रविवारची काळजी...!

Submitted by Charudutt Ramti... on 3 June, 2016 - 06:12

रविवारची काळजी...!

“अहोss...घरातलं गव्हाचं पीठ सम्प्लय.”

घरातलं कुठलही पीठ संपल की मला धडकी भरते. कारण कसलही जरी पीठ संपल की हीच मुक्तपीठ आता सुरू होणार हे मला माहिती अस्त.

“दोन आठवड्या पासून सांगतेय. पीठ संपणारे संपणारे...तुमच लक्ष कुठेय?... घरातल्या एका गोष्टी कडे धड लक्ष देऊ नका...”

‘घरातल्या एका गोष्टी कडे धड लक्ष देऊ नका’ या स्टेशन वरुन सुटलेली गाडी 'जळळ माझ नशीब' नावच स्टेशन आल्याशिवाय आजिबात थांबत नाही. गाडी एक्सप्रेस असली तरी अध्ली-मध्लि बरीच स्टेशन घेत जाते. एखाद दुसर गाळल की परत रिवर्स मारुन यायला आमची इंडियन रेल्वे मागे पुढे पाहणार नाही. या स्टेशना वरती माझे मित्र येतात...ऑफीस च ट्रॅवेलिंग येत. कधी काळी विसरलेला तिचा वाढदिवस...बजेट नाही म्हणून पुढे ढकलावा लागलेला एखादा ट्रीप चा प्रोग्रॅम येतो...हिच्या भावाला त्याच्या मुलाच्या मुंजीत घरचा आहेर करताना कापड दुकानाच्या काउंटर वर ‘एवढा भारीतला काय करायचाय शर्ट-पॅंट’ असा तोंडातून चुकुन गेलेला शब्द...आणि मग कापड दुकानात बिल भारेस्तोवर माझ्याच खर्चाने माझाच झालेला मानपान,...माझ्या कडच्यांनी हिला पहिल्या मन्गळा गौरी ला केलेली बजेट मधली कुचराई...ही सगळी वाटेत नेहमी वरचे वर लागणारी स्टेशन. गाडी पॅसेंजर लागली तुमच्या नशिबान, तर स्टेशन आणखी वाढतात. मग त्यात 'सख्यान्बरोबर' 'चुलत' आणि 'मावस' स्टेशनही लागतात. माझ त्या दिवशीच राशी भविष्य काय आहे त्याच्यावर ते सगळ अवलंबून आहे.

बॅचलर होतो मुंबईत तेंव्हा रविवार हा हक्काचा दिवस. सोमवार ते शनिवार सहा दिवस स्वता:ला विकायच आणि रविवारी मात्र स्वत:वर सत्ता गाजवायची असा नियम. साडे अकराला सोसायटीच्या नळाच पाणी जातय हे माहीत असूनही अकरा पंचवीस पर्तन्त पुरवणी वाचत अन्थरुणात पडणे हा घटनेन दिलेल्या काही मूलभूत हक्कांपैकी एक. शेवटी नाइलाज म्हणून नळात साठलेल्या पाण्यान बादली भरून ठेवायची. बारा-सव्वा बाराला कधीतरी...मस्त पैकी डोक्यावर ओतायचि. ते लोखंडी बादलीतल गारढोण पाणी जीवघाबरा करून टाकायच. शुचीरभुतते साठी सिन्थोल किंवा लाइफबॉय. फ़्रेश आंघोळ करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे आंघोळीला जमेल तेवढा उशीर करणे. पण लग्नानंतर हे असे विचार आणि गट्स दोन्हीही राहिलेले नाहीत.

दहा वर्ष झाली लग्नाला. म्हणजे अदमासे पाचशे रविवार. शनिवारी ऑफीस मधून घरी येऊन चहा बरोबर काही तरी चाळा म्हणून रिमोटने सॅर्फिंग करता करता डिस्कवरी चॅनेल वर कुठल्याश्या सरपटणार्या प्राण्यांचा एपिसोड सुरू असतो. जरा दोन मिनिट चॅनेलवर स्थिरावतो न स्थिरावतो तोच "घरात फार पाली झाल्या आहेत उद्या जरा लक्ष घाला घरात” पासूनच रविवार ची नांदी सुरू होते. ऐकून न ऐकल्या सारख करण या गोष्टीला आमच्या घरात फार कडक शिक्षा होतात. त्यामुळे मी तस करण पुर्वीच सोडून दिलय. पाली मारण, पंखे पुसण, रद्दी टाकण, गळत असलेल नळ बदलण, मिक्सर चे तुटलेले ब्लेड बदलून आणण, जुन्या पॅंटयांची शिप्याकडून पिशव्या शिवून आणणे, अशी अनेकविध प्रकारच्या कामांची यादी साधारण शुक्रवारिच संध्याकाळच्या साडे सात वाजल्या पासून वाढत असते. काम विसरू नयेत म्हणून ती लिहिली जातात. लिहिता लिहिता मग अजुन काम आठवतात. रविवार केवढा?...मी केवढा?...ती काम केवढी?...पण संसारीक क्रौर्याला जगात परिसीमा नाहीत. खर म्हणजे अमेरिकेत डे लाइट सेविंग नावाचा प्रकार करतात. म्हणजे सुर्योदयाच्या वेळा आणि सूर्यास्ताच्या वेळा पाहून घड्याळ एक तास पुढे मागे वगरे करतात. मला ही अनेक वेळा वाटत. रविवारी असच कराव. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा पुढे मागे नाही झाल्या तरी निदान आपण घड्याळ तरी पुढे मागे करावा आपल्या सोई प्रमाणे. पण असल्या बुरसट विचारांना आमच्या घरी थारा नाही. निदान रविवारी तर आजिबातच नाही.

