सरबजीत - एक जखम (Movie Review - Sarbjit)

Submitted by रसप on 22 May, 2016 - 02:06

पाकिस्तानच्या जेलमध्ये शब्दश: सडत पडलेल्या सरबजीतच्या हातावरून एक मुंगळा फिरतो आहे. तो त्याला नुसता पाहतो आहे. इतक्यात कोठडीचा बाहेरचा दरवाजा करकरतो. कुणी तरी आत येणार असतं. सरबजीत लगबगीने पाणी प्यायचा भांड्याखाली त्या मुंगळ्याला झाकून ठेवतो. 'शोले'तला गब्बर हातावर फिरणाऱ्या माशीला मारतो, तसा सरबजीत त्या मुंगळ्याला मारणार नसतोच. कारण तो स्वत:सुद्धा एका परमुलुखात चुकून घुसलेला असतो किंवा कदाचित हवा आणि उजेडही जिथे चोरट्या पावलांनी येतात अश्या त्या कोठडीत त्याला सोबत म्हणूनही तो मुंगळा काही काळ पुरणार असेल. कुणास ठाऊक नक्की काय ! दिग्दर्शक ते उलगडत बसत नाही. तो विचार आपल्याला करायचा आहे.

'सरबजीत' एकदा पाहाण्यासारखा नक्कीच आहे. दिग्दर्शक ओमंग कुमारचा पहिला सिनेमा 'मेरी कोम' ठीकच वाटला होता. प्रियांकाने तो चांगलाच उचलून धरला होता. पण इथे मात्र मुख्य भूमिकेतल्या ऐश्वर्या राय-बच्चनला दिग्दर्शकाने उचलून धरलंय. सुरुवातीला ऐश्वर्याचा अत्याभिनय (Over acting) डोक्यात गेला. नंतर नंतर ती जरा सुसह्य होत गेली. पण तरी ते चिरक्या आवाजात बोलणं काही जमलं नाहीच आणि वयस्कर स्त्री म्हणूनही तिला काही सहजपणे वावरता आलं नाही असं वाटलं. दुसऱ्या इनिंगची सुरुवात आत्तापर्यंत तरी ऐश्वर्यासाठी सामान्यच ठरली आहे.

सरबजीत सिंग चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात गेला होता. दारूच्या नशेत त्याच्याकडून ही चूक घडली. ह्या एका चुकीमुळे त्याचं अख्खं आयुष्य बरबाद झालं. ही आपल्याला ज्ञात असलेली त्याची कहाणी. जे दिसतं तेच सत्य असतं आणि जे सत्य असतं ते कधी न कधी दिसतंच, ह्यावर माझा तरी फारसा विश्वास नसल्याने, खरं खोटं देव जाणे. पण ह्या सरबजीतला पाकिस्तानात बॉम्बस्फोट केल्याच्या आरोपावरून डांबून ठेवले गेले. त्याच्यावर अनन्वित अत्याचार तर झालेच, पण त्याचा शेवटही भयंकर होता. इथे आपण अजमल कसाब आणि अफजल गुरू ह्या दहशतवाद्यांना फाशी दिले आणि तिथे त्यांनी सरबजीतला जेलमध्येच हल्ला करून ठार मारलं. त्याचा उघडपणे खून करून बदलाच घेतला एक प्रकारे. त्याच्यावर ठेवलेले बॉम्बस्फोटाचे आरोप खोटे ठरले असतानाही, त्याला सुटका मिळाली नाही. लपलेलं सत्य जरी काही वेगळं असलं, तरी दिसणारी अमानुषता खूपच संतापजनक आहे.

सरबजीतच्या हालअपेष्टा रणदीप हुडाने फार अप्रतिम सादर केल्या आहेत. भूमिकांच्या लांबीचा विचार केला, तर सिनेमा ऐश्वर्यावर - सरबजीतच्या मोठ्या बहिणीवर - बेतला आहे. मात्र रणदीप हा एक हीरा आहे. तो लपत नाहीच. सिनेमा येण्याच्या खूपच आधी, त्याचा एक फोटो आला होता. 'सरबजीत'च्या गेटअप मधला. रस्त्यावरच्या रोगट भिकाऱ्यासारखा दिसणारा तो माणूस रणदीप हुडा आहे, हे समजायलासुद्धा वेळ लागत होता. ह्या गेट अपसाठी त्याने खूप वजनही कमी केलं. त्याची घाणीने पूर्ण भरलेली नखं, पिंजारलेले केस, किडलेले दात, अंगावर पिकलेल्या जखमा, खरुजं, गालिच्छ पारोसा अवतार, कळकट फाटके कपडे वगैरे असं आहे की जे आपल्याकडे ह्यापूर्वी कधीच कुठल्या सिनेमात दाखवलं नाही. सिनेमात दाखवलेल्या अमानवी अत्याचारांचा विचार करता, त्याचं तसं दिसणं किती आवश्यक आहे हे समजून येतं. ते सगळं पडद्यावर पाहणं भयंकर आहे.

