फुकटेगिरीतली मौजमजा !

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 June, 2016 - 16:26

कितीही पैसे ओतले तरी फुकट खायची मजा विकत घेता येत नाही Happy

मग ते फुकट खाणे असो, फुकट पिकनिकला जाणे असो, किंवा फुकटात कुठेतरी रहाने असो ..

आयुष्यात कधी फुकटेगिरीतून आनंद उचलला असेल तर ते तेवढ्याच आनंदाने इथे शेअर करून तो आनंद द्विगुणित करा.

सुरुवात करून देतो ..

आमचे कॉलेज सुटल्यावर तासा दिडतासाने म्हणजे संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास कॅन्टीनमध्ये उरल्यासुरल्या खाद्यपदार्थांचे फुकटात वाटप व्हायचे. बटाटावडे, समोसे, भज्या हे प्रामुख्याने असायचे, तर सोबत ईडलीवडे, शिरा, उपमा अन पोहे सुद्धा कमी अधिक प्रमाणात मिळून जायचे.

साडेसहाला वाटप होणार तर सहा-सव्वासहा वाजताच आम्ही उपाशीतापाशी मित्रमंडळ कॅन्टीनपाशी जमा व्हायचो. एखादा फंटर काऊंटरवर चक्कर मारून आज किती माल शिल्लक आहे याची नजरेनेच मोजदाद करून यायचा. कधी जर स्टॉक कमी आणि गर्दी जास्त असेल तर बाह्या सरसावून सारे तयार व्हायचो. तसे कितीही असले तरी बाह्या सरसावल्या जायच्याच कारण स्पेशल आयटमवर सर्वांचाच डोळा असायचा. त्या गर्दीत जो सर्वात पुढे त्याला चॉईस सगळ्यात जास्त, हा साधा हिशोब होता.
सव्वासहानंतर जी मुले पैसे देऊन विकतचे खायला यायची त्या बड्या बापाच्या पोरांना आम्ही खाऊ की गिळू नजरेने बघायचो. कारण त्यामुळे आमच्या वाट्याचे खाणे कमी व्हायचे.

असो, तर सहा-पंचवीस झाले रे झाले की काऊंटरवर गर्दी करायला सुरुवात. पुढचे पाच मिनिटे.. "माsलssक, माssलक .. क्लॅप क्लॅप क्लॅप".. अश्या घोषणा आणि टाळ्यांनी कॅन्टीनच्या मालकाला चढवले जायचे. साडेसहाच्या ठोक्याला त्याने कॅन्टीनच्या पोरांना 'हम्म आता वाटा या फुकट्यांना' असा इशारा दिला की आरोळ्या देत, कॅन्टीनमध्ये उपस्थित पोरीबाळींसमोर आपले ईम्प्रेशन डाऊन तर नाही ना होत याचा विचार न करता, आम्ही त्यांच्यावर तुटून पडायचो. फुल्ल सत्ते पे सत्ता स्टाईल. त्यांनी वाटायच्या आतच एकेकाच्या हातातून हिसकावून घ्यायचो. त्यांनी चांगलेचुंगले पदार्थ आमच्यासाठी राखून ठेवावेत यासाठी कॅन्टीनच्या पोरांना आधीच पटवून सेटींगही लावल्या जायच्या. फार काही नाही, त्यांच्या तंबाखू चुन्याची सोय आणखी कुठूनतरी करणे एवढेच पुरेसे ठरायचे.

मग जमा झालेला ऐवज घेऊन आमचा भलमोठा ग्रूप दोनतीन टेबल एकत्र जोडून बसायचा. ज्याने जास्त जमवले त्याचे कौतुक आणि ज्याने कमी आणले त्याला शिव्या देऊन झाल्यावर मग मात्र अफाट मैत्रीचे उदाहरण देत हावरटपणा न करता प्रत्येकाला एकसमान खायची संधी देत आरामात चवीचवीने समूहखान केले जायचे. एखादा राजा उदार व्हायचा आणि आपल्या खिशातून तीसचाळीस रुपये काढून पोरांसाठी चहाची ऑर्डर द्यायचा. मी चहाचा अट्टल शौकीन असल्याने हे राजेपद मी देखील बरेचदा मिरवायचो. प्रत्येकी पंचवीस-तीस रुपयांचे फुकट खाउन झाल्यावर तो तिनेक रुपयांची कटींग चहा भले स्वत:च्या खिशातून का आला असेना एकंदर पार्टीची लज्जत वाढवायचा.

