साहित्यचोर कसा पकडायचा?

Submitted by विद्या भुतकर on 6 May, 2016 - 16:45

चारेक महिन्यापूर्वी मला माझीच एक कविता कुणीतरी फोरवर्ड केली. तीही २००७ मध्ये लिहिलेली, 'एक पत्नीने आपल्या पतीजवळ मांडलेली भावना प्रधान कविता ………… ' असे लिहून. मी ती लग्नाच्या वाढदिवसाला लिहिली होती. असो. अजूनही त्या पोस्टवर २८००० पेक्षा जास्त लाईक्स, ४००० कमेंट्स आणि हजारो शेअर्स होत आहेत. ज्यांनी ती फेसबुक वर पोस्ट केली त्यांनाही ती अशीच कुणीतरी पाठवलेली Whats App वरून. लोकांचे असे प्रतिसाद पाहून, दोन वर्षं बंद असलेलं माझं लिखाण पुन्हा सुरु झालं.

पहिल्या पंधरा दिवसात मी अजून एक कविता लिहिली, 'संसार म्हणजे चालायचंच' ! ती माझ्या ब्लॉग, फेसबुक पेज आणि माझ्या Whats App वरील मित्र मैत्रीणीना पाठवली माझ्या नावासकट. पण तरीही तीन दिवसांच्या आत तीच कविता निनावी फिरायला सुरुवात झाली होती. मध्ये फेसबुक वर ती कविता 'माझे पान' नावाच्या पेज वर निनावी दिसली ज्याला ८००० पेक्षा जास्त लाईक्स होते. त्यानंतर मी माझ्या कविता फेसबुक वर टाकताना एका इमेज वर पब्लिश करू लागले. पण माझ्या ब्लॉग वर अजूनही टेक्स्ट च होते.

हे सगळं सांगायचं कारण म्हणजे माझी नवीन कविता 'मिडलक्लास' पुन्हा एकदा सगळीकडे निनावी फिरताना दिसत आहे. ती मी मागच्या आठवड्यात लिहिली आणि चार दिवसात ती Whats App वर आली. आता कुणी म्हणेल की हीला स्वत:चे कौतुक सांगायचे असेल. पण पुढे मला बरेच मुद्दे बोलायचे आहेत आणि कदाचित नक्की काय केले की हा त्रास सुटेल हा प्रश्न विचारायचा आहे. कवितेचे टेक्स्ट फक्त आता माझ्या ब्लॉग आणि मायबोली वरच टाकले होते. मायबोली पेक्षा मला माझा ब्लोग फीड जिथे जातो 'ब्लोग कट्टा' सारख्या साईट वरून अशा कुणाच्या तरी हातात जात आहे जिथे लोक जनरिक कविता दिसल्या की कॉपी करून पुढे पाठवतात असे मला वाटत आहे.

बरं, चोरी करता ठीक, पण पुढे जाऊन ते माझं नाव काढून टाकूनच पुढे पाठवत आहेत. खरं सांगू का, मला माझ्या कविता अजिबात भारी वाटत नाहीत. उलट चोरी करणाऱ्या लोकांवर किती वाईट दिवस आले आहेत याचे मला वाईट वाटते. असो, माझे काही मुद्दे जे गेल्या चार महिन्यापासून डोक्यात आहेत, ते इथे मांडतेय:

१. तुम्हाला अशा रोज अनेक कविता येत असतील, त्या खाली कुणाचे नाव आहे हे कधी कुणी पाहिलंय? बहुतेक वेळा ते नसतंच. या लोकांना नाव काढून टाकण्यात काय मिळत असेल? मला स्वत:ला अशा अनेक कविता आल्या आहेत ज्यात कवीचे नाव नाहीये. म्हणजे मी सोडून अनेक लोकांच्या साहित्याची चोरी होत आहे. मध्ये 'रसप' ची 'हि कविता तर माझीच होती' कविता वाचली आणि त्याचं दु:खं जाणवलं.

२. मला शंका आहे की इण्टरनेट प्रोव्हायडर लोकांना कंटेंट तयार करण्यासाठी पैसे देतात का ? कधी विचार केलाय, क्रिकेटची match संपायच्या आत एक जोक भराभर सगळीकडे पोचलेला असतो. कशामुळे? कुणीतरी हे करत असणार ना? असे कंटेंट पाठवून कुणाचाही फायदा होत नाही फक्त डेटा खर्च होतो.

