काही राजीनामे

Submitted by बेफ़िकीर on 12 May, 2016 - 07:23

प्रकार १ -

ह्या पत्राद्वारे मी अत्यंत व्यथित अंतःकरणाने ह्या कामाचा राजीनामा देत आहे. व्यवस्थापनाने वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी मनापासून आभारी आहे. माझे साहेब श्री एक्स वाय झेड, तसेच मोठे साहेब, माझे सर्व सहकारी हे नेहमीच माझ्या पाठीशी उभे होते. ह्या पदावर असताना माझ्याहातून जी कामे यशस्वी झाली ती सर्व ह्या साहेब व सहकार्‍यांच्या खंबीर आधारामुळे शक्य झाली. जी काही अपयशे मिळाली असतील ती मात्र केवळ माझ्या अक्षम्य हलगर्जीमुळे मिळाली असावीत असे मी मानतो. येथून जाताना मन उदास झालेले आहे. एका कुटुंबाप्रमाणे सर्वजण होते. रोजचा डबा, गप्पा, मानापमान, ताणतणाव, बढत्या, पगारवाढी ह्या सर्व गोष्टी आयुष्याचा एक भाग होऊन बसलेल्या होत्या. कित्येकवेळा तर घरी जायचीही इच्छा व्हायची नाही. सुट्टीच्या दिवशी घर खायला उठत असे. ही नोकरी बदलावी लागणे हा केवळ ईश्वरी इच्छेचा एक असा भाग आहे ज्यात भावनेला स्थान नाही. ह्या विस्तीर्ण वृक्षावरील शेकडो पक्ष्यांमधील एक आज माझ्यारुपाने उडून चालला आहे दुसर्‍या कोणत्यातरी वृक्षावर आपले घरटे बांधायला. ह्या वृक्षाला फरक तर काहीच पडणार नाही पण त्या पक्ष्याचे हृदय मात्र मधोमध छेदले जाईल. आयुष्याच्या अंतापर्यंत ह्या आठवणी पाठपुरावा करतील. माझा सर्व मोठ्यांना नमस्कार व सर्व धाकट्यांना आशीर्वाद! कृपया शक्य तितक्या लवकर माझी रिफंडेबल रक्कम मला मिळावी अशी उदार व्यवस्थापनाच्या चरणी विनंती! शक्य झाल्यास मला लवकरात लवकर विसरावेत. साश्रूनयनांनी शेवटचा नमस्कार!!!!

प्रकार २ -

एरवी पक्ष्यांच्या किलबिलाटाने मंगल वाटणारी पहाट
आज उदासीच्या धुक्यात लपेटलेली होती
माझं चिमुकलं, धिटुकलं बाळ
चोखत होतं स्वतःच्या मुठी
आणि म्हणत होतं त्याच्या
अगम्य बोबड्या भाषेत
की आई, आज तू चाललीस ती शेवटचीच
दोन नितळ आसवांच्या धारा
झिरपल्या माझ्या लोचनांमधून
पतीराजांनी फिरवला हात
माझ्या केसांमधून
आणि म्हणाले
जा, जा आणि हा अवघड प्रसंग सोसून ये
सांग त्यांना प्राणेश्वरी
की नाही जगू शकत आहेस तू त्या नोकरीशिवाय
पण करणार काय
इथे टाळी वाजली
तर तिथे ऐकू येईल
इतक्या कमी अंतरावर मिळालीय तुला नवी नोकरी
त्यातच त्यांनी दिलाय तुला पावणे दोन टक्के राईझ
तीन मिनिटांत घरी पोचू शकशील तू ऑफीसमधून
जा, जा सांग त्यांना
की नाही शक्य हा प्रस्ताव डावलणं
आणि म्हणून हे माझ्या सहकार्‍यांनो
ही माझी शेवटचीच कविता
तुमच्यासोबत घालवलेल्या काव्यमय काळाच्या फायलीवर
विव्हल मनाने ही कवितारुपी दोरी बांधून
गूढ आशयाच्या दिवसांना करत आहे गुडबाय
माझा राजीनामा घ्यावा
असे सांगताना आक्रोशत आहे मन
उडत आहेत कारंजी शेकडो मूक किंकाळ्यांची
गळत आहेत नभातून टपाटप तारे
जाते मी