अपवाद वगळता हे रोजच व्हायचे. अपवाद वगळता आम्ही ठरलेले मेंबर तिथे रोजच जमायचो. दोघातिघांची घरची परीस्थिती अशी होती की बाबांना सांगून ते कॅन्टीन विकत घेतील. पण कसलीही घमेंड नसल्याने या खादाडीची मजा त्यांनीही आमच्याईतकीच लुटली.

आता पुन्हा हे असे करणे जमेल की नाही माहीत नाही. जमले तरी तितकीच मजा येईल की नाही ठाऊक नाही. पण अश्या कैक आठवणी जागवणारे प्रतिसाद माझ्याकडून या धाग्यात नक्की येतील.. तुमचेही कोणाचे असे किस्से असतील तर येऊ द्या. लाजलात तर थिजलात Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुसऱ्याकडे खायचं नाही/ जेवायच्या-खायच्या वेळेला जायचं नाही - हे बिंबवले / बिंबले आहेत अजूनही झोपेत सुद्धा डोकं तसाच विचार करत. मला तरी कुठेही आमंत्रण असल्याशिवाय जाऊन खाण ह्यासारखी दुसरी लाजिरवाणी गोष्ट नसेल. चुकुन ऐनवेळेस गेल्यामुळे फुकट मिळालं तरी घशाखाली जाणार नाही. घशाखाली गेलं नाही म्हणून घेऊन टाकण्यापेक्षा आत्ता खाऊन आले, उपास आहे पासून काहीही कारण सांगीन पण खाणार नाही. फुकटेपणातली मजा not for me and not for my childhood friends.

नवीन Submitted by राजसी on 4 July, 2018 - 11:23 >>> + १११११११११११११

लेख वाचला , पटला नाही, म्हणजे थाप कॅटेगरीतला वाटला.

कॅटीनमधे शिल्लक राहत असेल तर आधी ते तिथल्या कर्मचार्यांत म्हणजे कँटीनच्या, मग कॉलेजातील शिपाई, सफाई कामगार वगैरे मध्ये वाटत असतील एकवेळ, पण स्टुडंटस ना ते पण रोज .. माहीत नाही पण नाही पटले.

{यासाठी कॅन्टीनच्या पोरांना आधीच पटवून सेटींगही लावल्या जायच्या. फार काही नाही, त्यांच्या तंबाखू चुन्याची सोय आणखी कुठूनतरी करणे एवढेच पुरेसे ठरायचे.}

छान छान.

दुसऱ्याकडे खायचं नाही/ जेवायच्या-खायच्या वेळेला जायचं नाही - हे बिंबवले / बिंबले आहेत
>>>>>

राजसी धिस ईज कल्चरल डिफरन्स !
दक्षिण मुंबई चाळ संस्कृतीत असे वागणारयाला माणूसघाणा किंवा गेला बाजार अकडू समजले जायचे Happy

पण तुम्ही आपल्या जागी योग्यच आहात.
मध्यंतरी मी रेंटवर राहायचो. पहिल्याच दिवशी शेजारयांना भेटून आलो. त्यांना समोरच्या घरात राहणारयांचे आडनाव माहीत नव्हते. मला कल्चरल शॉकच बसला. पण नंतर जाणवले की यात काही गैर नाही. उद्या आपले बालपण अश्या जागी गेले असते तर आपणही असेच झालो असतो हे मला तिथे काही दिवस राहून समजले. कारण तिथे सारेच अश्या विचारांचे होते.

