तारे जमीन पर

Submitted by तिलोत्तमा on 23 June, 2016 - 09:04

तारे जमीन पर
तारे जमिन पर ह्या चित्रपटाच्या अनुषंगाने एक मोठा जड दरवाजा उघडला गेला आहे असे मला वाटते. मुलांच्या मानसिक अवस्थेवर येथे प्रकाश टाकला आहे. हा सिनेमा सर्वांना खरतर अंतर्मुख करून गेला. मुलाचा जन्म झाल्यावर प्रथम आईवडिल त्याच्या सार्वंगीन विकासाकडे लक्ष ठेवतात, व नंतर शिक्षिका त्याला हातभार लावतात. पण तेव्हाच मुलांच्या बारीक सारीक गोष्टीतुन आपल्याला काहीतरी खटकते. त्याकडे दुर्लक्ष करू नका असे ह्या सिनेमाने आपल्याला सुचवले तर नाहि? अश्या नाजुक व कोवळ्या अवस्थेतील मुलांकडे जर निट लक्ष दिले नाहितर त्यांचे मानसिक खच्चिकरण होण्याची शक्यता असते.
माझ्या मैत्रिणीला दोन मुली. मोठी सर्व शालेय पायर्या व्यवस्थीत पार करताना दिसत होती. पण धाकटिने जन्म झाल्याबरोबर आपण वेगळे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. जसे की रडून रडून रात्र जागवून काढणे, परक्या व्यक्तिकडे जाण्यास घाबरणे. जवळ जवळ दोन वर्षांची झाल्यावरच ति मुलगी बोलु लागली.
सुरूवातीला आईला वाटले की असु शकते एक मुल शांत तर एक करामती. त्यामुळे कदाचित निट समजले नाहि. पण मुळात ही तर खास अशी लक्षण नव्हतीच मुळी. पण शाळा सुरू झाल्यावर हळुहळू इंग्लीश बाराखडि लिहिण्याची वेळ आली तेव्हा अक्षरे लिहीण्यास थोडा त्रास होताना दिसला. त्या मुलीला अजिबात लिहिताच येत नव्हते असेही नव्हते. फक्त एखाद दुसर अक्षर ति उलटा लिहीत असे. त्यात काय विषेश, असे तर खुप मुले लिहीतातच की. हळुहळू वरच्या वर्गात गेल्यावर टिचर मुलीच्या अक्षराकडे खास लक्ष द्याअसे बजावू लागल्या. तेव्हा मात्र काळजी वाटू लागली.
असे कसे? आपली मुलगी नेमकी इंग्रजी ब आणी ड हिच अक्षरे उलटि का बरे लिहित असावी? एखाद वाक्य पूर्ण का बरे ती लिहीत नसावी? सर्व प्रश्नांची उत्तर तोंडी पाठ असुन लिहीतानाच आळस का बरे करत असावी? कोणतेही मोठे स्पेलिंग का बरे हिला पाठ करून लिहीता येत नसावे? ह्या बेसीक गोष्टिंमुळे सर्व विषयांवर परिणाम होताना दिसला. पण नेमके कुठे अडते आहे हेच कळत नव्हते.
माझी मैत्रीण मात्र नोकरीचा विचार हि न करता चोविस तास मुलींकडे लक्ष देण्यास थांबली. घरीच इतर मुलांची ट्ुयशन तिने घ्यायला सुरूवात केली. पण ट्युशन घेताना मात्र तिचा एक डोळा मात्र सतत धाकट्या मुलीकडेच असे. पण तरीहि म्हणावा तसा रिझल्ट मात्र नव्हता. अशातच मुख्याध्यापीकेने भेटायला बोलावल्याचा निरोप आला. लगेचच दुसर्या दिवशी ति मुख्याधिपीकेला भेटायला गेली. “तुमची मुलगी खुप हुशार आहे,“असे सांगुन त्यांनी संभाषण सुरू केले. त्यामुळे थोडा ताण कमी झाला. त्या म्हणाल्या ,“तुमची मुलगी अभ्यासात मंद आहे असे मुळीच समजु नका. पण अक्षर उलटे लिहीते म्हणून तुम्हि सायन हॉस्पीटलमध्ये जाउन एकदा दाखवून या. मला वाटते की ति डिसलेक्सिक असावी. जर तसे असेल तर आपली शाळा तुम्हाला पुर्ण सहकार्य करूशकते. “
माझ्या मैत्रीणीला हे सर्व नविनच होते. खरतर बहुतेक लोक आपल्या मुलात काहि दोष आहे हे कधिच मान्य करत नाहि. पण घरीच संगणक असल्यामुळे तिने लगेच माहिती काढली. तेव्हा तर तिला ह्या गोष्टिचा खजिनाच मिळाला. अापल्या आजुबाजूला अशी बरिच मुले असतात की ज्यांना डिसलेक्सिया असतो. पण नीट मार्गदर्शन न मिळाल्यामुळे त्यांना ढ च लेबल लावून मागे ढकलले जाते. पण ह्या सुविद्य शाळेने मुलिला तिने कसे मार्गदर्शन करावे हे सांगीतले.
