रस्त्याचे ऋण ...

Submitted by अजातशत्रू on 8 June, 2016 - 21:33

पूर्वी आमचा सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग हा असा दिसायचा. दोन्ही बाजूनी दाट झाडी अन त्या झाडांच्या अर्धवर्तुळाकार कमानी सारया रस्त्याने स्वागताला उभ्या असत. झाडांच्या या कमानी इतक्या दाटीवाटीने उभ्या असत की आपण झाडांच्या कंच हिरव्यागार पानांच्या हिरवाईतल्या गुंफातून प्रवास करतो आहोत की काय असे वाटायचे. रस्त्याच्या दुतर्फा असणारया या झाडांच्या भाऊगर्दीत प्रामुख्याने लिंब, बाभूळ, चिंच, वड, पिंपळ, पळस, सुबाभूळ आणि निलगिरी यांची झाडे जास्त करून असत. त्यातही कडूलिंबाची मेजोरिटी मोठी होती. एकमेकाच्या गळ्यात हात घालून रेलून बसावं तसे या झाडांच्या फांद्या एकमेकाच्या फांदयात अडकून गेलेल्या असत. दाट सावलीच्या संगतीने प्रवास होई मात्र मध्येच एखादे झाडी नसलेले वळण आले की जाणवत असे की बाहेर उन्हे किती कडक आहेत. प्रवास कोणत्याही गाडीतला असो अगदी बैलगाडी, लाल एसटी बस, टेम्पो, जीप,ट्रक वा लक्झरी कार काहीही असो,सर्व प्रवाशाना समान सुख या प्रवासात मिळायचे त्याचे कारण ही हिरवाई होती.आपल्या विरुद्ध दिशेने पळणारी झाडे कधी संपतच नसत.आपला वेग वाढला की त्यांचाही वेग वाढायचा अन वाऱ्याच्या झुळूकेवर उडून येणारी त्यांची पाने वाहनाच्या खिडकीतून अलगद आता येऊन पडत, त्यांना मातीचा आणि झाडाचा दोन्हीचा मिळून एक संमिश्र गंध असे. हा वास अजूनही माझ्या स्मृतींच्या कुपीत अजूनही मी जतन करून ठेवला आहे.

या सर्व झाडांचे बुंधे विटकरी चॉकलेटी रंगात रंगवलेले असत अन त्यावर दोन पांढरे पट्टे काही अंतर राखून मारलेले असत. त्यामुळे ही सर्व झाडे एका कुळातील वाटायची अन यांचा हा परिवार एका रांगेत आपल्या स्वागतासाठी कमरेत वाकून उभा राहावा तसा खोडात वाकलेला असायचा. वडाच्या पारंब्यांची कहाणीच निराळी ! आकाशाकडे झेपावण्याची जिद्द मनी बाळगून असतानाही मातीची आत्यंतिक तीव्र ओढ असणारा विशालकाय वृक्ष म्हणजे वड ! एकाच वेळेस आकाशाकडे अन मातीकडेही वाढणारा हा वड आपल्या असंख्य पारंब्यांचा पसारा घेऊन रस्त्याच्या कडेला बसलेला असे. जणू एखादा तेजस्वी वृद्ध साधू आपल्या केसांच्या जटा मोकळ्या सोडून बसलेला आहे अन त्या जटा थेट मातीशी लोळण घेताहेत असं ते दिसायचं. या रस्त्यावरील ती वनराई म्हणजे वाटसरूच्या मस्तकावर धरलेला हिरवा किरीटच जणू ! रोरावणारे वादळवारे, अंगांगातून घामाच्या धारा काढणारे कडक ऊन, वेडावाकडा कोसळत जाणारा पाऊस, विजांचा लखलखाट अन ढगांचा गडगडाट निसर्गाच्या कोणत्याही रुपात आपली मातीत रोवलेली मुळे आणखी घट्ट धरून ही झाडे पांथस्थाची सोबत करत. वाटेत एखादे जळून गेलेले वा वाळून गेलेले एखादे झाड दिसले की फार वाईट वाटायचे. त्यातल्या एखाद्या झाडाने कुठली तर चकाकणारी वीज आपल्या अंगावर खेळवलेली असायची नाहीतर एखाद्या झाडाचे आयुष्य संपून गेलेले असायचे. तरीदेखील त्याच्या त्या वाळून गेलेल्या फांद्यांवर लहानाचे मोठे झालेल्या पक्षाचा संसार नव्याने घरट्यात मांडलेला असायचा. त्यातल्या काटक्या लांबूनही स्पष्ट दिसायच्या. हिरव्यागार असणारया झाडांवर तर अनेकविध पक्षांच्या शाळा भरलेल्या असत, त्यांचा तो कलकलाट अजूनही माझ्या कानात साद घालतो आहे ...