त्यात अत्याचारांमधे भर म्हणून रविवारी सकाळी सकाळी हिच्या आत्ये बहिणीचा - बेबीताईचा फोन येतो. नाशिकहून नानामामा आणि सरुमामी आल्यात. त्यांना तुला भेटायचय. आता त्यांना हिला भेटायचय म्हणल्यावर ही "हो मी येते भेटायला" अस म्हणेल तर मग काय मजा आली संसाराची. मग "आइय्या खर्र्रच ?" असा एक मोठठा उद्गार्वाचक प्रश्न हिच्या वोडा फोन वरुन बेबीताईच्या एअर टेल वर जातो. नाशिक वरुन रोज हजारेक लोक येत जात असतील त्यात आणखी दोन पुण्याला आले तर त्यात एवढ आश्चर्य व्यक्त करण्यासारख काय आहे हे एक आणि आश्चर्य व्यक्त करायला एवढ्या जोरात ओरडणे का आवश्यक आहे हे, मला लग्नाला दहा वर्ष झाली तरी अजुन समजलेले नाही. आता मे महिन्यातल्या उकड्याने हैराण आणि भकास झालेल्या रविवारी हिची बेबिताई सकाळी सकाळी नाना मामा आणि सॅरू मामी आलेत नाशकातून अस खोट सांगून हिला एप्रिल फूल करेल अशी सुतराम शक्यता नाही. त्यामुळे ते खरच आलेले आहेत. ह्यात शंका नाही. मी सहज आजच राशी भविष्य पाहण्या साठी इकड तिकड हाताशी जवळपास आजचा पेपर लागतोय का ते पाहील.

मग हिने बेबीताईला "तू जर त्यांना या वेळी माझ्याकडे घेऊन आली नाहीस तर मी परत कद्धि कद्धि तुझ्याकडे फिरकणार नाही...अशी धमकी दिली. आणि वर कुणाची तरी शपथ पण घातली." बेबीताई पण थोडे आढे वेढे घेत तयार झाली. अय्या पण तुम्ही सगळे येणार कसे. ए थांब मी ह्यांना पाठवते तुम्हाला घ्यायला. माझा हिने पुढच्या दोन मिनिटात 'ओला' किंवा 'उबेर' चा अँप केलेला असतो. मला जराही न विचारता. चला सकाळी सकाळी पाली मारायच्या वाचल्या. शेवटी खट्टू झालेल मन वाईटातून चांगल शोधतच की.

पुढचा सगळा रविवार नानामामा लग्ना नंतर पहिल्यांदाच 'हिच्याकडे' आल्यामुळे - नानामामा आणि सरूमामी यांनी आमच्या हिला लहान पाणी कस वाढवल...इथ पासून ते नानामामान्चा मुलगा अमेरिकेत कसा यशस्वी डॉक्टर आहे इथ पर्यंत वीस मिनिटांची एक डॉक्युमेंटरी झाली. डॉक्युमेंटरी ऐकवून झाल्यावर पदरान डोळे टिपण झाल. तिच्या माहेरच्या माणसांची एण्ट्री झाली स्टेज वर तर किमान एकदा तरी डोळे टीपतेच ती. कारण माझ्या घरचे (म्हणजेच हिच्या सासरचे) सगळेच कसे दगडा च्या काळजाचे हे त्याशिवाय प्रूव होत नाही.

आता माझ्या हक्काच्या आठवड्यातल्या एकुलत्या एका रविवारवर पाणी सोडून नानामामा आणि सरुमामी यांच्या पाहुणचारा त मी जराही कुचराई केली तर हिच्या एक्सप्रेस ट्रेन च्या स्टेशनांची संख्या दुप्प टी हून ही अधिक वाढण्याची शक्यता असते. त्यापेक्षा नानामामा आणि सरुमामीना काहीही कमी पडू न देण हेच संसारीक सुखाच गमक आहे.

पण एक नक्की...तिच्या माहेरची माणस येणार असल्या मूळ रविवार चा हिच्या हातचा स्वयंपाक आणि माझ दुपारच जेवण मात्र सुपर्ब होणार हे नक्की !

चारूदत्त रामतीर्थकर
३ जून २०१६,पुणे /-

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त
Happy

पाली मारण, पंखे पुसण, रद्दी टाकण, गळत असलेल नळ बदलण, मिक्सर चे तुटलेले ब्लेड बदलून आणण,>> हे सगळं तुम्ही करता? नशीबवान आहे हो तुमची बायको! आमच्या कडे हे सगळं मला करावं लागतं, नाहीतर करवून घ्यावं लागतं (नोंद: हे करणारा नवरा नसतो). काय करणार स्वेच्छेने ही नवीन नोकरी स्विकारली आहे ना, होममेकरची Wink

बाकी मस्त लिहीलय. Happy

‘घरातल्या एका गोष्टी कडे धड लक्ष देऊ नका’ या स्टेशन वरुन सुटलेली गाडी 'जळळ माझ नशीब' नावच स्टेशन आल्याशिवाय आजिबात थांबत नाही. गाडी एक्सप्रेस असली तरी अध्ली-मध्लि बरीच स्टेशन घेत जाते. एखाद दुसर गाळल की परत रिवर्स मारुन यायला आमची इंडियन रेल्वे मागे पुढे पाहणार नाही.>>>>>>

कहर!!

Lol