Sarbjit.jpg

अनेक वर्षांनंतर सरबजीतला भेटायला त्याची बहिण, बायको व दोन मुली पाकिस्तानात जेलमध्ये येणार असतात. त्याला फाशीची शिक्षा सुनावलेली असते. पंधरा दिवसांवर फाशी आलेली असताना, तो आपल्या कुटुंबाला भेटणार असतो. 'आपल्या घरचे येत आहेत' हे समजल्यावर आनंदाला पारावर न उरलेला सरबजीत आपली छोटीशी कोठडी स्वच्छ करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो. घाणीचं भलंमोठं भांडं कांबळं टाकून झाकतो. थोडंसं पाणी असतं, अंगातले कपडे त्यात भिजवून ती घाणेरडी कोठडी पुसून काढतो. उरलेल्या पाण्यात कशी तरी अंघोळ वगैरेही करतो. चहा बनवतो ! त्याची ती सगळी धडपड व्याकुळ करणारी आहे. प्रत्यक्ष भेटीचा प्रसंग तर हृदयाला घरं पाडणारा आहे.
नंतर त्याची फाशी स्थगित होते आणि पुन्हा कोर्टात केस उभी राहते. मग पुन्हा एकदा त्याला भेटायला त्याची बहिण येते. तेव्हा ती त्याला धीर देण्यासाठी 'तू इतकी वर्षं इथे सलामत आहेस' म्हणते. तिच्या ह्या वाक्यावरचा सरबजीतचा आउटबर्स्ट जबरदस्त आहे ! 'कोणती सलामती ? ह्या काळ्या कोठडीत मला डांबून ठेवलंय. मी इथेच हागतो, इथेच मुततो, इथेच बाजूला बसून असतो, जेवतो, झोपतो.. एक जमाना झाला मला कुणी मिठी मारलेली नाही. कुणी बोलायला येत नाही' वगैरे त्याचं बोलणं अक्षरश: ऐकवत नाही ! अंगावरच येतं !
एकूणच रणदीपचं काम जीव पिळवटणारं आहे. एखाद्या व्यक्तिरेखेत शिरून तिला सादर करू शकण्याची अभिनय क्षमता आणि त्याच्या जोडीनेच उत्तम शरीरयष्टी, असा वेगळाच कॉम्बो त्याच्याकडे आहे. जो इतर कुणाकडेही नाही. 'मै और चार्ल्स' मध्ये त्याने चार्ल्स शोभराज ज्या बेमालूमपणे उभा केला होता, त्याच बारकाईने तो सरबजीत साकार करतो. त्याची हताशा, वेडगळपणा, वेदना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कळकटपणा त्याने आपलासा केला आहे. सरबजीतला न्याय मिळाला नाहीच, पण रणदीपने भूमिकेला मात्र न्याय दिलाच आहे, ह्याबाबत वादच नाही.

रिचा चड्डानेही तिला जितका वाव मिळाला आहे, तेव्हढ्यात उत्तम काम केलं आहे. 'मसान'मध्ये एकसुरी वाटलेली रिचा चड्डा इथे विविध प्रसंगात वेगवेगळ्या छटा दाखवते. पण मुळात तिची भूमिका ऐश्वर्याच्या स्टारडमपुढे गुदमरली असल्याने ती झाकोळली जातेच.

दर्शन कुमार चा रोल छोटा, पण महत्वाचा आहे. पाकिस्तानी वकिलाच्या भूमिकेत तो मस्त काम करतो. NH10 आणि मेरी कोममध्येही त्याला कमी लांबीचीच कामं मिळाली होती आणि तिथेही त्याने चांगलंच काम केलं होतं. त्या मानाने इथे त्याला काही ठिकाणी थोडी संधी मिळाली आहे आणि ती त्याने वाया जाऊ दिलेली नाही. सरबजीतच्या खऱ्या वकीलाला आपल्या कुटुंबासह पाकिस्तान सोडून परदेशात आश्रय घ्यावा लागला होता. तिथल्या कट्टरवाद्यांनी त्याला दिलेला त्रास, 'सरबजीत'मध्ये थोडासाच दिसतो. पण त्यावरून साधारण कल्पना येते.