प्रकार ३ -

कदाचित व्यवस्थापन चकीतच होईल की नोकरीला लागल्याच्या केवळ तिसर्‍या दिवशी मी राजीनामा देत आहे. पण परिस्थितीच तशी आहे. खूप प्रयत्न करूनही मला येथे राहता येणार नाही ह्या निष्कर्षावर मी पोचलेलो आहे. माझ्या मनात कोणाबद्दलही काहीही वावगे, गैर असे नाही. ह्या तीन दिवसांत मी कोणाला दुखावले असल्यास मनापासून क्षमा मागतो. खरे तर मला नोकरीची गरज आहे. पण मला इतर ठिकाणांहून आलेल्या ऑफर्स जरा अधिक आकर्षक आहेत. त्यामुळे इच्छा नसूनही मी नोकरी सोडत आहे. मी उद्यापासून येणार नाही. तीन दिवसांचा पगार पुढच्या महिन्याच्या सात तारखेला कृपया माझ्या खात्यात जमा करावा अशी विनंती! बाकीच्यांनी मला दिलेल्या ऑफर्स दाखवल्या तर मी तीन दिवस तरी येथे का राहिलो असा प्रश्न तुम्हालाच पडेल ह्याची खात्री बाळगावी.

प्रकार ४ -

पप्पांनी गावाकडं बोलावल्यालं हाये! तवा हा राजीनामा घ्यावा आन मला मोक्ळा करावा. कंप्नीचं एक कागदाचं ठिकरंबी आपल्याजवळ न्हाई. तवा संशे धरू नये. मी बसायचो ती खुर्ची मोडल्याली हाये आधीपास्नंच! उगा ते वळतं करायला जाऊ नये. लई ब्येक्कार व्हईल. शिर्सागरला म्हनाव दम आस्ला तं खाली रस्त्यावं यून बोल. आन त्यो मेहता खुर्ची उबवतो त्याला श्ट्रेट केला जावा. पगार घ्याया पुन्ना येईल. गौरीला बाय सांगावा.

प्रकार ५ -

झालेला प्रकार अत्यंत मानहानीकारक व खेदजनक असून ह्यानंतर ह्या ठिकाणी राहण्याची तसूभरही इच्छा उरलेली नाही. एका सातभाई नामक नगण्य सिनियर ऑफीसरला डेप्युटी मॅनेजर बनवून व्यवस्थापनाने आपल्या अकलेची जी दिवाळखोरी सिद्ध केलेली आहे ती पाहून कीव येत आहे. असिस्टंट मॅनेजर ह्या पदावर सलग साडे चार वर्षे राहून मी डेप्युटी मॅनेजर पदाला गवसणी घातलेली होती. माझ्यानंतर ह्या कंपनीत आलेला, माझ्यापेक्षा एक पोस्ट खाली असलेला सातभाई केवळ हांजी हांजी करतो ह्या एकाच निकषावर त्याला माझ्या डोक्यावर आणून ठेवण्याचा जो घृणास्पद प्रकार झालेला आहे तो पाहून मी तडकाफडकी माझ्या अत्यंत जबाबदार अश्या पदाचा राजीनामा देत आहे. किंचितही लाजलज्जा उरलेली असली तर माझा पी एफ वगैरे ताबडतोब रिलीज करून ते सिद्ध केले जावे. प्रकाश एजन्सीसारखा डिस्ट्रिब्युटर मी एका रात्रीत उभा करू शकतो हे माहीत असतानाही व्यवस्थापनाला सातभाईची भुरळ पडावी हा विनोद नक्कीच ऐतिहासिक ठरेल. हा कुठला कोण सातभाई, येतो काय आणि दिड वर्षात डेप्युटी मॅनेजर होतो काय, सगळेच अफाट आहे. थोरले शेठजी असते तर कंट्रोल जाऊन त्यांनी हा निर्णय घेणार्‍यांना बसता लाथ उठता बुक्की दिली असती. पण ते दिवस आता राहिले नाहीत. आता सातभाईच्या हातात सूत्रे देऊन ज्या उज्ज्वल भविष्याकडे काही मूर्खांनी डोळे लावलेले आहेत त्यांना ते भविष्य उज्ज्वल तर नाहीच उलट अंधःकारमय असल्याचे निदर्शनास येईल तेव्हा माझा शोध सुरू होईल. पण तेव्हा मी सापडणार नाही. पश्चात्ताप हेच प्रायःश्चित्त ह्या उक्तीच्या व्याप्तीत न बसणारा गलथानपणा व्यवस्थापनाने केलेला असून लवकरच बिझिनेसमध्ये त्याचे पडसाद उमटतील. सातभाई नावाचे बुजगावणे कस्टमरच्या तालावर बीभत्स अंगविक्षेप करून नाचत नाचत आपल्याच ऑफीसमध्ये येईल तेव्हा आपला निर्णय कसा फडाडकन् आपल्याच श्रीमुखावर बसला हे बघून येथील सगळे शकुनी जमीनीवर येतील. निघतो.

