दगा ...

Submitted by अजातशत्रू on 6 June, 2016 - 21:51

भाल्यांच्या टोकदार पात्यांनाच मी आपलेसे केले
तेंव्हा त्यांनीच लवून कुर्निसात मला केले....

आपल्याच माणसांच्या हाती शस्त्र माझे दिले,
तेंव्हा पाठीवर वार आधी त्यांनीच केले !

निद्रिस्त आत्म्यास जेंव्हा आवाहन बंडाचे केले,
त्यानेच तेंव्हा मला पांढरे निशाण दाखवले.

अभ्रात आकाशाच्या मळभ मनातले रिते केले,
अन गारदी नभातले घरात हळूच उतरले !

व्यथा सांगण्या माझी कोणासही वर्ज्य ना केले,
निरोप घेता कळले ते बहिरे ठार निघाले .

आपले म्हणून ज्यांच्या अधरी मस्तक टेकवले,
ते निखालस गळेकापू निष्णात निघाले !

घातक्यांच्या दुनियेत जेंव्हा मूक राहण्याचे ठरवले
तेंव्हा ओठांनीच दगा करून मज बाजारात उभे केले !

- समीर गायकवाड.

http://sameerbapu.blogspot.in/2016/05/blog-post_27.html

 पाटील.png

Group content visibility: 
Public - accessible to all site users