सायकलीचं आणि अनवानी पावलांच जग!!!!

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

ज्या काळात, ज्या घरात, ज्या गावात, आणि ज्या कुटुंबात मी जन्मलो तिथे कैक माणसे, बाया, मुले, मुली पायी चालताना दिसायची. बायका नदीवर कपडे धुवायला जात तेंव्हा त्या अनवानी पावलांनी करकर निघत आणि सात आठ माणसांच ओलचिंब धुण घेऊन घरी येत असतं. नदीची वाट चढउतारांची असे. अगदी पावसाळी दिवसात सुद्धा ह्या बायका अनवानी पायांनीच जात. उलट, चप्पल घालून नदीवर जाणं म्हणजे पाय मोडून घेणं असे. कारण, पाय शेवाळी जागेवरुन घसरलाचं तर अनवानी पायांनी जितक्या लवकर सावरता येतं तितक्या लवकर वाहणा घातलेल्या पायांनी सावरता येत नाही.

हीच गत, पुरुषांची असे!!! माझ्या बाबांनी ६५ वयापर्यंत सायकल धोप धोप धोपटली. त्यांनी वापरलेली सायकला मला पुर्ण वेळ तेंव्हाच मिळाली जेंव्हा बाबांचे सायकल चालवणे आपोआप बंद पडले. तोवर, सायकल खाली असेल तर तरच ती मला मिळे. तीही फक्त बाबांची आणि त्यावर माझ्या बहिणीचा पण डोळा असायचा. अगदी राहवल नाहीत अर ४० पैशाला तासभर सायकाल भाड्याने मिळे पण ती पंक्चर होता कामा नये नाहीतर भाडे अजून लागत असे.

मला ११ वीला सायकल मिळाली ती बाबांची. ती तेंव्हा बांबाइतकीच वृद्ध झाली होती. मी ती नीट करुन करुन त्यावर इतके पैसे खर्ची केले पण तरीही नवीन सायकल घेण्याइतपत ९०० रुपयाची एकरक्कम अशी घरात मला द्यायल परवडत नसे आणि नसेही!

अनिकट मधे जिथे मी वाढलो तिथे फार फार तर लोकांकडे लुना असे. ती लुनासुद्धा कंडम झालेल्या अवस्थेत दिसे. माझा भाऊ जेंव्हा पोलिस म्हणून भरती झाला तेंव्हा त्यांच्या खात्यातून काही पैसे पगारातून कटून त्यांना लुना मिळत असे. भावानी लुना घरात आणली पण सोबत नियमांची एक यादी सुद्धा रोज रोज ऐकायला भाग पडली. रोज लुना धुणार, पुसणार, फडके मारणार ही कामे मी करायची. पण चालवायची मुभा नाही. भाऊ झोपला असताना लुना चालवायची संधी मिळाली तरी गाडी त्याने कुलुप लावलेली असायची. ती वाकड्या हॅन्डलची लॉक केलेली गाडी असे वाटे ओढून ताणून सरळ करावी. भावाचा घरात इतका दरारा असायचा की त्याची चावी घेऊन गाडी चालवायची म्हणजे नंतर मार नक्की मिळणार. शिवाय बोलणी. वर सोडवायला कुणीच नाही. कारण आई बाबा सहीत घरचे सगळे जण त्याला घाबरायचे.

एकदा भाऊ बाहेरगावी गेला आणि चावी माझ्याकडे आली. त्यावेळेसे माझे वय २१ होते आणि अशा उतावळ्या वयात गाडी बिडी शिकण्याचे फार धाडस असते. मी गाडीला किक मारली आणि अ‍ॅक्सेलेटर एकदम वाढवला. गाडी बैल बुजाळावा तशी बुजाळली. इकडे तिकडे धावली. मला चांगलेच लागले. गाडीची काच फुटली. गुडघे खरचटून आग आग व्हायला लागले. आणि, आता भाऊ येणार आणि आपली परेड घेणार म्हणून माझी अवस्था मेल्याहून मेल्यासारखी झाली.

मला अजूनही गाडी अशी भर रस्त्यावर चालवायला जमत नाही. मला गाडी येत नाही म्हणून मी खूप आधीच ७ व्या ८व्या वर्गात असणार्‍या माझ्या भाच्यांना गाड्या घेऊन दिल्यात. आज माझे भाचे आणि भाच्या धुम्म गाड्या चालवतात. मित्रांना डबलसीट फिरवतात. माझी विरुन गेलेली स्वप्ने बागडायला पुन्हा वर येतात.

