ठाकरे सर ः एक ‘नारळी’ व्यक्तिमत्त्व

Submitted by maheshp on 7 July, 2016 - 23:45

धिप्पाड शरीरयष्टी, भेदक नजर... असं हे धडकी भर‍वणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे ठाकरे सर. ते कोणता विषय शिकवतात हे अद्याप मला कळलेलं नाही; पण पिंपळगाव बसवंतच्या के. के. वाघ कॉलेजमध्ये ते आम्हाला एनसीसीला होते एवढं मात्र ठामपणे सांगू शकतो. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर जाणवलं, की ते भयंकर वगैरे काही नव्हते. ते तर ‘नारळी व्यक्तिमत्त्व’ होतं! होय, नारळीच!! नारळ बाहेरून टणक असलं तरी आतून मात्र गोड असतं. तसंच काहीसं.

एनसीसीतली एक छोटीशी आठवण आहे. एकदा माझी एनसीसीच्या कॅम्पसाठी निवड झाली नाही. ती कदाचित पुढच्या वर्षी झाली असती; पण सोबतीचे अनेक जण कॅम्पला जाणार म्हणून मलाही या कॅम्पला जाण्याची प्रचंड इच्छा झाली. मी त्यांना भेटलो. ‘‘सर, मला कॅम्पला यायचंय.’’ ते काहीसे कचाट्यात सापडल्यासारखे जाणवले. शेवटी त्यांनी सांगितलं, बरं ठीक आहे. कारण कॅम्पसाठी विद्यार्थिसंख्या मर्यादित असते. मात्र, तरी त्यांनी माझी कॅम्पसाठी निवड केली. देवळाली आर्टिलरी सेंटरमध्ये कॅम्प धम्मालच झाला. कॅम्पचं सर्टिफिकेट सर्वांना मिळालं; पण मला काही मिळालं नाही. मला वाटलं, आपल्याला कॅम्पमध्ये बळेच घुसडलं म्हणून ते दिलं नसेल. पण त्यांना विचारण्याचीही हिम्मत झाली नाही. जाऊद्या, मला कॅम्पला पाठवलं, हेच माझ्यासाठी मोठं आहे म्हणून मी गप्प बसलो. पण आजही प्रश्न अस्वस्थ करतोय, की मला प्रमाणपत्र का दिलं नसेल?

बारावीनंतर मी केटीएचएममध्ये अॅडमिशन घेतली आणि गाव जवळजवळ सुटलंच. ठाकरे सरही दृष्टिपटलावरून जवळजवळ धूसरच झाले. ते आता गावात राहत नाहीत, हेही बरीच वर्षे माहीत नव्हतं. सोबतीचे मित्रंही विखुरले. योगायोगाने दोन दिवसांपूर्वीच जुना सोबती अरविंद रोकडे भेटला. तब्बल २३ वर्षांनी! खूप गप्पा झाल्या. मित्रांच्या आठवणी निघाल्या. अनेक सरांच्या आठवणींना उजाळा दिला आणि अचानक म्हणाला, अरे ठाकरे सरही माझ्या घराजवळच राहतात.

ठाकरे सर म्हंटल्याबरोबर माझ्या डोळ्यांसमोर त्यांच्या आठवणीतला संपूर्ण पट फ्लॅशबॅकसारखा झरझर तरळून गेला. ती एनसीसी, खाकी वर्दीतली रुबाबदार देहयष्टी, हजरजबाबी... इत्यादी इत्यादी. मी म्हंटलं, ‘‘मला भेटायचंय रे. असतात का घरी?’’ कारण रिटायर्ड माणसांचा काही नेम नसतो. घरात नेमक्या वेळेत सापडतीलच असं कधी होत नाही. पण अरविंद म्हणाला, की नाही असतात घरी.

फार विलंब न करता दुसऱ्याच दिवशी आम्ही सायंकाळी ठाकरे सरांच्या घरी. घरी गेल्याबरोबर त्यांच्या पत्नी समोर आल्या. मी म्हणालो, ‘‘सर आहेत का?’’

सौ. ठाकरे : ‘‘हो आहे. आपण कोण?’’

मी : मला ओळखा बरं. (सर आणि मी एकाच गल्लीच राहायचो. त्यामुळे सरांसह त्यांच्या घरातले सर्वच मला लहानपणापासून ओळखायचे.)

सौ. ठाकरे (कपाळावरील रेषा आखडून आठवण्याचा प्रयत्न करीत) : ‘‘नाही आठवलं. कोण?’’

मी : सरांना बोलवा. ते ओळखतात का बघू?

सौ. ठाकरे : तुम्ही बसा. ते येताहेत..

माझी उत्सुकता चाळवली. सर तसेच दिसत असतील का? मला ओळखतील का? (ओळख सांगितल्यानंतरही ओळखतील का, हाही प्रश्न चाटून गेला)

सर आले. चेहरा तसाच भेदक, शरीरयष्टीही तशीच मजबूत; पण उतारवयाच्या खुणा तेवढ्या नव्या होत्या. निदान माझ्यासाठी तरी. त्यांनी आम्हा दोघांकडेही पाहिलं. अरविंदला रोजच पाहत आले असल्याने त्याला न ओळखण्याचा प्रश्नच नव्हता. माझ्याकडे मात्र ते प्रश्नांकित नजरेने पाहत होते. मी म्हंटलं, सर, नमस्कार. ओळखलंत का?

ते काहीसे माझा चेहरा वाचत होते; पण कुठेही ओळखीची खूण सापडेना. शेवटी मलाच वाटलं, की आता फार काही ओळख लपवू नये. मी त्यांना नाव सांगितलं नि ते आश्चर्यचकित मुद्रेने म्हणाले, ‘‘अरे, किती बदललास तू!’’ खूप उत्सुकतेने माझी ओळख जाणून घेण्यासाठी थांबलेल्या सौ. ठाकरेही म्हणाल्या, ‘‘अरे बापरे! ओळखूच येत नाही आता तू.’’

ठाकरे सरांसोबत खूप गप्पा झाल्या. वर्षा, दीदीची खुशाली कळली. त्यांची तिसरी मुलगी राणी फारशी आठवत नव्हती. पण ती म्हणे, की ‘गावातल्या सर्वांच्या आठवणी येथे निघतात.’ या गप्पांमध्ये एनसीसीचा विषय आला आणि मीही माझ्या मनातली खंत बोलून दाखवली... ‘‘सर, तुम्ही मला कॅम्पचं प्रमाणपत्रच दिलं नव्हतं!’’ सरांना आता एवढ्या वर्षांनंतर सगळंच काही आठवणार नव्हतंच... पण गप्पांच्या या ओघात मला सतावणारी खंत त्यांना भेटून मात्र कायमची पुसून गेली.

खूप वेळ झाला होता. गप्पा संपत नव्हत्या. आमचा आणखी एक मित्र प्रफुल्ल मुसळे आमची वाट पाहत होता. पाच मिनिटांत येतो, असं सांगितलं, पण दीड तास उलटला होता. आता त्याचा फार अंत पाहायचा नव्हता आणि सरांशी गप्पा मारण्याचा मोहही आवरायला हवा होता.... पुन्हा भेटू, असं म्हणत अखेर तेथून बाहेर पडलो; पण त्यांच्या भेटीच्या आनंदात गुरफटून गेलो होतो...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users