३. हे लोक सहसा टेक्स्ट च पाठवतात. मी अनेक वेळा माझ्या कवितांची इमेज पाठवली आहे पण ती पुढे जात नाही, कदाचित लोकांना जास्त देत खर्च करायचा नसतो त्यामुळे बहुतांशी फक्त टेक्स्ट पुढे पाठवतात. त्यामुळे जोक वगैरेही त्याच स्वरुपात असतात. आणि हो ते तुमच्या चुका अजिबात दुरुस्त करत नाहीत. फक्त नाव काढून आहे तसे पुढे पाठवतात.

४. सामान्य लोकांना चांगले वाटले तर ते पुढे पाठवतात. त्यामुळे त्यांचा यात दोष मला वाटत नाही. उलट मला अनेक लोकांनी मेसेज करून सांगितले की अगं तुझी कविता मला आली होती फोरवर्ड, मी तुझे नाव टाकून पुढे पाठवली. (त्या सर्वांचे आभार. Happy )

५. बरं हे फक्त Whats App वर राहत नाही. 'माझे पान', 'एक तर लाईक बनतोच' अशा अनेक फेसबुक पेजला कंटेंट हवा असतो. त्या पेजेस वर स्वत:चे असे काहीही नसते. नुसते लोकांचे साहित्य, चित्र तिथे चिकटवलेले असते. हळूहळू ते पसरले की यांची प्रसिद्धी होतेच. मी मध्ये 'माझे पान' वर पहात होते, अनेक दागिन्यांचे फोटो आहेत तिथे. बायका रोज लाईक करतात. कुणी किंमत विचारते. पण उत्तर मिळत नाही. कारण ते फक्त फोटो आहेत, बरेचदा ढापलेले.

६. या फेसबुक पेजना अजून एक असते, त्यांना दुसऱ्याच्या गोष्टी शेअर करायच्या नसतात. माझी एक कविता मध्ये एका पेज वर मला दिसली. मी म्हणाले तुम्ही शेअर करा ना मूळ सोर्स कडून, तर त्यावर नकार आला. का तर आम्ही इमेज शेअर करत नाही. म्हणजे टेक्स्ट अजून कुणी कॉपी करून अजून पुढे पाठवायला तयार.

७. या सगळ्यात ज्यांचे साहित्य आहे त्यांना अजिबात किंमत नसते. मी अनेक लेखही पाहिले आहेत. त्यांना कुणीही विचारत नाही की अरे याचा लेखक कोण आहे.

एकूण काय, की तुम्ही एकतर लिहू नये, लिहिले तर कुठेही पोस्ट करू नये. अन केलेत तर त्याचे श्रेय तुम्हाला मिळेल अशी अजिबात अपेक्षा करू नये. शिवाय यात तुम्ही स्वत:ला खूप भारी समजता का असे लोकांना वाटायची शक्यता आहेच. पण आज तरीही हिम्मत करून हा लेख लिहितेय. कदाचित मला समदु:खी लोक मिळतील किंवा काही उत्तर मिळेल आणि काहीच नाही तर त्या चोरांपैकी कुणाला हा लेख मिळाला तर तेही तो पुढे पाठवतीलच निनावी. देव त्यांचं भलं करो. आजही एक कविता पोस्त करणार आहे पण फक्त इमेज. Happy बघू काय होते.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या सगळ्या कविता वहीत /डायरीत लिहून ठेवा आणि ती डायरी गोदरेजसारख्या भक्कम कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवा.
त्या लॉकरची चावी तुमच्या गळ्यातल्या चैनमध्ये घालून ठेवा.

ज्याला/जिला कुणाला तुमची कविता वाचायला द्याल त्याला/तिला अगोदरच आई/देव्/देश किंवा विवेकबुद्धी यांपैकी जे योग्य त्याची शप्पथ घालून ही कविता वाचल्याचं कुण्णाकुण्णाला सांगणार नाही असं कबूल करून घ्या.

शुभेच्छा!