रस्त्याच्या कडेला छोटी छोटी अनेक खोपटेवजा ढाबे असत, गाडीचा वेग करून या ढाब्यांच्या पुढ्यात थांबले मस्त वाफाळता चहा मिळायचा, लालबुंद तिखट शेंगाचटणी अन ज्वारीची पांढरीशुभ्र चवदार खमंग भाकरी, जोडीला लाल कांदा अन लसणाच्या पाकळ्या असा जिभेला पाणी सोडणारा साधासुधा पण रसरशीत मेनू तिथे असायचा. जोडीला वांग्याचे मसालेदार भरीत अन एखादी झणझणीत सोलापुरी काळ्या तिखटाची आमटी ! खिशाला परवडेल अन पोटातली भुकेची आग तृप्ततेने शांत होऊन जाईल असा हा सगळा बेत असायचा. मांसाहारी ढाब्यावरचां बेत तर याहून फक्कड असायचा. काही ठिकाणी तर वाटसरूच्या समोरच सामिषभोजन साग्रसंगीत बनवले जाई ज्याचा वास अवघ्या इलाख्यात धुरळा माजवून जायचा. त्या दरवळणारया वासानेच वाहने तिथे थांबत. एकदा एखाद्या ठिकाणी जेवलेला माणूस पुन्हा या रस्त्याने प्रवास करताना त्याच ढाब्याचा शोध घेत 'वास काढत' तिथेच यायचा ही खासियत इथल्या स्वयंपाकात आणि आदरातिथ्यात आहे. बसायला लाकडी बाकडी अन मस्त आरामदायी बाज असत. बहुत करून बदामाची लफ्फेदार घेर असणारी दाट सावल्यांची झाडे या ठिकाणी असत. या सर्व वातावरणामुळे इथे येणारया माणसाला चार घास आपोआप जास्त जात. हाशहुश्श करत, नाकातून पाणी येई अन नाकपुड्या व कपाळावर जमा झालेला घाम पुसत पुसत लोक म्हणत, "थोडे तिखट होते ओ पण असे जेवण कुठे नाही मिळाले आजवर ..."असा संवाद आटोपला की शेंगाचटणी वा चिक्कीची खरेदी होई आणि प्रवासी पुढच्या प्रवासाला मार्गस्थ होई ...

