'शोले'तल्या ध्येयपरास्त 'सांभा'च्या जिद्दी मुलीची यशोगाथा ......

Submitted by अजातशत्रू on 25 May, 2016 - 00:00

१९४७ चा काळ असेल. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात स्वातंत्र्य मिळायला अवघे काही महिने बाकी होते, मात्र दोन्ही देशात प्रचंड राजकीय - सामाजिक अस्थैर्य माजले होते, अशातच पाकिस्तानातील कराची शहरातला एक किशोरवयीन सिंधी मुलगा त्याच्या आईवडिलांना भारतात जाण्याविषयी विनवत होता.शेवटी कुटुंब विभक्त झाले, काही जण भारतात आले तर काहीजण तिथेच कराचीत राहिले. भारतात आलेल्या या सिंन्धी कुटुंबाने पंजाबात आश्रय घेतला. एक मुलगा एक मुलगी अन आई वडील असे ते चौकोनी कुटुंब होते. मुलगी वीणा देखणी अन नीटस होती तर मुलगा मोहन हा अगदी मरतुकडा, सडाफटिंग वाटावा असा होता, शिवाय त्याच्या चेहऱ्यावर व्रण होते.जणू टवके उडाले असावेत असा त्याचा चेहरा होता. जेमतेम उंची, किरकोळ शरीरयष्टी, डोक्यावर केसांचं जंगल अशा अवस्थेतल्या मोहनला क्रिकेटची फार आवड होती तर वीणाला छानछोकीची आवड होती, अन एके दिवशी तिचे नशीब फळफळले.

रवी टंडन या उदयोगपतीने तिला पसंद केले अन लग्नाची गळ घातली. तिच्या आईवडिलांना अपार आनंद झाला. इकडे थाटामाटात तिचा विवाह सोहळा संपन्न झाला अन तिकडे क्रिकेटच्या वेडाने ग्रासलेल्या मोहनने इथे आपली डाळ शिजत नाही हे लक्षात आल्यावर त्याची दुय्यम पसंद राहिलेल्या चित्रपट क्षेत्राकडे मोर्चा वळवला. फिल्मालया एक्टिंग स्कुलमध्ये त्याने प्रवेश घेतला. हा त्याचा उमेदवारीचा काळ होता, तिथलं शिक्षण संपलं अन तो कामासाठी स्टुडीओचे उंबरठे झिझवू लागला. त्याच्या शरीरयष्टी अन व्यक्तिमत्वामुळे त्याला कोणी रोल ऑफर करत नव्हते मात्र त्याला उपदेश मात्र मिळत होते. यातीलच एकाने त्याला नाव बदलण्याचा सल्ला दिला तेंव्हा त्याने आधी हसण्यावारी नेला मात्र पुढे त्याला नाव बदलावे लागले. एक्सट्रामध्ये जायचे हे नाही त्याने आपल्या डोक्यात पक्के केले होते.तोवर त्याचा मेहुणा रवी टंडनने देखील हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. १९६०मध्ये जॉय मुखर्जी स्टारर लव्ह इन शिमलामध्ये रवी टंडनने सहायक दिग्दर्शक आणि अभिनेता अशी दुहेरी कामगिरी केली. अन बॉलीवूडचे त्याच्याकडे लक्ष गेले. १९६३ मध्ये सुनीलदत्तनी त्यांच्या स्वतःच्या होम प्रॉडक्शनचा चित्रपट फ्लोअरवर आणला - 'ये रास्ते है प्यारके'. नेव्हल कमांडर के.एम. नानावटी यांच्या मर्डर मिस्ट्रीच्या सत्य घटनेवर आधारित या सिनेमाने सुनीलदत्तनी इंडस्ट्रीला कोर्टरूम ड्रामाची सक्सेस स्टोरी दिली. या सिनेमासाठी रवी टंडननी मुख्य सहायक दिग्दर्शकाचे काम पार पाडले होते. सुनील दत्त लखनौच्या ज्या अमिनाबाद गल्लीत राहून शालेय शिक्षण घेत होते त्याच शाळेत योगायोगाने मोहनदेखील त्याच काळात शिकायला होता. त्यामुळे १९६३ ला 'ये रास्ते है प्यारके'च्या निमित्ताने हे मित्र पुन्हा भेटले. तेंव्हा सुनीलदत्तनी मोहन साठी काम मिळवून देण्याचे कबुल केले. अन आपला शब्द पाळला. निर्माते दिग्दर्शक चेतन आनंद हे सुनील दत्त आणि रवी टंडन दोघांच्या परिचयाचे असल्याने त्यांनी मोहनला काम दिले अन अखेर मोहनची रुपेरी पडद्यावर झळकण्याची तीव्र इच्छा फळास आली. मुंबईत येऊन तब्बल सात आठ वर्षे झालेल्या मोहनसाठी १९६३ साल त्याच्या इच्छापुर्तीची पहाट घेऊन उगवले. चेतन आनंदच्या 'हकीकत'मध्ये त्याला छोटासा रोल मिळाला. 'हकीकत' हा पहिला हिट हिंदी युद्धपट ठरला. मात्र या सिनेमाने मोहन माखीजानीचे नाव बदलून त्याला नवी ओळख दिली. चित्रपटाच्या टायटलमध्ये त्याचे नाव होते धडपड्या मॅक मोहन ! होय आपल्या सर्वांच्या परिचयाचा मॅक मोहन उर्फ सांभा !!

