घरचा पाहुणा

Submitted by परदेसाई on 23 October, 2007 - 15:32

संध्याकाळ झाली तसं रमाबाईंनी देवापुढे निरांजन लावायला घेतलं. खूप जुनी सवय. सवयीने हातही जोडले गेले. पण लक्ष खरं तर तिथे नव्हतं. 'उद्या सकाळी आधी वाण्याचं बिल द्यायला हवं, त्यासाठी बँकेतून पैसे काढून आणायला हवेत. झाडूवाल्याला बोलावून काही जुने कपडे द्यायचे आहेत,' अश्या अनेक कामांची उजळणी मनात चालली होती, आणि हात मात्र देवासमोर जोडलेले आणि त्याबरोबर स्तोत्रपठणही चालू होतं.

तेवढ्यात दारावरची बेल वाजली. 'आता एवढ्यात कोण आलं असेल?' त्यांना प्रश्न पडला. 'पहिल्या मजल्यावर राहणार्‍या फाटक काकू असतील बहुतेक,' त्यांच्या मनात आलं. मुलं अमेरिकेला गेल्यापासून त्यांच्याकडे जाणं येणं असं कुणाचं नव्हतंच. त्यात दूधवाला, पेपरवाला ही मंडळी तर सकाळीच येऊन गेलेली. शेजार्‍यांमध्ये फाटक काकूंचा एक आधार होता. त्या नाहीतर त्यांची मुलगी कधीतरी संध्याकाळी यायच्या. डब्या-वाट्यांमधून आज केलेल्या पदार्थांची देवाणघेवाण व्हायची, आणि त्यानिमित्ताने थोडा वेळ गप्पाटप्पा पण व्हायच्या. 'आले,' म्हणत त्यांनी हातातलं तबक खाली ठेवलं, फुलं चटकन देवावर वाहिली, देवापुढे उदबत्ती खोचून ठेवली, आणि दार उघडायला गेल्या. दारात एक तरुण मुलगा उभा होता.

'नमस्कार काकू, काय म्हणताय?' म्हणत तो आत आला. खरं तर या तरुणाला त्यांनी आधी कधी पाहिलेलं नव्हतं. पांढरा टी-शर्ट, कडक इस्त्री केलेली पँट आणि हसतमुख चेहरा. आत आल्या आल्या त्याने एकदम हिंदी सिनेमासारखा पायालाच हात लावला. फक्त 'पाय लागू माँजी' असलं काही तो म्हणाला नाही. सहज मनात विचार आला, आणि त्याबरोबर त्यांच्या चेहर्‍यावर एक हास्यरेषा उमटली.

'काय ओळखलंत की नाही? अहो मी नवीन, नवीन शहा,' त्याने लगेच ओळख करून दिली.

'बस ना रे, बस बस,' त्या पटकन म्हणाल्या. नवीन शहा हे नावही त्यांना चटकन आठवेना. कुठे बरं ऐकलं असेल हे नाव?

'नवीन शहा? म्हणजे....' प्रश्न विचारल्यावर खरं तर 'असं आपण कुणाला विचारू नये' हेही लक्षात आलं पण प्रश्न निघून गेला होता.

'असं काय करताय काकू, मी नवीन... तुमच्या मुलाचा दोस्त,' सोफ्यावर बसत तो लगेच म्हणाला.

'रोहनचा? अरे रोहन बरोबर होतास का तू?' रोहनचा मित्र दिसतोय, त्यांच्या मनात आलं. 'हल्ली नावंही विसरायला होतात की काय मला?' त्यांनी स्वतःलाच मनातल्या मनात विचारलं.

'हो ना, रोहनचाच मित्र. पूर्वी पासूनची मैत्री आमची, बरोबरच होतो ना आम्ही.'

'म्हणजे सांगलीच्या कॉलेजला होतास का तू त्याच्या बरोबर?', त्यांनी पटकन विचारलं.

'हो, मी हॉस्टेलवर रहायचो. काय धमाल असायची हॉस्टेलवर तेव्हा.'

त्यांना रोहनचं हॉस्टेल आठवलं. मुंबईच्या कॉलेजमध्ये प्रवेश नाही मिळाला तेव्हा रोहनला सांगलीला प्रवेश घ्यावा लागला होता. पुढची चार वर्षं त्याने सांगलीला हॉस्टेलवरच काढली होती. मुंबईला येताना जाताना बरोबर मित्रांची टोळीच असायची. आणि आला की हॉस्टेलवर काय काय धमाल चालायची ती पण तो त्यांना सांगायचा.

