भगवद्गीता - सोप्या मराठीत - ९

Submitted by एम.कर्णिक on 19 February, 2009 - 14:18

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कॄष्णार्जुनसंवादापैकी
राजविद्याराजगुह्ययोग
नावाचा नववा अध्याय

निष्कपटी तू म्हणुन तुला हे गुह्यज्ञान देतो
जे जाणुन घेता अशुभातुन मुक्तिलाभ होतो १

जे गुह्य अति अन् श्रेष्ठ असे सार्‍या विद्यांमधी
पवित्र, उद्बोधक, सोपे अन् उचित धर्मामधी २

यावर नाही श्रध्दा ज्यांची असे पुरूष, पार्था
मला न मिळता पुन: भोगिती जन्ममॄत्युगर्ता ३

अदॄष्यपणे व्यापुनि आहे मी सारे जगत
माझ्या ठायी प्राणिमात्र पण मी नच त्यांच्यात ४

असे असुनिही माझ्यामध्ये प्राणिजात नसती
पहा ईश्वरी करणि, करी मी जरि त्यांची निर्मिती ५

सर्व दिशांना वाही वारा राहुनी नभात
तशी समज तू, जीवसॄष्टि ही माझ्यामधि स्थापित ६

कल्पांती हे सर्व जीव माझ्यांत विलिन होती
नवकल्पारंभी मी त्यांची करी पुन्हा निर्मिती ७

प्रकॄतीस अनुसरून जाहले जे जे परतंत्र
पुन:पुन्हा निर्माण करी मी असे भूतमात्र ८

हे जे माझे कर्म, मी करी उदासीनतेने
म्हणून ना मज बंधक होते ते सर्वार्थाने ९

माझ्या नजरेखाली करते प्रकॄति ही निर्मिती
याच कारणाने जगताला पार्था, येते गती १०

मनुष्यदेहामधि पाहुनि मज मूढ न ओळखती
परमेश्वर जगताचा मी या सत्या ना जाणती ११

कर्म, ज्ञान, मन तसेच आशा हो निष्फळ त्यांच्या
जे मोहाने जाति आहारी असुरी वॄत्तीच्या १२

पवित्र वॄत्ती धारण करती जे महानुभाव
भजती मजला अनन्यभावे जाणुनि अधिदेव १३

निश्चयपूर्वक सदैव करती माझे संकीर्तन
योगाचरणी होउन करती भक्तीने वंदन १४

तसे इतरही यज्ञ करूनि वा विविध अन्य रीती
एकत्रित वा अलगपणे मम उपासना करती १५

मी यज्ञ, तसा मंत्र मीच, मी अग्नि, घॄत मीच
मी समिधा, अन् तर्पणही मी, औषधही मीच १६

जगताचा आधार, पिता अन् माताही मीच
मीच पितामह, चतुर्वेद मी, ॐकारहि मीच १७

मी सर्वप्रभू, सर्वगती, अन् सर्वसाक्षी, भर्ता
शरणसखा मी, उगम स्थिती मी, मी निर्गमकर्ता १८

मीच आवरी अथवा सोडी उन्हा पावसाला
अमॄत अन् मॄत्यू दोन्ही मी भल्या वाइटाला १९

साम, यजु, ऋक् या वेदांतिल कर्मे आचरूनी
माझी पूजा करिती स्वर्लोकाचि आस धरूनी
ते पुण्यात्मे देवेंद्राच्या स्वर्लोकी जाती
अन् केवळ देवांस प्राप्य जे भोग तेहि घेती २०

स्वर्गाच्या उपाभोगानंतर जसे सरे पुण्य
मर्त्यलोकि मग जन्म घ्यावया हो पुनरागमन
अशा प्रकारे वेदत्रयीतिल कर्में करणार्‍यां
करावया लागती स्वर्ग−भू अशा कितिक वार्‍या २१

अनन्यभावे चिंतन माझे करूनी मज भजती
त्यांच्या निर्वाहाची देतो, पार्था मी शाश्वती २२