वरच्या काकूंनी हाच विचार करून कथा, कविता पोस्ट नाही केलेल्या Happy

विद्यातै
एक तर कायदेशीर कारवाई करा किंवा जमेल तसं आवाज उठवत रहा. काही करता येत नाही. फेसबुकवर असलेलं कंटेट हे फ्री आहे असाच समज आहे एकेकाचा.

साहित्याचा प्रसार करण्याच्या उदात्त भावनेतून या चोर्‍या होतात.
पहिली प्रतिक्रिया या प्रवृत्तीबद्दल बरंच सांगून जाते.

साती,
उपहास पोहोचत नाहीये. Happy

कपोचे,
२००७ च्या आधीपासून करत्येय.
माझा ब्लॉग
माझ्या कित्येक कवितस मलाच ऑर्कुट्/फेबु वर तर सापडल्याच पण आता व्हॉ अ‍ॅ वर पण येतात. (तेव्हा व्हॉ अ‍ॅ नव्हतं)
इथले माबोवरचे वैद्यकीय लेख मी खाली 'माबोवरच्या डॉ साती' अश्या नावाने फॉर्वर्ड करा अशी विनंती करूनही बिना नावाचे फॉर्वर्ड येतात.
कृपया काळजी नसावी.

चिनूक्स, अगदी अगदी.
पूर्वी माझ्या भावनाही क्रेडिट्/नामोल्लेख मिळालेच पाहिजे अश्या कोत्या होत्या.
आता भावना उदात्त झाल्यापासून मन आपोआप निर्विकार झालंय.

ते कट्यार काळजात घुसली मध्ये आहे ना, ' अमूर्ताची (अमृताची नव्हे हो) चोरी कशी होऊ शकेल?'
ते अगदी पटलंय मला.
Happy

बघा बरं. स्मायली टाकून इतक्या जुन्या मेंबराला नाही कळालं. विद्यातै, नव्या आहेत, त्यांचा काय समज होईल प्रतिसाद वाचून ?
-
आपल्या जवळच्या दोन चार जणांना आपला उपहास माहीत असणं वेगळं आणि पब्लीक फोरम मधे उपहास वापरण्याची कला अवगत असणं निराळं, पटतं का ?

इ़काका या शब्दाचं मात्र मनातल्या मनात कौतुक केलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक काका ! इलेक्ट्रॉनिक माध्यमातले काका.. केव्हढा गहन अर्थ आहे ! तुमचेही कौतुक.

थांबतो हं या विषयावर. आता साहीत्यचोरीवर बोलूयात.

एक काम करा तुमचं लिखाण तुम्ही ऑनलाईन प्रकाशित करण्यापेक्षा एक प्रकाशक शोधा आणि पुस्तक प्रकाशित करा. आणि त्याचे स्वामित्व हक्क घ्या.

मलाही गेल्या दिवाळीत माबोवरच्या तृप्ती आवटी या आयडीने लिहिलेला दिवाळीचा फराळ हि कविता व्हॉ.अ‍ॅ. वर आली होती. मी स्वतः प्रत्येक वेळी ज्या ज्या ग्रुपवर तो मेसेज आला त्या त्या गृपवर सांगत गेले, कारण सेंडरने ती कविता तृप्तीच्या नावाशिवाय टाकली होती. त्याचबरोबर मी तृप्तीला विपु करुनही सांगितल होत या प्रकाराबद्दल, तेव्हा ती म्हणाली होती की नॉर्मली ती इथे लिखाण इमेजेसच्या स्वरुपात टाकते ज्याला वॉटरमार्क लावुन, पण तरीही एखाद्या उत्साही कलाकाराने ते मोबाईलवर टाईप करुन फॉर्वर्ड केल असेल तर त्याला रोखण शक्य नाही.

तसच दोन वर्षापूर्वी मुग्धानंदची महिला दिनी केलेली कविता व्हॉ अ‍ॅ वर आली होती, तिच्या नावासकट.