'रोहन सांगायचा खरा, त्याच्या हॉस्टेलच्या गमती जमती..' त्यांनी कबूल करून टाकलं.

'तेच तर. अहो आम्ही काय धमाल करायचो माहिताय का? अर्थात सगळ्याच काही गमती आई वडिलांना सांगायच्या नसतात म्हणून, नाहीतर.. पण रोहन तसा सभ्य होता आमच्यात,' असं म्हणत तो हॉस्टेलवर केलेल्या गमती जमती, मुलांनी केलेली भांडणं अश्या बर्‍याच काही गोष्टी सांगण्यात रंगून गेला. खरंखोटं देवालाच माहीत, पण त्याच्या सांगण्यात एक प्रकारचा निरागसपणा होता, गोष्ट सांगण्याची एक हातोटी होती. 'रोहनच्या हॉस्टेलच्या गोष्टी रोहन सांगत होता त्यापेक्षाही रंगीत दिसतात. ही पोरं आईवडिलांपासून काय काय लपवत असतील कोण जाणे, ' त्यांच्या मनात आलं.

'मग तू आमच्या सुनेला पण ओळखत असशील. ती पण सांगलीचीच,' त्या म्हणाल्या. कॉलेज संपल्यावर रोहनने त्याच्याबोबर कॉलेजला असलेल्या दीप्तीला एक दिवस त्यांच्या समोर आणून उभं केलं. खरं तर कॉलेजला असतानाच त्याला ती खूप आवडली होती. पण कॉलेज संपलं आणि नोकरीही लागली तेव्हा त्याने लग्नाचा निर्णय घेऊन टाकला. रोहनचा पहिला पगार आणि होणारी सून एकाच दिवशी पदरी पडले. जुन्या आठवणी नवीनला सांगताना त्या पुन्हा एकदा भूतकाळात हरवून गेल्या. खरं तर तो भूतकाळ म्हणताही येणार नव्हता. तीन चार वर्षांपूर्वीच लग्न झालं होतं रोहनचं. त्याला काही भूतकाळ म्हणत नाहीत.

'म्हणजे काय? भाभीला मी ओळखत नाही असं कसं होईल. आमच्या बरोबर कॉलेजला तर होती ना ती. यायची कधी कधी हॉस्टेलला, रोहनला भेटायला. काय खेचायचो आम्ही त्या दोघांची. पण आम्हाला तेव्हाच सांगितलं होतं त्याने,' तो म्हणाला. मग एकत्र प्यालेली कॉफी, मुलांच्या हॉस्टेलची शिस्त, तिथला रखवालदार याच्याही गोष्टी रंगल्या.

'मग काय म्हणतो रोहन आता?' त्याने विचारलं.

'अरे तो तर अमेरिकेला असतो, वॉशिंग्टनला असतो सध्या' त्या लगेच म्हणाल्या.

'ते तर काय... मला पण माहीत आहे, मी पण तिकडेच असतो. म्हणजे वॉशिंग्टनला नाही, पण जवळच Virginia मध्ये, फोन होतात आमचे. तुम्ही येता की नाही तिकडे?'

'पासपोर्ट काढलाय रे मी आता, जाईन म्हणते कधीतरी लवकरच,' अमेरिकेला जायची घाई नसली तरी रोहनच्या घरी म्हणून जायलाच हवं. 'रोहनचं घर एकदातरी बघायलाच हवं,' त्यांनी मनाशी ठरवून टाकलं.

'मग आलात की आमच्याकडे पण यायचं बरं का? तसा मी दोनशे मैल लांब रहातो, पण अमेरिकेत काय? दोनशे मैल म्हणजे तीन तास. सकाळी गेलं तर दुपारी परत येता येतं. पण तुम्ही मात्र रहायलाच आलं पाहिजे बरं का? मी सांगतो रोहनला, मेलच टाकतो आज. तुम्ही कधी येणार हे कळलं की मेल टाकायला सांगतो,' अमेरिकेचं आमंत्रण त्यांने लगेच पक्कं करूनच टाकलं. बोलता बोलता अर्धा तास कसा गेला कळलंच नाही. 'स्मार्ट दिसतोय रोहनचा मित्र,' त्यांच्या मनात आलं.

'अरे तुला चहा पाणी विचारायचं राहूनच गेलं, थांब मी चहा टाकते.'

'राहू द्या हो काकू. no Formalities , मी तर just timepass म्हणून Mall ला आलो होतो, आई बाबांबरोबर,' घड्याळाकडे पाहत तो म्हणाला.

'अरे पण मग त्यांना घेऊन नाही यायचं का? एकटाच आलास ते?'

