...की गझल होते!

Submitted by नानुभाऊ on 13 May, 2016 - 00:51

...की गझल होते!

जीवनाशी सूत जुळले की गझल होते
अंतरी या दुःख रुळले की गझल होते!

नेमका माझ्या घरा आधी तिचा रस्ता
पाय आपोआप वळले की गझल होते!

वेगळा मिसराच असते ओळ कुठलीही
जे नको ते शब्द गिळले की गझल होते!

धावणे तर शिकवले जातेच सर्वांना
थांबण्याचे तंत्र कळले की गझल होते!

हे सुखाचे धूत वस्त्रासारखे जीवन
वेदनांनी खूप मळले की गझल होते!

घाट देहाचा तिच्या, घसरी नजर माझी
देखणे अपघात टळले की गझल होते!

मी स्वतःवर शेर केले की गझल रूसते
मी मला पुरते वगळले की गझल होते!

- केतन पटवर्धन

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा सुरेख! अनेक शेरांमधील खयाल छान! अलामतीतील सूटही नियमाप्रमाणेच! माझ्या 'शब्द आले की गझल होते असे नाही' ह्या गझलेची आठवण झाली हे सांगायचा मोह आवरला नाही. अर्थात, दोन्ही गझलांचा अर्थाअर्थी संबंध नाहीच.

माझ्या 'शब्द आले की गझल होते असे नाही' ह्या गझलेची आठवण झाली हे सांगायचा मोह आवरला नाही. >>>
बेफी जी.. तेच आमच प्रेरणास्थान! Happy _/\_

साती, सुप्रिया जी आभार! Happy

अतिशय सुंदर गजल ......

मी स्वतःवर शेर केले की गझल रूसते
मी मला पुरते वगळले की गझल होते! >>>>>>>>> विशेष आवडले .... Happy

नेमका माझ्या घरा आधी तिचा रस्ता
पाय आपोआप वळले की गझल होत

घाट देहाचा तिच्या, घसरी नजर माझी
देखणे अपघात टळले की गझल होते!

मी स्वतःवर शेर केले की गझल रूसते
मी मला पुरते वगळले की गझल होते!
>>>
आहाहा! जियो मेरे दोस्त Happy
ही गझल ऐकायला आवडेल मला तुझ्या आवाजात Happy

मी स्वतःवर शेर केले की गझल रूसते
मी मला पुरते वगळले की गझल होते! ....... नानूभावू आपने तो कमाल कर दिखाया ..............

वा