स्वतःच्या सावलीमध्ये उभी राहू कशी ?

Submitted by सुप्रिया जाधव. on 30 May, 2016 - 02:11

उन्हाळा सोसवेना अन खरी अड़चण अशी
स्वतःच्या सावलीमध्ये उभी राहू कशी ?

निराळ्या माणसांच्या निरनिराळ्या ह्या त-हा !
तसा तर डागही घड़तो कुठे बावनकशी ?

म्हणीपुरती म्हणाया म्हण ठरावी चांगली
'मरावी माय अन मागे उरावी मावशी !'

जगाला जिंकण्याचे स्वप्नरंजन चालते
घराची पायरी ओलांडते ना फारशी

जवळ जाताक्षणी समजूनही आले खरे
विचारांची तफावत जीव घेणारी अशी !

नकोसे वाटते आहे 'प्रिया' आयुष्य तर...
कशाला एवढे गुंतून तू पड़ते फशी ?

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निराळ्या माणसांच्या निरनिराळ्या ह्या त-हा !
तसा तर डागही घड़तो कुठे बावनकशी ?

छान आहे शेर…