या सिनेमानंतर मॅक मोहनने मागे वळून पाहिले नाही , मात्र विशेष दखल घ्यावी असा सिनेमा त्याला पूर्ण करिअरमध्ये मिळाला नाही. या गोष्टीची त्याला खंत होती पण तो स्वतःला लीड रोलमध्ये वा एखाद्या मोठ्या रोलमध्ये काम मिळावं म्हणून कुणाचे उंबरठे झिझवत फिरला नाही. त्याच्या स्वतःच्या बद्दलच्या अपेक्षा व स्वतःमधील कमतरता याची त्याला चांगली जाणीव होती. आपल्याकडे चांगला चेहरा नाही. उत्तम व्यक्तिमत्व नाही, आपल्याकडे तगडी शरीरयष्टी नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अत्युच्च दर्जाचा अभिनय सिद्ध करून दाखवावा अशी संधी नाही याची त्याला जाण होती. शिवाय आपली आर्थिक पार्श्वभूमी देखील चांगली नाही अन मुखवटयांच्या या खोट्या दुनियेत आपला कोणी गॉडफादर नाही हे तो ओळखून होता. फिल्मी पार्ट्यात जाणे अन वाट्याला येईल ते काम करणे हेच त्याचे बॉलीवूडचे जग होते. १९७५ मध्ये आलेल्या 'शोले'ने अनेकांची आयुष्ये बदलली त्यात एक मॅक मोहन पण होता. गब्बरच्या 'अरे ओ सांभा...सरकार हमपर कितना इनाम रखे है...'या प्रश्नाला तो पुरे पचास हजार असं उत्तर देतो. असे एकदोन ओळीचे दोन संवाद त्याच्या वाट्याला आले आणि लोक त्याला सांभा म्हणूनच ओळखू लागले. या रोलचा जसा फायदा झाला, इंडस्ट्रीत आयडेंटीटी मिळाली मात्र एक शिक्का बसला जो मरेपर्यंत पुसला गेला नाही. अन शोले पासून मॅक मोहन केवळ खलनायकांच्या सहायकाच्या भूमिकेत दिसू लागला....

एके दिवशी मॅक मोहनचे वडील गंभीर आजारी पडले आणि त्यांना जुहूच्या आरोग्यनिधी इस्पितळात दाखल केले, इथे कामास असणाऱ्या एका महिला डॉक्टरबरोबर या काळात त्याची सलगी वाढली, जिचं रुपांतर पुढं प्रेमात झालं अन त्यांनी पुढे जाऊन विवाह केला. मिनी तिचं नाव ! मॅक मोहनचा संसार तिनं मोठ्या प्रेमानं केला. मंजिरी,वीनती ह्या दोन मुली अन विक्रांत हा त्यांचा मुलगा. विक्रांत थोडासा दिव्यांगी मुलगा असल्याने मॅक मोहनने आपल्या संसाराकडे बरयापैकी लक्ष दिले. त्याचे इंग्लिश अत्युच्च दर्जाचे होते त्याचा फायदा त्याच्या मुलींना झाला. त्याच्या पत्नीने त्याला नेहमीच सपोर्ट केले अन जमेल तितके सुख संसारात दिले.