पूर्वी या रस्त्यावर दुतर्फा दिसायचे ते वेगवेगळे फळविक्रेते ! एखाद्या झाडाच्या आडोशात हिरवे कापड बांधून त्याचा तात्पुरता मांडव करून वेगवगेळ्या हंगामानुसार त्या त्या हंगामातील रसाळ ताज्या फळांच्या टोपल्या घेऊन हे लोक बसलेले असत. क्वचित एखादा फ्रुट स्टोलदेखील नजरेस पडायचा. मस्त टपोरी मक्याची चविष्ट कणसे भाजून देऊन त्यावर तिखट मीठ चोळून लिंबू पिळून दिलेला असायचा, ही भाजलेली कणसे खाल्ली की सारया प्रवासाचा शीण एका क्षणात नाहीसा व्हायचा. उसाच्या गोड रसात थंडगार बर्फाचे चुरचुरीत तुकडे घालून काचेच्या ग्लासात तो समोर आला की 'मला रस नको' म्हणणारे देखील दोनेक ग्लास गोड, ताजा, स्वच्छ असा ऊसाचा रस घटाघटा आवाज करीत पिऊन टाकत असत. बोरे, डाळींब, पेरू, चिक्कू, द्राक्षे, आंबे अशी अनेकविध फळे विकणारी ही गावाकडची माणसे कधी काटा मारत नसत वा फळांच्या भावावरून हमरातुमरीवर येत नसत. एक साधा सोपा व्यवहार यामागे असे. समाधान आणि तृप्तता याला त्यांच्या लेखी मोठी किंमत असे ! या रस्त्यावर उन्हाळ्याच्या दिवसांत मिळणारे लिंबू सरबत हे जणू स्वर्गीय पेयच असे. पिवळे जर्द रसदार लिंबू चिरून त्याच्या दोन अर्धवर्तुळाकर फोडी बनत, त्या फोडी लिंबाच्या साच्यात टाकून ग्लासात पिळल्या जात, साखर, वेलची पूड, थोडेसे मीठ अन थोडासा पाक या ग्लासात घातला जाई. मग थंडगार पाणी अन बर्फ ! प्रवासाने पाय आखडून गेले म्हणून सहज उतरलेले वाटसरू हळूहळू काही वेळ या झाडाखालच्या या रमणीय खोपटात रमून जात अन मग या गावाकडच्या माणसाशी कधीकधी गप्पांची देवाणघेवाण होई ! ही माणसे प्रेमाची भुकेली असत, एव्हढ्या मोठ्या गाडीतून उतरलेला माणूस आपल्याला नावगाव विचारतो अन आपल्या खुशालीचे चार शब्द विचारतो या विचारानेच तो हरखून जाई ! या रस्त्याने जाताना अशी माणसांच्या नव्या नात्यांची ओळख होत असे ...

हा रस्ता जसा माणसांचा होता तसा जित्राबांचाही होता ! सकाळच्या वेळेस रस्त्याच्या एका कडेने चरायला जाणारे गायी म्हशींचे कळप आणि त्यामागून चालत निघालेला गुराखी हे चित्र कायम असे. ही जनावरे जर रस्त्याच्या मध्ये आली तर हॉर्न वाजवूनही कधी कधी उपयोग होत नसे; तर कधी कधी हॉर्नच्या एका आवाजाने एखादे अल्लड वासरू उधळून पाळायला लागे, मग त्याला आवरता आवरता त्या गुराख्याची पार अब्दा होऊन जाई. ह्या गाईम्हशींचे शेण सारया रस्त्याने पडलेले असे अन वाहनांच्या चाकांनी ते आणखी दूरपर्यंत पसरले जाई. आपल्याच नादात जाणारया बैलगाड्या अन त्यांना जुंपलेले केविलवाणे बैल पहिले की मात्र मन दुःखी कष्टी होऊन जाई. साखर कारखाने सुरु असताना रस्त्याच्या एका कडेने बैलगाड्यांची ही रांग लागलेली असे. उसाच्या ढिगावर बसलेले उसतोडीचे मजूर अन ते जीवघेणे ओझे घेऊन निमूटपणे शून्यात नजर लावून पुढेच चालत राहणारे बैल हळूहळू दृष्टीतून ओझर होऊन जात. संध्याकाळच्या वेळेस चरून झाल्यावर वस्तीकडे, गोठ्याकडे परतणारे जनावरांचे जथ्थे पाहिले की श्रीकृष्ण आणि त्याचे न पाहिलेले गोकुळ हेच असावे असे वाटायचे. समोरून तिरपी झालेली सूर्याची तांबूस किरणे, वासरांच्या गळ्यातल्या घंटांचा मंजुळ आवाज, त्यांच्या पावलांचा आवाज अन त्यांच्या मागून त्यांना लडिवाळपणे पुकारत जाणारा अंगावर काळे घोंघडे पांघरलेला तो गुराखी. हळूहळू हा लवाजमा पुढे जाई अन वाहने वेग घेऊन पुढे सरकत.