दुसर्‍या देवांवरच्या श्रध्देने करती यजन
विधिवत् ना तरि पर्यायाने करती मम पूजन २३

कारण सार्‍या यज्ञांचा मी स्वामी अधिदैवत
मजविषयी अनभिज्ञ म्हणुनी ते असती मार्गच्युत २४

देवव्रती देवांस, तसे पितॄव्रती पितरांस
जे ज्यांशी प्रामाणिक, मिळती जाउनिया त्यास
अवलंबुन सारे ज्याच्या त्याच्या श्रध्देवरती
माझ्यावर निष्ठा ज्यांची ते मज येउनि मिळती २५

पान, फूल, फळ, वा केवळ जल करती मज अर्पण
निष्ठापूर्वक, ते प्रेमाने मी करतो ग्रहण २६

कौंतेया, जे भक्षण करिशी, हवन, दान करिशी
सारे काही मज अर्पण कर जे जे आचरशी २७

कर्माचे परिणाम शुभाशुभ जे असतिल काही
मुक्त होउनि त्या सर्वांतुन मिळशिल मज ठायी २८

मज सारे सारखे, कुणि नसे प्रिय वा अप्रिय
भक्त आणखी माझ्यामध्ये नसे अंतराय २९

दुराचारी जरि भक्त, मानि मी साधूसम त्यास
कारण त्याचे भक्तिमधि मन स्थिर असते खास ३०

शीघ्र मिळे धर्मात्मापद त्या शांतीही शाश्वत
कौंतेया, मम भक्त कदापी नसे नाशवंत ३१

सत्वशील, ब्राम्हण वा राजर्षी जे क्षत्रिय
पुण्यवंत मम भक्तीने जे ते तर नि:संशय,
ममाश्रयाने नारी वा नर, वैश्य, शूद्रयोनी
हे देखिल चिरशांति मिळवती, पार्था घे ध्यानी ३२

दु:खवेदनापूर्ण अशा या मर्त्यलोकात
वास्तव्य तुझे, म्हणुनि अर्जुना, हो माझा भक्त ३३

भक्तीपूर्वक मनात स्मरूनी कर मजला नमन
या मार्गाने येशिल मजप्रत, हे कुंतीनंदन ३४

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कॄष्णार्जुनसंवादापैकी
राजविद्याराजगुह्ययोग नावाचा नववा अध्याय पूर्ण झाला.
**********

अध्यायांसाठी दुवे :
अध्याय आठरावा http://www.maayboli.com/node/6531
अध्याय सतरावा http://www.maayboli.com/node/6448
अध्याय सोळावा http://www.maayboli.com/node/6370
अध्याय पंधरावा http://www.maayboli.com/node/6307
अध्याय चौदावा http://www.maayboli.com/node/6226
अध्याय तेरावा http://www.maayboli.com/node/6166
अध्याय बारावा http://www.maayboli.com/node/6101
अध्याय अकरावा http://www.maayboli.com/node/6072
अध्याय दहावा http://www.maayboli.com/node/5966
अध्याय नववा http://www.maayboli.com/node/5937
अध्याय आठवा http://www.maayboli.com/node/5868
अध्याय सातवा http://www.maayboli.com/node/5790
अध्याय सहावा http://www.maayboli.com/node/5720
अध्याय पाचवा http://www.maayboli.com/node/5651
अध्याय चौथा http://www.maayboli.com/node/5613
अध्याय तिसरा http://www.maayboli.com/node/5613
अध्याय दुसरा http://www.maayboli.com/node/5479
अध्याय पहिला http://www.maayboli.com/node/5479

प्रिय मित्रांनो,
माझ्या इतर कवितांसाठी माझ्या http://mukundgaan.blogspot.com या ब्लॉगवर भेट देण्याचे आग्रहाचे आमंत्रण देत आहे.
-मुकुंद कर्णिक.

गुलमोहर: 

कर्णिकसाहेब मस्त लिहिताय.

आम्हा सर्वांच्या शुभेच्छा आहेतच!

शरद

मस्त... मराठी रुपांतर खरंच सुरेख केलंय...

छान ... शुभेच्छा

सुंदर, अप्रतीम!

हरीश