मराठी मुलामुलींच्या प्रेमविवाहात येणारया अडचणी

Submitted by ऋन्मेऽऽष on 21 May, 2016 - 18:29

सुरुवात माझ्यापासून करतो

माझ्या प्रेमविवाहात 3 अडथळे / अडचणी आहेत.
माझ्या डोक्यावर अक्षता पडाव्यात असे वाटत असेल तर थोडीफार माहिती आणि जाणकारांचा सल्ला हवाय.

*1) जात*

प्रश्न - धर्मांतराप्रमाणे जात बदलता येते का?

मी ज्या जातीत जन्म घेतला आहे त्या जातीला शोभेसा असा कोणताही गुण माझ्या अंगात नाही. शोभेसा म्हणजे आमच्या जातीतील लोकांना आपल्या ज्या गुणांचा अभिमान आहे ते माझ्यात नाहीत.

तसेच आमच्या जातीतील दुर्गुण म्हणजे जे ईतर जातीतल्या लोकांना आमच्या जातीतील लोकांमध्ये दिसतात त्यापैकीही एकही नाही.

त्यामुळे मला आजवर माझ्या जातीचा ना अभिमान वाटत होता ना लाज वाटत होती.

पण आज अडचण मात्र वाटतेय.

कारण लवकरच ही जात माझ्या लग्नाच्या आड येणार आहे.

जर आमच्या दोघांपैकी कोणी एकाने दुसर्याची जात कागदोपत्री स्विकारली किंवा दोघांनी तिसरीच जात लावली तर ही अडचण सुटण्यास मदत होईल.

समाजमान्यतेनुसार वर असलेल्या जातीतून खाली असलेल्या जातीत जाणे सोपे पडेल की व्हायसे वर्सा सोपे पडेल?

कृपया धर्मांतराचा सल्ला देऊ नका. कारण मी नास्तिक असलो तरी गर्लफ्रेण्ड आस्तिक आहे आणि तिला देव बदलायचा नाहीये.

तळटीप - एखादा सल्ला मस्करीत दिला तर तसे नमूद करा अन्यथा तुमचा एक मजेचा सल्ला आमचा जीव घेऊ शकतो.

*2) पत्रिका*

पत्रिकेत काहीसे 34-36 गुण जुळवायचे असतात. आमचे दहाबाराच की काहीसे बरेचसे कमीच जुळताहेत. याऊपर कसलेसे विघ्नही आहे ज्यानुसार आमचे लग्न झाल्यावर पाच वर्षांच्या आत एकाचा अपघाती मृत्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे तेव्हा समजले जेव्हा आमचे लग्न करायचे नक्की झाल्यावर आम्ही बाहेरच्या बाहेर पत्रिका चेक केली. आमचा दोघांचा यावर विश्वास नसल्याने आम्ही मागे नाही हटणार, पण दोन्ही घरचे लोक पत्रिका बघण्यावर विश्वास ठेवणारे आहेत त्यामुळे ते आम्हाला पुढे जाऊ देणार नाहीत.

हा गुंता कसा सोडवावा. नकली पत्रिका बनवून घरच्यांना अंधारात ठेवावे की त्यांना खरे खरे सांगून आपल्या प्रेमाचे भविष्य अंधार्या खाईत लोटावे..

*3) घर (मुंबईत घर)*

सध्या जे मुंबईत घर आहे ते आईवडिलांचे आहे. लग्नानंतर लवकरच स्वत:चे घ्यायचा विचार आहे. किंबहुना ते बूक करून मगच लग्न करायचे आहे.
सध्याच्या आकडेमोडीनुसार दोघांचे पगार आणि बचत जोडून 55-60 लाखापर्यंत घराचे बजेट जातेय. एखाद्या छोट्या शहरात ही रक्कम मोठी वाटू शकली असती. पण मुंबईत वन बीएचके मिळायचे वांधे झाले आहेत. आणि एकीकडे मराठी माणसांनो मुंबईबाहेर पडू नकाचे नारे लावले जात आहेत.
खरे तर मलाही मुंबई सोडायची नाहीयेच. पण आता पन्नास साठ लाख खर्च करून काय मुंबईच्या वन रूम किचन मध्ये लोअर मिडलक्लास बनून राहायचे का? आणि अश्या पोराला आपली पोरगी द्यायला कोणता बाप तयार होईल? माझ्या गर्लफ्रेंडचे वडील तयार होतील का हा प्रश्नच आहे.