माझी आई घराबाहेर क्वचित पडली असेल. तिच्यासाठी खास म्हणून आमच्याकडे कधी चप्पल नसायची. ती कुठेही जाताना बिना चपलेची जायची. किती दुरवरुन आम्ही पाणी आणायचो पण आमच्यासहीत कुणाच्याही पायात चप्पल नसायची. तळपाय सतत मातीने काळपटलेले असायची. काटे सहज मोडायचे आणि मोडलेले काटे सह्ज पायात रुजायचे. काट्यानी 'हर्ट' होणे बरे.. पण कुणा आंडुपांडु लोकांचे शब्द नकोत!

आमच्याघरी फक्त बाटाच्या आणि त्याही खोट्या बाटाच्या चपली येत किंवा जाड चामड्याच्या. त्या चामड्याच्या चपली एकदा का पाण्यात भिजल्यात.. भरल्यात की टम्म भुगत. पायाला दगड बांधल्यागत त्या वाटत. बाट्याचे पट्टे तुडले की ते शिवून आणायचे. चप्पल तळपायाच्या ठिकाणी घासून घासून तिथे छिद्र पडले की मग मागून थिगळ लावायचे. जर एक चप्पल धडी आणि दुसरीचा एकदम बोरा वाजला असेल तर घरात अजून अशीच एक चप्पल असायची. मग ती एक आणि ही एक अशी त्यांची एक जोडी बनवून ती वापरायची. त्याची कधीच लाज वाटली नाही. 'चित्रा' टॉकीज समोर कितीतरी चांभार बसलेले असायचे. आता ते चांभारही दिसत नाही. प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर सायकलीच पंचर काढणारे असायचे. माझ्या भाच्यांना तर चांभार कसा असतो तेही माहिती नाही. पंचर काढणे काय असते तेही माहिती नाही. आपल्या जीवनातून शब्द हद्दपार होतात ते असे!!! आणि सोबत माणसेही!!! नको ती माणसे सतत आपल्या मागे असतात 'हर्ट' करायला.

११, १२, बीईचे चार वर्ष मी सायकाल अफाट चालवली. रोज तीस तीस किलोमीटरचे अंतर. सकाळी पाच वाजल्यापासून रात्रीच्या आठ पर्यंत वर्गच असायचे. शिकवण्या असायच्या. परिक्षा असायच्या. दुसरे कुठलेच काम नसायचे. माझ्या सायकलीला समोर के कॅरीअर बसवले असायची. एकदादोनदा माझे रेजिस्टर आणि कंपॉस त्यातून खाली पडले. एकदा तर मी कॉलेजमधे सायकल लावली आणि दोन्ही वस्तू काढायचे विसरुन थेट वर्गात गेलो. पाच मिनिटात रेजिस्टर आणि कंपॉस चोरीला गेले होते. सायकलीचा पास संपला असूनही जर सायला लावली असेल तर सेक्युरीटीवाला सायकल्ची हवा काढायचा. १००० सायकलीने कॉलेज भरलेले असायची. वर्ग सुटले की ह्याची सायकाल त्याच्या सायकली अडकायची. ह्याचे पायडल त्याच्या चाकात जायचे. ह्याचे हॅन्डल समोरच्या सायकलीच्या कॅरीअर मधे अडकायचे. एकावर एक सायकली पडायला लागल्या की एक वेळेस १०० ते २०० शे सायकली एकावर एक कोसळायच्या. मग बसा तासभर गुंता सोडवत.

