जादूची गोळी

Submitted by यतिन-जाधव on 28 June, 2016 - 00:35

सचिन आणि महेश दोघे अतिशय जिवलग मित्र, अगदी जीवाला जीव देणारे, दोघांच्या आवडीनिवडीही अगदी सारख्याच, दोघेही खोडकर स्वभावाचे, कॉलेजात दोघे मिळून एकत्र खोड्या काढायचे आणि एखाद्या गरीब स्वभावाच्या विद्यार्थ्याच्या नावावर सहज खपवून स्वतः मात्रं नामानिराळे राहायचे, कॉलेजात दोघांचेही प्रेम एकाच मुलीवर बसले, आता झाली ना पंचाईत पण करणार काय, मैत्रीपुढे छोरी किस झाड कि पत्ती या अंडरस्टॅंडींगने दोघांनीही मैत्रीसाठी आपापला काढता पाय घेतला आणि छोरी दोघांनाही झुलवून तिसऱ्याच बरोबर पळून गेली.
पुढे अशीच नवीन-नवीन जाळी टाकता टाकता सचिनच्या गळाला मधुरा नावाचा एक मासा लागला, सुरवातीच्या खोड्यांच रुपांतर हळूहळू प्रेमात होऊन आता ते त्यांच्या विवाहात बदललंय, सचिन व्यवसायाने इंजिनियर आहे तर मधुरा एका प्रायवेट कंपनीमध्ये नोकरी करते, मुळात मधुरा आपली बहिण मृणालबाबत जरा जास्तच पझेसिव आहे, मृणाल आता कोलेजच्या शेवटच्या वर्षाला आहे, मधुरा एका छोट्या गावातून शिक्षणासाठी मुंबईत आली तेव्हा ती होस्टेलवर रहात असे, त्यामुळे होस्टेलवरचं खडतर जीवन तिने अनुभवलंय, त्यांचे ते उठण्या-बसण्याचे, आंघोळीचे, जेवणाचे, अभ्यासाचे, बाहेर जाण्या-येण्याचे नियम अगदी ठराविक वेळेलाच ठराविक गोष्ट करण्याच्या नियमाने तर ती अगदी पार कंटाळून गेली होती, म्हणून मृणालला त्या खडतर काळापासून वाचवण्यासाठी तिने आपल्या लग्नानंतर मृणालला होस्टेलवर न ठेवता आपल्यासोबत घरीचं ठेऊन घेतलंय, त्यामुळे नुकताच त्यांचा विवाह झाला असला तरी पण अजूनही घरात त्या दोघांना हवातसा एकांत मिळत नाहीयय आणि ही गोष्ट मैत्रीमध्ये सचिनने महेशला सांगितलीय, महेशने ही त्याला त्यासाठी एखादे दिवशी प्रत्यक्ष घरी येउन परिस्थिती पाहूनच योग्य तो निर्णय घेऊन आपण यावर काहीतरी सोलुशन काढण्याचे प्रॉमिस दिलय.
महेशही आता डॉक्टर झालाय, त्याचेही इकडेतिकडे झोल चालूच आहेत, पण अजून हवातसा मासा गळाला लागत नाहीयय, पण त्याबाबत त्याचे प्रयत्नही अगदी युद्धपातळीवर चालू असतात, मुळातच उचापत्या स्वभाव आणि प्रत्येक गोष्टीत काहीतरी नवीन करून पाहण्याची खोड, यामुळे तो नेहमीच काहीतरी छोटे-मोठे शोध लावत असतो आणि त्याचे हे प्रयोग आपल्या मित्रांवरच करत असतो. असेच एकदा एका प्रयोगातून त्याने एक फोर्मुला बनवला आणि आमच्याच दोघा गायक मित्र-मैत्रिणीवर केला, ते सर्वसाधारण आवाजाचे गायक त्याच्या गोळ्या घेतल्यानंतर लगेचच किशोर आणि लताच्या आवाजात गाऊ लागतील हा महेशचा दावा होता, पण प्रत्यक्ष स्टेजवर शोच्या वेळी लता ऐवजी कोंबडीचा आणि किशोर ऐवजी कुत्र्याचा आवाज येऊ लागल्याने लोकांनी तो शो उधळून लावला, शिवाय अंडी टोमॅटोचा मार पडला तो वेघळाच.
