चला…… पार्टी….

Submitted by विद्या भुतकर on 26 May, 2016 - 16:22

संदीप म्हणाला, 'बायको तुझ्या पेजचे १००० लाईक्स झाले की मी पार्टी देतो तुला'. खरंतर मीच त्याला द्यायला हवी त्याच्या प्रोत्साहनासाठी आणि मदतीसाठी. असो. पण मला वाटलं, काय अशा फालतू गोष्टींसाठी पार्टी? मग म्हणले का नाही? अगदी खूप मोठ्ठं काहीतरी घडल्यावरच साजरं करायचं असं थोडीच आहे? मी त्याला भेटले तेव्हाही अशीच काहीतरी कारण काढून पार्टी घेतली होती. आणि कॉलेज, ऑफिस अशा ठिकाणी वेगवेगळ्या मित्र-मैत्रिणीनी अशा मागितलेल्या आणि दिलेल्या अनेक पार्ट्यांची मी साक्षीदार आहे.

कुणाला वाटेल ही काय पार्ट्या झोडत असते का? पण ती तरी कशाला मोठी हवी? टपरीवरच्या चहाचीही चालतेच की? आणि गाड्यावरच्या डोशाचीही चालते, आपल्याला काय? खायला मिळाल्याशी मतलब, हो की नाही? पण या अशा फालतू पार्ट्यांमध्ये जी गम्मत असते ना ती मोठ मोठ्या बर्थडे पार्टी मध्ये येत नाही. एकमेकांची खेचण्यात, 'तू कधीतरी पार्टी देकी' म्हणण्यात जी मजा असते ती ३ आठवडे आधी आलेल्या evite मध्ये नसते आणि त्याच्या रिटर्न गिफ्ट मधेही. एकूण काय या इतक्या छोट्या कारणांसाठी घेतलेल्या पार्ट्याच भारी रंगतात. आणि होतं काय की त्यामुळे रोजच्या जगण्यात एखाद्या छोट्या कारणासाठी खूष होण्याची मजा मिळते.

हे असं खूष होणं प्रत्येकालाच जमतं असंही नाही. कितीही मोठी बातमी असली तरी रडका चेहरा करून सांगण्याची कला असते काही लोकांमध्ये. पण काही असे खास असतात जे अगदी आज लख्खं ऊन पडलंय म्हणून मजेत दिवस घालवतात तर काही पाऊस पडला म्हणून . आणि त्याच कारणासाठी रडणारेही असतात. आपण कुठे असलं पाहिजे हे आपल्यावर आहे नाही का?

माझी एक मैत्रीण आहे. तिच्याशी कधीही बोललं की मस्त वाटतं. बाकी कितीही गोंधळ चालू असला तरी तिचे जे छोट्या छोट्या गोष्टीत खूष राहायचे कसब आहे न ते मला खूप आवडते. कधी विचारले की म्हणेल,' आता काय जुलैमध्ये बर्थडे आहे. मग गणपती, मग नवरात्री इ." आता हे सण काही रोज येत नाहीत पण ते येणार आहेत आणि त्याच्या आधीच त्याची उत्सुकतेने वाट बघण्यात आणि खूष राहण्यात काय चूक आहे? तिच्यासमोर मी बोलायचं म्हणजे मला अतिशय 'रडूबाई' असल्याचं फिलिंग येतं. त्यामुळे मीही स्वत:ला जरा सुधारण्याचा प्रयत्न करते. पण तिची जी ती कला आहे ना ती तिलाच माहित. कधी बाहेर फिरून आली म्हणून खूष,कधी नवीन ड्रेस घेतला म्हणून खूष तर कधी बिर्यानी खायला मिळाली म्हणून खूष. अशा छोट्या आनंदात मग मोठे मोठे सणवार वगैरे म्हणजे दुधात साखरंच !

आता सध्या नवर्याचा पाय Fracture झालाय. जरा टेन्शन आलं होतं तर म्हणे नशीब डावा पाय आहे, उजवा नाही. आता ही म्हणजे पोझिटिव्ह असण्याची हाईट आहे नाही का? पण खरंच असे पोझिटिव्ह लोक आजूबाजूला असले की किती भारी वाटतं ना? त्यामुळे कितीही मोठं संकट असलं तरी केवळ काहीतरी दुसरं चांगलं घडतंय म्हणून ती वेळ सुसह्य होऊन जाते. असो.
तर आज मला तरी सेलिब्रेट करण्यासाठी कारण मिळत आहे. आज माझ्या पेजचे १००० लाईक झाले, खूप छान वाटत आहे. अनेक भारी लिहिणारे लेखक असतील आणि आहेत मराठीत. पण म्हणून माझा आनंद कमी होत नाही. बरोबर ना?
चला…… पार्टी….

धन्यवाद. Happy

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फ़ार छान लिहिता. तुमचे लेख वाचण्याची सवयच लागली आहे.लिहित रहा. हा लेख सुध्धा अगदी योग्य वेळी (म्हणजे उदास वाटत असताना)वाचला. धन्यवाद. Happy

अनेक भारी लिहिणारे लेखक असतील आणि आहेत मराठीत. पण म्हणून माझा आनंद कमी होत नाही. बरोबर ना? >>

अगदी खरं आहे...
मस्त लिहिता तुम्ही लिहित राहा....आपलं जवळचं काहीतरी वाटतं वाचताना....

चनस, पियु, अनघा, स्मिता
सर्वान्चे आभार. Happy आपण काही स्पेशल लिहू शकत नाही असे नेहमी वाटत असते. पण रोजचे विचार कुठेतरी माण्डायला मिळते म्हणून लिहीत राहते. Happy

विद्या.