नवशिक्यांसाठी फुलके .. अगदी क्रमवार आणि पारंपरिकरित्या.

Submitted by हर्ट on 30 May, 2016 - 08:17
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१) गव्हाचे पिठ (न चाळलेले)
२) एक चमचा तेल
३) चिमुटभर मिठ
४) कोमट पाणी

प्रमाणः
दोन सपाट वाट्यामधे ७ ते ८ फुलके होतात.
कणिक भिजवताना पाणी एकदम न ओतता थोडे थोडे ओतावे म्हणजे कणिक पातळ होणार नाही.

क्रमवार पाककृती: 

१) सर्वप्रथम एका पातेल्यात पाणी कोमट करुन घ्या:

२) ह्यानंतर कोपरामधे गव्हाचे पिठ, त्यात थोडे मिठ, आणि अर्धा चमचा तेल घ्या आणि हे सर्व पाणी ओतल्या अगोदरच मिसळून घ्या.

३) पिठ मळवताना, हाताच्या मागिल बोटाचा ज्यावर आपण ३०/३१ चे महिने मोजतो आणि ईंग्रजी भाषेमधे ज्याला knuckles म्हणतात त्यांचा वापर करुन कणिक हाताच्या बोटाना पाणी लावत लावत मळा. खालिल चित्रामधे तुम्हाला knuckles चे ठसे आहे. त्यावरुन एक अंदाज येईल कणिक कशी मळायची.

४) फुलके फुलण्यासाठी कणिक शक्य तेवढ्या वेळ मळायची म्हणजे ती लाटायला मऊ तर होतेच शिवाय फुलके कोरडे होत नाही.

५-अ) लिंबाइतकी पिठाचा गोळा घ्या.

५-ब) हा गोळा पिठात छान घोळवून घ्या. नंतर त्याला लागलेले पिठ काढून टाका. जास्त झालेले पिठ काढण्यासाठी फुलक्याचा गोळा हाती झटकायचा आणि मग त्यावरुन बोटे फिरवली की रवाळ पिठ आपोआप खाली पडते.

६) आता, फुलक्याचा हा गोळा पोळपाटावर ठेवा.

७) आता फुलका काठाकाठाने लाटत जा. हा फुलका कुठेच दुमडणार नाही, मधेच त्याला घडी पडणार नाही, वा फाटणार नाही ह्याची काळजी घ्या. असे दुमडलेले, फाटलेले फुलके फुलत नाही. सहजा कणिक पातळ झाली की असे होते. किंवा पोळपाट ओला असेल तर असे होते. किंवा, तुम्हाला सवय नसेल फुलके लाटायची तर असे होते. पण अनुभवातून ह्या चुका टाळता येतात हे नक्की.

८) आता तापल्या ताव्यावर हा फुलका ठेवा. तवा थोडातरी तापलेला असायचा हवा. आच मध्यम पण मोठी नको.

९) वरची ही बाजू जरा कोरडी झाली की लगेच फुलका उलटून ठेवायचा. हे चित्र किती फुलक किती कोरडा असावा हे दर्शवते आहे. इतका कोरडा पुरे आहे. एक लक्षात ठेवा फुलक्यात moisture रहायलाच हवे नाहीतर तो फुलत नाही. moisture राहू देण्यासाठी पहिली बाजू कमीतकमी वेळ तव्यावर ठेवायची. अगदी ३० सेकंद पुरे आहेत.

१०) आता, दुसरी बाजू तव्यावर शेकायची/भाजायची. तीही अगदी ३० ते ४५ सेकंद. खाली चित्र दिले आहे. ते पहा. दुसरी बाजू इतपत भाजलेली पुरेशी आहे.

११) आता, लगेच हा फुलका हातानी किंवा सवय नसेल तर चिमट्यानी उचलून घ्यावा. पण चिमट्यानी फुलका उचलण्यापुर्वी तो मधेच चिमट्याची धार लागून फाटणार / अडकणार नाही ह्याची दक्षता घ्यावी. शक्यतोवर हातानीच उचलावा. फार गरम नसतो.