मॅक मोहनने त्याच्या फिल्मी करिअरमध्ये २०० पेक्षा अधिक चित्रपटात काम केले. 'शोले' शिवाय 'सत्ते पे सत्ता', 'डॉन', 'जंजीर', 'मजबूर' 'खुन पसीना' या सारख्या गाजलेल्या चित्रपटात त्याने सुपरस्टार अमिताभच्या सिनेमात भूमिका साकारल्या होत्या. 'रफू चक्कर','कर्ज' मधलेही त्याचे रोल तेच ते असले तरी प्रेक्षकांच्या डोक्यात राहिला. मॅक मोहन हा एकच नट असावा ज्याचे वास्तव जीवनातले मॅक हे नाव त्याच्या अनेक सिनेमातील रोल मध्ये त्याला चिकटले होते. आपल्याला एखादा तरी चांगला रोल मिळावा ही इच्छा मनी धरून असलेल्या मॅक मोहनला कॅन्सरने गाठले. तो आणि त्याचा परिवार खचले नाहीत, त्याने अखेरपर्यंत झुंज दिली अन त्यातच मुंबईतील कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात त्याचे १० मे २०१० च्या उदास सांजेला निधन झाले. 'अतिथी कब जाओगे' हा त्याचा शेवटचा सिनेमा. त्याच्या उतरत्या काळात त्याला कामं मिळत नव्हती तेंव्हा त्याने मिळेल त्या प्रादेशिक भाषांतील चित्रपटात अनेक टुकार भूमिका केल्या. ७१ वर्षांचे आयुष्य जगलेला मॅक मोहनने आयुष्यभर एकच खंत केली ती म्हणजे त्याची ध्येयपूर्ती कधीच होऊ शकली नाही, कोणत्याही लहान मोठ्या प्रॉडक्शन हाऊसने आपल्याला लक्षात राहण्याजोगा रोल ऑफर केला नाही. ही खंत उरी घेऊनच त्याने आपला प्रवास संपवला. त्याच्या शोकसभेत अमिताभसह अनेक मोठी मंडळी आली होती ज्यांनी त्याच्याबद्दल गौरवोद्गार काढले. मॅक मोहनने मिळवलेली शुभचिंतकांची शिदोरी पुढे त्याच्या पुढच्या पिढीस प्रोत्साहनकर्ती झाली ....

मॅक मोहन त्याच्या आयुष्यात ध्येयपरास्त झाला मात्र त्याच्या मुलीने अशी काही उत्तुंग झेप घेतली की आता त्याच्या आत्म्यास निश्चितच शांती लाभलेली असेल. मॅकची मुलगी मंजिरी हिने इंडस्ट्रीतच करिअर करायचे ठरवून त्यात आपल्या बहिणीला देखील सामील करून घेतले. आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी छोट्या गोष्टीतून सुरुवात केली मात्र त्यातच गुंतून न पडता सदैव पुढे जात राहिली.तिने आधी मॅक मोहनच्या नावाने मॅक प्रॉडक्शन्स या आधीच्याच संस्थेचे पुनरुज्जीवन केले. जाहिराती बनविल्या, स्टील फोटो शूट सुरु केले अन शॉर्ट फिल्मचा पुढचा टप्पा दिमाखात पूर्ण केला, आर्थिक अडचणीवर मात करताना तिने कुणाचीही फुकट सहानुभूती घेतली नाही. अपवाद तिची आत्येबहिण असलेली रविना टंडनचाच होता. ती मंजिरीला सतत प्रोत्साहित करत राहिली.

'दि लास्ट मार्बल'ह्या २०१२ मधील मूक (सायलेंट मुव्ही) शॉर्ट फिल्मने तिच्यातील चुणूक जगापुढे आली. ही मुंबईच्या रस्त्यावरील मुलांची व्यथा सांगणारी फिल्म होती. या शॉर्ट फिल्मला अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गौरवले गेले. तत्पूर्वी तिने 'वेक अप सिद' आणि 'सात खून माफ' ह्या दोन भिन्न विषयांच्या सिनेमांची सहायक दिग्दर्शकाची जबाबदारी पार पाडली होती. या पुढचा जो टप्पा तिने गाठला त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. 'मिशन इम्पोसिबल 4 - घोस्ट प्रोटोकॉल', 'बेटमेन द डार्क नाईट राईझेस', 'गांधी ऑफ द मंथ' आणि डिस्नेचा 'लिली & द विच' ह्या हॉलीवूडपटासाठी तिने सहायक दिग्दर्शकाचे काम केले. २०१४ मधे 'द कॉर्नर टेबल' ही शॉर्ट फिल्म आली आणि त्यातून नामी शक्कल लढवली. तिने मुंबईच्या काळाघोडात एक देखणा केफे सुरु केला जिथे रोज संध्याकाळी वेगवेगळ्या देशातील शॉर्ट फिल्म दाखवल्या जातात. 'The Pantry Short Film Nights'असं तिच्या या उपक्रमाचं नाव आहे.

