आस

Submitted by विशाल कुलकर्णी on 10 May, 2016 - 13:55

बांधावरचा पिंपळ सांगे
सोनसावळी दुःखे ओली
फांदी-फांदी जीर्ण पर्णिका
बांडगुळांची गर्दी सगळी

अस्ताईचे सूर अनोळखी
शुष्क पान्हा हळवी देवकी
कशी रुचावी जगण्यालाही
अस्थाईविन बंदिश पोरकी

सुकली पाने सुकली माती
खिन्न विरहिणी होय पालवी
पाणी सुकले बुंध्यापाशी
त्राही त्राही अंकुर डोकवी

कधी अकस्मित ओल मुळांना
कधी मेघांचे हळवे चुंबन
लागे जलदांना ओढ भूमीची
कधी अचानक अधीरे मिलन

नश्वर स्वप्ने, नश्वर दुःखे
नश्वरतेचा शाप सुखाला
शाश्वत ऐसे इथे न काही
श्वासांचा का ध्यास जीवाला ?

सोनसावळा पिंपळ वेडा
शुष्क डहाळ्या तरीही जपतो
आस लाजऱ्या मृगथेंबाची
मनी बाळगून जगत राहतो

विशाल १०-०५-२०१६

Group content visibility: 
Public - accessible to all site users