अन हॅपीनेस ईंडेक्स

Submitted by ऋन्मेऽऽष on 23 June, 2016 - 14:43

ऑफिसमध्ये आज कोणीतरी काहीतरी डिजाईन चुकवले. ज्याचा भुर्दंड आमच्या सर्व टीमला भोगावा लागणार होता. गेले पाचसहा दिवसांची मेहनत पाण्यात गेली होती. नव्याने तीन दिवस त्यातच वाया घालावे लागणार होते. साला ईथे ईंजिनिअरचे अर्धे अधिक आयुष्य रिवर्कमध्येच जाते. जर देवाने तुम्हाला शंभर वर्षाचे आयुष्य दिले असेल आणि तुम्ही चुकून ईंजिनीअर झालात तर टेक्निकली तुम्ही ८० वर्षच जगतात. कारण आयुष्याची २० वर्षे एकदा केलेले काम रीपीट करण्यातच जातात. तर ते एक सोडा. या गोंधळाचा सुगावा लागल्यानंतर काही त्रस्त जीव सुट्टा मारायला टपरीवर गेले. त्यातले काही जण चैतन्यकांडी अंगात थोडेफार चैतन्य भरेल या आशेने गेले, तर काही जण नव्या जोमाने पुन्हा काम करण्यासाठी ताजेतवाने होण्यास चहा प्यायला गेले.

मी एक त्रस्त जीव सुखाच्या शोधात गूगलमहाराजांना शरण गेलो. "हाऊ टू बीकम हॅपी" असे काहीतरी ईंग्रजीमध्ये शोधून सुखी होऊया म्हटले आणि हॅप्पी शब्द टाईपताच अलिबाबाची गुहा उघडून त्यातून "हॅपीनेस ईंडेक्स" नावाचे रत्न बाहेर आले. मी भारतीय असल्याचे गूगलने अचूक ओळखत भारतीयांच्या हॅपीनेस ईंडेक्सबद्दलची एक बातमी पहिल्याच पानावर झळकावली. आणि त्यावर क्लिक करताच.....
मला एक मनोरंजक, धक्कादायक, शरमेची आणि लांच्छनास्पद बातमी वाचायला मिळाली.

१) मनोरंजक अश्यासाठी की हॅपीनेस ईंडेक्स असा काहीसा प्रकार असतो ज्यात एखाद्या देशातील लोकांचे सुखसमाधान मोजले जाते हे मला पहिल्यांदाच समजले.

२) धक्कादायक यासाठी की त्या हॅपीनेस ईंडेक्समध्ये भारताचा आणि भारतीयांचा क्रमांक ११८ वा होता. आपण भले इथे अच्छे दिन आले आणि मेरा देश बदल रहा है असे कोकलत असलो तरी वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या 2-3 वर्षांत या हॅपीनेस ईण्डेक्स मधील आपली क्रमवारी घसरत ११३ वरून ११८ वर पोहोचली आहे.

३) शरमेची यासाठी की कामानिमित्त ज्या गोर्‍या लोकांशी माझे दररोज बोलणे होत असते आणि कॉल झाल्यावर ज्यांची आम्ही इथे यथेच्छ टिंगल उडवत असतो, ते तिथे टॉप टेनमध्ये नांदत होते. त्यामुळे ते जेव्हा हॅपीनेस इंडेक्स नावाचा प्रकार चेक करतील तेव्हा आपली किती टिंगल उडवतील या कल्पनेनेच माझे पाणीपाणी झाले.

आणि सरतेशेवटी,
४) लांच्छनास्पद यासाठी की पाकिस्तान सुद्धा आपल्या आधी ९२ व्या क्रमांकावर विराजमान आहे. एवढेच नव्हे तर आपण चक्क बांग्लादेशच्याही मागे आहोत. बस्स हे जेव्हा मला समजले त्या क्षणीच, फाळणीनंतर सीमेपलीकडच्या लोकांपेक्षा आपण जास्त खुश आहोत हा माझा भ्रम अगरबत्तीच्या राखेसारखा कोसळून पडला.