मंजिरी मोहन माखीजानी या नावाची २०१४ त हॉलीवूडमध्ये दखल घेतली गेली. तिच्या 'द कॉर्नर टेबल'ला कान्स चित्रपट समारोहात उगवत्या सिनेनिर्मात्या - दिग्दर्शकांच्या यादीत सामील केले गेले अन त्याचे विशेष स्क्रीनिंग केले गेले. २०१४ च्या दिल्लीतील दादासाहेब फाळके सिनेमहोत्सवात विशेष ज्युरीचा पुरस्कार मिळाला. न्यूयॉर्क चित्रपट महोत्सवात देखील तिला पुरस्कार मिळाला. अमेरिकन पेव्हेलियनच्या शोकेसमध्ये ही फिल्म दाखवली गेली. हा बहुमान मिळवलेली ती एकमेव भारतीय महिला आहे. या दरम्यान तिने लॉसएंजिल्स मध्ये जोनाथन लेनार्ड सोबत फॅशन फोटोग्राफरचे प्रशिक्षण घेऊन तिथे कामही सुरु केले. मात्र तिला आणखी पुढे जायचे असल्याने तिने तूर्तास तरी फॅशन फोटोग्राफीचा ऑप्शन तसाच ठेवला आहे.
तिची खरी कमाल या वर्षी झाली आहे. अमेरिकन फिल्म इंन्स्टीटयूट (AFI)ने महिला दिग्दर्शकांच्या कार्यशाळेसाठी जगभरातून ८ दिग्दर्शिका निवडल्या आहेत त्यात मंजिरीचे नाव सामील आहे. या कार्यशाळेत सहभागी होण्याआधी २०१५ मध्ये मंजिरीने लॉस एंजिल्सच्या स्कूल ऑफ थियेटर, फिल्म्स एंड टेलिव्हिजन (UCLA) च्या व्यवासायिक पटकथालेखकाचा (स्क्रीनप्ले) अभ्यासक्रम विशेष प्राविण्यात पूर्ण केला होता.

२०१७चे वर्ष मंजिरीचे सर्वात महत्वाचे वर्ष आहे. या वर्षी तिचा बहुप्रतिक्षित 'आय सी यु' हा AFIने स्पोन्सर केलेला इंग्रजी सिनेमा प्रदर्शित होईल. मंजिरीने या सिनेमासाठी लेखिका - दिग्दर्शिका अशी दोन्ही महत्वाची कामे आपल्या खांद्यावर घेतल्या आहेत. मेट्रो स्टेशनमध्ये आत्मघातकी हल्ला करायला आलेल्या एका स्यूसाईड बॉम्बरची कथा यात आहे. त्याला सबवे मध्ये एक परिचित तरुणी भेटते जी त्याच्या मुलीची आठवण करून देते, त्याच्या विचारपरिवर्तनासाठी प्रयत्न करते. त्याचे मन द्विधा होते, त्याचे सुरक्षित रीत्या तिथून बाहेर पडण्याचे सारे रस्ते बंद झालेले असतात. पुढे काय होते ते प्रत्यक्षात पडद्यावर पाहण्यासाठी मार्च २०१७ पर्यंत आपल्याला वाट बघावी लागणार आहे. तिचा हा सिनेमा क्लिक झाला तर जगभर तिचा डंका होईल अन मग आपले बॉलीवूडवाले तिच्या कडे दिग्दर्शनासाठी रांगा लावतील.