त्रास करून घेऊ नका हाच उत्तम मार्ग.
माझ्या लिखाणाला इथे दर दुसर्या पोस्टला शिव्या पडत असतात पण ते सुद्धा फेसबूक वर सापडते मग आपल्यासारख्यांचे उचलले जाणं नॉर्मल गोष्ट आहे Happy

अर्थात पहिल्यांदा त्रास हा होतोच हे कबूल. आपल्याला आपल्या लिखाणाचे श्रेय आणि कौतुक हवेच असते हे नाकारण्यात अर्थ नाही. पण मग मी माझ्यापुरता विचार केला की तसेही माझे ऋन्मेष हेच खरे नाव आहे यावरच इथे कित्येकांचा विश्वास नाही तर ते नाव फेसबूकवर चार लोकांना समजले न समजले काय फरक पडतो Happy

हा लेख लिहिण्याची तीन कारणे होती:

१. बरेच दिवसांपासून असलेले विचार मांडायचे होते.

२. प्रश्न विचारायचे होते: इण्टरनेट प्रोव्हायडर लोकांना कंटेंट तयार करण्यासाठी पैसे देतात का ? कधी विचार केलाय, क्रिकेटची match संपायच्या आत एक जोक भराभर सगळीकडे पोचलेला असतो. कशामुळे?

३. मी गेले दोन वर्षं या सर्व मिडिया मधून बाहेर होते त्यामुळे हे माझ्यासाठी नवीन असेल पण तरीही कुणाला असे अनुभव आले असतील तर काही माहिती मिळेल अशी अपेक्षा होती. असो.

मी २००६ पासून ब्लॉग लिहित आहे. त्यामुळे इथे नवीन असले तरी लिखाणाला नाही.

साती, उपहास समजला. स्वत:च्या शांतीसाठी नक्कीच दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहे पण हे असे लोक का करत असावेत हा विचार मनात आल्याशिवाय रहात नाही. तुम्ही म्हणालात तसे, यासाठी एकच उपाय की डायरी लिहून कुलुपात ठेवायची. ते जमले नाही म्हणून तर इतके वर्षं ब्लोग लिहित आहे. जित्याची खोड…दुसरं काय? असो.

तुम्ही सर्वांनी वाचलेत आणि कमेंट टाकलीत याबद्दल धन्यवाद. सध्या सैराट च्या नावाखाली लिहिलेलं जास्त वाचलं जातं त्यामुळे या लेखावर प्रतिक्रिया दिल्याबद्दल विशेष आभार. Happy

विद्या.

विद्याताई,

Imitation is the greatest flattery.

लोकांनी तुमच्या कवितांची चोरी करणं अक्षम्य आहे. पण या सायबरयुगात ते थांबवण्याची किंमत फार आहे. तुमच्या कविता लोकांना कॉपी करून फॉर्वर्ड कराव्याशा वाटतात यातच त्यांच्या गुणवत्तेची पावती आहे.

एकूण काय, की तुम्ही एकतर लिहू नये, लिहिले तर कुठेही पोस्ट करू नये. हे सर्दी झाली म्हणून नाकच कापून टाकण्यासारख होईल.

त्रास करून घेऊ नका इतकंच. Life was never fair. Don't expect it will ever be.

खरं सांगू का, मला माझ्या कविता अजिबात भारी वाटत नाहीत. उलट चोरी करणाऱ्या लोकांवर किती वाईट दिवस आले आहेत याचे मला वाईट वाटते.>>>> हाहाहा!
मला असले विनोद जाम आवडतात! Wink

एक जालीम उपाय आहे......

आपल्या कवितेत, लेखात वगैरे आपले नाव येवु द्या. जसे संतकवी करायचे उदा.

"तुका म्हणे"..."नामा म्हणे"..."सोयरा म्हणे"...."दास रामाचा"..."एका जनार्दनी"....

Happy

ऋन्मेश्वरी!!!

बापरे...

ज्ञानेश्वर नावाचे एक संत होते त्याचप्रमाणे त्यांच्या नावाशी साधर्म्य असलेला एक रेडाही होता. संत ज्ञानेश्वरांनी त्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवून एक श्लोक उच्चारला. पाठोपाठ रेड्यानेही त्याच्या स्पेशल आवाजात तो श्लोक उच्चारला. जर ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवून अख्खी ज्ञानेश्वरी म्हंटली असती तर काय झाले असते त्याची कल्पना आली.

I was really hoping for some answers. But I guess, the only way to react to such incidents is to stay quiet.

Thank you for all your comments.
Vidya.