____________________________________

असो....

तर या माझ्या प्रेमविवाहात असलेल्या तीन अडचणी आहेत. कमी अधिक प्रमाणात या तीन किंवा ईतर अडचणी (आपापल्या परीने भर टाका) मराठी मुलांच्या प्रेमविवाहात असतात. त्या सर्वांची सांगोपांग चर्चा करायला हा धागा. इथे तुम्ही एका मराठी मुलाचे किंवा मुलीचे पालक म्हणूनही चर्चेत भाग घेऊ शकता. चर्चेचा फायदा सर्वांनाच.

आपला नम्र,
नवतरुण ऋन्मेष

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रत्येक शस्त्रासाठी एक एक ढाल बनवून ठेवावी लागते.
आई वडील आहेत ते आपले. 'बघा जमत असेल तर नाही तर सोडून द्या मी चाललो' असं चालत नाही.
>>>>

अतरंगी प्लस सेव्हन एटी सिक्स Happy

सायो, हेच !

प्रेमविवाहात पण पत्रिका वगैरे पाहतात हे वाचून आश्चर्य वाटले..
>>>>>>
सायो आणि जाई,
हे मी आधीही काही जणांच्या तोंडून ऐकले आहे.
पण प्रेमविवाहात पत्रिकेचे नियम बदलतात किंवा ती निरुपयोगी होते हे ऐकून मला आश्चर्य वाटते.
म्हणजे पत्रिका वगैरे खरे असो वा थोतांड, जे काही आहे ते प्रेमविवाह आहे की नाही यावर कसे अवलंबून आहे.
म्हणजे माझ्या आणि माझ्या गर्लफ्रेंडच्या पत्रिकेत मृत्युयोग आहे तो आम्ही एकमेकांवर प्रेम करू लागताच गायब कसा होणार?

तात्पर्य - प्रेमविवाह शांततेत सगळ्यांनी मान्य करून आनंदाने पार पडल्याची उदाहरणे कमीच असणार.
>>>>>>>

हो. घरचे पटकन होकार देतील असे होत नाही आणि मधल्या वेळेत त्यांच्या डोक्यात सतरा गोष्टी कालवणारे जवळचे नातेवाईकही असतात. जेवढे ठरवून लग्न करताना बघत नसतील तेवढे मग आपल्या मुलाने/मुलीने निवडलेल्या जोडीदारात बघितले जाते.

आपल्या मुलांना स्वताच्या आयुष्याचे लग्नासारखे मोठे निर्णय घ्यायची अक्कल नाही असे आपल्याकडे बरेच पालकांना वाटणे ही देखील एक अडचण म्हणू शकतो. यामागे त्यांचा हेतू मुलांची काळजी असतो हे मान्य करूनही मग होकार देण्यास बरेच आढेवेढे घेतले जातात.

मराठी मुलांच्या लग्नात जात, धर्म यांबरोबर प्रांताचा पण विचार करतात. एकाच जातीतले पण कोकणातले, देशावरचे विदर्भातले असे वेगवेगळ्या प्रांतातले असतील तरीही लग्न ठरवताना कठीण जाते.
>>>>>>>>>>>

राहुल१२३... मग तर लागलेच माझे .. हि सुद्धा अडचण येणार हा विचारच नाही केला. मी कोकणकन्या आहे तर ती सातार्याचा कंदी पेढा.. नंतर हेडरमध्ये संपादन करून घेतो .. क्रमांक 4 - प्रांत Sad

..

बादवे,मराठी मुलामुलींच्या प्रेमविवाहात येणारया अडचणी, हे काही कळले नाही.बाकीच्या प्रांतातील मुलामुलींच्या प्रेमविवाहात अडचणी येत नाहीत का?
>>>>

विषय मायबोली मराठीपुरता मर्यादीत राहावा एवढाच हेतू होता. ईतरांचे प्रॉब्लेम इथे चर्चून काय फायदा? Happy

कदाचित तुमचे दोन्हीकडचे पालक लवकर परिस्थिती स्वीकारून फार आढेवेढे न घेता परमिशन देतीलही, आपल्या मुलांनी स्वतः निवडलेल्या जोडीदाराबरोबर आनंदाने लग्न लावून दिलेले खूपजण बघितलेत त्यामुळे असंही होऊ शकतं. हे असं सकारात्मक मी जास्त बघितल्याने असेल कदाचित (माझ्या नातेवाईकांत जातच काय वेगळ्या धर्माचेपण आहेत त्या त्या धर्मात राहून सुखात आहेत, पत्रिका वगैरे कोणीही बघितल्या नाहीत, आजूबाजूला पण बघितली आहेत अशी लग्नं) माझा दृष्टीकोन positive. अर्थात मला माहितेय फक्त मी बघते तेच समाजात सगळीकडे नाही घडत पण घडावं असं वाटतं. तुमच्या बाबतीत सर्व सकारात्मक होऊदे.

मनस्मी यांनी खूप चांगलं सांगितलं आहे. साती यांनी पण त्यांचा अनुभव छान लिहिलाय.

अन्जू,
मी देखील आमच्या ओवरऑल घराण्यात गेले १०-१२ वर्षात बरेच आंतरजातीय प्रेमविवाह पाहिले आहेत. तसेच आंतरराज्यीय (गुजराती, साऊथ ईंडियन), आंतरधर्मीय (ख्रिश्चन, मुस्लिम) हे देखील पाहिले आहे.

आंतरजातीय विवाहात स्विकारले जाण्याचे प्रमाण जातीनिहाय वेगवेगळे होते. स्विकारले सर्वांना गेले, पण राडा वा कुजबूज होण्याचे प्रमाण कमीअधिक.

आंतरराज्यीय विवाहात पैश्याने श्रीमंत स्थळ सहज सर्वच नातेवाईकांकडून स्विकारले गेले पण दुसर्याबाबत तसे झाले नाही.

आंतरधर्मीय विवाहापैकी एक मुलांच्या हट्टापुढे पर्याय नाही या भावनेतून स्विकारले गेले तर एक जराही स्विकारले न जाता संबंध तोडले गेले. आता ते संबंध तोडले गेलेले कोणत्या धर्माचे असेल हे ओळखायला कठीण नाही.

अर्थात काही वर्षांनी काही नातेवाईकांनी हळूहळू संबंध जोडले तर काहीं मरेपर्यंत जोडणार नाही मोडमध्येच आहेत.
यापैकी माझे आईवडील संबंध जोडणार्यांमध्ये असल्याने ते याबाबतीत फार कट्टर नाही म्हणू शकतो.
पण जेव्हा स्वताच्या मुलाची पाळी येईल तेव्हा ते कसे रिएक्ट करतील आणि त्यांनी परवानगी दिली तरी त्यांना कोणाकोणाला काय स्पष्टीकरणे आणि उत्तरे द्यावी लागतील याचीही काळजी वाटत आहेच.