प्रकार ६ -

आय रिझाईन. रिलीज रिफंड. अ‍ॅन्ड येस, गो टू हेल.

प्रकार ७ -

शंभर टक्के आऊटपुट देऊनही जी कंपनी एस टी ची बिले नसल्यामुळे टूर अ‍ॅडव्हान्सचे पैसे सॅलरीतून कापते त्या कंपनीत राहणे हा निव्वळ मूर्खपणा आहे हे कळायला मला अकरा वर्षे लागली ह्यासाठी मी दिलगीर आहे. कृपया हा राजीनामा स्वीकारून, एकदाच काय कट करायचे ते करून उरलेले पैसे माझ्या झोळीत टाकावेत व उपकृत करावेत. एस टी ची तिकिटे जपून ठेवण्यात माझे एक चतुर्थांश आयुष्य जाईल असे माझ्या वडिलांनाही कधी वाटलेले नव्हते. तरीही मी प्राणपणाने एस टी ची तिकिटे जपून ती टूर बिलावर स्टेपल करत असे. मात्र ज्या एच आर ने आजवर माझ्या प्रामाणिकपणाचे दाखले नवोदितांना दिले, त्या एच आर ने परवा माझ्या टूर बिलात एक अडीच रुपयाचे तिकिट कमी पडत आहे हे कारण देऊन बिल पास केले नाही हे बघून कोणाच्याही तळपायाची आग मस्तकास जाईल. एच आर मध्ये नवीन आलेल्या प्रज्ञा घोडके नावाच्या ऑफिसरने लेखी माफी मागीतली तरच हा राजीनामा मागे घेण्यात येईल. महाराष्ट्रातील एस टी ची तिकिटे हा एखादा अमूल्य ठेवा असल्याप्रमाणे एच आर च्या मागे असलेल्या कळकट्ट खोलीत गेल्या सोळा वर्षांपासून साठवलेल्या आणि वाळवी लागलेल्या फायली खणून काढल्या तर फक्त माझीच बिले अशी निघतील ज्यात पै पै चे तिकिट जोडलेले असेल. तेही वाळवीने खाल्लेले नसेल तर! कोणतातरी मॅनेजमेन्टचा कोर्स करून आणि नट्टापट्टा करून डायरेक्ट ऑफिसरपदावर विराजमान होणार्‍या ह्या आजकालच्या मुलींना निष्ठा आणि सिनियॉरिटीशी घेणेदेणे नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे. तेव्हा अपॉलॉजी आली तरच मी उद्यापासून येईन अन्यथा फर्गेट इट!