'काय आहे काकू, Wedding ची तयारी चाललीय, आणि मी कालच आलोय. म्हणून तर रोहनला फोन पण करू शकलो नाही येताना.'

'लग्न करतोयस? अरे वा. धावत पळत होणार वाटतं तुझं लग्न,' अमेरिकेतून मिळणारी टिचभर सुट्टी कशी असते ती त्यांना माहीतच होती.

'तेच तर. Shopping ला आलो, तर काय? Frustrating Experience. तुम्हाला सांगतो, Credit Card घेत नाही, Cash द्या म्हणतोय तो. मला तर परत परत यायला वेळच नाही. मी त्याला CITIBANK चेक offer करतोय तर तो पण घेत नाही. आई बाबांना तिथेच उभं करून आलोय, Alterations ची Guarantee म्हणून. काकू, विचारायला awkward होतंय पण एक पन्नास हजार रुपये असतील का हो तुमच्याकडे? मी तुम्हाला लगेच CITIBANK चा चेक देतो, म्हणजे तुम्हाला उद्या Cash मिळेल,' त्याने खिशातून पाकीट काढलं.

'पन्नास हजार? एवढे कुठे असणार ते माझ्याकडे. उद्या आलास तर कदाचित मिळाले असते. तू येण्या अगोदर मी तोच विचार करत होते.'

'मग वीस पंचवीस हजार तरी द्या. Advance म्हणून देतो, आणि delivery करायला सांगतो त्याला घरी.'

'तेवढे पण नाहीत रे माझ्याकडे, घरात एवढे पैसे ठेवत नाही ना मी, पण बघते एक फोन करून. आमच्या फाटककाकू नाहीत का? त्यांच्याकडे आहे का बघते. पाच दहा हजार नक्की मिळतील.'

'पाच दहा? ' एक क्षण विचार करत तो थांबला. 'बरं दहा मिळतील तरी बघा Please. '

चहाची तयारी बाजूला ठेवत त्या Intercom कडे सरकल्या. पण तेवढ्या दरवाज्यावरची बेल वाजली. फाटकांची शुभा सरळ दरवाजा ढकलून आत आली.

'अगं ये. तुलाच फोन करणार होते, बरं झालं आलीस.'

'काकू, मला वाटलंच तुम्ही माझी आठवण काढताय. बघा, मला telepathy झाली. हे कोण?' तिने विचारलं.

'हा अगं, रोहनचा मित्र. नवीन शहा. आत्ताच आलाय अमेरिकेतून,' त्यांनी ओळख करून दिली.

'काकू तुमचे पाहुणे जाण्याच्या घाईत दिसताहेत, तेव्हा आता नुसतं Hi म्हणते, बरं काकू तुम्ही माझी आठवण का काढलीत?'

'शुभा आज इतकी उत्साहात कशी काय?' शुभाचा एकंदरीत अविर्भाव पाहून त्यांनाच प्रश्न पडला.

'अगं, ह्याला पैसे हवे होते. पन्नास हजार. माझ्याकडे कुठले आले गं एवढे. तुझ्या आईकडे बघ ना, दहा पंधरा हजार असले तर. दुकानात जायचंय याला, आणि बसायला वेळ नाही म्हणतोय,' नवीनच्या चेहर्‍यावर फक्त एक स्मितहास्य उमटलं.

'त्यात काय? मी करते व्यवस्था. रोहनचा मित्र म्हणजे आमचा पण मित्र नाही का? '

'ही पोरटी आज एकदम कानात वारं शिरल्यासारखी का करतेय? नेहमी तर 'दमले काकू, आज ऑफिसात कित्ती काम होतं!!' म्हणून झोकून देते खुर्चीत.

शुभाने पटकन सेलफोन उचलला. 'अगं श्रध्दा, एक काम करतेस का?..... पन्नास हजार हवेत.... मामाकडून? चालेल.... पटकन...'
'तुम्हाला कुठल्या दुकानात हवेत?' तिने नवीनला विचारलं.

'दुकानात नको, इथेच मिळाले असते तर बरं..' तो चाचरत म्हणाला.

'बरं,' तिने परत सेलफोन कानाला लावला, 'इथेच पाठव.... त्यांनाच पाठव बरं का?' म्हणत फोन ठेवून पण दिला.

'काकू, तुम्ही मस्त चहा करा. श्रध्दाचा मामा, लगेच येणार पैसे घेऊन,' ती लगेच नवीनशी गप्पा मारू लागली.
'अगं पण...' त्या आतूनच म्हणाल्या.