आचेवर पहिली बाजू धरावी. जर दुसरी बाजू धरली तर फुलका फुलणार नाही. हे फुलक्याचे तंत्र आहे.

११-अ) हा ११-अ भाग मुद्दाम लिहित आहे. फुलका जर का आचेवर खूप वेळ ठेवला तर मधे तो जळतो. हे पहा. म्हणून फुलका फुलका की क्षणात तो दुरडीत ठेवायचा.

११-ब) जर तुम्हाला आचेवर धरुन फुलका भाजता येत नसेल तर तो तळहाता इतकाच लाटावा आणि थेट तव्यावर भाजावा.

१२) आता, फुलके असे चतकोर दुमडून ठेवावे. त्याला चार बोट तेलाचे लावू शकता.

१३) हे झाले पुर्ण कणकेचे फुलके

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच. Happy

कोणे एके काळी चांगले फुलके जमावेत म्हणून लई सर्कस, झटापट केली आहे. लाटून तव्यावर टाकलेला फुलका लगेच पालटायचा असतो हे लक्षात यायला बरेच दिवस गेले होते. सांगणारं अनुभवी जवळ कुणीच नव्हतं. तेव्हा हे असं काही वाचायला मिळालं असतं तर फार बरं झालं असतं असं आत्ता वाचताना वाटलं.

आता बारीक/जाड, घट्ट भिजवलेली / सैल भिजलेली कशीही कणीक असो, त्यातून तळहाताएवढे / तव्याएवढे कोणत्याही आकाराचे बेमालूम फुलके जमतात Proud Lol

कोणे एके काळी चांगले फुलके जमावेत म्हणून लई सर्कस, झटापट केली आहे. लाटून तव्यावर टाकलेला फुलका लगेच पालटायचा असतो हे लक्षात यायला बरेच दिवस गेले होते. सांगणारं अनुभवी जवळ कुणीच नव्हतं. तेव्हा हे असं काही वाचायला मिळालं असतं तर फार बरं झालं असतं असं आत्ता वाचताना वाटलं.

आता बारीक/जाड, घट्ट भिजवलेली / सैल भिजलेली कशीही कणीक असो, त्यातून तळहाताएवढे / तव्याएवढे कोणत्याही आकाराचे बेमालूम फुलके जमतात>>>>>>>+१

Kanik ani paani kiti ghetle? Tya pramanat kiti fulke hotat te pan saanga. Navshikya lokana andaj nasto pramanacha.

आचेवर पहिली बाजू धरावी. जर दुसरी बाजू धरली तर फुलका फुलणार नाही. हे फुलक्याचे तंत्र आहे. >>>
पहिली बाजु म्हणजे???

फुलके कधी केले नाहित म्हणुन काहीच माहिती नाही, एक प्रश्न आहे - तवा बाजुला ठेवुन मग तिथेच फुलके शेकायचे की कसे???

हर्ट, खूप खूप धन्यवाद स्टेप बाय स्टेप फोटो साठी.
चपातीची ही रेसीपी स्टेप बाय स्टेप नक्की लिहा. माझ्या चपातीचा पापड होतो त्यामूळे कधी बनवत नाही. Uhoh

हर्ट, लाजवाब फुलके .नी त्याचे स्टेप बाय स्टेप काढलेले फोटोही .त्यासाठी केलेल्या या सगळ्या खटाटोपाबद्दल धन्यवाद!!!

या बरोबर एकतर गरमागरम पाट्वड्यांची भाजी, नाहीतर भरली वांगी, नाहीतर बटाट्याच्या काचर्‍या व शिकरण, नाहीतर लुसलुशीत कोबीची तेलावरची भाजी हवी!! ! व लोणचे..... अहाहा.... Happy

मस्त. स्टेप बाय स्टेप.
कठीण कठीण रेस्प्या सगळे देतात. अश्या साध्याच पदार्थांची रेस्पी कोणी सांगत नाही. + १

छान.