गंमत बघा, जेव्हा मी हि बातमी माझ्या सहकार्‍यांना दाखवली तेव्हा ते खळाळून हसू लागले. आणि ईथे मी विचारात पडलो कश्यावरही हसू शकणारी ही जमात आपली, मग हा हॅपीनेस ईंडेक्स नक्की कश्याच्या आधारावर ठरवला जातो..

बातमी चाळली, त्यातून खालील निकष सापडले..

1. real GDP per capita
2. social support
3. healthy life expectancy
4. freedom to make life choices
5. generosity
6. perceptions of corruption.

बघा जरा. ईंग्लिशमध्ये सापडलेय. कोणाला काही समजतेय तर. मलाही समजवा. खरेच अच्छे दिन यायला आणि आपला हॅपीनेस ईण्डेक्स वाढवायला नक्की काय करावे लागेल. ईथे यावरच चर्चा अपेक्षित आहे.

बाकी मला सापडलेलं, समजलेलं आणि पटलेलं कारण म्हणजे enequality.. विषमता. मग ती आर्थिक असो वा सामाजिक. आणि यातून निर्माण होणारा असंतुष्टपणा. जो कोणाला कधीच हॅपी ठेवू शकत नाही. आणि हा असंतुष्टपणा कायम राहील याची काळजी आपले मायबाप सरकार नेहमीच घेत असते. मग ते सरकार कोणतेही असो.

पण चूक आपलीही आहेच की.. आपल्या घरात आपले पोर उपाशी आहे याची चिंता न करता आपण शेजारच्या घरात बोकड शिजतेय की बैल यात रस घेऊ लागलो तर त्याचा फायदा उचलला जाणारच.. असो, उगाच विषय कुठून कुठे जायचा.. एंजॉय अनहॅपीनेस ईंडेक्स Happy

....

https://en.wikipedia.org/wiki/World_Happiness_Report
http://www.hindustantimes.com/india/india-ranked-118th-in-un-s-world-hap...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तौलनिक आहे तो इंडेक्स.
पुर्वी एक विनोद होता रशियन: गेस्टापो आले आणि त्यांनी आमच्याच घराचं दार वाजवलं." *** इथे राहतात का?" " ते शेजाय्राचं नाव होतं!"
पाकिस्तानी इथे आले की ( विशेषत: स्त्रिया ) सर्वात प्रथम चौपाटीवर जाऊन भेळ खातात म्हणे.
आता समजेल प्रत्येक देशाचा हॅपिनेस कुठे असतो ते.

हॅपिनेस हि टर्म रिलेटिव आहे रे बाबा. डेन्मार्क, नाॅर्वे, फिनलंड वगैरे देशात जेमतेम ३ महिने (नाॅन विंटर) हॅपी राहण्या ऐवजी मी भारतात १२ महिने अनहॅपी राहणं पसंद करीन... Proud

ऋन्मेऽऽष जी... १ ते ४ मधे तुम्हाला जे वाटले ते अगदी अगदि...४ तर अगदिच.

हे सगळ रेलेटिव्ह आहे हे खरय...पण जागतीक पातळी वर तुलना झाली की जरा त्रास होतोच. Happy

राज,
कारण डोक्यावर तळपता सुर्य बघायची आपल्याला सवय झाली आहे. मुळात वातावरण हे हॅपी अनहॅपीचे कारण नाहीयेच. असू शकत नाही. आपण जिथे जन्म घेतो वाढतो तिथे सेट होतो. त्यामुळे आमच्याईथे उन असते तुमच्याकडे थंडी असते हा निकष लागूच होणार नाही.
ईथे परग्रहावरून आलेल्या तटस्थ मनुष्यासारखा विचार करा.

