माझा बगिचा!

Submitted by जव्हेरगंज on 5 June, 2016 - 12:59

माझ्या घराशेजारीज मी एक बाग लावली आहे. बागेत भरपूर झाडं आहेत. त्यांना मी रोज पाणी घालतो. एकदाच फुल लागलेलं गलाबाचं रोपटं वर्षानुवर्ष जागा अडवून बसलंय. कधीतरी फुलेलंच या आशेनं मी त्याला शेण लावून कलम करत राहतो. एकदातर त्याच्या बुंध्यालाच कात्री लावली होती. पण पुन्हा तरारुन उगवलं. फुले मात्र त्याला कधीच लागली नाहीत.

कर्दळीची झाडे अमाप आहेत. आता कर्दळंच का लावली? असे विचारणाऱ्यांचा मला विशेष राग येतो. फारफार तर त्याच्या पुंगळ्या काढून मला वाजवायला आवडतात हे ही कारण असू शकेल. पण तेच असेल असंही नाही.
'कर्दळ' हे नावंच कसं ऐकायला भारदस्त वाटतं. 'कर्दळीच्या वनात' वगैरे असं लोकांनी लिहून ठेवले आहे. आमच्या शेतातपण बोरीच्या झाडाखाली कर्दळंच उगवलीय. शेवटी कर्दळंच ती. त्यात कसली आलीय आवड निवड. पण मला आवडते. तिची लाल लाल फुलं बघायला मजा येते.

कोरफड सदृश्य एक झाडं आहे. लांब पाकळ्यांच पांढरं फुल त्याला लागतं. त्याचा मधला तुरा खायला पण मस्त लागतो. एकदा त्याचा सुवास घेतला की तासभर तरी नाकातून जात नाही. पण त्या झाडाखाली साप येतो म्हणून म्हातारीनं उपटून टाकलं. एकच झाड होतं. पुन्हा कुठे मिळालंही नाही.

एकदा मी ज्वारी, बाजरी, गहू, शेंगदाणे, वाटाणे, अगदी तांदूळसुध्दा एकमेकांत मिसळून एका चौकोनी जागेत लावले. खत वगैरे टाकून पाणी शिंपडलं. मग रानच करायचं ठरवलं. बारक्या काटकीनं सऱ्या पाडल्या. आडव्या मारुन वाफंबी तयार केलं. बांधावर आख्खी कैरीच पुरुन टाकली. हाताशी घावले म्हणून कडंनं चिंचोकेपण पेरले.

मग रोज उठून बारक्या शेताची प्रगती तपासणे हा माझा आवडता खेळच होऊन गेला. तांब्याभर पाणी शेताला पुरुन उरायचं. तिसऱ्या चौथ्या दिवशी बारीक बारीक कोंब मातीतून बाहेर डोकावू लागले.('जमलं की!' काळ्या काळ्या मातीत लपलंय कोण?) मन या कोंबावरून त्या कोंबावर उडत गेले. पण ह्यातली ज्वारी कुठली अन बाजरी कुठली? कशाचाच मेळ लागेना. बांधावरचा आंबा मात्र लगेचच ओळखू आला.

वाघ पाठीमागं लागल्यासारखी रोपं तरारुन वरती आली. गावात गच चिच्चा असताना बारक्या चिच्चंचा पाला एकदा खाऊन बघितलाच. अवर्णनीय.
आंब्याचा कोवळा पाला हातावर चोळून वास घेतला. आहाहा! कैरीचीच आठवण आली. एवढी, की थोडासा पाला खाऊनच टाकला. (बापरे, पुन्हा त्या वाटेला गेलो नाही )

भुईमूग तर एवढा वाढला उपटूनच टाकावा की काय असं वाटून गेलं. बारक्या चिल्यापिल्यांत थोराड टग्यासारखा तो पसरला होता. शेंगातरी मिळतील म्हणून शेवटी उपटूनच टाकला. एक मोठ्ठी शेंग वगळता हाताशी काय लागलं नाही. फोडून मग तिच्यातले शेंगदाणेही खाऊन टाकले.

मग गव्हाला लोंब्या लागतील, ज्वारी बाजरीला कणसं लागतील म्हणून वाट बघत राहिलो. पण रोपं तेवढीच राहिली. का राहिली? त्यांनी माझ्या इवल्याश्या शेतालाच जग समजलं की काय! बारक्या रानात बारकंच राहायचं असं त्यांनी ठरवलं असावं. नाहीतर माझ्या घराभोवती एव्हाना जंगल तयार झालं असतं. पिकलेले आंबे आणि गाभुळलेल्या चिंचा अंगणात सडा टाकत राहिल्या असत्या. पण तसं काही झालं नाही.

पुढे बऱ्याच दिवसांनी ते शेत जळून गेलं.

सध्या बगिच्यात एक बटाट्याचं रोप लावलयं. बघूया कसं जमतयं ते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच!

मस्त जव्हेगंज! Happy
झाडं लावणं हा प्रकार एकदा मला करुन बघायचाय. का काय माहित पण ती क्रिया आपल्या सतत वार्‍यावर, वरच्या वर उडत राहणार्‍या मनाला जमीनीवर आणेल असं वाटत राहतं. आपण घरात, ऑफिस मध्ये तशी पुष्कळ कामं करतो खरं पण हे असं मातीत काहीतरी रुजवून ते उगवताना बघणं हे एक जास्त ठोस अशी, आपल्याला आपल्याच उगमाच्या थोडं जास्त जवळ नेणारी अशी क्रिया वाटते.
ह्यावरुनच आठवलं, मध्यंतरी बीच वर गेलो होतो. बूट सॉक्स काढून समुद्रावरच्या वाळूत गेलो तर येवढं "लिबरटेड" असल्याचं फिलिंग आलं! केवढी साधी गोष्ट आहे खरं? पण तेव्हाच लक्षात आलं की आपल्याला किती कमी वेळा (ऑल्मोस्ट नाहीच), अनवाणी, भुसभुशीत जमीनीवर चालायला संधी मिळते. जिथून आलो अन ज्यामुळे हे सर्व सुरु आहे त्याच्याशी डायरेक्ट असा काँटॅक्ट राहिलेलाच नाही आजिबात.