावर त्यांचे बहुतांशी संशोधन थांबते. त्या निष्कर्षांचे समाजशास्त्रीय विश्लेषण काही ठिकाणी येते, काही ठिकाणी नाही. तसेच या सर्व संशोधनातून एक सलग सैद्धांतिक मांडणी करण्याची त्यांची ताकद नक्कीच होती, पण ती दृश्य स्वरूपात वेगळेपणे मांडली गेली नाही हे खरे!

याचे एक कारण कदाचित हेही असावे की ढेर्‍यांनी कायमच जनसामान्यांना सहज आकलन होईल अशा सोप्या मराठीत त्यांचा ग्रंथप्रपंच केला. गेली बरीच दशके नवे, उल्लेखनीय, मूलगामी संशोधन हे प्रस्थापित व्यावसायिक इतिहासलेखनाच्या चौकटीत होते व परिभाषेत लिहिले जाऊन एका ठरावीक वर्तुळासाठीच प्रकाशित होते. त्यातील खूप कमी भाग सोप्या स्थानिक भाषांमध्ये सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतो. ढेरे यांनी मात्र कायमच या प्रस्थापित चौकटीबाहेर काम केले. ज्या समाजाच्या परंपरांवर काम केले त्या समाजातील सर्वाना कळेल अशा भाषेत लिहून त्यांच्यापर्यंत ते पोहोचवले याबद्दल आपण सर्वच त्यांचे कायमचे ऋणी आहोत. मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी की मराठीत लिहिल्याने खऱ्या अर्थाने ढेरे महाराष्ट्राबाहेरच्या संशोधकांपर्यंत फारसे पोहोचले नाहीत. त्यांच्या फक्त ‘श्रीविठ्ठल: एक महासमन्वय’ या पुस्तकाचे डॉ. अ‍ॅन फेल्डहाउस यांनी इंग्लिशमध्ये भाषांतर केले आहे. बाकी पुस्तके भाषांतराची वाट बघत आहेत.

हे सगळे विषय आडवाटेचे, एकांडे, झगमग ग्लॅमर नसणारे! यासाठी लागणारी बौद्धिक कौशल्ये, विविध नव्या-जुन्या भाषा अवगत असणे, त्यांच्यातील सांस्कृतिक परंपरांचे सखोल ज्ञान असणे, अगणित जुन्या ग्रंथांमधले संदर्भ आणि इतर विविध पुराव्यांचे वर्षांनुवर्षे परिशीलन करण्याची चिकाटी असणे- सहजासहजी आत्मसात करता येण्यासारखी नाहीत आणि त्यातून ज्ञानानंद सोडून लौकिकार्थाने इतर फारसे काही मिळण्यासारखेही नाही. ढेर्‍यांसारखी प्रज्ञा आणि प्रतिभाही दुर्मिळच असते. तेव्हा त्यांच्या निधनानंतर या शोधवाटांचं भवितव्यही अंधारलेलं आहे असं आता या क्षणी तरी वाटतं आहे. ते तसं राहू नये, या वाटांवर चालणारा कुणी नवा तोलामोलाचा वारसदार तयार व्हावा अशी इच्छा आहे. तीच ढेर्‍यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या वाटांवर चालणारा कुणी नवा तोलामोलाचा वारसदार तयार व्हावा अशी इच्छा आहे. तीच ढेर्‍यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल! >> +१

धन्यवाद वरदा लेखाबद्दल. रा चिं ढेर्‍यांचे साहित्य जरी अनेकांनी वाचले तरी त्यांचे कार्यास थोडेफार तरी फळ मिळाले असे वाटते. आपल्याच नजिकच्या इतिहासाबद्दल इतके गैरसमज आपल्याच मनात ठासून भरलेले असतात ते तरी साफ व्हायला मदत होते.

ढेरे यांची ओळख करून देणारा लेख आवडला. त्यांची पुस्तके वाचण्याची इच्छा निर्माण झाली आहे.