पण हल्लीच्या काळात सायकल चालवणे.. पायी चालणे हे म्हणजे काहीतरी खास असे झाले आहे. फेसबुकवर खन्ना नावाचा मुलगा लिहितो आज पहाटे ५ ला उठून मी १ किलो पायी चाललो. सोबत त्याच्या पायांचे फोटो. मग मुंबईच्या रस्त्यांना शिव्या. मायबोलिवर लोक लिहितात आम्ही इतकी इतकी सायकल चावली. मग त्याची गती. मार्गात आलेले चढउतार. न समजणारे आलेख. साग्रसंगीत वर्णन. हे सर्व वाचताना मला फार टोचत राहत की जेंव्हा पायी चालणे, सायकल चाववणे हे फार फार किरकोळ होते तेंव्हा ते कसे दुरल्क्षित झाले होते. आणि आज चार लोक पायी चालतात. चार लोक सायकल फिरवतात. त्याच्या किती गवगवा होतो. किती कौतुक होते ह्या लोकांचे. कधीकधी आपल्याला फिरुन मागे याव लागत. आपण जसे होते तेच खूप बरे होते असे वाटायला लागते. म्हणून अनेक जण मागे फिरतात. पुन्हा आपले वळण बदवतात. त्यात एक फॅशन असते. एक आनंद असतो. मित्रांमधे चर्चा असते. मग त्यांचा तो आनंद पाहून मन कळवत की अरे आपण हे सर्व किती करायचो. तेंव्हा कधीकुणी कौतुकास्पद बोलल्याचे आठवत नाही. कैची आपण आपली शिकली. पायडल मारणे आपण आपलेच शिकले. हात सोडून सायकल चालवणे आपण आपले शिकले. सायकलीमधे हवा भरणे, पंचर काढणे, सायकल धुणे आणि द्सर्‍याच्या दिवशी सायकलीला झेंडूची माळ घालणे हेही आपणच केले आहे. म्हणजे आपण सायकलीवर तेंव्हा खूप खूप प्रेम केले आहे. अजून काय हवे!!!!!!

-- हर्ट!

विषय: 
प्रकार: 

जुने जाऊद्या मरणा लागुनी..
सध्या सायकलची कांय अॅक्टीव्हिटी सुरु आहे?

बी, तुम्ही तुमच्या गावातलं , तुमच्या शाळा-कॉलेजच्या दिवसातलं वातावरण, त्यात वाढलेले तुम्ही, घरच्यांबद्दल अजिबात तक्रारीचा सूर न लावता लिहीलेलं खरंच खूप आवडलं.

फक्त आवडली नाही ती अलिकडच्या काळातील सुधारणांविषयींची नकारात्मक टिप्पण्णी. सुधारणा या बहुधा काळानुरुपच होत असतात. पूर्वी लोक अनवाणी चालायचे. तेव्हाचे रस्ते धूळभरले असायचे. डांबरी किंवा काँक्रीट च्या रस्त्यांएवढे ते तापत नसत. लोकांना वाहनाची उपयोगीता भावली. मग त्यासाठी रस्ते बदलणं भाग पडलं. त्यामुळे लोकांच्या पायात चपला येणं अपरिहार्य झालं. असो.

तुमच्या साध्या, सोप्या , बोली भाषेतील लिखाण आवडलं.

छान लिहीलयं.

सायकल चावली,सायकल चाववणे >> चालवली, चालवणे हवं ना?

आजकाल लोक कशाच कौतुक करत सुटतील त्याचा भरोसा नाही.

हजोरो रुपये भरुन ताडोबाला जाऊन वाघाचे फोटो काढतात नि सांगतात "बघा आम्ही वाघ पाहला"

लहानपपणी आमच्या गावात दर महिन्याला वाघ दिसायचे. माझी आजी तर एकदा वाघाला कुत्रा समजुन हाड करणार होती

पण लगेच कळले की कुत्रा इतका मोठा कसा? हा वाघच आहे.

तेव्हा वाघपण माण्सांवर हल्ला करत नसत.

सुंदर लिहिलय!!!
मी अकरावी पर्यंत अनवाणी जात असे.( हल्ली अकरावी नाही , त्या मुळे हे बंडल वाटायची तीव्र शक्यता आहे!! अत्यंत स्ट्राँग वकीली पॉइंट!!))
घरी पंखा तर दूरच... वीज नव्हती.( हल्ली सुध्दा वीज बर्याचदा नसते!!)
मसाला दोसा आणि आईस क्रीम पहिल्यांदा आजोळी दहावीत असताना धारवाडला खाल्ला.( आता या वयात सांभाळून खावे लागते!)
बट सो व्हॉट?
त्या काळाच्या फालतू बाबींचे कौतुक नको अन आजच्या १ कि मीचे सुध्दा !!!!
नो रिग्रे ट्स!!!!

एक निरागस( नो पन इंटेंडेड) प्रश्न : बी म्हणजे हर्ट काहो ???