बाकी ज्याला दोन वेळच्या जेवणाची ददात आहे, ज्याला आपली मुले उपाशी झोपलेली बघावी लागत असतील, रोजचे पिण्याच्या पाण्याचे हाल असतील, वैद्यकीय सोयीसुविधांअभावी जिथे लोकं मरत असतील, जिथे एखाद्या समाजालाच वाळीत टाकले जात असेल वा एखाद्याची गुलामी करणे हेच त्यांचे आयुष्य असेल.. अश्यांना विचारल्यास ते आम्ही आहे तिथेच हॅपी आहोत असे नाही बोलणार. तयार होतील ते डेन्मार्क नॉर्वे फिनलॅन्डला जायला..

साधे आमच्या मुंबईचेच घ्या. पावसाळ्यात लेट झालेल्या गर्दीच्या ट्रेनने लटकत का होईना घरी पोचतोय म्हणून हॅपी आहोत. तरीही हे नाही झेपले तर मुंबई सोडून गावाला वा आणखी कुठे राहण्याचा पर्याय उपलब्ध असतो.
पण त्याच पावसाळ्यात मुंबईच्या फूटपाथवर कुडकुडत आसरा शोधणारे ज्यांच्याकडे वेगळे आयुष्य जगण्याचा पर्यायच नसतो ते आम्ही आहोत तिथे खुश आहोत बोलू शकतील का..

भ्रष्टाचाराची तर आपल्याला सवयच झाली आहे. जे कमी करतील ते सरकार चांगले. काय फरक पडतोय केलाच कोणी भ्रष्टाचार वा नाही केला तरी.. आपले जीवन आहे तसेच चालू राहणार हा त्यामागचा विचार. पण हा विचार सर्वांनाच लागू होत नाही. ज्यांचे आयुष्य सरकारी सेवांवर अवलंबून असते त्यांना लागू होत नाही. अश्यांचे वृद्धापकाळातले हाल तर मग विचारूच नका.

क्रमश:

ऑफिसला पोचतोय. सवडीने आणखी लिहेन..

इंट्रेस्टींग धागा ऋन्मेष..

Happiness ही relative term असेल पण Happiness Index साठी निकष दिलेले आहेत. ऋन्मेषला त्यावर मते अपेक्षित असावित.

हायेस्ट हॅपिनेस इन्डेक्स असल्याचे मानला गेलेला भूतान देश मी पाहिला आणि विधात्याला अक्षरशः शरण गेलो. हॅपिनेस इन्डेक्स मोजण्याची कोणतीही यंत्रणा नाही असे म्हणत काही देशांनी भूतानच्या नावापुढे प्रश्नचिन्ह उमटवले आहे असेही ऐकले. पण प्रत्यक्ष भूतानमध्ये असताना 'हॅपिनेस इन्डेक्स आणि त्यावरील गदारोळ गेला खड्ड्यात, आधी भूतान एन्जॉय करा' अशी अवस्था झाली.

काय ते तणावमुक्त हसरे चेहरे! काय ती हवा! काय ती हिमाच्छादीत शिखरे, स्फटिकासारख्या पाण्याने भरलेल्या नद्या, श्रीमंती आणि गरीबी असा भेदच नसणे, पहाडी हिरव्या भाज्या, एवढे करून कायद्याची अंमलबजावणी कडक, गुन्ह्यांचे प्रमाण अल्प! कोठेही दादागिरी, पळवाटा काढणे, नियम मोडणे, बेदरकारी असले प्रकारच नाहीत. स्वस्ताई आहे ते एक औरच! आत्तापर्यंत फक्त तीनच देश पाहिले. थायलंड, दुबई आणि भूतान! पण भूतान खल्लास प्रकार आहे. 'हॅपिनेस इन्डेक्स' समजायला टूरिस्ट म्हणून जाऊन उपयोग नाही, तेथे वास्तव्य करायला पाहिजे, हेही मान्य! पण तिथलेच लोक इतके आनंदी की आपल्याला आपल्याच चेहर्‍यावरच्या (एरवीहून कितीतरी उत्तम) भावांची लाज वाटावी.