खरं सांगायचे झाल्यास माणूस जेव्हा आपल्या सिमीत जगातून बाहेर येत डोकावतो तेव्हा त्याला असे कल्चरल शॉक बसत राहतात.
पण अगदी खरे सांगायचे झाल्यास हे शॉकच माणसाचे जीवन समृद्ध करतात Happy

लेख वाचला , पटला नाही, म्हणजे थाप कॅटेगरीतला वाटला.
>>>>

याचा खरे तर मला आनंदच वाटला. आपण असे लाईफ जगलो आहोत जे लोकांना अविश्वसनीय वाटावे Happy

तंबाखू चुन्याची सोय
>>>>
भरत हे असे बोल्ड का केलेत? आता यात काय व्याकरण शुद्धलेखन चुकले?

@ आरारा,
फुकट नेटचा कुठला धागा? त्याचा फुकट खाण्याशी काय संबंध?

पण अगदी खरे सांगायचे झाल्यास हे शॉकच माणसाचे जीवन समृद्ध करतात

<<

एक इंग्रजी शब्द आहे.

Auto-patriotism

अर्थ, स्वतःचा पोपट करणे. खुद्द को ... बनाना.

राजसी माझ्या घरी पण सेम शिस्त... मी लहान असताना बेबी सिटिंग मध्ये ठेवायची आई कामाला जाताना... माझा डब्बा त्यांना दिलेला असायचा. एक दिवस मला एक चपाती कमी वाटली . त्या काकूंनी विचारलं ,देऊ का...मला भूक लागलेली म्हणून मी एक चपाती त्यांच्याकडची खाल्ली.
त्या काकूंनी बाबांना सांगितलं बोलता बोलता...बस्स...असली फटकवली मला बाबांनी...."उपाशी का नाही राहिली?? का खाल्लं मागून??"
मी 6 की 7 वर्षाची होते . मला त्यांनी का मारलं ते कळलं च नव्हतं....

माझं बालपण दक्षिण मुंबईच्या नसलं तरी मध्यवर्ती मुंबईच्या चाळीत गेलं आहे. शेजारी, पाजारी, खालच्या मजल्यावरच्या सगळ्यांची नावं गावं माहिती होती. आई वडील नोकरी करणारे होते पण तरीही शाळा कॉलेज वयात व्यवस्थित मोकळीक असली तरी त्यात शिस्त होती. वार्‍यावर सोडल्यासारखं फिरणं अलाऊड नव्हतं. ह्या वार्‍यावर सोडल्यासारखं फिरण्यात इथे तिथे, शेजारी पाजारी काही फुकट खायला मिळतंय का हे धरलं आहे. शेवटी प्रत्येकाच्या घरचे संस्कार आणि शिस्त असतेच.

लहान मुलांना नॉर्मली कुणीही उपाशी राहू देत नाही. शेजारची आत्या काकू मावशी पोटभर खाऊ घालूनच पाठवते. (हेच आपली आई शेजार्‍याच्या मुलाबद्दलही करते) पण त्याच वेळी, मुलांबाबतही 'हे मेले शेजारी गेले की दुष्काळातून आल्यासारखे गिळतात. मी घरी इतकं करते तेव्हा यांची भूक कुठे मेलेली असते कुणास ठाऊक' हा सर्व आयांचा पेट पीव्ह उर्फ आवडता संताप असतो.

हे असं असलं, अन "शेजारचे घर" सख्ख्या भावाचे असले, तरीही, शेजारच्या घरी जेवायच्या वेळी जाऊ नये, जावे लागलेच, तर माझं जेवण झालंय असे म्हणावे, हे ट्रेनिंग लहाण मुलांच्या न-कळत्या कडून कळत्या वयात जाण्याचा भाग असतो. एक दोनदा साम्गून समजले नसेल तर रिपीट ऑफेंडर्सला काय बक्षिस मिळायला हवे?

माझे आई बाबा आम्ही कुणाकडून मागून खाऊ नये या बद्दल प्रचंड आग्रही होते...आता ते कळतंय मला पण तेव्हा नाही समजायचं....