आठवणी म्हणून छान आहेत. बर्‍याच गोष्टींना अगदी अगदी झालं. भाड्यानी सायकली घेणे, बाटाच्या स्लिपर घालून पाण्यातून, चिखल मातीतून पळणे. सायकली बुंगाट पिदाडणे, लपून गाड्या चालवणे आणि पुढे त्यावरुन रपटणे (पडणे) अन त्यावर मग घरात होईल ती बोंबाबोंब वेगळी.
आता पुष्कळ काळ बदललाय, पुर्वी गाड्या तितक्या कॉमन नव्हत्या पण आता घरात दोन चाकी तर असतातच असतात पण चार चाकींची पण संख्या वाढतच आहे. पुर्वी पायी हे नॉर्मल होते (अजूनही काही लोकांकरता ते नॉर्मल आहे दुसर्‍या कुठल्याही पर्याया अभावी) आजकाल गाड्या न्यु नॉर्मल झाल्यात अन पायी, सायकल चालवणे हे सगळं व्यायाम प्रकारात मोडत चाललय. त्यात कुठल्याही गोष्टीचं कौतूक करायला हक्काचं साधन म्हणजे फेसबूक लोकांच्या दिमतीला आल्यामुळे त्याचा उदो उदो होतो.

छान लिहिलंय.
भाड्याच्या( :-)) सायकली चालवल्यात. तेव्हा ताशी २ रुपया देउन सायकल घ्यायचो आम्ही. Happy शिकताना ढोपरं कोपरं फुटलीच होती.
आता लेकीला सायलक शिकायला सुध्दा लेकीचा बाबा ३५०० हजाराची सायकल आणतो. माझा बाबा २ रुपये द्यायलाही कशाला हवेत असं विचारायचा Happy

छान लिहिलंय.

अनेक गोष्टींना अगदी अगदी झालेच अनेक जुन्या गोष्टी आठवल्या.
अनवाणी चालणे, सायकली ताबडवणे. पायात रुतलेले काटे काढायला बिब्बा गुळाचा चटका असे उपाय पण आठवले

ध्यानात एक गोष्ट आली की
ज्यावे़ळी जी गोष्ट सगळेच करतात त्यावेळी त्याचे कौतुक कोण करणार?
जी गोष्ट ज्या वेळी दुर्मीळ त्याचे त्या वेळी कौतुक

अवांतर -
(तुझ्याच भाषेत) कुणा आंडुपांडु लोकांच्या शब्दानी हर्ट होणे बंद कर आणि परत 'बी' हो. रुजुन ये बहरून ये
ताटी उघड आता

अ‍ॅमस्टर डॅम मध्ये अतिशय सुरेख सायकल कल्चर आहे. नीट मेंटेन केलेले सायकल ट्रॅक्स आहेत. त्यांची जीवन शैली सायकलवरच आधारित आहे. सर्व फिट लोक्स सायकल चालवताना इतके मस्त दिसतात अगदी उत्साही वाट्ते. बाबांबरोबर
बाळाची छोटी सायकल पण पार्क केलेली असते. त्रिपुर सुंदरी ललनांना आपन कॉलेज मध्ये असताना कसे सायकल चे लॉक काधत असू तसे करताना बघून जीव आनंदाने अर्धा झाला. लोकांनी आपल्या गरजे प्रमाणे मॉदिफिकेशन्स पण केली आहेत. पुधे मागे बास्केटी मुलांसाठी सोयी, मोठी तीन चाकी सायकल. समोर वॅगन असलेली.

मला तर एक सायकल रिक्षा वाला देखिल दिसला. उत्साहात पेडल करत होता. रिक्षा मस्त मोठी आहे. भारतातले १२ - १४ लोक्स बसू शकतील दाटीवाटीन. लै मज्जा. मी पण एक साधी सायकल घेनार आता परतल्यावर. कॉलेज परेन्त मी पन
तुमच्या सारखीच सायकल चालवली आहे.

अहो खरेच तुम्हे हर्ट होउ नका किंवा झाले तरी एक राजपूत अपने घाव दिखाता नही असे मस्तानी बाजीरावला ( सिने मात ) सांगते तसे मस्त मजेत आहात अशी छान आयडी घ्या. आनंद मित्र, उत्साही भुंगा असे काहीतरी. इस दुनिया की क्या मजाल कि कोई हमें रुलाए? अभी तो अपने हसने खेलने के दिन है.

मस्त. आवडलं. तू नेहमीच खुप छान लिहितोस. वाचता वाचता सायकलवर बसूनच भूतकाळात गेले.
अधेमधे ते टोमणे मात्र खड्यासारखे दाताखाली आले, शक्य असेल तर ते काढून टाक.

हर्पेन आणि अमांना अनुमोदन.
एक सांगू का? ज्या निर्मळ नजरेनं मागे वळून बघतोस, ती सगळीकडे बघतानाच कायम ठेव ना. कुणाला काय करायचं ते करू दे.
गांधीजींनी हे खुप छान सांगितलंय पहा Nobody can hurt you without your permission Happy

११, १२, बीईचे चार वर्ष मी सायकाल अफाट चालवली. रोज तीस तीस किलोमीटरचे अंतर.<< आता तू किती चालवू शकतोस / चालवतोस का ??