विद्याताई, माबोवर एक असा धागा आहे आधीपासून्च. सेनापती आयडीच्या लिखाणात सापडेल (त्याने अजुन आयडी बदलला नसेल तर)
पण खर तर याला उपाय नाहीच Happy उपाय त्रासापेक्षा त्रासदायक असावा बहुदा

फेसबुकवर कांचन कराई या नावाने एक प्रसिद्ध व्यक्ति आहेत. त्यांना संपर्क करा. त्या या विषयातल्या तज्ज्ञ आहेत. त्यांनी बोक्या सातबंडे या टोपणनावाने लिहिणार्‍या (पक्षी ढापून प्रसिद्ध करणार्‍या) एका साहित्यचोराचा पर्दाफाश केला होता. हा साहित्यचोर तर दुसर्‍याचं साहित्य स्वतःच्या ब्लॉगवर प्रसिद्ध करून त्याद्वारे जाहिरातींतून बक्खळ पैसाही कमवित होता.

कविता असेल तर फक्त JPG टाका Watermark टाकून, आणि कथा असेल तर फक्त PDF... (तुमच्या ब्लॉगवर सुध्दा) बहुतेक लोक परत टायपायच्या विचारात नसतात.. त्याना Forward करायचे असते.

कथा-कविता चोरी होतात.कधीकधी तो नाव उडवून स्वतःच्या नावावर खपवायचा सोयीस्करपणा असतो, कधी 'नावात काय एवढं, कोण कुठला त्याचं नाव उगीच कशाला प्रसिद्ध करु' म्हणून नाव उडवून 'वाचलेलं चांगलं' म्हणून प्रसिद्ध केलेल्या असतात.आता व्हॉटसअ‍ॅप वगैरे मुळे हे एकदमच सोपं झालंय.
याला उपाय किंवा कंट्रोल नाही.उपाय एकचः स्वतःची एक वेगळी लेखनशैली डेव्हलप करा.(म्हणजे जो गण्या कॉपी पेस्ट करुन स्वतःच्या नावावर खपवतोय त्याला ओळखणारे चार लोक तरी 'ह्या! हे काय तू लिहीलेलं वाटत नाही' म्हणतील.) तुम्हाला कोणाचा लेख निनावी आल्यास लेखकाचे नाव सांगा.(मिसळपाव वरचा भेसळ कशात काय असते वाला लेख व्हॉटसअ‍ॅप वर निनावी आला आहे, पण तो मी कधी वाचला होता आणि लेखकाचे नाव हे दोन्ही मिसळपाव वर लॉगिन घेऊन योग्य प्रकारे फास्ट शोधण्याची एनर्जी नाही.) बरेचदा ओरिजिनल लेखकाचे नाव सांगितले आणि 'हे टाकून पुढे पाठवा' म्हणून सुधारीत पोस्ट दिली तर लोक 'हा कोण लागून गेलाय इतके शिकवणारा टिक्कोजीराव' म्हणून इग्नोर मारतात.विशेषतः जे लिहीतच नाहीत त्यांना त्या लिखाणामागचं विचारमंथन, लिखाणाचा जन्म याचं काही देणंघेणं नसतं.
यात एक वर्ग असा आहे की त्यांना कोणी लिहीलंय हे जाणण्याची इच्छा असते पण खरोखर माहिती नसतं, ते 'लेखकाचे नाव माहिती असल्यास कळवा' वगैरे लिहीतात.
एकंदर लोकांना कंटेंट शी देणंघेणं असतं, तो कसा, कुठे, कोणी दिला याच्याशी नाही.
माझे निनावी कधीकाळी फिरलेले हे दोन : (आता शिळेपाके झाले, मी ते का लिहीले, ते बोअर आहेत इ.इ. आता वाचल्यावर वाटतं.)
http://anukulkarni.blogspot.in/2007/01/ctrl-alt-del.html
http://anukulkarni.blogspot.in/2007/01/blog-post_9073.html

अनु, बघ हे तुझे लेख मी २००७ मधेच वाचले होते. पण हे चोर ब्लॉगवरून जुने कन्टेन्टही घेत आहेत. असो. सध्या फक्त कवितेची इमेज टाकत आहे त्यामुळे फोरवर्ड होण्याचे प्रमाण कमी आहे. अजून तरी इमेज मधल्या कविता बाहेर दिसल्या नाहीयेत. Happy

विद्या.