आता मात्र माझ्या मैत्रीणीने वेळ वाया न घालविता ताबडतोब सायन होस्पीटल गाठले. तेथे तिच्या मुलीच्या विवीध चाचण्या केल्या गेल्या. त्यामुळे ति मुलगी भाषेत कमजोर आहे की गणितात की लिहीण्यात कमजोर आहे ते तपासले गेले. त्याप्रमाणे तिला डिसलेक्सिक असल्याचे सरटिफीकेट दिल्या गेले. त्यानंतर शाळेतिल काउंसिलरने नेमका मुलिचा अभ्यास कसा घ्यावा ते समजाविले. तसेच जि अशी मुले आहेत ज्यांना हि समस्या आहे अश्याच्या आईवडिलांची एखादि मीटिंग बोलावली जायची, तेथेहि ति जाउ लागली. त्या मुळे ह्या मार्गावर आपण एकटेच नाहि आपल्यासारखी बरीच मुल व त्यांचे आईवडिल ह्या फेर्यातुन जात आहेत हे पण समजले. तिला थोडे समाधान वाटले. काहि नविन गोष्टिहि समजल्या जश्या की हि मुल एकपाठी असु शकतात. म्हणजे एकदा ऐकले तरी त्यांच्या लगेच लक्षात राहते. त्यांना वेगळ्या पध्दतिने लिहीवियास शिकवले तर आपण डिसलेक्सियावर मात करू शकतो हे महत्वाचे पण समजले.
लगेच माझ्या मैत्रीणीने संगणकाची मदत घेतली. इंग्रजी फोनेटिक्सच्या सिडी आणून तिन मुलीला अ अँ शिकवायला सुरूवात केली. त्यामुळे हळुहळू प्रगती पुस्तकातल्या लाल रेषा कमी होउ लागल्या. आई व मुलीत आत्मविश्वास वाढला. नंतर तिने मुलीचे नाव शालेय खेळांमध्ये घातले. त्यामुळे मुलांची बौध्यीक क्षमताहि वाढते व दहाविच्या परिक्षेत ग्रेस गुणहि मिळतात हे तिला समजले. मग तिने मुलीचा अभ्यास घ्यायला सुरूवात केली. प्रत्येक धड्यावर ती 20-25 प्रश्नावली स्वतः तयार करू लागली. मुलगी शाळेतुन आल्यावर त्याची छोट्या वाक्यात उत्तरे लिहून घेउ लागली.
अश्या पध्दतीने अभ्यास घेताना तिच्या असे लक्षात आले की तिची मुलगी एका वाक्यात उत्तरे पटापट लिहीत होती. ते लिहीताना ती कंटाळाही करत नव्हती. ह्या विशीष्ट पध्दतिमुळे मुलगीहि खुश झाली व आवडिने अभ्यास करू लगली. मैत्रीणीने घरी स्वतः सर्वांशी इंग्लिश मध्ये बोलण्यास सुरूवात केली. त्यामुळे इंग्लिश भाषेचा स्पेलिंग प्रमाणे कसा उच्चार असावा याचे ज्ञान मिळाले. तसेच तिने मुलीच्या गणितावर लक्ष केंद्रीत केले. चार्ट तयार करून गुणाकार भागाकार व पाढे शिकवले. हळुहळू त्या मुलीत फरक पडला. ४५% वरून ५०% टक्कयांपर्यंत गुण मिळू लागले. तसेच शाळेनेही त्यांच्याकडून विषेश सवलती दिल्या होत्या म्हणा. जश्या परिक्षेला अर्धा तास देणे, हिंदी भाषा ऐच्छिक करणे, कोणतीहि टिचर स्पेलिंग चेक करणार नाहि. अश्या मुलांनच्या उत्तराचा फक्त मतितार्थ लक्षात घेतला जाईल. कारण मुलांना उत्तर माहित असायचे पण लिहीण्याचा व स्पेलिंगचा कंटाळा , यामुळे थोडक्यात उत्तरे असायची. अश्याप्रकारे माझ्या मैत्रीणीच्या मुलिने नववी पर्यंत ह्या मदतीमुळे ५५% गुण काढले.
पण जसजस वय वाढत तस मुलांमध्ये नकळतच हुशारी येउ लागते. त्यामुळे ह्या मुलीने दहावीला कोणतीहि मदत मागीतली नाहि. वर्षभर नीट अभ्यास केला. आईनेहि जागुन पहारा दिला व वार्षीक परिक्षेत ६३% गुण काढले. मग मात्र ती मुलगी अजीबात न डगमगता आर्टसला गेली. पण ग्रँज्युयेशनला काॅलेजमधून तिसरी आली. असा अखंड तिचा प्रवास चालू झाला. आज तिने उच्च घेउन ज्या मुलांना हा त्रास आहे त्यांना सावरण्यास ती मदत करत आहे. जो त्यातुन जातो त्यालाच माहित असते की ह्यातुन नेमके कसे पार पडावे. कठीण काहिच नसते पण प्रयत्न मात्र खुप करावे लागतात. तेही खचुन न जाता. सेल्फ काॅनफिडन्स कायम राखावा लागतो.
अश्यातर्हेने ज्यांच्या मुलांना असा प्राॅब्लेम आहे त्यांच्या आई वडिलांनी नक्किच मदत घ्यावी व सर्वांनी मिळून प्रयत्न केला तर अशी मुल जी मुळात जास्त बुध्दिमान असतात त्यांना चमकायला वेळ लागणार नाहि. फक्त अश्या मुलांना प्राॅब्लेम चाईल्ड न म्हणता स्पेशल चाईल्ड म्हणा इतकीच विनंती.
तिलोत्तमा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users