फोबिया (Movie Review - Phobia)

Submitted by रसप on 3 June, 2016 - 02:33

'फोबिया' गेल्या आठवड्यात रिलीज झाला होता. २७ मे ला. पण त्या सुमारास सिनेमा पाहायला वेळ नव्हता. सहसा मी पहिल्या दोन-तीन दिवसांत पाहता आला तरच थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहतो, नंतर जायचा मला कंटाळा येतो. पण 'फोबिया' वेगळा वाटत होता आणि एक-दोन जणांनी चांगलंही म्हटलं. To add to it, त्यात राधिका आपटे मुख्य भूमिकेत. राधिका आपटे मला आवडतेच. तिच्यात अल्लडपणा आणि जबरदस्त आत्मविश्वास असं एक वेगळंच मिश्रण मला जाणवतं. तिचा चेहरा मला एकाच वेळी मिश्कील, विचारी, सुंदर आणि मादक असा वाटतो. एक समर्थ अभिनेत्री तर ती आहेच. तरीही मांझी, लै भारी मधलं तिचं काम मला विशेष आवडलं नव्हतं. 'फोबिया'मध्ये ती कसं काम करते, हे म्हणूनच औत्सुक्याचं वाटत होतं.

'Psychological Thriller' भारतीय चित्रपटांत आजकाल वरचेवर दिसायला लागले आहेत. मात्र बहुतेक वेळा त्यांत मानसिक स्थैर्य बिघडलेली व्यक्तिरेखा नकारात्मक भूमिकेत असते. 'फोबिया' त्याला सन्माननीय अपवाद आहे.

महेक देव (राधिका आपटे) ही एक मुंबईस्थित तरुण चित्रकार आहे. बिनधास्त आणि मुक्त स्वभावाची महेक तिच्या स्वभावाप्रमाणेच आयुष्यही जगते आहे. बिनधास्त आणि मुक्त. वयाची तिशी गाठूनही ती लग्नाच्या बंधनात अडकलेली नाही. शान (सत्यदीप मिश्रा) हा तिचा अत्यंत जवळचा मित्र आहे. त्याच्याशी तिचं नातं मित्रत्वाचंच आहे. त्या नात्याला प्रेमाचं नाव ती देत नाहीय. एकंदरीतच आपलं आयुष्य ती पूर्णपणे आपल्या मर्जीनेच जगते आहे. तिच्या चित्रांत मात्र एक प्रकारची असुरक्षितता, अनिश्चितता आपल्याला दिसून येते. मोजक्या, हव्या तेव्हढ्याच प्रतिमा व रंग त्यांत दिसत असले, तरी त्यांची गुंफण जराशी गुंतागुंतीची, गूढ किंवा अनाकलनीयही वाटते. कदाचित तिच्या व्यक्तिमत्वाचा एक असा कोपरा, जो अजून तिला स्वत:लाही गवसलेला नाही, तिच्या कलाकृतींतून आपल्याला दिसतो आहे. एखाद्या कलाकाराच्या कलंदर, लहरी स्वभावाचंच कदाचित हे दर्शन असावं.
स्वत:च्या अश्याच काही आत्ममग्न चित्रांचा प्रदर्शन सुरु असताना ती अर्ध्यातूनच तिथून निघते. नशेच्या बेधुंद अवस्थेत टॅक्सीत एकटी जात असताना तिच्यासोबत एक घटना घडते. ह्या घटनेमुळे मनात खोलवर दडलेली असुरक्षिततेची भावना जागृत होऊन तिच्या व्यक्तित्वावर परिणाम होतो. लोकांमध्ये बिनधास्त वावरणारी महेक घराबाहेरही पडेनाशी होते. तिची चित्रकला बाजूला पडते. 'Agoraphobia' नामक मानसिक असंतुलानाने ग्रासलेल्या महेकला पूर्वपदावर आणण्यासाठी तिची बहिण अनु (निवेदिता भट्टाचार्य) आणि शान खूप प्रयत्न करतात. जरासा बदल म्हणून शान तिला एका नव्या घरात घेऊन जातो. इथली नवीन कॉलेजवयीन शेजारीण निकी (यशस्विनी दायमा) महेकची चांगली मैत्रीणही होते.
पण काहीच पूर्वीसारखं होत नाही. उलटपक्षी परिस्थिती बिघडतच जाते. निकी, अजून एक शेजारी मनू मल्होत्रा (अंकुर विकल), शान आणि स्वत: महेक ह्या बदलत्या आणि बिघडत्या परिस्थितीत ओढले जातात. उत्तरोत्तर भयंकर रुप धारण करत जाणाऱ्या एकाद्या वणव्याप्रमाणे ही कहाणी पेटत आणि पसरत जाते. अखेरीस एका विशिष्ट ठिकाणी येऊन शांत होते. ह्या शेवटालाही आग विझलेली नसतेच. धुमसत असते.