प्रकार ८ -

माझ्या मिस्टरांची बदली होत असल्यामुळे मला कामावर येता यायचे नाही. पुढेमागे दमण येथे कंपनीने काही कारणाने शाखा उघडली तर माझ्या नावाचा अवश्य विचार व्हावा. मुलांचीही शिक्षणे सुरू आहेत, त्यामुळे आग्रह केला जाऊ नये. आरती करत असलेले हेवेदावे हे ह्या राजीनाम्याचे खरे कारण नाही. माझ्या लेखी तिला काडीची किंमत नाही. व्हीपीची सेक्रेटरी म्हणून व्हीपीच्या थाटात वागण्याचे परिणाम ती लवकरच भोगेल.

प्रकार ९ -

मुंदडासाहेबांची बदली करण्यात यावी नाहीतर माझा राजीनामा स्वीकारावा. मी दोनच पर्याय समोर ठेवत आहे. हा असला बिनडोक माणूस डोक्यावर बसवून मी देवीचे भुत्ये नाचतात तसा सगळीकडे नाचू शकत नाही. मला अक्कल नावाचा एक प्रकार मिळालेला आहे व त्याचा मी वापरही करतो. हेसुद्धा ह्या मुंदडाला माहीत नसेल. एक्सेलवर फॉर्म्युले टाकता येत असताना फ तुकडीतल्या विद्यार्थ्यासारखा चेहरा करून लॅपटॉपसमोर कॅल्क्युलेटर वापरणार्‍या माणसाला सर म्हणणे आमच्या खानदानाच्या इभ्रतीस शोभत नाही. आम्ही राजे निंबाळकरांपैकी आहोत. काय ते लवकर सांगून आमचा वेळ वाचवावात. देवी काळूबाई आपणांस सद्बुद्धी देवो.

प्रकार १० -

सालाबादप्रमाणे मी हा राजीनामा देत आहे. मला मिळालेले इन्क्रिमेन्ट हे नेहमीप्रमाणेच अत्यल्प असून त्यात मी एक अ‍ॅडिशनल पालेभाजीही आणू शकत नाही. माझ्याकडून वाजवून काम करून घेताना किंवा मला थांबून काम करायला सांगताना ह्या इन्क्रिमेन्टची आठवण मॅनेजमेन्टला राहत नाही. हा राजीनामा अ‍ॅक्सेप्ट होणार नाही व अजून थोडे पैसे वाढवून मिळतील ह्या आशेत!

प्रकार ११ -

श्री स्वामी समर्थ
श्री गजानन महाराज की जय
श्रद्धा, संयम, सबूरी
विवेकसे सोचो, विवेकसे काम लो

नमस्कार! उघड उघड दिसत असलेल्या परिस्थितीमुळे मला राजीनामा देण्याचा आदेश स्वामींकडून आलेला असून मी त्यानुसार हा राजीनामा सुपूर्द करत आहे. पुढील कार्यवाहीस भगवंत समर्थ आहेच. तुमच्या कुलदैवताचे स्मरण करून ह्या राजीनाम्याचा स्वीकार करून त्वरीत माझे पैसे रिलीज करावेत. सर्व काही श्रींच्या इच्छेनुसार होत असते. तुम्ही व मी निमित्तमात्र आहोत. वावगे वागू नयेत. तो वरून पाहत आहे. एक दिवस त्याला जाब द्यावा लागणार आहे ह्याचे भान ठेवावेत. अध्यात्मिक आनंदाच्या प्राप्तीसाठी इतरांना मनःशांती देणे हा राजमार्ग ठरलेला आहे. आपण जन्ममृत्यूच्या फेर्‍यात अडकलेले किडे आहोत. मोक्ष हे आपले अंतिम उद्दिष्ट असायला हवे. तूर्त मला येथून मोक्ष देण्यात यावा. माझा प्रवास भिन्न आहे. कंपनीची टारगेट्स आणि माझी टारगेट्स ह्यांच्यात सुतराम संबंध उरलेला नाही. कंपनीला फक्त फायद्याशी घेणेदेणे उरलेले आहे. मला आत्मिक उन्नती साधायची आहे. काही जप असे असतात जे माध्यान्हप्रहरीच केले जातात. ते करताना मी सापडलो ह्या कारणावरून पांडे नावाच्या इसमाने मला चार शब्द सुनवावेत हा फार मोठा धक्का आहे. साधनेत व्यत्यय आणणार्‍यास शासन देणे हे काम आम्ही गोपालस्वामी महाराजांवर सोपवलेले आहे. ते काय ते पांडेचे बघून घेतील. ह्या फेर्‍यातून सुटका होण्यासाठी आपणा सर्वांना शुभेच्छा!