२) धक्कादायक यासाठी की त्या हॅपीनेस ईंडेक्समध्ये भारताचा आणि भारतीयांचा क्रमांक ११८ वा होता. आपण भले इथे अच्छे दिन आले आणि मेरा देश बदल रहा है असे कोकलत असलो तरी वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या 2-3 वर्षांत या हॅपीनेस ईण्डेक्स मधील आपली क्रमवारी घसरत ११३ वरून ११८ वर पोहोचली आहे.

<<

रुणम्या "जी" उर्फ गधड्या! Angry

उचलली बोटे लागला टंकायला? राष्ट्रद्रोही कुणीकडला! चल आधी ती बोटं अन कीबोर्ड गोमूत्रात धू. चूळ भर. अन नमोनमो चा ५६ वेळा जप कर.

अच्छे दिन ला नावं ठेवतोस? नरकात जाशील मेल्या आता.

{जिथे एखाद्या समाजालाच वाळीत टाकले जात असेल वा एखाद्याची गुलामी करणे हेच त्यांचे आयुष्य असेल.}

{आपण शेजारच्या घरात बोकड शिजतेय की बैल यात रस घेऊ लागलो तर त्याचा फायदा उचलला जाणारच.}

हिंदू संस्कृती रक्षकांचं अजून इकडे लक्ष गेलेलं दिसत नाही.

बेफिकीर यांच्याकडुन भुतानबद्दल वाचुन तेथे जावेसे वाटु लागलेय. स्वस्ताई असेल तर इतका सुंदर देश तर पाहुन होईन.

अन हॅपी.. एक शब्द आहे ना !

बेफिकीर.. भूतान बद्दल मी ही वाचले होते. आणि तो देश आहेही छान. पण सध्या तिथे तरुण पिढीत काहीसा असंतोष जाणवायला लागलाय. पारंपरीक कपडे, संथ संगीत याविरुद्ध उठाव केला जातोय. ( गेल्या वर्षीच्या मुशाफिरी दिवाळी अंकात बहुतेक आहे तो लेख. )

बेफिकीर भूतानबद्दल लेख लिहिला आहे का... ? नसेल तर उचला तुमची लेखणी.. आणि होऊन जाऊ द्या.. एकाच प्याराग्राफने उत्सुकता वाढवली आहे.

ऋन्मेशा अशा सिरियस विषयावर लिहु नकोस रे...
>>>>
वेल नक्की काय सिरीअस ते नाही समजले. एखादे वाक्य लिहिण्याच्या ओघात झाले असेल सिरीअस तर क्षमस्व Happy

अन हॅपी.. एक शब्द आहे ना !
>>>
हो. ते मुद्दाम तसे लिहिले आहे. मूळ ईंडेक्स हॅपीनेस आहे पण ११८ व्या क्रमांकासाठी त्याला (अन)हॅपीनेस इंडेक्स बोलणेच सोयीस्कर

कांहीं शंका -
१] 'हॅपीनेस'सारख्या आत्यंतिक व्यक्तीनिष्ठ अवस्थेबाबत एखाद्या देशासाठी/ व्यक्तीसमूहासाठी समान निकष लावून काढलेला 'इंडेक्स' कितपत ग्राह्य मानतां येईल ? अन्न, निवारा यासारख्या मूलभूत सोईंची उपलब्धता हा एक निकष सोडल्यास इतर निकष खरंच औचित्यपूर्ण ठरतात ?

