जीवाभावाचा पार

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 2 July, 2016 - 02:18

आमचा उरणचा कुंभारवाडा अजूनही झाडाझुडपांच्या सावलीत आहे ही एक सुखद गोष्ट आहे. आमच्या वाडीतील घराभोवतीही काही जुनी झाडे आहेत. त्यातच घराच्या बाजूलाच एक पुरातन आंब्याचे झाड आहे. आम्ही १२ वर्षापूर्वी इथे नवीनच राहायला आलो तेव्हा माझ्या सासर्‍यांनी त्या आंब्याच्या झाडाला एक मोठा पार बांधून घेतला.आता हा पार म्हणजे आमची एक जीवाभावाची वास्तूच झाली आहे. आम्ही जॉइंट फॅमिली असल्याने हा पार म्हणजे मोकळ्या हवेतील आमच्या कुटुंबाचे स्नेहसंमेलनाचे ठिकाण म्हणा किंवा आमचा कट्टा म्हणा. घरातील लहान मुलांसाठी हा पार म्हणजे जणू मामाचे गावच.

झाड पुरातन आणि मोठा असल्याने पारावर गार सावली पहुडलेली असते. सुट्टीत आमच्या घरातील बच्चे कंपनी ह्या पारावर अनेक खेळ खेळतात. आंब्याच्या फांदीला बांधलेल्या दोरीच्या झोपाळ्यावर माझ्या मुली श्रावणी आणि राधा मनमुराद झोके घेतात. दोघी लहान असताना त्यांना भरवण्याचा कार्यक्रम बर्‍याचदा ह्याच पारावर चिऊ काऊ दाखवत व्हायचा. पुतण्या अभिषेक फुटबॉल व क्रिकेट खेळताना पार बॉल अडवून खेळाचा आनंद लुटत असतो. मधून मधून संध्याकाळी आम्ही घरातील सर्व मंडळी पारावर एकत्र बसून चणे, शेंगदाणे, भेळ भेळीचा बेत करतो व खात गप्पा मारत बसतो तेव्हा तो पारही सगळ्यांना एकत्र भेटून सुखावतो. महिन्यातून एकदा तरी रविवारी आम्ही पारावर एकत्र जेवायला बसतो. ह्या वनभोजन आणि सहभोजनामुळे जेवणाला वेगळाच आनंद व रुचकरपणा येतो.
घरात काही मोठे कार्यक्रम म्हणजे लग्न, बारशांसारखे असले किंवा मोठ्या प्रमाणात पाहुणे आले की ह्या पाराचा आम्हाला मोठा आधार असतो. मोठ्या प्रमाणात बाहेर बनणार्‍या जेवणाची तयारी ह्या पारावरच चालू असते. जेवण तयार झालं की सगळं जेवण पारावरच ठेवून पाराच्या समोरच्या भागात टेबल खुर्च्यांच्या पंगती मांडल्या जातात.
आमच्या गैरहजेरीत पारावर पशू पक्षी बागडत असतात. ह्याच आंब्याच्या झाडावर अनेक ढोली आहेत ज्यात ह्या साळुंख्याची कुटुंब राहतात. त्यामुळे त्यांचे संवाद त्यांची भांडण, त्यांचा लाडिकपण सगळाच ह्या पारावर चालू असतो. इतर अनेक पक्षांची हजेरी पारावर लागत असते.
असा हा आमचा जिव्हाळ्याचा पार सगळ्यांना गुण्या गोविंद्याने नांदवून घेणारा, कधी कंटाळा आला, मूड नसला, थकवा जाणवत असला की ह्या पारावर शांत जाऊन बसलं की ह्या पाराच्या सहवासात तो थकवा दूर पळून जातो. नवीन उत्साह

मी ब्लॉग बनवत आहे. जाणकारांनी पाहून काही त्रूटी असतील नर नक्की सांगा. नविनच बनवत असल्याने मला त्यातले पुरेसे ज्ञान नाही.

http://prajaktamhatretarangmaniche.blogspot.in/

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधं, हेवा वाटावा असंच !
अर्थात, हातीं घ्याल त्यांत पारंगत होणं हा तर तुमचा माबोकराना सुपरिचित स्थायीभावच ! Wink

व्वा...खुप मस्त लिहिलेय...लोकसत्ता मागच्या शनिवारी वाचलेले आणि आत्ता 'त्या तुम्हीच का' हे विचारण्यासाठीच मायबोली उघडले तर 'जीवाभावाचा पार' ह्जर Happy ... उत्तरही मिळाले....

