उंबरा

Submitted by हर्षल_चव्हाण on 13 July, 2016 - 01:05

सैल झाले बंध आता, व्यर्थ आहे बांधणे,
दोन धृवांतील अंतर, हे कशाने सांधणे?

मी तुझ्या श्वासात माझे श्वास होते गुंफले,
"नाव या नात्या नको", गर्दीस माझे सांगणे...

शोध घेताहे सुखाचा, दु:ख ये पत्त्यावरी,
(पण मनाला आस ही, व्हावे उन्हाचे चांदणे)...

अंत देव्हार्‍यात वा तिरडीवरी आहे जरी,
"पण, जरा उमलून घे", आहे फुलांचे सांगणे,

का निघेना पाय येथुन, का पुन्हा ती ओढही?
अंगणी माझ्या मनाच्या, आठवांचे रांगणे...

कोणत्या हद्दीत येते, प्रेम हे माझे-तुझे?
उंबरा आहे शरीराचा, मनाने लांघणे...

- हर्षल (१३/०७/१६ - दु. ३.००)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम आहे की!
>>>>> कोणत्या हद्दीत येते, प्रेम हे माझे-तुझे?
उंबरा आहे शरीराचा, मनाने लांघणे...>>>>> वाह!!! खासच.
>>>>> अंत देव्हार्‍यात वा तिरडीवरी आहे जरी,
"पण, जरा उमलून घे", आहे फुलांचे सांगणे,>>>> बहोत खूब!!

Chanch