२] << आपण जिथे जन्म घेतो वाढतो तिथे सेट होतो. त्यामुळे आमच्याईथे उन असते तुमच्याकडे थंडी असते हा निकष लागूच होणार नाही. >> हें जसं 'ऊन व थंडी'ला लागू होतं तसंच जन्म घेतों तिथली 'श्रीमंती व गरीबी' असल्या अनेक परिस्थितीजन्य घटकानाही लागू नाही होत ? मीं गरीब देशात जन्म घेतला तर मला 'हॅपीनेस'साठी श्रीमंत देशाचे निकष जशेच्या तसे लावणं खरंच योग्य होईल ? श्रीमंत घरातल्या मुलाला रिमोटवर चालणारी नवी महागडी गाडी मिळण्याचा 'हॅपिनेस' व रस्त्यावर रहाणार्‍या मुलाला कचर्‍याच्या गाडीत टाकलेली जुनी प्लास्टीकची ढकलगाडी मिळाल्याचा 'हॅपीनेस' सारखाच असतो; त्या 'हॅपीनेस'ला गाडीच्या किंमतीची फूटपट्टी लावणं कितपत वास्तवाशीं धरून होईल ?

[ कृपया केवळ देशाभिमान वगैरे दुखावल्याने ह्या शंका मांडतोय असं समजूं नये ]

भाऊ,
म्हणून तर मला पटलेला सर्वात महत्वाचा फॅक्टर "enequality.. विषमता. मग ती आर्थिक असो वा सामाजिक." असे लेखात लिहिलेय.

आणि हो, आपला देश गरीब नाहीये. फक्त मूठभर लोकांच्या हातात पैसा आहे आणि उरलेले दारिद्र्यात खितपत पडलेत. त्यातही बरेच वर्ग पडतील. ईथे प्रॉब्लेम हा आहे. असावा. एखाद्या लहान मुलाला अक्कल येईपर्यंत कचर्‍यातील गाडी घेऊन खेळताना तेवढ्यापुरती मौज वाटेलही. पण त्याच्या आसपासच काही जण रिमोट कार घेऊन खेळताना बघून त्याला त्रास होणारच. वाढत्या वयानुसार हे पावलोपावली जाणवू लागणार तर कसा होणार मग तो त्या गरीबीला सेट. मन मारूनच ना..

<< त्यांनी हॅपीनेसचा अर्थ subjective well being असा लावलाय किंवा घेतलाय.> > त्यालाच मीं 'व्यक्तीनिष्ठ' शब्द वापरलाय व मला वाटतं तो 'subjective'साठी मराठीतला नेमका शब्द असावा.
<< पण त्याच्या आसपासच काही जण रिमोट कार घेऊन खेळताना बघून त्याला त्रास होणारच. वाढत्या वयानुसार हे पावलोपावली जाणवू लागणार तर कसा होणार मग तो त्या गरीबीला सेट. मन मारूनच ना..>> म्हणजेच , रस्त्यावरचा मुलगा असो, चाळीतला चाकरमानी असो, बंगल्यातला छोटा व्यापारी असो....त्याचा 'हॅपीनेस' इतरांशी तुलना करण्यामुळे 'अनहॅपीनेस' मधे बदलतो ह्या तात्विक विचाराकडेच आपण जातो, असंच झालं ! यामुळे, << अन्न, निवारा यासारख्या मूलभूत सोईंची उपलब्धता हा एक निकष सोडल्यास इतर निकष खरंच औचित्यपूर्ण ठरतात ? >> या माझ्या शंकेला उलट पुष्टीच मिळते.

वैयक्तिक आनंदाचा तक्ता करणे अवघड म्हणूनच एखाद्या समाजाला रोजच्या आयुष्यात नीट राहाता यावे असेच मुद्दे विचारात घेतले जाणार. त्यात भारत अफाट लोकसंख्येमुळे सरासरीत मार खाणारच. (म्हणजे भारतात सर्व आनंदीआनंद आहे असे नाही).

मुळात ११३ वा क्रमांकच वाईट आहे त्यामुळे ११३ चा ११८ वर पोचला काय आणि ११३ चा १०८ वर पोचला काय... दोन्ही वाईटच.. उगाच कोणी केवळ या नंबरच्या खालीवर घसरण्यामुळे आनंदी होऊ नये.