'अहो काकू, पोलीसात आहे ना श्रध्दाचा मामा, त्याच्याकडे असतात पैसे,' मग नवीनकडे वळत, 'अशी कॅश फक्त पोलीस, नाहीतर चोरांकडे मिळते बरं का?' तिने डोळे मिचकावले.

'मी.... मी.... मी जरा आईवडिलांना घेऊन येतो,' तो उठत म्हणाला.

'बसा हो दोन मिनिटं, चहा होतोच आहे, तोपर्यंत पैसे येतीलच,' शुभा त्याला म्हणाली.

'नाही, नाही... मला निघालंच पाहिजे,' असं म्हणत तो दार उघडून बाहेर पळाला. शुभा तरीही शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली.

'काकू, हा तुमचा नवीन पळाला की," असं म्हणत तिने पटकन Intercom चा Receiver जागेवर ठेवला. रमाबाईंच्या चेहर्‍यावर एक मोठ्ठं प्रश्नचिन्ह पाहत ती म्हणाली.

'आज Intercom ने वाचवलं तुम्हाला. Receiver ठेवायला विसरलात तुम्ही. तिकडे तुम्ही परत याल बोलायला म्हणून आईने intercom speaker वर टाकून तसाच चालू ठेवला आणि ती भाजी करायला गेली. मी घरी आले, तर तुमच्या घरात हा चोर शिरलाय आणि तुम्ही मस्त गप्पा मारताय,' ती म्हणाली.

'चोर? अगं काहीतरीच काय बोलतेस? चोर कसा असेल तो?,' त्या म्हणाल्या. 'या शुभाला आज झालंय काय?' त्यांच्या मनात आलं.

'चोरच होता असणार तो. वॉशिंग्टनला राहतो म्हणे. अगदी तीन तासांवर,' ती त्याची नक्कल करत म्हणाली.

'अगं पण असेल राहत तो तिकडे.'

'काकू अहो भोळ्या आहात तुम्ही. कुणी कधी फसवेल कळणारही नाही तुम्हाला. माझ्या घरी बसून मी सगळ्या गप्पा ऐकल्या त्याच्या. तुमच्या एक लक्षात आलं का? की, तुम्हाला एक मुलगा आहे, या पलिकडे त्याला काहीच माहिती नव्हती. तुम्ही रोहन म्हणालात, मग तो लगेच रोहनचा मित्र, तुम्ही सांगली म्हणालात, मग तो लगेच हॉस्टेलवर, तुम्ही वॉशिंग्टन म्हणालात तर तो लगेच Virginia ला. आधी मस्त मराठी बोलत होता, पण अमेरिकेत पोहोचला, आणि इंग्रजी फाडायला लागला. पण कॉलेजचं नाव नाही, इतर कुठल्या मित्राचं नाव नाही, शिक्षकांच नाव नाही. तुम्ही दीप्तीवहिनीचं नाव नाही सांगितलंत तर तो तिला भाभी म्हणतोय आणि थापा मारतोय. तो फक्त तुम्ही सांगाल ती माहिती तुम्हाला तिखटमीठ लावून सांगत होता काकू.'

'अगं बाई, म्हणजे बोलण्याच्या नादात मीच त्याला सगळी माहिती पुरवली की काय?' आता मात्र त्यांना स्वतःच्या बडबडेपणाचा राग येऊ लागला.

'नाहीतर काय? मी घरी आले, तेव्हा मलाही वाटलं, रोहनचा मित्र दिसतोय म्हणून. पण थोडावेळ झाल्यावर लक्षात आलं, म्हणून मग पळत आले वर मी.'

'मग ती श्रध्दा, आणि तिचा मामा?'

'कुठली श्रध्दा, आणि कुठला मामा. मला कुठूनतरी पोलिसाचं नाव घ्यायचं होतं, त्याचा चेहरा बघायला. म्हणून मग खोटाच फोन केला, तर पळालाच की तो..,' ती हसत म्हणाली.

'अगं पण तुला कळलं कसं की तो खोटं बोलत होता म्हणून,' त्यांना अजूनही खात्री नव्हती.

'काकू, तुम्ही वॉशिंग्टन म्हणालात, त्याला DC वाटलं असणार म्हणून तो लगेच Virginia म्हणाला. पण रोहन Seattle ला आहे ना? तेव्हाच ओळखलं थापा मारतोय तो. काकू मी चालले, दार लावून घ्या, आणि कुणी आलं तर मला फोन करा आधी.' म्हणत ती निघालीही.


-विनय देसाई

विशेषांक लेखन: