मनास नाही सवड क्षणाची

Submitted by निशिकांत on 16 May, 2016 - 00:42

घरी संपदा पाणी भरते
उशास आहे चवड सुखांची
जरी लोळतो सुबत्तेत मी
मनास नाही सवड क्षणाची

झगमगणार्‍या सदनिकांतुनी
नांदत असते स्मशानशांती
महाग झुंबर घरोघरी पण
देवा पुढती दिवा न ज्योती
चार वृक्ष अन् लॉन जराशी
प्रचंड हिरवळ सुसंस्कृतांची
जरी लोळतो सुबत्तेत मी
मनास नाही सवड क्षणाची

संस्कृतीत इथल्या ना बसते
कधी बोलणे शेजार्‍यांशी
दार घराचे बंद आणखी
बोलतात पडदे खिडक्यांशी
सदैव गुदमर मनात माझ्या
खरी वेदना आडपडद्यांची
जरी लोळतो सुबत्तेत मी
मनास नाही सवड क्षणाची

कसा पिंजरा सोनेरी हा!
कैद वाटते लोभसवाणी
हनीसींगचा घरात वावर
कुठे हरवली अभंगवाणी?
ढासळत्या मुल्यास बघोनी
बंदी येथे रडावयाची
जरी लोळतो सुबत्तेत मी
मनास नाही सवड क्षणाची

कधी वाटते कशास आलो?
धडपड करुनी या वळणावर
मनात येते, निरव शांतता
मिळेल निजल्यावर सरणावर
ऐहिक पुढती अन् मी मागे
ससेहोलपट किती जिवाची?
जरी लोळतो सुबत्तेत मी
मनास नाही सवड क्षणाची

घरात छोट्या मोठे मन हे
नांदत असते आनंदाने
तत्व येथले, प्रसंग येता
धावत यावे शेजार्‍याने
सारे माझे, मी सार्‍यांचा
चाळ आठवे बालपणाची
जरी लोळतो सुबत्तेत मी
मनास नाही सवड क्षणाची

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail---nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users