ब्लॉगची रचना सुन्दर आहे... खुप आवड्ला... लेख वाचत रहावेसे वाट्तात.. प्रतिसाद देऊन ब्लॉगवर गेले...वाचतच बसले आता लक्षात आले कि अरे मी तर मायबोली वाचत होते....उत्कृष्ट ब्लॉग....

जागू, ब्लॉगसाठी मनापासून अभिनंदन. ब्लॉग छान आहेच. पण मला महत्त्वाचं वाटतंय ते झपाट्याने शहरीकरण होत असलेल्या भागातल्या मूळ संस्कृतीचं तुझ्यामुळे होत असलेलं दस्तऐवजीकरण . यापूर्वी अष्टागरातल्या जीवनावर शंकर सखाराम यांनी खूप लिहिलंय. ते अर्थात वेगळ्या अंगाने जाणारं, संस्कृतीचा शोध घेणारं लिखाण होतं. तुझं लिखाण वेगळं. साधं, सरळ. जुन्या काळात बायका ओव्या गात. या स्त्रीगीतांतून आजूबाजूचा निसर्ग, वस्तुजात यांच्याशी जिव्हाळ्याचं नातं जोडलेलं असे. वस्तुमात्राविषयीचा तो जिव्हाळा तुझ्या लिखाणातून दिसतो. आणखी एक. मासळीविषयीचं इतकं थेट वर्णन अजूनपर्यंत कोणीही इतक्या मोकळेपणानं, कोणताही गंड न बाळगता केलेलं नाही.(पु.ल. देशपांडे आदींचा वेगळाच ज्याँर. ती गोष्ट वेगळी.) एक र. वा. दिघ्यांचं' पाणकळा' आठवतंय. मराठी पाकविश्वात अशा ऑथेंटिक माहितीची मोठीच उणीव होती. ती आता हळूहळू कमी होतेय. या धीटपणाचं श्रेय नक्कीच तुला जाईल.
कोंकण म्हणजे फक्त दापोली-चिपळूण-रत्नागिरी नव्हे किंवा देवगड-वेंगुर्ले नव्हे. पूर्वीचा कुलाबा जिल्हा हाही कोंकणातच येत होता हे आजकाल सांगावं लागतंय. नवी मुंबई, पेण, पनवेल, न्हावे-शेवे, थळ वायशेत, द्रोणगिरी अशासारख्या महाकाय प्रकल्पांमुळे इथल्या लोकजीवनात मोठीच उलथापालथ झालीय. हे जीवन पूर्ण बदलण्याआधी उत्तर कोंकण कसं होतं ते लिहून ठेवण्याच्या कामातला थोडा अंश तुझ्याकडून पार पाडला जातोय. आज हे किरकोळ वाटेल, पण वीसपंचवीस वर्षांनी त्याचं महत्त्व कळेल. असो.
खूप शुभेच्छा.

साधं, हेवा वाटावा असंच !
अर्थात, हातीं घ्याल त्यांत पारंगत होणं हा तर तुमचा माबोकराना सुपरिचित स्थायीभावच ! >>>>>भाऊकाका +१००० Happy

जेवण तयार झालं की सगळं जेवण पारावरच ठेवून पाराच्या समोरच्या भागात टेबल खुर्च्यांच्या पंगती मांडल्या जातात.>>>>>>याचा आनंद अनुभवला आहे Happy

जेवण तयार झालं की सगळं जेवण पारावरच ठेवून पाराच्या समोरच्या भागात टेबल खुर्च्यांच्या पंगती मांडल्या जातात.>>>>>>याचा आनंद अनुभवला आहे स्मित >> हो बरोबर . वाचताना मला तीच आठवण येत होती.

मस्त लिहिलंय जागू. ब्लॉग ही छानच झालाय.

भाऊ, प्रज्ञा, उषा, झंपी, अन्जू, वर्षू, देवकी, चनस धन्यवाद.

भाऊकाका आज तुम्हाला सलाम. Happy

हिरा आहो किती छान लिहीलाय तुम्ही प्रतिसाद. हा माझ्याचसाठी आहे का हे मी वारंवार चेक करतेय.

जिप्सी, ममो ते लिहीताना मलाही तिच आठवण येत होती.