किती लांबचे दिसते ह्यावर बरेच काही ठरते

Submitted by बेफ़िकीर on 14 May, 2016 - 11:09

घामट सदरा, अंग सापळा, फरश्या हातांमध्ये
उन्हात चढतो बारा मजले, घरघर श्वासांमध्ये
मातीमध्ये तनमन माखे, भूक कळे ना तृष्णा
मिस्त्री खेकसण्याची कायम भीती डोळ्यांमध्ये

सारी दुनिया खेकसते, जग टिचकीवर नाचवते
तेच खायला मिळते जे श्रीमंतांना टाकवते
भीकही न मागू देते हे भिकारडेपण त्याला
परिस्थिती कपडे देते पण व्यक्तित्त्वे नागवते

झोपडीत सांजेला स्वागत होवो इतकी आशा
तुला तेवढेसुद्धा नसते मान्य कधी आकाशा
घरवाली लायकी काढते थिल्लर औकातीची
रात्र काढते उंबर्‍यावरी मग दारूण निराशा

प्रत्येकाला नभात दिसती तेच तेच ते तारे
मजूर, मिस्त्री की अभियंता, जन्म ठरवतो सारे
हातामध्ये नाही त्या गोष्टीवर नशीब ठरते
हाती उरते मधूर ह्सणे किंवा अश्रू खारे

अजूनही ह्या पिढीस शिकवा जमेल तितके यारो
पडो न त्यांना कष्ट, तुम्हाला पडले जितके यारो
किती लांबचे दिसते ह्यावर बरेच काही ठरते
'फक्त स्वतःचा विचार' सोडा, कराच इतके यारो

============

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान...

राजकारणा च्या वाममार्गावर भटकलेली लेखणी पुन्हा काव्य गझलावर आली हे पाहोन आमीर खुस्रोचा आत्मा थडग्यामध्ये सुखात हसला असेल.

Two persons were looking through the window.
One was looking the bars .
Other was looking the stars.

शेवटच्या चार ओळी वगळता एक नंबर काव्य आहे.
तुमची लेखणी नेहमीच दर्जेदार रचना घेऊन येते. ही रचनाही त्यास अपवाद नाहीच. परंतु शेवटच्या ओळी रुचल्या नाहीत ब्वा.

पण क्या बात! वाह.