ऐश्वर्याचे काही टाळीबाज संवादांचे सुमार प्रसंग वगळले, तर संवादलेखनही (उत्कर्षिनी वशिष्ठ) मला अत्यंत आवडलंय. अतिशय अर्थपूर्ण व नेमके संवाद आहेत.
आजकाल एकाच सिनेमाला सहा सात जण संगीत देत असल्याने चांगलं काम कुणाचं आणि वाईट कुणाचं समजत नाही ! ओव्हरऑल संगीतसुद्धा चांगलं वाटलं. मुख्य म्हणजे अनावश्यक वाटलं नाही.

ओमंग कुमार ह्यांनी हा विषय निवडल्याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन करायला हवं. सरबजीत प्रत्यक्षात कोण होता ? सामान्य माणूस की हेर किंवा अजून कुणी, हा विषय वेगळा. पण त्याने एक भारतीय असल्याची भारी किंमत मोजलीच आहे. त्याच्या यातनांना ओमंग कुमारने लोकांपर्यंत पोहोचवलं आहे. ऐश्वर्याच्या जागी एखादी सकस अभिनय क्षमता असलेली ताकदीची अभिनेत्री असती, तर कदाचित खूप फरक पडला असता.

Sarbjit2.jpg

सरबजीत तर आता राहिला नाही. फक्त त्या नावाची एक जखम राहिलेली आहे. खपलीखाली अजून ओलावा आहे. 'ह्या निमित्ताने लोकांना बाजीराव पेशवा समजला' सारखे युक्तिवाद करणारे लोक ह्या निमित्ताने ही जखमही समजून घेतील. कदाचित असे किती तरी सरबजीत आजही खितपत पडले असतील किंवा संपूनही गेलेले असतील. त्या सगळ्यांना नाही, तर त्यांतल्या काहींना तरी जाणून घेण्याचा प्रयत्न होईल.
हेही नसे थोडके !

रेटिंग - * * *

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2016/05/movie-review-sarbjit.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वास्तववादी परिक्षण. आवडले.

ऐश्वर्या बाबत सहमत, तीची ओवर अ‍ॅक्टिंग खरच डोक्यात जाते. तीच्या जागी 'दिव्या दत्ता'ने ती भुमिका अतिशय छान केली असती असे वाटते.

परिक्षण आवडले. आज पाहायचा बेत आहे. पण हाल अपेष्टांबाबत वाचून बघावा की नाही असा विचार मनात आला. असा चित्रपट बघून दु:खी होणे हे निदान आजच्या दिवसाचे तरी ध्येय नाहीच. पण तरी बघूयात काय ठरते.

ऐश्वर्या राय कुठून आली ह्या पिक्चरमध्ये? तिला का हा रोल दिला गेला म्हणे?? Uhoh

पिक्चर न पाहताही हे प्रश्न पडलेले आहेत कारण परिक्षणात केलेले चित्रपटाचे वर्णन! आणि त्यामुळेच दिव्या दत्ता ह्या प्रसाद ह्यांच्या सुचवणीशीही पिक्चर न बघताच सहमत व्हावेसे वाटत आहे.

ईथे परीक्षण दिल्याबद्दल धन्यवाद.

सरबजीत (चित्रपट) नक्कीच बघायचाय... पण असे 'डोक्याचा भुगा' करणारे चित्रपट नको वाटतात. 'सरबजीत' हे भारत पाक संबांधाचे वास्तव्य आहे हे मानले तरी त्याकडे डोळे ऊघडे ठेवून बघणे आणि निव्वळ चरफड, हताश होणे ई. मानवेल की नाही हा प्रश्ण आहे. कारण शेवटी चित्रपट हा काही 'संदेश' पोचवण्याचे माध्यम आहे हे मान्य केले तर सरबजीत सारख्या चित्रपटातून काही 'नविन' संदेश नाही तर जखमा अधिक मिळतात.

ऐशवर्या च्या एकंदरीत कारकिर्दीतच 'दिसणे' हाच निव्वळ हाय पॉईंट होता/आहे. संवाद्फेक वा अभिनय या असल्या अपेक्षा तीच्याकडून नव्हत्या/नाहीत. बॉलीवूड मध्ये बाहुल्यांना 'मार्केट' मिळालं आणि ऐश्वर्या टिकली.

पण, रणदीप हा एक प्रचंड मेहेनती आणि गुणी अभिनेता आहे. रामू पासून सुटका झाल्यावर जरा बर्‍यापैकी अभिनयवाल्या भूमिका करतोय... हे ही नसे थोडके.