- ऋन्मेष -

मी लहान असताना चाळीतला बालकृष्ण होतो. एक म्हणजे कमालीचा गोंडस होतो. चाळीतील जुनेजाणते आजही आठवण काढतात असा बेंचमार्क सेट करून ठेवलेला. आणि आता अंगकाठीने शिडशिडीत असलो तरी तेव्हा ईतका गुबगुबीतही होतो की पॅन्ट माझ्या मांड्यांमधून चढायची नाही असे आई सांगते. अर्थात खाण्यापिण्याची प्रचंड आवड होती. आई ऑफिसला गेली. सकाळी आजीने आंघोळपांघोळ उरकली की शेजारचे एकेक जण नंबर लाऊन मला घेऊन जायचे. पुढचे खाणे पिणे खेळणे कोणाच्या घरी होईल हे सांगता यायचे नाही. संध्याकाळी आई ऑफिसहून आली की आधी मला चाळीतील एकेक घरे शोधत फिरायची. तेव्हा जमानाही वाईट नव्हता. चाळीत तर नव्हताच नव्हता. त्यामुळे आपले वर्ष दिड वर्षाचे पोरं कुठे असेल याची आईला अशी चिंताही नसायची. त्यानंतर रात्री मी चुकून दादरावर (मजल्यावरचा कॉमन पॅसेजमध्ये) दिसलो की लोकं लॉटरी लागल्यासारखे मला उचलून आईसक्रीम चरायला खाली नाक्यावर घेऊन जायचे. आईचे काम आटोपले की ती इथे तिथे बघायची आणि समजायची.. गेला आपला पिल्लू कोणाबरोबर तरी Happy

तेव्हा केबल टीव्हीही नव्यानेच आले होते. महिन्याला चाळीस रुपयात तीस पिक्चर बघा. आमच्या दक्षिण मुंबईत केबलच्या धंद्यात सारी भाई लोकं ती. त्यामुळे विकांताला न्यू रिलीज पायरेटेड कॉपी केबलवर ठरलेले. पण केबल टीव्ही प्रत्येकाच्या घरात नसायचा. मग ज्याच्या ज्याच्याकडे आहे त्याच्या घरी ईतर बघायला. आमच्या घरीही उशीराच केबल घेतली. त्याआधी असेच शेजारीपाजारी. बरेचदा रात्री तेच आधी झोपून जायचे आणि मी बाराला पुर्ण पिक्चर बघून त्यांचा टीव्ही बंद करून घरी झोपायला जायचो Happy
तर जेवणही पिक्चर बघता बघताच व्हायचे. कधी त्यांच्या घरातले त्यांच्या मुलांसोबत तर कधी माझी आई ताट घेऊन यायची. शेजारी म्हणजे फॅमिली रिलेशनच असायचे. अनुभव घेतल्याशिवाय ते समजणे अवघड.

पुढे आमच्याकडे टीव्ही आला तेव्हा तर दर क्रिकेटच्या मॅचला आमचे घर स्टेडियम बनायचे. लोकांच्या घरी टीव्ही असायचे ते सुद्धा एकत्र मॅच बघायला आमच्याकडे जमायचे.
सचिनच्या शारजाच्या इनिंग ते पाकिस्तानसोबत मारलेले वर्ल्डकप 98 ते युवराजचे सहा सिक्स, दादाचे लॉर्डसवर शर्ट फिरवणे, कुंबळेच्या दहा विकेट.. एकूण एक ऐतिहासिक अविस्मरणीय क्षण चाळीतल्या सर्वच मित्रांसोबत एकत्र एण्जॉय केल्याने आणखीनच अविस्मरणीय झाले आहेत Happy

फ्रिजही तेव्हा कोणाकोणाच्याच घरी असायचा. मग कोणाकडे पाहुणे आले की फ्रिजवाल्या शेजारयाकडून थंड पाणी आणने कॉमन होते.
फोनबाबतही हेच. ठराविक लोकांकडेच...
व्यापक विषय आहे हा यार.. स्वतंत्र लिहायला हवे.. नुसते भरकटत जावेसे वाटतेय आठवणींत ... Happy