Phobia.jpg

राधिका आपटेने जबरदस्त काम केलं आहे. सध्या जे भयपटांचं पीक आलं आहे, त्याची सुरुवात राम गोपाल वर्माच्या 'भूत'पासून झाली होती. 'भूत'मधल्या उर्मिला मातोंडकरच्या कामाने जो प्रभाव पाडला होता, तसा प्रभाव थेट 'फोबिया'मधल्या राधिका आपटेने पुन्हा एकदा पाडला आहे. आत्तापर्यंत हिंदीमध्ये तिला मिळालेली ही सगळ्यात आव्हानात्मक भूमिका. ह्या संधीचं तिने सोनं केलं आहे. इतकं की काही काळासाठी ती आपल्याला तिच्यासारखा विचार करायला भागही पाडते.
'बॉम्बे वेल्वेट', 'फेरारी की सवारी' सारख्या सिनेमांत छोट्या भूमिकांत दिसलेल्या सत्यदीप मिश्राला इथे चांगल्या लांबीची भूमिका मिळाली आहे. महेक काधीच समजून न घेत असलेल्या एका मित्राची व तिच्या प्रियकराची घुसमट त्याने चांगली दाखवली आहे. त्या व्यक्तिरेखेची प्रामाणिक कळकळ तोही तितक्याच प्रामाणिकपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो.
जराश्या पोरकट 'निकी'च्या भूमिकेत 'यशस्विनी दायमा' लक्षात राहते. तिचा वावर आपल्या चेहऱ्यावर एक हास्याची लकेर उमटवतोच.
तर, अंकुर विकलने सादर केलेला विक्षिप्त मनूसुद्धा जबरदस्त झाला आहे. अनुक्र विकलचा चेहरा ओळखीचा वाटत होता. जरा शोध घेतल्यावर लक्षात आलं, '24' (हिंदी) मालिकेत त्याने मुख्य दहशतवाद्याची भूमिका केली होती.

दिग्दर्शक पावन क्रिपलानी भयपट स्पेश्यालिस्ट असावेत. 'फोबिया'द्वारे त्यांनी भयपटांची हॅट ट्रीक केली आहे. चित्रपटाची लांबी जेमतेम पावणे दोन तासांचीच आहे. ह्यामुळेच असेल, पण कहाणीची गती कमी होत नाही आणि त्याच वेळेस दिग्दर्शकाची पकडही सुटत नाही. गच्च बांधलेली पटकथा (क्रिपलानी, पूजा लाढा सुरती, अरुण सुकुमार) देखील अनावश्यक पसारा अजिबात होऊ देत नाही.

'एक थी डायन'ने खरीखुरी भीती दाखवली होती. 'फोबिया'सुद्धा तसाच घाबरवतो. भयपट पाहणं आणि 'फन फेअर्स' मधल्या विविध 'राईड्स'मध्ये बसणं एकसारखंच. आपण स्वत:ला घाबरवण्यासाठी उत्सुक असतो. जर भीती वाटली नाही, तर तो सिनेमा आणि ती राईड बकवास ठरते. ज्यांना ही अशी विचित्र उत्सुकता आहे, त्यांनी 'फोबिया' जरूर पाहायला हवा. हे लिहायला मला खूपच उशीर झाला आहे कारण आता सिनेमागृहातून तो गेला आहे. तरी कुठे एखादा शो उरला असेलच तर नक्की पाहून घ्या किंवा जेव्हा कधी टीव्हीवर येईल, तेव्हा तरी अवश्य पाहाच ! भीती अनुभवणं ही काही विकृती नाही. 'भय' हासुद्धा नाट्याच्या नऊ रसांपैकी एक आहे. कुणाला दचकवणं सोपं असतं, घाबरवणं अवघड. जी तऱ्हा सध्या विनोदनिर्मितीची झाली आहे, तितकी वाईट भयनिर्मितीची नाही. तरी अनेकदा घाबरवण्याऐवजी दचकवलंच जातं.

'फोबिया' घाबरवेल, एव्हढं नक्की.