म्हणजे माझ्या आणि माझ्या गर्लफ्रेंडच्या पत्रिकेत मृत्युयोग आहे तो आम्ही एकमेकांवर प्रेम करू लागताच गायब कसा होणार?>>>> ऋन्मेऽऽष , तुझ्या वरच्या पोस्टीतले हे वाक्य वाचले. त्यावरुन असं वाटतंय की सध्या जात, धर्म, घरच्यांचा विरोध इ. कारणांपेक्षा तुला पत्रिकेतला मृत्युयोग हेच कारण निर्णय घ्यायला आड येतंय. साहजिक आहे. पत्रिका जुळणे - जुळवणे इ. गोष्टींवर विश्वास नसला तरी पत्रिकेवरुनच्या अशा भविष्यावर विश्वास ठेवायचा नाही म्हणलं तरी ही गोष्ट मनातून झटकूनही टाकता येत नाही. तेव्हा प्राप्त परिस्थितीत काही मार्ग सुचवते.

-- ज्यांनी हे भविष्य सांगितलं त्यांना किंवा त्यातल्या (सो कॉल्ड ) जाणकारांना डिटेल विचारुन घे.केवळ लग्नाच्या बंधनामुळेच, म्हणजेच कधीही लग्न केलं तरी तिथून पुढे ५ वर्ष हा योग आहे का? तसं असेल तर चक्कं live in मधे राहा ५ वर्षं. तेव्हा जात, धर्म, घरच्यांचा विरोध, लोक काय म्हणतील याचा फारसा विचार नको. जागा भाड्याने घेऊन राहा. वेगळं राहून चांगले संबंध टिकवता येतात.

माझा भविष्य, पत्रिका अस्ल्या गोष्टींवर विश्वास नाही. त्यामुळे मी त्या वाटेला जातही नाही.

तुझा यावर विश्वास आहे /नाही माहित नाही. पण तू त्या वाटेला गेला आहेस. त्यामुळे तुला त्यावर उपाय म्हणून थोडा आडमार्ग घ्यावा लागेल. या आडमार्गावर तुमचं एकमेकांवरचं प्रेमआणि विश्वास आणि घरच्यांबद्दलचा आदर तुम्हाला तारुन नेइल.

तुला आणि तुझ्या गफ्रेंला खूप खूप शुभेच्छा!

ऋन्मेषा , वर पगाराच्या हिशोब्सात बायकोचा पगार जमेला धरला आहेस.

जर तुमचे मूल संभाळायला तुमचे पालक मुंबैतच उपलब्ध असतील तरच तिचा पगार हिशोबात धरु शकशील. अन्यथा नाही.

आईवडीलांच्या संमतीने लग्न केल्यास संसार सुखाचा होइल असे मला वाटते. >>> सहमत, बायकोलाही विश्वासात घ्यावे - एक उपसूचना.

आईवडीलांच्या संमतीने लग्न केल्यास संसार सुखाचा होइल असे मला वाटते. >>> सहमत, बायकोलाही विश्वासात घ्यावे - एक उपसूचना.<<<<<कोणाची बायको?

शुगोल,
त्या वाक्याचा अर्थ काढण्यात गल्लत होतेय. माझा देव, पत्रिका, ज्योतिष कश्यावरही विश्वास नाही.

आमच्या घरचे बघणार आणि तेव्हा त्यात काय निघणार याची आधीच कल्पना यावी म्हणून आम्ही बघितली.

जर विश्वास असता तर मृत्युयोग कसा टाळावा यावर सल्ला मागितला असता. पण आमचा विश्वास नाही म्हणून तर नकली पत्रिका बनवायचा विचार करत होतो. लग्न तर आम्हाला करायचेच आहे, पण आता विश्वास असलेल्या आमच्या घरच्यांना उगाच ती पत्रिका बघून टेंशन येणार हे आम्हाला नकोय.