ऐश्वर्या बाबत सहमत, तीची ओवर अ‍ॅक्टिंग खरच डोक्यात जाते. तीच्या जागी 'दिव्या दत्ता'ने ती भुमिका अतिशय छान केली असती असे वाटते.>>>>>> तब्बु सुध्दा फिट बसली असती. ...

छान लिहिलेय . बघायचा आहे..

तीच्या जागी 'दिव्या दत्ता'ने ती भुमिका अतिशय छान केली असती असे वाटते.>">>>> +1

फार सुंदर लिहिलय रणजीत पण तरीही ३च स्टार का? ऐश्वर्यासाठी २ स्टार कापले की काय?
मला तर वाचताना पण रडायला येत होतं, त्या माणसाला जगताना काय झालं असेल Sad
माझ्याच्याने नाही पाहववणार हा सिनेमा Sad मी नाही पहाणार

चांगले लिहिलय.
हुडाला अभिनय येत असेल हे त्याच्या आधीच्या सिनेमांवरुन खरच कधी वाटले नव्हते. पण शोभराजमधे चांगले काम केले होते.
ऐश्वर्या सुंदरतेमुळे आवडते. डोळे तर फार सुंदर आहेत. पण आवाजाबद्दलचे आणि एकुण अभिनयाच्या मर्यादा याबद्दलचे मत मान्य.

पण हाही पाहीन असे वाटत नाही. काल सैराट होता गावात, पण नाही गेले.

मला आव्हानात्मक भुमिकेत विद्या बालनला पहायला आवडते. तिचा विलक्षण बोलका चेहरा, अक्षरशः चकाकणारे डोळे, सुंदर आवाज, सुंदर संवादफेक, तिच्या आवाजात एक नाद आहे, ठेका आहे. जय हो विद्या!!

मला आव्हानात्मक भुमिकेत विद्या बालनला पहायला आवडते. तिचा विलक्षण बोलका चेहरा, अक्षरशः चकाकणारे डोळे, सुंदर आवाज, सुंदर संवादफेक, तिच्या आवाजात एक नाद आहे, ठेका आहे. जय हो विद्या!!
>>>
+११११११

माझ्यानं पाहवणार कि नाही कोण जाणे.
वाचतानाच काटा आला हे मात्र खरे..
ऐश्वर्या कधीच आवडली नाही पण रणदीप हुडा क्लास आहे.. बघेल शायद..

@रीया,

ऐश्वर्याची निवड साफच चुकली आहे. त्याउप्पर, मूळ पात्रापेक्षा ह्या उपपात्रावरच सिनेमा जास्त आहे. त्याचं नाव 'सरबजीत' असण्यापेक्षा 'सरबजीत की बहन' ठेवायला हवं होतं. मला वाटलं की ही खूप मोठा मायनस पॉईण्ट आहे सिनेमाचा. पण इतर काही मुद्दे (रणदीप, एकंदर 'टेकिंग', बाकी लोकांचा अभिनय) पॉझिटिव्ह आहेत.

फर्दर, 'ओव्हरऑल इम्पॅक्ट' चा विचार मी करत असतो. सगळं काही चांगलं असलं तरी काही वेळेस त्या सगळ्याचा एकमेकाशी मेळ बसत नाही, असाही अनुभव आलेला आहे.

'सुनिधी' ह्यांच्याशी सहमत.
तिथे विद्या बालन हवी होती. दिव्या दत्ता मलाही खूप आवडते आणि उत्कृष्ट अभिनेत्रीही आहे. पण आता तिचं वय दिसायला लागलं.

मला तब्बू मात्र ठीकठाक अभिनेत्रीच वाटते. 'दृश्यम' मध्ये कंटाळा आणला होता तिने. एरव्हीसुद्धा तिचा अभिनय खूपच एकसुरी वाटतो. तिला वाजवीपेक्षा जास्त मान मिळाला आहे, असं मला वाटतं. तिने ऐश्वर्यापेक्षा नक्कीच चांगलं काम केलं असतं, पण तरी भूमिकेला न्याय नसताच मिळाला. (हे.मा.वै.म.)

एक अवांतर निरिक्षण : अशाच प्रकारच्या हालअपेष्टा अंदमानातल्या कैद्यांच्या वाट्याला आल्या होत्या, किंबहुना जास्तच.

