अशी मी तशी मी

Submitted by तिलोत्तमा on 23 June, 2016 - 09:10

अशी मी तशी

इतकी वर्षे मी हि तुमच्यासारखेच सुख दुखाच्या साक्षीने आयुष्य जगत होते. कधी आनंदाचे क्षण यायचे तर कधी दुखाचे. पण त्यामुळे मी कधी खचून गेलेय असे झालेच नाही. आयुष्य हे असच असत अस मनाला समजवायचे.
पण चार वर्षांपूर्वी माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. मी आंतरबाह्य बदलूनच गेले. त्याच अस झाल कि मी व माझ कुटुंब खूप खुश होतो. देवाने मला एक नाहीतर दोन दोन सोन्यासारखे मुलगे दिले आहेत. माझा प्रेमविवाह असल्यामुळे मनासारखा जोडीदारही मला लाभला आहे. मराठमोळ्या कुटुंबाबरोबर मारवाडी कुटुंबाशी सोयरिक केल्यामुळे तेथेही नवीन रीतीभाती शिकून मी सर्वांची लाडकी सून म्हणून गणल्या गेले आहे.
पण म्हणतात ना एखाद्याच्या संसाराला द्रुष्ट लागते तशी माझ्या संसाराला द्रुष्ट लागली. सुखाच्या अत्युच्च क्षणी कोणीतरी माझा उंच झोका झपकन पकडावा तसे झाले. ना खाली ना वर.
त्याचे काय झाले वयाच्या अवघ्या चाळीसाव्या वर्षी माझ्या छातीमध्ये कॅन्सरची गाठ असल्याचे निदान झाले. माझ्या तर तळपायाची जमीनच सरकल्यासारखे झाले. इतक्या झटपट सर्व झाले कि मी विचार करेपर्यंत डॉक्टरांनी माझ्या स्त्रीत्वाची साक्ष दाखवणारे माझा वक्षच मुळी छाटून टाकला. त्यात आणि कॅन्सेरचे निदान केल्यामुळे माझ्या डोळ्यासमोर काजवेच चमकले. इतके दिवस कॅन्सरने लोक मरतात एवढेच काय ते माहित होते. शिवाय ह्या नवीन शारीरिक बदलाचा स्वीकार करणेही आलेच. परंतु त्यापेक्षा जास्त म्हणजे मी मृत्यू डोळ्यासमोर पहात आहे असेच वाटू लागले.
थोडक्यात काय तर माझे जीवन बदलले. जगाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोण बदलला. प्रत्येक दिवसाची सुरूवात मला नवीन वाटू लागली. मुलांच्या आणी नवऱ्याच्या बारीक सारीक गोष्टी मला आनंदमय वाटू लागल्या. मी अधिक प्रेमाने सर्वांशी वागू लागले. माझ्या हे लक्षात आले होते कि आईच किवा घरची गृहिणीच जर आजारी व नाराज असेल तर घरातला आनंदच मुळी गायब होतो. माझी मुले व नवरा तर दबक्या आवाजात फक्त माझ्या तब्येतिचीच चवकशी करत असतात हे माझ्या लक्षात आले. त्यात त्यांची काय चूक? माझ्याबरोबर त्यांच्यावरही संकट कोसळले होते ना. माझ्या मते आई हीच खरी घराचा कुटुंबाचा कणा असतो, एकमेकांना जोडणारा दुवा असतो. आईशिवाय घर विस्कळू शकते. आज मीच कणखरपणा दाखवायची आवश्यकता आहे हे मी समजले. आता आपले किती दिवस उरलेत ह्याचा विचार करण्यापेक्षा आता आपल्याला काय काय करायचे राहून गेले आहे याचा विचार करायला मी सुरु केले. आयुष्यात नाराज होवून आता माझ्या मुलांचे व नवऱ्याचे काय होणार असा दुखी विचार न करता आपण काय काय करू शकतो, काय करायचे बाकी आहे ह्याचाच विचार मी करू लागले.
तेव्हा माझ्या असे लक्षात आले कि लहानपणापासूनच नाचण्यासाठी माझे पाय थिरकत असत. ती कला आपल्याबाहेर कधीच येवू शकली नाही . कारण सासर माहेरची जवाबदारी असेल नाहीतर मुले लहान असल्याची काळजी असेल. त्यामुळे आपण आपल्याकडे लक्षच देवू शकलो नाही हे लक्षात आले. तेव्हा मी निश्चय केला कि मी माझी हि एकुलती एक इच्छा व्यवस्थित पूर्ण करीन.
ताबडतोब मी स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. औषध व केमोथेरपी सर्व यथासांग चालूच होते. पण मोठ्या आव्हानासाठी शरीर मजबूत व फीट ठेवणे जरुरी असल्यामुळे मी घरीच व्यायाम व नृत्याचा STAMINA वाढवायला सुरुवात केली. नातेवाईक भेटायला येत असत. त्यांना वाटे कि मी आता उदास वगैरे असेन, माझे सांत्वन कसे करावे. पण त्यांना मला बघून आश्चर्याचा धक्काच बसे. कारण माझे रूप पालटले होते. डोक्यावर नवीन उगवलेल्या केसांना मी नाविन्य पूर्वक कट देवून स्वताचा कायापालट केला होता. त्यामुळे मी अजूनच स्मार्ट व सुंदर दिसू लागले होते. माझी नृत्याची अपार इच्छा व कसब बघून कुणीतरी मला सरोज खान ह्या नावाजलेल्या नृत्यांगणा व नृत्य शिक्षिकेच्या क्लास मध्ये नाव नोंदवण्यास सांगितले. मला खूप आनंद झाला. माझे स्वप्न साकारायला लागले होते. सरोज खानने माझी कला बघता क्षणीच माझ्यातील स्पार्क हेरला व त्यांच्या क्लासमध्ये मला सहभागी करून घेतले. त्यानंतर माझ्या दिवसरात्र प्रयत्न व चिकाटी मुळे मी आता सरोज खान ह्यांच्या क्लासमध्ये प्रशिक्षक पदी रुजू झाले आहे.
म्हणतात ना आधी स्वतः करावे मगच इतरांस ज्ञान शिकवावे. तसेच मीही आता माझ्यासारख्याच इतर कॅन्सर पिडीत भगिनींना माझा आदर्श घालून देणार आहे. आज दहा वर्षे झाली मी नृत्याचे क्लास घेत आहे. वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेत आहे. आता माझ्यातला विश्वास इतका वाढला आहे कि रडणारी नाराज मुलगी मीच होते का हा माझा मलाच प्रश्न पडतो. मी माझ्या सर्व भगिनींना सांगणार आहे कि कॅन्सर मुळे आयुष्यात दुखी होवून आयुष्य रंगहीन झाले आहे असे न समजता आपल्या आयुष्यातील रंग शोधा. प्रत्येक दिवस हा आपल्याला मिळालेला बोनस आहे अस समजा व आनंदाने जगा. आपल्यातील सुप्त कला गुणांना बाहेर काढा. मग बघा तुमचे सुध्दा आयुष्य स्वतःचाच स्वतःला हेवा वाटावा असे होईल.