वर फक्त मला एवढीच शंका आहे की प्रेमविवाहात पत्रिका का बघू नये? तेव्हा ती का निष्क्रिय वा निरुपयोगी होते? यामागे काय लॉजिक आहे? प्रेमात खरेच एवढी ताकद असते की ग्रह तार्यांची दिशा बदलावी Happy

बाकी लग्नानंतरचा योग टळावा म्हणून लिव ईन मध्ये राहायचा पर्याय अजून कन्फ्यूज करणारा..
लग्न म्हणजे नक्की काय मग.. दोन मनांचे आणि शरीरांचे मीलन की गळ्यात मंगळसूत्र बांधायचा विधी?

मुग्धा, हो दोघांचे पगार हिशोबात घेतले आहेत. तुम्ही म्हणता ती परिस्थिती घरून हाकलले तरच येऊ शकते. पण मग त्या परीस्थितीत मोठे घर वा मुंबईत राहायचा हट्ट सोडूच.
तसेही तुर्तास घर हा तितका मोठा प्रॉब्लेम नाही. बस्स अशी वेळ आली की आम्हाला लागलीच घराची सोय करावी लागली तर काय ही चर्चा आमच्यात होत असते म्हणून हा मुद्दा धाग्यात टाकला. बरेच प्रेमवीरांना हा विचार करावा लागत असेलच.

प्रेमविवाहात पत्रिकेचे नियम बदलतात असे कोणी सांगितले तुम्हाला ? असे काही बदलत नाहीत फक्त निर्णय बदलणार नसेल तर जमते का नाही जमत त्याने काही फरक पडत नाही म्हणून पत्रिका बघू नये एवढेच .

प्रेमविवाह शांततेत सगळ्यांनी मान्य करून आनंदाने पार पडल्याची उदाहरणे कमीच असणार. <<<
मी नक्की कुठल्या जगात राहते? मला तर नाहीच झाला विरोध पण अगदी मोजकी उदाहरणे वगळता मित्रमैत्रिणींच्यापैकी कुणाच्याही प्रेमविवाहामधे घरून विरोध झाला नाही. ज्यांच्या घरी सुरूवातीला ज्वलंत विरोध होता अश्यांच्या कहाण्याही अखेर आईबापांनी परवानगी दिली आणि लग्न करून दिले या मार्गाने गेल्या आहेत.

२ च उदाहरणे आहेत आईबापांनी विरोध केल्याने मुलगी पळून गेल्याची. खरंतर एकच. ती आळंदी मॅरेजवाली. लग्न झाल्यावर १०-१२ दिवसात जोरदार रिसेप्शन केले होते त्यात दोन्हीकडचे आईवडील एकदम उत्साहात सामिल.

दुसर्‍या उदाहरणात आईबाप फक्त लग्नात सामिल झाले नाहीत. मैत्रिणीच्या घरी पहाटे जाऊन तिचा ब्रायडल जामानिमा करून देऊन तिला वधूवेषात, तिच्या बॅगेसकट, तिच्या आईवडिलांच्या समोरूनच माझ्या स्कूटरीवरून लग्नाच्या हॉलमधे घेऊन गेले होते. लग्न रजिस्टरच होते. तिचे वडील सह्या करायला आले आणि निघून गेले. नंतर वर्ष दोनवर्षात तिचे आईकडे जाणेयेणे सुरू झाले परत.

ही सगळी उदाहरणे १७-१८ वर्षांंपेक्षा जास्त आधीची आहेत. बहुतेकांची मुलेबाळेही आता १२ वी होऊन पुढे गेलेली आहेत.

तुम्ही दोघांनी एकमेकांशी लग्न केले तर मृत्युयोग आणि कोणा दुसर्याशी केले तर काही प्रोब्लेम नाही असे सांगितले आहे का ? हे पण अजबच आहे.

हैद्राबादला या.
सगळी व्यवस्था करु.
हां, टिनाच्या शेडमध्ये नव्हे अर्थात.
२ बिएचके, ते ही १२०० sft, दोन बाल्कन्या.
वरुन १५ लाख वाचतील तुमचे.
तेलुगु शिकण्याची सक्ती नाही.