तेंव्हा कुणाला फारशी घाई नव्हती, वेळ होता. एकमेकासाठी आस्था होती, निसर्ग आणि माणूस यांच्यात एक आर्त प्रेमाचे नाते होते. आता चारपदरी डांबरी सडक झाली आहे. सुंसुं वेगाने वाहने धावत असतात, अंगात वारे भरलेली ही वाहने एखादा अपघात जरी झाला तरी तशीच पुढे निघून जातात. मेलेलें माणूस की जनावर आहे हे पाहण्याची तसदी देखील कुणी आता घेत नाही.रस्त्याच्या दुतर्फा असणारी हिरवी वनराई याच रस्त्यापायी नष्ट झाल्यापासून हा रस्ता दीनवाण्या चेहरयाने उभ्या असलेल्या अनाथ मुलासारखा वाटतो आहे. आता रस्त्याच्या कडेने ती खोपटे नाहीत, आता आहेत चकचकित हॉटेल्स ज्यांना 'हायवे'वर फक्त बक्कळ पैसा कमवायचा आहे. आता गावाकडची माणसेही तशी उरली नाहीत कारण या रस्त्यात ज्यांची जमीन गेली त्यांनाही अफाट पैसा आलाय, त्यांनाही आता वेळ नाही फळे विकत बसायला ! आता आपुलकीच्या गप्पा नाहीत की ती शांत शीतल घनदाट सावली नाही की घेरदार झाडांच्या कमानी नाहीत.आता साडेतीन तासात माणसे सोलापूर पुणे प्रवास करतात, सगळे कसे फास्ट झाले आहे. कामे वेगाने होतात, भेटीगाठी घेऊन होतात. पण या प्रवासातला प्राण हरपलाय. पूर्वी रस्ता लहान असल्याने अपघात फार होत असत मात्र आता रुंद रस्त्यावर हे प्रमाण तितके नाहीये इतकीच काय ती समाधानाची बाब आहे.

आणखी एक सांगायचे राहिले, गावाकडच्या गरीब साध्याभोळ्या माणसांची 'फास्ट' प्रवाशांना अडचण होऊ नये म्हणून आता या रस्त्याच्या कडेने एक 'सर्व्हिस रोड' असतो ज्याच्या कडेला आधीच्या रस्त्यावर मोठ्या दिमाखात उभ्या असलेल्या झाडांची भलीमोठी कापलेली खोडे अन फांद्यांचे जखमांनी भरलेले तुकडे विव्हळत पडलेले असतात. त्यांची चूक काय आहे हे ते त्यांना अजून कुणी सांगू शकलेले नाही. रुंद झालेल्या या चार पदरी रस्त्याने मी अजून एकदाही पूर्ण पल्ल्याचा प्रवास एकदाही पूर्ण केलेला नाही कारण मला या झाडांच्या कलेवरांनी विचारलेले प्रश्न अनुत्तरीत तर करतातच पण शरमेने मान खाली घालायला लावतात.

आता हा रस्ता सर्वांचा उरला नसून तो सुसाट वेगाने केवळ आणि केवळ धावत सुटलेल्या अलिशान गाड्यांचा हायवे झाला आहे !

मी मात्र अजूनही माझ्या स्मरणकुपीतल्या त्या जुन्याच रस्त्यात रममाण झालो की झाडे, पाने, फुले, गुरांचे कळप आणि ती काळजात रुतलेली गावाकडची माणसे यांच्या आठवणीनी व्याकुळ होऊन जातो अन नकळत रुमाल डोळ्याला लावतो ....या रस्त्याचे माझ्यावर हे एक ऋणच आहे...

- समीर(बापू) गायकवाड.

http://sameerbapu.blogspot.in/2016/03/blog-post_9.html
sameer bapu imgaes.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी अगदी मनातलं
मला बऱ्याचदा तोडलेल्या झाडांचे ओंडके बघून हाच विचार येतो.
हि गोष्ट फक्त सोलापूर रस्त्याची नाही तर आता सगळीकडचीच आहे.

छान लिहिलय.
रस्ते नविन केलेत, पण इंग्रजांनी जी दूरदृष्टी दाखवुन ज्या जातींची वृक्षसंपदा रस्त्याकडेने लावली त्याच्या एक शतांशही झाडे देशी सरकारांनी लावली नाहीयेत. होपलेस पिपल... !