सुंदर समीक्षा.
मला पाहवणार नाही कदाचित. हा चित्रपट सरबजीतच्या बहिणीशी केलेल्या चर्चेनंतर बनवला आहे असे वाचले.
ऐश्वर्या ला चांगला दिग्दर्शक मिळाला तर ती उत्तम अभिनय करते, पण मूळात या भुमिकेसाठी तिची निवडच योग्य नव्हती.

छान परिक्षण

रणदीप हुडा एक अफलातून अभिनेता आहे पण दुर्दैवाने तो कायम अन्डर डॉग राहीला आहे.

ऐश्वर्याच्या ऐवजी प्रिती झीन्टा शोभली असती

बाय द वे आनन्दाची गोष्ट म्हणजे योगायोगाने म्हणा ह्या चित्रपटाच्या श्रेयनामावलीत माझ्या फर्म चे नाव ऑडीटर म्हणून दाखवण्यात आलेले आहे Proud

छान परिक्षण पण मी नाही बघणार. मला बघवणार नाही Sad

ऐश्वर्या कधीच आवडली नाही>>>> + १११११११११११११११११११११११११११११

रसप, खुप छ्हान लिहिलेत. मला बघवणार नाही असे वाटतेय.

केदार अभिनंदन......

ऐश्वर्या ला चांगला दिग्दर्शक मिळाला तर ती उत्तम अभिनय करते, पण मूळात या भुमिकेसाठी तिची निवडच योग्य नव्हती.

उदाहरण ? ती अभिनयासाठी कधीही प्रसिद्ध नव्हती. फारफारतर अधुन मधुन बरे काम करते असे म्हणता येईल.

गुरु! त्यात तीचा तो नेहमिचा भेसुर हसण्याचा अभिनय नसल्याने असेल पण मनिरत्नम ने बरच चान्गल काम करुन घेतलय.. पण असे फार कमिवेळा घडलय त्यामुळे एखादा चित्रपट अभिनयाचा मानदन्ड असु शकतच नाही.

सरबजित ला पॉप्युलॅरिटी मिळावी म्हणुन अ‍ॅश ला घेतल असल तरी तिची निवड साफ चुकलिय हे ट्रेलर्स वरुनच कळतय. विद्या माइट हॅव बीन बेटर चॉईस. तब्बु ! बिग नो नो !

जेलमधला तो पहिल्या भेटीचा प्रसंग खरंच डोळ्यात पाणी आणणारा आहे. रणदीप हूडा ने तो सीन खाल्लाय....
बहीण-भावांमधलं प्रेम आणि तळमळ खुपच सुंदर सादर केली आहे.
रीचा चढ्ढा ला अगदीच कमी वाव दिलाय....

आवडलं परिक्षण.. रणदीप हुडा साठी बघणार हा सिनेमा.. मॉन्सून वेडिंग पासून फेव आहे माझा तो!!
ऐश्वर्या चं Over acting खरोखरंच डोक्यात जातं.. जजबा , इरफान मुळे पाहीला होता Happy
ऐश्वर्या ऐवजी दिव्या दत्ता ला घेतलं असतं तर सिनेमाला वेगळंच वळण लागलं असतं.. पण आपल्याकडे अजूनही ,' ग्लॅमरच बिकता है..चांगला अभिनय वगैरे दुय्यम गोष्टी आहेत.. उनको कौन भाव देता है..

माझ्या दोन कलीगनी हा सिनेमा पाहिला आणि त्यांच्यामते ऐश्वर्या राई हीने जास्त सुंदर काम केलेले आहे आणि तिचाच रोल जास्त मोठा आहे सिनेमात.

पाहीला........ रणदीप हूडा.. अ‍ॅट पार एक्सलंस!!! खराखुरा सरबजीत उभा केलाय .. काटे आले अक्षरशः अंगावर!!!
यावर्षी सर्वश्रेष्ठ अभिनेता म्हणून अवॉर्ड मिळायलाच पाहीजे..
ऐश बद्दल काय म्हणावे... रसप +१०० .. तिने पंजाबी अ‍ॅक्सेंट आत्मसात करण्याचे कष्ट ही घेतले नाहीयेत.असो(च)!!

मूवी पाहिला.
रणदीप हूडा मस्तच आहे. जीव तोडून काम.
बच्चनांची सून - न बोलणे उत्तम. ती कधी मनात भरतच नाही. काय ते ओरडणं , काय ते नाटकी बोलणं?

तिला एक लहान मुलगी आहे. तिला सांभाळून घरची कामे करुन ती सिनेमात काम करते. त्याचे कौतुक व्हायला हवे. मुली ऐश बद्दल सतत रडत असतात.

Pages