ऋन्मेऽऽष च्या ह्या धाग्यावर आवर्जून प्रतिसाद द्यावासा वाटत होता पण सवड आणि विचारांची सुसूत्रता नसल्याने दिला जात नव्हता. आत्ता सवड आहे तेव्हा विचार विस्कळीत असले तरी प्रतिसाद देत आहे.
मला ही आधी ह्या आनंदीपणा मोजण्याचे निकषांची पट्टी साऱ्या जगाला लावणे किती योग्य आहे अशी शंका होती. पण काही काळ एका विकसित देशामध्ये घालवल्यावर ह्या निकषांचे महत्व मला पटले आहे. असे नाही की ह्या सगळ्या गोष्टी घडल्या की आपोआप सारे राष्ट्र आनंदी होईल पण ह्या साऱ्या गोष्टी ह्या जमेच्या बाजू आहेत आनंदी जीवन जगण्यासाठी.
भाऊ, तुलना करून सतत दुःखच मिळते असं नाही. आपण तुलना कोणाशी आणि कशाच्या बाबतीत करतो ह्यावर ते अवलंबून असते. अन्न, वस्त्र, निवारा ह्या अगदीच मुलभूत गरजा आहेत. केवळ त्या पूर्ण झाल्या म्हणजे आनंदी होण्याची वाट सुकर झाली असे म्हणता येणार नाही. आज जगात ह्या गरजा पूर्ण झालेले अनेक जण आहेत जे आनंदी नाहीत.
माझे असे निरीक्षण आहे की आपण (पक्षी: भारतीय) अल्पसंतुष्ट आणि तरीही असमाधानी लोकं आहोत. जेव्हा आपल्या प्रयत्नांचे मोजमाप करण्याची वेळ येते तेव्हा आपण अल्पसंतुष्ट असतो आणि जेव्हा दुसऱ्याच्या कामगिरीचे मोजमाप करायची वेळ येते तेव्हा असमाधानी. ह्या दोन्ही वृत्ती आनंदासाठी मारक आहेत. विशेषतः एक समाज म्हणून जगताना. कारण व्यक्तिगत पातळीवर अल्पसंतुष्ट असणे हे एका वरकरणी आनंदी आयुष्यासाठी पुरेसे असेलही पण एका समाजात जगताना दुसऱ्याच्या कामावर असमाधानी असणे फार आनंद-विरोधी आहे.
ह्यातून दुसरी गोष्ट जी एक वाईट सवय म्हणून आपल्या समाजात भिनली आहे ती म्हणजे आपल्या आनंदाची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलणे. मी जर आज आनंदी नसेन तर त्याला जबाबदार धरायला आपल्याला शंभर माणसे सापडतात आणि आपण त्यांच्यावर सहज दोष ढकलून मोकळे होतो. पण मला आयुष्यात झालेल्या काही जाणीवांपैकी एक महत्वाची जाणीव ही आहे की माझ्या आनंदाला सर्वस्वी मीच जबाबदार आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने जर स्वतःच्या आनंदाची जबाबदारी उचलली तर जगातल्या आनंदी लोकांमध्ये नक्कीच वाढ होईल! जेव्हा मी ही जबाबदारी स्वीकारेन तेव्हा मला सगळ्यात पहिल्यांदा हे शोधावे लागेल की मला कशामुळे आनंद मिळतो? आणि जर माझ्या आजूबाजूचे आनंदी असतील तर त्याने मी आनंदी असायला मदत होईल का? मला वाटतं की १८ वर्षांवरील प्रत्येकाने ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे.
ह्या धाग्यावर ऋन्मेऽऽषच्या इतर धाग्यांवर येतात तसे भरभरून प्रतिसाद आले नाहीत ह्याचं मला आश्चर्य वाटत नाहीये पण वाईट जरूर वाटतंय. कारण मला व्यक्तीशः ऋन्मेऽऽषने लिहिलेला हा लेख आवडला आहे (फार कमी लेख आवडतात मला त्याचे) आणि महत्वाचा वाटतो आहे. मात्र प्रतिसादांची संख्या बघता भारत आनंदी देशांच्या क्रमवारी मध्ये इतका मागे का ह्याचं उत्तर मिळतं - कारण आम्हाला ही गोष्ट इतक्या गंभीरतेने घ्यावीशीच वाटत नाही, ती आमची जबाबदारी वाटत नाही. आणि जोवर हे चित्र/ ही मानसिकता बदलत नाही तोवर आपला क्रमांक वर जाणार नाही.