ज्या मॅक मोहनला किरकोळ सिनेमात दोन तीन मिनिटांचा स्क्रीनटाईम मिळणे मुश्कील होते त्याच्या मुलीने आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घेतलेली ही गगनभरारी खरोखरच दिव्य आहे, गौरवास्पद आहे. पण आपल्या प्रसिद्धीमाध्यमांची चांगले अन प्रेरणादायी लिहायची, दाखवायची सवय बहुधा मोडली असावी. त्यामुळे कुणाला तिचे नाव माहित असण्याची सुतराम शक्यता नाही. त्याऐवजी शाहरुखच्या अमक्या मुलाने बच्चनच्या नातीबरोबर कसे गुलछर्रे उडवले किंवा सैफअली खानची मुलगी कुठे डेट करते किंवा इतर सेलिब्रिटींची टुकार मुले कसा वाह्यातपणा करताहेत याच्या बातम्या -बाईटस अगदी रंगवून दाखवल्या जातात.
बॉलीवूडच्या अन जगाच्या लेखी एका ध्येयपरास्त किरकोळ माणसाच्या मुलीने जिद्दीच्या जोरावर घेतलेल्या झेपेचे कौतुक सोडा साधा नामोल्लेख देखील होत नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. मंजिरीला तिच्या या प्रोजेक्टसाठी AFIच्या नियमानुसार फंडरेझिंग करावे लागेल. १५००० डॉलर्सचे तिला टार्गेट होते, ही पोस्ट लिहिताना ७१ टक्के टार्गेट (१०५७८ युएस डॉलर्स इतकी रक्कम) तिच्या प्रोजेक्टच्या नावे जमा झाली आहे. शबाना आझमी, प्रियांका चोप्रा, दीपिका, किरण खेर, रविना टंडन यांनी तिला याकामी फुल सपोर्ट केले आहे. तिला आणखी प्रोत्साहन आणि फंडसची गरज आहे. पण कुणापुढे हात न पसरता, कुठल्याही कुबड्या न वापरता तिला ही वाटचाल पूर्ण कारायची आहे. तेंव्हा आपण साऱ्यांनी या जिद्दी मुलीला किमान शुभेच्छा द्यायला तरी काय हरकत आहे.

- समीर गायकवाड.

http://sameerbapu.blogspot.in/2016/05/blog-post_47.html

( मंजिरीच्या 'आय see यु' या प्रोजेक्टची लिंक - https://www.indiegogo.com/projects/i-see-you--7#/)

Sholay_Movie_pic_09_g7rdby.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

समीरबापू तुमचे लेख फारच हटके असतात! हा लेख सुद्धा प्रचंड जास्त आवडला आहे! अशीच वाचन मेजवानी आपण कायम देत राहाल अशी अपेक्षा अन आपल्याला पुढील लेखनाकरता भरभरुन शुभेच्छा

बाप .... पाकिस्तान ते मुम्बई .

मुलगी .... मुम्बै ते अमेरिका.

प्रोग्रेस ईज एक्पोनेन्शली प्रपोर्शनल टु द डिस्टन्स फ्रॉम नेटिव्ह प्लेस .

समीरबापू तुमचे लेख फारच हटके असतात! हा लेख सुद्धा प्रचंड जास्त आवडला आहे! अशीच वाचन मेजवानी आपण कायम देत राहाल अशी अपेक्षा अन आपल्याला पुढील लेखनाकरता भरभरुन शुभेच्छा >>>>> +११११११ Happy

समीर -

<<<<<<२०१७चे वर्ष मंजिरीचे सर्वात वर्ष आहे. या वर्षी तिचा बहुप्रतिक्षित 'आय सी यु' हा AFIने स्पोन्सर केलेला इंग्रजी सिनेमा प्रदर्शित होईल. मंजिरीने या सिनेमासाठी लेखिका - दिग्दर्शिका अशी दोन्ही महत्वाची कामे आपल्या खांद्यावर घेतल्या आहेत. >>>>>>> यातील पहिल्या वाक्यात बहुतेक "महत्वाचे: हे शब्द राहिले असावेत.... ते जरा दुरुस्त करणार का ?? Happy आगाऊपणाबद्दल क्षमस्व....

Bravo! मंजिरीचे यश कौतुकास्पद आहे. तिला खूप सार्‍या शुभेच्छा! तिची ओळख करून दिल्याबद्दल तुमचे आभार.. लेख छान प्रवाही झाला आहे.

भारी लेख ! मन्जिरिला अनेक शुभेच्छा! शेवटच्या पॅराग्राफविषयी सहमत, आपल्याकडे मिडिया त्याच त्याच चेहर्‍याना अवास्तव मेहनत देवुन अती करते.

मॅकचा सुरुवातीचा जो परिचय दिला तुम्ही त्यावरुन अगदी ऑटोमॅटिकली पु ल देशपांडेंचा "बोलट" आठवला! अतिशय सशक्त लेखन हे पुन्हा एकदा म्हणतो

आवडला लेख, मंजीरी यांना शुभेच्छा >>>> +१

हटके विषय अन खिळून वाचत रहावी अशी शैली अन मांडणी आहे. माबोवर लिहीत रहावे. Happy

Pages