शेजारधर्म आणि फुकटेपणा ह्याची गल्लत करु नका. बाकी आमच्या घरी फ्रिज, टीव्ही आणि फोन येइपर्यंत, कधिही ह्या गोष्टी शेजाऱ्यांच्या वापरण्याइतक्या जीवनावश्यक वाटल्या नाहीत. उन्हाळ्यात बर्फ टाकून सरबत, पन्हे प्यावेसे वाटले तर बर्फ विकणाऱ्या माणसाकडून बर्फ विकत आणायची पद्धत होती. बर्फ लाकडाच्या भुश्यात विकायला ठेवलेला असायचा.

अहो राजसी तुम्ही आपल्या आयुष्याची तुलना माझ्या आयुष्याशी करू नका. तुम्ही जिथे राहता तिथला शेजारधर्म आणि माझे बालपण जिथे गेलेय तिथला शेजारधर्म एकच कसा असेल?

जसे तुम्हाला आमच्याबद्दल वाटत आहे तसेच एखाद्या ब्रिटीशाला तुमच्याबद्दल वाटत असेल. कारण त्यांच्या शेजारधर्माच्या व्याख्या आणखी कनझरवेटीव्ह असतील. आपल्या भारतीयांचा शेजारधर्म त्यांना दुसरयाच्या बाबीत नाक खुपसणे वाटू शकते.

तेच कशाला, आपण भारतीय हाताने खातो हे सुद्धा कित्येकांना चीप आणि ओंगळवाणे वाटते Happy

यावरून आठवले,
मी शाळेत होतो तेव्हा मसाला डोसा काटाचमच्याने खायचो. कारण मला काटाचमच्याने खाता येते हे जगाला दाखवायचे होते. मग अक्कल आली तसे अप्रूप गेले आणि मसाला डोसा खायची खरी मजा हातानेच येते हे समजले Happy

आमच्या दक्षिण मुंबईतल्या चाळीतले शिस्त आणि संस्कार यांची व्याख्या करायची झाल्यास ती शेजारधर्मापासून सुरू व्हायची आणि माणूसकीवर येऊन संपायची. ती ज्याला जपता येत नाही तो आमच्याईथे कुसंस्कारी ठरायचा. याच व्याख्येनुसार मला अभिमान आहे माझ्या संस्कारांचा. कारण शेजारधर्म आणि माणूसकी या दोन्ही बाबतीत आमचे घर चाळीतले एक आदर्श होते. मी बालपणापासूनच सर्व चाळीतल्यांचा लाडका असायचे हे देखील एक कारण होते Happy

फुकटे पणा चाळीत करायचात ना? तिथल्या शिस्त आणि संस्कारांच्या नावा खाली? मग कॉलेज मधे कस ? कि कॉलेज चाळीत होते? तुमच्या केस मधे ते आहे म्हटले तरी नवल वाटणार नाही.
कधी तरी अपवाद म्हणुन हे असे केले तर मजा येइल ही पण रोज करणे खरच लाजीर्वाणे आहे.

लोकहो,
हे ललित लेखन आहे,
ल . लि . त .
लेखक प्रथमपुरुषी एकवचनात लिहितो ते पूर्ण सत्य असा समज करून घेऊ नका.
व छान!! म्हणा किंवा स्कीप मारा, त्यात सत्याचा अंश किती आणि कोणता ते शोधायचा भानगडीत पडू नका,

आता फुकटेपणाला माणुसकी म्हणायचे का? फुकटेपणा नसावा म्हणणे म्हणजे माणुसकी नाही!
उदा. भर उन्हात कोणाकडे पाहुणा आला म्हणून यजमान गूळ-पाणी देणार (माणुसकी), शेजाऱ्याकडे कोणीतरी उन्हाचे आलंय बघून आता नक्की गूळ खायला मिळणार म्हणून पटकन हजर होणे आणि शेजाऱ्याला गूळ-पाणी द्यायला भाग पाडणे. (पण माणुसकी!?) कृपया गूळ-पाण्याला चहा-पोहे-भजी कशाने ही बदला. येणाऱ्या पाहुण्यांनी घरातल्या साठी खाऊ आणलेला असेल आणि घरातले तो खाऊ खात असल्याचा सुगावा लागला की हजर होणे आणि शेजाऱ्याचा खाण्याचा आनंद द्विगुणित करायला हातभार लावणे(पण माणुसकी!?)