{{{ प्रेमविवाह शांततेत सगळ्यांनी मान्य करून आनंदाने पार पडल्याची उदाहरणे कमीच असणार. <<<
मी नक्की कुठल्या जगात राहते? }}}

सैराट कुठल्या जगातला चित्रपट आहे?

प्रेम हे डोळसपणेच करायला हवे. आवडली मुलगी वा मुलगी आणि मग प्रेमात पडलो आणि त्यापुढे काही वर्षानी जेंव्हा लग्नाचा विषय निघाला तर एकानी काही कारण सांगितले जात पात ई. ई तर ती एक फार मोठी फसवणूक झाली. प्रेमात लग्नासारखा कायदा जरी मधे नसला तरी आपापले कमिटमेन्ट तरी असायला हवे. प्रेमात खूपदा नकार देणारी मुलेच जास्त असताना.

असे काही बदलत नाहीत फक्त निर्णय बदलणार नसेल तर जमते का नाही जमत त्याने काही फरक पडत नाही म्हणून पत्रिका बघू नये एवढेच .
>>>>>>>>>>
अन्विता, पण जर पत्रिका खरी असेल, थोताण्ड नसेल, त्यातील मृत्युयोगही खरा मानला तर मग प्रेमवीरांनी मागे न हटता किंवा त्यावर काही पूजाअर्चा विधी उपाययोजना न करता खुशाल मरावे असे म्हणायचे आहे का?

आणि हो. मंगळ असेल एकाला तर त्याचे काय करायचे? आमच्यात नाही कोणाला, पण अशी उदाहरणे पाहिली आहेत की मंगळावर काही उपायच नाही म्हणून प्रखर विरोध झालाय..

प्रेमात खूपदा नकार देणारी मुलेच जास्त असतात
>>>>>
बी हर्ट केले तुमच्या या वाक्याने Happy
बहुतेक मुलांचा हेतू टाईमपासच असतो, ते आधीपासून या बाबत क्लीअर असतात, तिथे मुळात प्रेमच नसते.
पण जिथे प्रेम असते तिथे ऐन मोक्याला कच खाणारे मुलेच जास्त किंवा मुलीच जास्त असे नाही बोलू शकत.

मी नक्की कुठल्या जगात राहते
>>>>>
नीधप,
पोल काढला तर प्रेमविवाहाला विरोध होणार्या जगात राहणारे जास्त जण भेटतील. हे जग फार मोठे आहे.

मंगळ आणि पत्रिका या बाबतीत शॉर्टकट आहेत ना?.

बच्चन साहेबांच्या सुनेला पण मंगळ होता ना? म्हणून तर तिचे आधी प्राण्यांशी, झाडाशी वगैरे लग्न लावले. आणि मग बच्चनपुत्र लग्नास उभे राहिले.

ज्योतिषी तुम्हाला थोडे खर्चिक मार्ग सांगून मंगळाची शांती कशी करायची ते सांगतात. चिंता नसावी.

आंतरजातीय प्रेमविवाहा मध्ये भारतात एक ग्रे स्केल बघायला मिळते.

त्याचे एक टोक मुलामुलींना फक्त प्रेम केल्यामुळे मारून टाकणे आणि दुसरे सो कॉल्ड हुच्चवर्णीय कुटुंबांनी जात पात न पाहता मुलामुलींची योग्यता पाहून ऍरेंज मॅरेज करणे.

सगळी उदाहरणे ऐकली आहेत.

कधीकधी दोघांना एकदम मारुन टाकणे हे नंतरचा वर्षानुवर्षांचा असहकार, उपेक्षा, जावयाला/सुनेला घरातलं न समजणं, जातीवरुन हिणवणं असा त्यांचा छुपा छळ करण्यापेक्षा सुसह्य असू शकते.(वाक्य काव्यमय आहे पण कल्पना करुन पहा.)

Pages