प्रकार १२ -

पुळचट, भ्याड आणि पळपुट्या असलेल्या व्हाईस प्रेसिडेंट दामल्या,

तुला तुझ्या घरी पाणी भरणारी माणसे हवी असतात. स्तुतीपाठकांच्या गराड्यात राहणे ही तुझी यशाची परमोच्च व्याख्या आहे. चमच्यांनी गच्च भरलेल्या तुझ्या दळभद्री केबीनमध्ये पाय टाकताना एक शिसारी येते. कस्टमरच्या तालावर स्वतः नाचताना आणि एम्प्लॉयीजना नाचवताना तुला आपण कोण आहोत ह्याचाही विसर पडतो. तुला व्हाईस प्रेसिडेंटपदी बसवणे ही कंपनीची घोडचूक आहे. तू तोंड उचकटलेस की टाळ्या वाजवण्यासाठी हात हलवणारे लागतात तुला पुढे मागे! तुझी एक स्वतंत्र टोळी निर्माण झालेली आहे. संपूर्ण कंपनीत बदनाम झालेल्या दामल्या, हिम्मत असली तर हा राजीनामा स्वीकारून हे डिपार्टमेन्ट चालवून दाखव. तुझ्या तुपकट थोबाडावर हा कागद फेकतानाही मला स्वतःचीच किळस वाटत आहे. डिपार्टमेन्टचा मासळी बाजार करणार्‍या कोळ्या, एकाच कपॅसिटीचे दोन ड्रायर बसवून तू प्लँट लोड फॅक्टरचा जो बट्ट्याबोळ केलेला आहेस त्याचा जाब तूच वरच्या साहेबांना दे! बायकीपणे माझ्या तक्रारी करून मला स्टोअर किंवा क्वॉलिटीला पाठवण्याच्या ज्या टिनपाट गेमा तू खेळत आहेस त्या आमच्या गल्लीत आम्ही बालपणी खेळायचो. हा राजीनामा स्वीकार आणि पैसे फेक!

==================

-'बेफिकीर'!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशक्य आवडले.

तुमच्या नावासकट पुधे ढकलले तर चालेल का? खुप गरज आहे.....

किंवा तुम्हीच फेबु ला टाका, मी शेअर करेन.

बर्‍याच दिवसांनी तुमचे लेखन दिसले

हो भारीच जमले आहे. Happy असे लिहाय्ला झाले नाही हे मात्र नक्की, राजीनामे देताना. Happy
"थू" पण भारीच. Happy

हा माझा राजीनामा आहे, आजपासूनचाच.
पत्नीच्या शेवटच्या आजारांत घेतलेल्या रु.२०,०००/ च्या कर्जाची परतफेडीची बाकी रक्कम मला देय असलेल्या रकमेतून वजा करून उरलेले पैसे मला यथावकाश द्यावे. या कर्जाच्या परतफेडीसाठी मला परवडतील असे हप्ते ठरवून द्यावे, ह्या माझ्या वारंवार केलेल्या कळकळीच्या विनंतिचा आतां विचार करूं नये.
धन्यवाद,
आपला,
*******.
[ ता.क. - आपली कंपनी ज्या सप्लायर कंपनीचे करोडो रुपये देणे लागते, त्याच कंपनीत 'रिकव्हरी ऑफिसर' म्हणून माझी नेमणूक झाली आहे; पगाराबरोबर वसूल केलेल्या रकमेतही मला टक्केवारी मिळणार आहे. ]

मीं जे राजीनामे लिहीले होते त्याच्यापुढे हे राजीनामे एकदमच फुसके !
पण मी ते द्यायच्या आधीं मलाच ' डीसमिसल ऑर्डर' द्यायचे ना साले !!!
honeymoon.JPG