<<त्यांच्या संशोधनामुळे आतापर्यंतच्या सांस्कृतिक इतिहासलेखनातील अनेक गृहीतके बदलावी लागली>>

कोणती गृहितके? यावर अधिक प्रकाश टाकलात तर बरे होईल.

सध्याच्या प्रांतीय-जातीय-सांस्कृतिक अशा नाजूक अस्मितांच्या काळात हे तटस्थ, वस्तुनिष्ठ लिखाण संशोधक आणि वाचक या दोन्ही गटांनी आदर्श घेण्यासारखे असेच आहे.>> हे अत्यंत महत्वाचे..

योग्य श्रध्दांजली वरदा. थोडी भाषा क्लीष्ट वाटली पण चांगली ओळख करुन दिलीस.

उत्तम लेख. कमी शब्दात प्रभावी ओळख.
वर्चस्वी अभिजात धर्मपरंपराच केवळ सत्य म्हणून प्रसार होण्याच्या आणि मिथकांचे अतिसुलभीकरण आणि ते गोंडस पॅकेजिंग करुन विक्रीयोग्य बनवण्याच्या या काळात तर त्यांचे कार्य जास्तच महत्वाचे ठरते.

सुरेख लेख वरदा!
"मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी की मराठीत लिहिल्याने खऱ्या अर्थाने ढेरे महाराष्ट्राबाहेरच्या संशोधकांपर्यंत फारसे पोहोचले नाहीत.">> हे खरंच दुर्दैवी आहे. संशोधनात्मक पुस्तके भाषांतरीत होण्यास तशाच तोलामोलाच्या व्यक्तीची गरज असते हे एक कारण असावे.
अवांतर: मी नुकतेच डॉ. अ‍ॅन फेल्डहाउस यांनी लिहिलेले आणि विजया देव यांनी अनुवादित केलेले नदी आणि स्त्रीत्व हे पुस्तक घेऊन आले आहे. त्यामुळे त्यांचे नाव पाहून एकदम अरेच्चा झाले!

>हे सगळे विषय आडवाटेचे, एकांडे, झगमग ग्लॅमर नसणारे!< आज-काल सगळ्यांनाच झगमगाट पाहिजे. असे असताना याला वाहून निरपेक्षपणे काम करणाऱ्या रा. चिं. ढेरे यांचे महत्त्व पटते. तुम्हीही त्यांचे मोठेपण सहज समजेल अशा सोप्या भाषेत लिहिले आहे. त्याबद्दल तुमचे आभार मानलेच पाहिजेत. `लोकप्रभा`च्या संकेतस्थळावरून हा लेख 303 जणांनी शेअर केला आहे. त्यावरूनही तो वाचकांना किती आवडला याची कल्पना करता येते.

संशोधनाचा लेखाजोखा केवळ प्राप्त असलेल्या कागदपत्रांवर वा अन्य ऐतिहासिक साधन उपलब्धतेवरच अवलंबून असतो असे न मानता त्यावर स्वत:च्या विचारांचे (इतिहासासंदर्भात) आशययुक्त दोन शब्दही समाविष्ट करून सर्वसामान्य वाचकापुढे ते ठेवणे ही बाब धार्मिक तसेच ऐतिहासिक घटनांच्या अभ्यासाची आवड निर्माण करण्यास उपयुक्त ठरते. अर्थात हजारो वर्षाच्या परंपरेबाबत चार पुस्तके लिहिणे इतकेच आपले काम असे डॉ.रा.चिं.ढेरे यानी कधी मानल्याचे समीक्षकांना दिसलेले नाही. वाचकाला (तसेच अभ्यासकालासुद्धा) त्या त्या घटनेचे तसेच पूजनीय प्रकृतीचे यथार्थ दर्शन देण्याचे काम त्यांच्यातील निर्मळ संशोधकाने आपल्या सक्षम लेखणीने केल्याचे दाखले कसे आणि किती आहेत ते वरदा यांच्या लेखाद्वारे समजते.