रेटिंग - * * * *

- रणजित पराडकर

http://www.ranjeetparadkar.com/2016/06/movie-review-phobia_3.html

http://www.ranjeetparadkar.com/2016/06/movie-review-phobia_3.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान परिक्ष॑ण.
राधिका आपटे मला आवडतेच. तिच्यात अल्लडपणा आणि जबरदस्त आत्मविश्वास असं एक वेगळंच मिश्रण मला जाणवतं. तिचा चेहरा मला एकाच वेळी मिश्कील, विचारी, सुंदर आणि मादक असा वाटतो. एक समर्थ अभिनेत्री तर ती आहेच. >>>> याच साठी पहायचा आहे.
'अहल्या', 'बदलापूर', 'हंटर', 'तुकाराम' सगळ्यातल्या तिच्या भूमिका आवडल्या आहेत..

छान परिक्षण,
इथल्या सिनेमागृहात हा सिनेमा तेलगु भाषेत डबिंग केलेला दाखवतायत. हिंदीत आल्यावर पाहिन.

'विरप्पन' पाहिलात का? पाहिला असेल तर त्याचे ही परिक्षण लिहा इथे.

एक नंबर रसप.
कालच गर्लफ्रेंड म्हणाली कुठला नवीन चांगला पिक्चर आहे का या संडेला बघायला.. हा बघतो आता कुठे लागलाय ते

पुण्यात थिएटर्स मधे आहे अजुन बर्‍याच ठिकाणी. ऐकेलेले रिव्हयुज आणि आता ऑथॉरिटीचे ( रसप Happy ) परिक्षण पण पहाण्यासाठी प्रोवोक करतं आहे. आज/उद्या रात्री नक्कीच पहाणार.

राधिका आपटे मला आवडतेच. तिच्यात अल्लडपणा आणि जबरदस्त आत्मविश्वास असं एक वेगळंच मिश्रण मला जाणवतं.>> +१००
मलाही बघायचा आहे..

{{{ भीती अनुभवणं ही काही विकृती नाही. 'भय' हासुद्धा नाट्याच्या नऊ रसांपैकी एक आहे. कुणाला दचकवणं सोपं असतं, घाबरवणं अवघड. जी तऱ्हा सध्या विनोदनिर्मितीची झाली आहे, तितकी वाईट भयनिर्मितीची नाही. तरी अनेकदा घाबरवण्याऐवजी दचकवलंच जातं.

'फोबिया' घाबरवेल, एव्हढं नक्की. }}}

ठळक केलेल्या वाक्यांकरिता चित्रपट नक्कीच पाहिला जाईल. समीक्षण आवडलं.

फोबियाचेही अनेक प्रकार असतात. काही जणांना रसप यांनी लिहिलेल्या चित्रपट परीक्षणांचाच फोबिया आहे असं इथला एक प्रतिसाद वाचून जाणवलं.

>>काही जणांना रसप यांनी लिहिलेल्या चित्रपट परीक्षणांचाच फोबिया आहे असं इथला एक प्रतिसाद वाचून जाणवलं. Lol

फोबियाचेही अनेक प्रकार असतात. काही जणांना रसप यांनी लिहिलेल्या चित्रपट परीक्षणांचाच फोबिया आहे असं इथला एक प्रतिसाद वाचून जाणवलं. >> Biggrin
चित्रपट बघणार.

राधिका ,शोर इन द सिटी, बदलापूर्,मांझी पासूनच फार्फार आवडायला लागलीये.. (स्मिता पाटील ची आठवण येते तिला पाहिल्यावर .. जौ दे हे अवांतर आहे Happy )
घरी भयपट पाहायला जाणारे वीर कुणीच नाही..म्हणून मीच जाणार फक्त Wink , आता हा रिव्यू वाचल्यावर नक्कीच..

>> काही जणांना रसप यांनी लिहिलेल्या चित्रपट परीक्षणांचाच फोबिया आहे असं इथला एक प्रतिसाद वाचून जाणवलं <<

Lol

You nailed it !

हेच लक्षात आल्यापासून मी बुभुक्षितांची क्षुधाशांती करण्याचे वृथा प्रयत्न सोडून दिले आहेत !
धन्यवाद बिपीन चंद्र जी !!

{{{ मी बुभुक्षितांची क्षुधाशांती करण्याचे वृथा प्रयत्न सोडून दिले आहेत ! }}}

अगदी मोजक्या शब्दांत मोठा अर्थ पोचवलात. सुप्परलाईक्ड!

Pages