तिलोत्तमा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच.

तपशिलात काहीतरी गडबड झालीय.

<<चार वर्षांपूर्वी माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. >>
<<आज दहा वर्षे झाली मी नृत्याचे क्लास घेत आहे. >>

हे खरे आहे का?:अओ: असेल तर..

आधीच्या लिखाणापेक्षा यात वाचतांना थोडे दचकल्यासारखे झाले, पण तुम्ही जो पॉझीटिव्ह दृष्टीकोन ठेवलाय तो जबरी आहे, हॅट्स ऑफ टु यु! तब्येतीची काळजी घ्याच, पण जे कार्य तुम्ही हातात घेतलेय, त्यात उत्तरोत्तर यश मिळु दे आणी तुमचा स्नेह परीवार पण वाढु दे. मायबोलीवर तुम्हाला मित्रत्वाचा ओलावा मिळेलच. नशीबाने तुम्हाला मैत्रिणी पण छान मिळाल्यात, तो स्नेह पण असाच वृद्धींगत होऊ दे.

<चार वर्षांपूर्वी माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. >>
<<आज दहा वर्षे झाली मी नृत्याचे क्लास घेत आहे. >> गजानन यांचा पॉईंट विचारात घेण्यासारखा आहे. ताई नीट सांगा.

वाचुन वाईट वाटलं , पण ज्यापद्ध्तीने तुम्ही सगळ्या प्रॉब्लेम्स वर मात करुन नवीन आयुष्य चालु केलत त्याला तोड नाही.
तुमच्या पुढच्या वाटचालीस खुप सार्‍या शुभेच्छा !

Hi mazya maitrinichya babtit ghadleli agdi khari gosht aahe. Sorry for char ani daha varsh.

मैत्रिणीबाबत घडली आहे होय, पण तुम्ही आधी तसा उल्लेख केला नाही.:अओ: असो, तुमच्या मैत्रिणीला चांगले आरोग्य लाभु दे.

वाह, इतके सकारात्मक विचार करुन ते प्रत्यक्षात आणणार्‍या तुमच्या मैत्रिणीस सलामच....

खूपच प्रेरणादायी अनुभव ....

तुम्हाला अनेक धन्यवाद ....