"...ढेर्‍यांनी कायमच जनसामान्यांना सहज आकलन होईल अशा सोप्या मराठीत त्यांचा ग्रंथप्रपंच केला..." ~ हे वाक्य लेखाचे महत्त्व तसेच डॉक्टरांच्या संशोधनाचा पाया स्पष्ट करते. आपल्या हाती उपलब्ध असलेल्या साधनांवरच विसंबून न राहता स्वत:चीही मते तटस्थपणे देताना संशोधन लिखाणामागे मनाचाची संबंध आहे... असावाच. परंपरा तसेच इतिहासातील कोणत्याही महत्त्वाच्या घटनेविषयी माहिती करून देताना तत्कालीन उपलब्ध साधने समोर आणली पाहिजेत हे योग्य आहेच, पण त्याचवेळी त्या त्या घटनांच्या प्रसंगाचे विश्लेषण करताना सहजसोप्या भाषेचा वापर करणेही तितकेच योग्य....ही प्रवृत्ती सर्वसामान्य वाचकांना उपकारक ठरणारी शाबीत होते.

आदरणीय डॉ.रामचंद्र चिंतामणी ढेरे महत्त्वाचे संशोधक मानले गेले आहेत ते याच प्रवृत्तीमुळे. वरदा यांचा लक्षणीय लेख हेच सांगतो...आनंददायी.

लोकसाहित्य व संस्कृती, संतसाहित्य आणि दैवतविज्ञान अशा विषयांमध्ये संशोधन करणारे व्यासंगी अभ्यासक व साहित्यिक डॉ. रा. चिं. ढेरे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मूलगामी संशोधनाचा आणि लालित्यपूर्ण लेखनाचा आनंद घेण्याच्या हेतूने त्यांच्या जन्मदिनी, म्हणजे गुरुवार दि. २१ जुलै रोजी अरभाट फिल्म्स्‌ आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांनी ’लौकिक व अलौकिक’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. टिळक रस्त्यावरील ज्योत्स्ना भोळे सभागृहात संध्या. ७ वाजता होणार्‍या या कार्यक्रमात ज्योती सुभाष, माधुरी पुरंदरे, ओम भूतकर आणि हर्षद राजपाठक डॉ. ढेरे यांच्या निवडक साहित्याचे अभिवाचन करणार आहेत. चित्रपट-दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे. संहिता-संकलन चिन्मय दामले यांचे आहे, तर दृश्य-संरचना सुनीत वडके यांनी केली आहे.

लोकपरंपरा, धर्म, तत्त्वज्ञान, दैवतशास्त्र, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, कला अशा अनेक विषयांना कवेत घेणारे, पण जनसामान्यांना सहज समजेल, असे विपुल लेखन डॉ. ढेरे यांनी केले. आपल्या रोजच्या धर्मजीवनाशी आणि लोकपरंपरांशी निगडित असे डॉ. ढेर्‍यांचं लेखन वाचकांना निखळ आनंद देणारे आणि समृद्ध करणारे आहे. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या झळाळत्या शोधवाटांवरून चालण्याची संधी या कार्यक्रमाद्वारे रसिक-वाचकांना मिळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे चित्रपट-नाट्यक्षेत्रातल्या नामवंतांनी एकत्र येऊन डॉ. ढेरे यांच्या विविधस्पर्शी संशोधनाचा व साहित्याचा आस्वाद घेणारा हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून प्रथम येणार्‍यांस प्राधान्य असेल. काही जागा राखीव आहेत

छान लेख वरदा. ढेर्‍यांच्या कार्याविषयी आपण बोललो आहोतच. ह्याचप्रमाणे कोसंबी, आणि राजवाडे ह्यांच्यावरही लेख वाचायला छान वाटेल.

सुंदर लेख. हात जोडावे असे तीनच ज्ञानतपस्वी मला मराठीत सापडले - ढेरे, कुरुंदकर आणि दुर्गाबाई
बाकीचे लेख वेळ काढून वाचतो आता.