गाणं विसरणारं

Submitted by विद्या भुतकर on 1 June, 2016 - 21:33

आज पळताना गाणी ऐकत होते, नेहमीप्रमाणेच. गाण्याच्या स्पीडप्रमाणे माझाही वेग बदलत असतो. आणि मधेच एखादं असं गाणं लागतं की ते आवडीचं असतं. गाणं म्हणालं की त्या गाण्यातील प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. किंवा त्यातले हिरो-हिरोईन, त्यांच्या डान्स स्टेप आणि त्याचा मुव्ही हे सर्व पटकन डोक्यात येऊन जातं. बाकी सर्व गाण्यांसारखे काहींच्या बाबतीत त्याचे चित्र डोळ्यासमोर उभे राहत नाही. मग मी पळता पळता फोनकडे बघायला लागते, कुठल्या मूव्हीमधलं हे गाणं आहे हे पाहण्यासाठी. मी, "अरे या पिक्चर मधलं आहे होय?" असं अविश्वासाने बघते आणि पुन्हा पळायला लागते. आणि हे आजचं नाही. आणि बरेचदा तीच ती गाणी असतात जे कुठल्या सिनेमातलं आहे हे मला आठवत नाही. एकदा तर पळताना अशी ओळीने ३ गाणी एका पाठोपाठ आली. मग माझा वेग एकदम मंदावला. या गाण्यांमध्ये असलेली काही गाणी एकदाची लिहीतेच म्हणजे तरी लक्षात राहतील.

१. इश्क सुफियाना- डर्टी पिक्चर

२. बेपनाह प्यार है आजा- कृष्णा कॉटेज

३. हे बघा आता हे तिसरं गाणं डोक्यात आहे पण बाहेर येत नाहीये. त्यात सोनाक्षी सिन्हा आणि सैफ अली खान आहेत. हां शेवटी गूगल आहेच. त्या दोघांचं हे एक गाणं- सामने है सवेरा- बुलेट राजा या मुव्ही मधलं.

४. फलक तक चल- टशन. हा सिनेमा कसा आहे ते सांगायला नकोच. पण गाणं इतकं छान आहे आणि विशेषत: त्यातले शब्द. खूपच सुरेख.

एरवी गाणी आणि त्यांचे मुव्ही लक्षात ठेवणारी मी हेच का विसरत असेन असा विचार करत होते. पहिलं गाणं कदाचित त्या मुव्ही च्या बाकी गाण्यांपेक्षा वेगळं असल्यामुळे असेल. आता बाकी सर्व गाण्यात काय कॉमन आहे तो विचार करतेय. एक तर हे मूव्ही मी स्वत: ते पाहिले नाहीयेत. त्यामुळे असेल किंवा 'अशा मुव्ही मध्ये इतके छान गाणे आहे?' असे वाटल्यामुळे असेल. बऱ्याच सुमार सिनेमांमध्ये खूप काही सुरेख गाणी असतात. म्हणजे अगदी चिखलात कमळ असावं किंवा कोळशाच्या खाणीत हिरा तशी. मग ते हिरे कानावर पडले की ऐकावेसे वाटत राहतात. पण कितीही लक्षात ठेवायचा प्रयत्न केला तरी आजूबाजूचे कोळसे, चिखल हे काही लक्षात रहात नाही. Happy मग प्रत्येकवेळी एक आग्रह करतो, त्याचं मूळ शोधण्याचा.

कितीही प्रयत्न केले तरी ते मूव्ही आठवणीत रहात नाही. कदाचित आपला मेंदूच आपल्याला सिग्नल देत असतो फक्त हवी तीच माहिती स्टोअर करण्याचा आणि नको ते सर्व विसरण्याचा. असे काही असेल का? पण केवळ मिव्ही चांगला नव्हता म्हणून गाण्यांना योग्य ते क्रेडीट मिळाले नाही तर नक्कीच त्यांच्यावर अन्याय होईल। गाणारा, संगीतकार या सर्वांचे कष्ट आणि कला तर त्यात आहेच ना. आठवणीतली गाणी काय सर्वांचीच असतात. काही हसवणारी असतात, काही रडवणारी. पण ही अशी न आठवणारी गाणीही असतातच. तर या अशा सर्व गाण्यांसाठी आणि त्यांच्या विसरलेल्या मुव्हीसाठी आजची पोस्ट. Happy तुमचीही असतीलच अशी काही गाणी तर जरूर सांगा.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इश्क सूफियाना...इतकं सुंदर गाणं या डर्टी पिक्चर च्या नशिबात का बरं मिळालं असेल हा विचार मी नेहमी करते.
किती सुरेख गाणं...!

डर्टी पिक्चर मला आवडला होता.

बोलना हल्के हल्के - गाणं माझं फेव्हरीट. पण पिच्चर (झुम बराबर) आणि ह्या गाण्याचं पिक्चरायझेशन भ्यानक.

हैप्पी जर्नी (अतुल कुलकर्णी, प्रिया बापट, पल्लवी सुभाष) मुव्ही जास्त नाही चालला .. पण त्यातलं "तारका रेंगाळल्या ...तुझ्यासाठी" ... हे छान आहे गाण.. Happy