मस्त! शाब्बास Happy

फुलक्याच्या दोन्ही बाजू कडांकडेसुद्धा नीट भाजल्या जायला पाहिजेत. आधी तव्यावरची बाजू पूर्ण भाजून आचेवरची बाजूसुद्धा पटापट गोल फिरवत भाजायला हवी. तुझे फुलके छान फुगलेत, पण कच्चट दिसताहेत. फक्त मधली बाजू भाजली आहेस तू.

तुझा कच्चट शब्द आवडला Happy

धन्यवाद सई इतकी छान निरिक्षण करुन टिप दिलीस. नक्की उपयोग होईल. मला फुलके करायला माझ्या रुममेटची नीरजची बायको अनुपमाने शिकवले. ती फक्त तीनच महिने सिंगापुरला आली होती. माझ्या बहिणीचे त्यावेळी बाळंतपण होते म्हणून मी अकोल्याला गेलो. परत आलो तर अनुपमा परत भारतात गेली होती. परत तिची आणि माझी भेट झाली नाही. तिचे आडनाव पण मला माहिती नाही. जेणेकरुन मी तिला बेफुवर शोधेन. तिने मला स्वैपाकातले जे मुलभुत तत्व सांगितले आहे ते आयुष्यभर पडत आहे. असे मित्र लाभले दुर्मिळ आहे.

मला तुझ्याकडून खूप काही शिकायचे आहे. तुझा कच्चट शब्द आवडला.

अतिशय बेसीक कृती अतिशय सुलभ भाषेत!! आवडली !

एक शंका,

फुलक्याला तेल लावतात? म्हणजे मी तर फुलके हेल्थी असतात कारण त्यांना तेल तूप नसते वगैरे गोष्टीच ऐकल्या होत्या अन तसेच फुलके खाल्ले आहेत, अर्थात लावतही असले ऑथेंटिक रेसिपी मध्ये तर मला माहिती नव्हते हे नमूद करावेच लागेल.

सोन्याबाजू, गव्हाच्या पोळ्या करताना पोळीला दोन बोटे तेल लावलेच पाहिजे आणि कणिक मळवताना पिठात थोडे तेल घालायला पाहिजे. कारण कणकेतही ग्लुटेन असतो. तेल लावल्यामुळे वात निर्माण होत नाही.

बादवे, कणकेतला ण हा ण की न कुठला न/ण वापरायला हवा? मला नेहमी ण च ऐकायला येतो.

पंजाबी सुद्धा भरपुर तेल बटर लावतात त्याच्या पोळ्यांना. ह्या मागे कारण हे नाही की चव आणखी छान लागते पोळ्यांची पण आपले शास्त्रच असे सांगते की पोळीला तेल हवे आणि भातावर तुप हवे. मला तरी आपल्या शांस्त्रावर प्रचंड विश्वास आहे. पण आपण लोक नको ते अन्न तेलकट बनवतो आणि नको त्या पदार्थांसाठी मग तेला तुपाची कपात करावी लागते.

मी एक आयुर्वेदीक पुस्तक वाचत आहे त्यात ऋतुनुसार आहार दिला आहे आणि सोबत प्रत्येक घटक पदार्थांचे गुण दिले आहे.

कणीक बरोबर.
कच्चट हा नेहमीच्याच वापरातला शब्द आहे, अर्धवट कच्चं / कच्चा ह्या अर्थाने.
तेल घातल्यामुळे वात कमी होतो हे माहिती नव्हतं. पोळी/ फुलका खुसखुशीत होते हे माहितीये.

तू खुप चांगला विद्यार्थी आहेस आणि तू ऑलरेडी सुंदर स्वैपाक शिकला आहेस. तुझ्या कृती आणि त्यातून तयार होणारे पदार्थ बघतानाच त्यांच्या चवीची कल्पना येत जाते. ते प्रामाणिकपणे खाणेबल दिसतात Happy
सर्वांच्याच बाबतीत असं होत नाही. कित्येकदा सगळं टेक्निकली जिथल्या तिथं आणि उत्तम दिसत असूनही एंड प्रॉडक्ट बघून शंका येते की हे चवीला नक्की कसं असेल? Uhoh
मी सारखी विसरत होते हे तुला सांगायला.

Pages