जिज्ञासाजी, आपला प्रतिसाद अतिशय आवडला.
मीं खूप विचारपूर्वक लिहीलं होतं असं नाही. मनात प्रथमतःच ज्या शंका आल्या त्या मांडल्या होत्या. आतां यावर खूप विचार केल्याशिवाय बोलणं हाच अविचार, हें जाणवलं. फक्त छोटसं स्पष्टीकरण -
१] << अन्न, वस्त्र, निवारा ह्या अगदीच मुलभूत गरजा आहेत. केवळ त्या पूर्ण झाल्या म्हणजे आनंदी होण्याची वाट सुकर झाली असे म्हणता येणार नाही.>> मीं तसं नाही म्हटलंय. मूलभूत गरजांपर्यंत आनंदी होण्याचा मार्ग सर्वांसाठी समान असतो. त्यानंतर मात्र प्रत्येकाची वाट वेगवेगळी असते म्हणून त्यानंतर समान निकष लावून 'हॅपीनेस इंडेक्स' काढण्याबद्दल माझी शंका होती व अजूनही आहे;
२] << तुलना करून सतत दुःखच मिळते असं नाही. आपण तुलना कोणाशी आणि कशाच्या बाबतीत करतो ह्यावर ते अवलंबून असते. >> एकदम मान्य. पण ऋन्मेषजीनी रस्त्यावरच्या मुलाच्या मानसिकतेचा दाखला दिला फक्त त्यावरचाच माझा तो प्रतिसाद होता.
इथली चर्चा वाचायला व विचारपूर्वक सहभागी व्हायलाही उत्सुक आहे. आणि, हो, रुन्मेषजींचेही हा विषय चर्चेस घेतल्याबद्दल आभार.

जिज्ञासा छान पोस्ट.

तुमच्या पोस्ट मध्ये भारतीय " दुसऱ्याच्या कामगिरीचे मोजमाप करायची वेळ येते तेव्हा असमाधानी" असतात या वाक्याचा नेमका अर्थ कळला नाही, जरा एखादे उदाहरण द्याल का ?

ग्लोबल इंडेक्स विषयी, मला REAL GDP PER CAPITA हा हैप्पीनेस चा मापदंड कसा असू शकतो हे कळलं नाही. एका देशाकडे लाखभर रुपये असतील दुसर्याकडे कोट्यवधी. त्याच्यावर आनंद आणि सुख ठरत नाही.

बाकी मापदंड बरोबर वाटत आहेत. इंडेक्स मध्ये प्रत्येक मापदंडाचे weightage सारखेच असते का ?

ते दरडोई उत्पन्न आहे. शिवाय रीअल म्हणजे त्या देशातल्या किंमती लक्षात घेतल्यात.

Happiness = subjective WELL BEING हे कोणी लक्षात घेतंय का?

अरे हो GDP PER CAPITA म्हणजे दरडोई उत्पन्न. पटकन लिहिताना ध्यानात नाही आलं.

तुम्ही लिहिल्याप्रमाणे ते जर ppp वर असेल तरी माझी अजून एक शंका. Ppp म्हणजे फक्त माझे उत्पन्न 'क्ष' इतके आहे आणि त्यात मी य गोष्टी घेऊ शकतो याचे डॉलर किंवा एखाद्या चलना मधले रूपांतर. असेच असते ना ?

हा पण मापदंड आनंद/सुख मोजण्यास मला योग्य वाटत नाही.

Pages