असाच एके दिवशी आपल्या मित्राला मदत करायला म्हणून महेश अचानक सचिनच्या घरी थडकतो, घराची बेल वाजवतो, थोड्या वेळाने एक सुंदर तरुणी हळुवारपणे दरवाजा उघडते, महेशची आणि तिची नुसतीच नजरानजर होते, दोघेही नुसतेच एकमेकांकडे पहात राहतात, महेशच्या हृदयाची तार आता झंकारू लागते व तो अचानक ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ सिनेमात शिरतो आणि अनिलकपुरच्या रुपात स्वतःला पाहुन ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हे पूर्ण गाणं एन्जॉय करतो, बरं हे असं होण्याची त्याची ही काही पहिलीच वेळ नाही, प्रत्येक वेळी गळ टाकताना त्याची हिच अवस्था असते आणि साधारण मासा गळाला लागतोय अशी पुसटशी जरी शक्यता निर्माण झाली कि मग काय विचारूच नका, याहूनही बिकट अवस्था होते, याची संपूर्ण स्टोरी त्याने आपल्या मित्रांना किमान पंचवीस वेळातरी ऐकवली असेल, इकडे मृणालचीही अवस्था काही वेगळी नाहीय, पण ती तसं काही दाखवून देत नाही आता मुद्दामच खोट्या रागाचा आव आणून ती विचारते “ यसं मिस्टर ! ” महेश आता थोडा भानावर येतो, तिचा तो चिडलेला आवाजही महेशला आता अतिशय कोमल वाटू लागतो,
मृणाल : ‘ओ कुठे हरवलात, कोण आपण ? आम्हाला कोणतीही वस्तु विकत नकोय.’ महेश आता पूर्ण भानावर येतो,
महेश : ‘ओ तुम्ही मला सेल्समन समजलात काय ?’ थोडं ततपप करत तिला म्हणतो, ‘स.. स.. सचिनचं घर हेच ना ?’
मृणाल : हो हेच, पण तुम्ही कोण ?
महेश : मी सचिनचा मित्र डॉक्टर महेश.
मृणाल : ओ आय एम सॉरी हं, डॉक्टर महेश.
महेश : नो नो इटस ओके मिस…
मृणाल : मृणाल
महेश : तुम्ही मला नुसतं महेश म्हंटलं तरी चालेल, नो फॉरमॅलीटीज.
मृणाल : “ पण डॉक्टर” महेश आता तिला मध्ये अडवत म्हणतो,
महेश : महेशss नुसतं महेशss, तुम्ही मला डॉक्टर नाही म्हणालात तरी चालेल.
मृणाल : ‘ पण जीजू घरी आलेले नाहीत अजून’ महेशच्या हृदयाची तार आता चांगलीच ताडताड उडू लागते.
महेश : ‘अगं माहिती आहे गं मला तो घरी नाहीय ते, म्हणूनच तर मुद्दामच ही वेळ निवडून तर आलो ना?’
पण हे वाक्य मात्र तो मनातल्या मनातच बोलतो, आता उगाचच काहीतरी विषय वाढवण्यासाठी महेश पिण्यासाठी पाणी मागतो, मृणाल पाणी आणण्यासाठी आत जाते, महेश आत जाताना तिला संपूर्णपणे न्याहाळतो आणि हा.ss.य.ss. म्हणून उसासा टाकतो व “विरघळून चंद्र आज रक्तातून वाहे” या गाण्याच्या ओळींच्या अगदी नेमका अर्थ प्रत्यक्ष अनुभवतो, आतून मृणाल पाण्याचा ग्लास घेऊन येते, महेश पाणी पितो आणि मृणालला एक निरोप देतो कि ‘ सचिनला सांग माझं त्याच्याकडे एक महत्वाच काम होत, पण ठीक आहे मी पुन्हा फोन करून येईन.’ असं म्हणून सचिन अगदी तृप्त मनाने बाहेर पडतो. मृणालने आता पूर्णपणे महेशच्या हृदयाचा ताबा घेतलेला आहे, महेशचा मात्र पद्धतशीरपणे मृणालला परत भेटण्याचा प्लान सफल झालेला असतो, मृणालच्या आठवणीने महेश ती रात्र कशीबशी तळमळून घालवतो आणि सकाळी लवकर उठून आधी सचिनला फोन करतो व संध्याकाळी काम आटपल्यावर उशिरा घरी भेटायला येत असल्याचं कळवतो. संध्याकाळी महेश सचिनच्या घरी पोहोचतो, इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर सचिन त्याला विचारतो ज्या कामासाठी आलायस ते तर आधी सांग? महेशच्या शोधक नजरेने सचिन आता ओळखतो कि महेश मृणाललाच शोधतोय, महेश उगाचच मधुरा घरात नसल्याची खात्री करून घेण्यासाठी पाणी मागतो, सचिन स्वतःच उठून पाणी आणायला जायला निघणार इतक्यात महेश त्याला थांबवून विचारतो,
महेश : अरे घरात कोणीच नाहीयय का ?
सचिन : ‘मधुराला यायला उशीर होईल पण मृणाल येइलच इतक्यात’ मृणालच नाव निघताच महेशची कळी खुलते, त्याच्या चेहऱ्यावरच्या बदललेल्या छटा सचिन त्वरीत ओळखतो आणि त्याला विचारतो, ‘काय रे तू मृणालवर तर लट्टू झाला नाहीस ना?’ महेश सुरवातीला नाही-नाही म्हणत आढेवेढे घेतो, पण नंतर कबुल होतो.