फुकटेपणातली मजा इतरांना देण्याचाही कधी विचार करा.
यांच्यापासून प्रेरणा घ्या.
https://www.telegraph.co.uk/technology/facebook/8012043/Girl-14-fears-21...
https://www.telegraph.co.uk/news/2016/12/07/12-million-attending-girls-b...

आमच्या गावात दिगू बामन होता. तो झुंबरशेटकडून नमुन्याला म्हणून गुळ न्यायचा व त्याचा चहा करुन प्यायचा. पुढच्या वेळी दीपाशेट कडून त्याच्या पुढच्या वेळी नंदाशेट त्याच्या पुढच्या वेळी बन्सीशेट...

राजसी, फुकटेपणाला माणूसकी कोण म्हणतेय. अहो दोन पोस्ट दोन विषय एकात एक आणू नका. ती माणूसकी संस्कारांची व्याख्या सांगताना आलीय.

चाळीत जेवढे मी ईतरांकडे फुकट खाल्लेय त्यापेक्षा जास्त ईतरांनी आमच्याकडे खाल्लेय. अर्थात याचा हिशोब कधी करू नये आणि केलाही नाही. पण हा फरक सहज जाणवण्यासारखा होता कारण आमच्या चाळीत दोन रूम्स होत्या. जोडून. त्यात बाथरूमही दोन. त्यात मी एकुलता एक आणि आईवडील असे तीनच माणसे. थोडक्यात एवढे सुटसुटीत मोकळेढाकळे घर अख्ख्या चाळीत कोणाचे नव्हते. त्यात माझ्या आईवडिलांचा स्वभाव असा की आओ जाओ घर तुम्हारा. त्यामुळे वर म्हटल्याप्रमाणे क्रिकेटचे सामने आमच्या घरातच बघितले जायचे. वीसीआर आणून नवीन पिक्चरही बघितले जायचे. कोणाच्या घरी कार्य असेल की आमच्या घराची जागा वापरली जायची. कोणाचे पाहुणे थांबणारे असतील तर आमच्या घरी झोपायला यायचे. अश्यांचे चहापाणी स्वत:तर्फे करताना हात आखडता घेतला जायचा नाही. त्या शेजारयांच्या पाहुण्यांनाही असे वाटायचे की आपण आपल्याच घरात राहतोय. बिल्डींगमधील सत्यनारायणाची पूजा, महाप्रसाद, होळी, नवरात्र, दहीहंडी वगैरे जे सर्व उपक्रम व्हायचे त्यात आमचे घर आणि आमच्या घरातील सामानाचा वापर आमची परवानगी न घेता गृहीत धरला जायचा. उरलेल्या प्रसादाचे आणि जेवणाचे वाटप आमच्या घरूनच व्हायचे. ते ग्रम करताना घरचेच तेलतूप वापरले जायचे. थोडक्यात आमच्यासाठी आमची चाळ हेच एक कुटुंब होते.

@ अदिति, लेखातला किस्सा कॉलेजचा आहे. चाळ प्रतिसादात आली आहे. गल्लत नको. उद्या गावचा एखादा किस्सा लिहिला तर चाळ गावात आणि गाव कॉलेजमध्ये असे कन्फ्यूजन वाढतच जाईल.

येनीवेज,
गावावरून आठवले..
गावाला कोणाच्या शेतात वा बागेत वा झाडावरचे आंबे चिंच करवंद पेरू उस सण्त्री वगैरे फुकट तोडून खायचा अनुभवही कोणी घेतला नाही का?

Pages