बी २०-२५ वर्षा पुर्विचा तो काळच वेगळा होता.

तरीपण ते सायकलींग चे चालण्याचे हरवलेले दिवस परत जगण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्यात काय वाईट आहे. त्याला प्रोत्साहन देणे चांगले का वाईट ??

प्रतिक्रिया वाचून हा लेख अजून वाढवावासा वाटतो आहे. धन्यवाद.

अ‍ॅम्टरडॅम मीही पाहिले आहे. कम्बोडियामधे सुद्धा सायकली चालवणारे अनेक टुरीस्ट पाहिले आहेत. ईन्डोनेशियामधे तर सायकल टुर होता. सकाळी ९ ते १ च्या मधे सायकलीवरुन योग्यकर्ता दाखवणार होते पण ते माझ्या वेळेत बसले नाही.

मी सुध्दा दाबून सायकलिंग केलेय.. शाला- कॉलेज.. तो काळच तसा होता. आमचे गावाबाहेर घर होते अन दिवसाकाठी टू व्हीलर एखाद दुसरी जायची. चारचाकी तर अगदीच कधीतरी जायची. हवा भरायला ५० पैसे आईकडून मागून घ्यायचे, ओळखीचा दुकानदार फुकट हवा भरायचा. हवेच पंप स्वयंचलित नव्हते. आपोआपच व्यायाम व्हाय्चा. सायकल आहे म्हणजे किती सोप्प इकडे तिकडे जाणे असे वाटायचे. आई-आजी त्यांना काही तत्काळ हवे असायचे तेव्हा सायकलवरून पिटाळायच्या, पोस्टात पत्रे टाकणे, कुठे काही निरोप देणे असो, चालायला नको, मस्त सायकलवर जाता येते असे वाटायचे. Happy

तुम्ही बी आहात का? हर्ट आयडी घेतला काय आता? वरच्या प्र्तिक्रियांमुळे समजले

सायकल ला सजावट करण्यासाठी कोणी इथं सायकलच्या फॉक्स मध्ये अम्रुतान्जन च्या झाकणामागचे पांढरे लावले आहे का ?

मस्त लिहिले आहे बी ..
पण अप्रूप वाटणारेही आपल्या जागी योग्यच आहेत की.. हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात जे वेळ काढूनच शक्य होते त्याचे कौतुक वाटणारच..
मी सुद्धा विकेंडला कधी रात्र रात्र जागतो तर कधी भल्या पहाटे उठून वॉल्कला जातो.. चालता चालता आजूबाजूच्या शांत निसर्गरम्य जागेचे किंवा झोपलेल्या रस्त्यांचे फोटो काढत व्हॉट्स्सपवर टाकत राहतो.. यातही गंमत वाटते कारण डाराडूर झोपलेले माझे मित्र जेव्हा सुर्य डोक्यावर आल्यावर उठतात तेव्हा माझी त्यांच्यापेक्षा हटके सकाळ बघून त्यांची जळतेच Wink

अर्थात जळवणे हा हेतू नसून सुखाचे क्षण वाटणे, पसरवणे हाच हेतू असतो Happy

मस्त!
अरे सायकल हा जणु एक एक्स्टेन्डेड अवयवच होता! सायकल इतकी पिदाडलीये की काही विचारू नको. अजूनही (म्हण्जे मला या वयात म्हणायचंय! ) चान्स मिळाला की सोडत नाही.
आणि हो....ते नाव बदल बाबा लवकर!

मी इतके दिवस हर्ट हा नवा (डु)आयडी आहे असं समजून लेख उघडलाही नव्हता. 'बी' चा असता तर आधीच उघडला असता.
तुम्ही हर्ट का झालात ते मला माहीत नाही पण मला नाही आवडला आयडी (काय फरक पडतो म्हणा)
________________

लेख आवडला पण शुगोल +१
________________

खेड्या पाड्यांमधे लोकं रोज भाकरी करतात तरिही तुम्हाला इथे त्यावर धागा काढावासा वाटलाच ना?
तसच तर आहे हे.

आजकाल सगळ्या सुविधा उपलब्ध असताना आवर्जुन सायकल ने जाणं वा अनवाणी चालणं हे अप्रूपाचं काम आहेच!