महेश : अरे दोस्तोंसे क्या छुपाना !
सचिन : मी आधीच ओळखलं होत, मी नसताना तू घरी येउन गेलास तेव्हाच, साल्या तुला काय मी आज ओळखतोय, आणि मृणालनेही ज्या प्रकारे तुझा निरोप मला दिला त्या वरून तुमचा ताका भिडणार हे मी आधीच ओळखलं होत, चल ऑल दि बेस्ट ! पण मला एक सांग तू माझ्याकडे एक महत्वाचं काम आहे असा मृणालला निरोप दिला होतास ते काम तरी खरं आहे ना, कि तिला पुन्हा भेटण्याचा उगाचच एक बहाणा.
महेश : यार तो बहाणा तर होताच ! पण खरच एक कामही आहे, तुला माहीतच आहे मी नेहमी नवीन-नवीन प्रयोग करत असतो असाच एक प्रयोग करताना मला एक नवीन फॉर्मुला सापडलाय.
सचिन : अच्छा म्हणजे तुला नेहमीसारखा कोणीतरी गिऱ्हाईक हवाय तर प्रयोगासाठी.
महेश : अरे नाही यार तू आपला खास दोस्त ना म्हणून मला तुझ्यावर एक छोटासा प्रयोग करून पहायचा आहे, फक्त तुझी साथ असेल तर.
सचिन : सॉरी यार महेश यावेळी मी तुला काहीही मदत करू शकणार नाही.
महेश : अरे पण ऐकून तर घे मी काय म्हणतो ते !
सचिन : नको मला ऐकायचं पण नाहीय नेहमीसारखी काहीतरी टुकार कल्पना असणार ती फसणार वर माझं हसं होणार.
महेश : बघ परत एकदा विचार कर, झालाचं तर यात तुझा फायदाच आहे, तुमचा लग्नानंतरचा प्रायवसीचा प्रोब्लेम यातून सोल्वं होऊ शकतो विचार कर.
सचिन : काय म्हणतोस ! तसं असेल तर मी एका पायावर तयार आहे तुला मदत करायला.
महेश : हे बघ मी जो नवीन फॉर्मुला बनवला आहे, त्या पावडरच्या दोन छोट्या गोळ्या मी तुला देईन, त्या रात्री झोपताना घ्यायच्या आणि मी सकाळी उठल्यावर तुझ्याकडे येईन, तुला कस काय फील होतंय, डोळ्यांनी कसं आणि किती दिसतंय, याच्या नोंदी घ्यायला.
सचिन : म्हणजे काही भयंकर प्रकार नाहीय ना ?
महेश : काहीही भयंकर नाहीय आणि इफेक्ट फारतर दहा ते बारा तास पर्यंतच असेल.
सचिन : अरे पण मला थोडीशी कल्पना देना, की काय कशा प्रकारे त्याचा इफेक्ट असेल.
महेश : नाही सचिन ते मी आधी नाही सांगणार, पण सकाळी उठल्यावर तू जे अनुभवशील ते नक्कीच तुझ्या आवडीचं आणि फायद्याचं असेल.
सचिन : मग तू हा प्रयोग स्वतःवर का नाही करून पाहत ?
महेश : पण मी स्वतःवरचं प्रयोग केला तर त्याच्या नोंदी कोण ठेवणार ? तू कशाला काळजी करतोस मी आहे ना.
सचिन : अरे तू आहेस म्हणूनच तर काळजी वाटते ना, मागच्या वेळेला तु मला अगदी पुराणकाळात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता प्रत्यक्ष कृष्णाच्याच आवाजात ऐकू येईल असं सांगून एक गोळी दिली होतीस, पण त्याचं काय झालं माहितीय ना?, मला माझ्या समोरच्या व्यक्तीच्या मनातलं सगळं ऐकू येऊ लागलं होत, ऑफिसात आणी घरात झालेली भांडणं आणि तो दिवस मी अजूनही विसरू शकलो नाही.
महेश : अरे त्यावेळी थोडीशी चूक माझ्याकडून झाली होती, पण नंतर ती मी सुधारलीच ना ?
सचिन : ठीक आहे तरी पण मला थोडीतरी कल्पना दे, या गोळीने मी काय पाहू शकतो, काय फील करू शकतो.
महेश : रात्री गोळी घेऊन झोपल्यावर तू जेव्हा सकाळी उठशील तेव्हा तुला सगळ्या गोष्टी स्पष्ट दिसतील, तुला फक्त इतकंच सांगतो कि अगदी भिंती पलीकडच्याही वस्तू, माणसं देखील तू पाहू शकशील.
....................................................................................................................................क्र्मश

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users