बेखुदीSSSSSS

Submitted by विद्या भुतकर on 26 April, 2016 - 14:32

सकाळची घाईची वेळ. घरात गोंधळ घालून शेवटी मुलांना कसेबसे तयार करून मी बाहेर काढलं एकदाचं. ऑफिसला पोहोचायला किती वेळ होणार याचं गणित चालूच होतं. गाडी सुरु करून दोन मिनिट झाले नाहीत तोवर स्वनिक म्हणाला, 'आई 'बेखुदी' सॉंग लाव'. सध्या आमच्याकडे हिमेश रेशमियाचे संगीत असलेलं हे बेखुदी गाणं जोरदार चालू आहे. एकदा शाळेत पोहोचेपर्यंत पाच वेळा रिपीट वर ऐकावं लागलं आहे. गाणं मलाही आवडतं पण किती वेळा ऐकावं याला काही मर्यादा?
गाडी चालवताना सकाळच्या गर्दीत मी काही ते गाणं लावणार नव्हते. नाही म्हणालं तर दोघेही ऐकेनात, मग मी म्हणाले, 'मीच म्हणते, चालेल?' तर 'हो' म्हणाले. Happy म्हणजे त्या गाण्यावर हिमेशने न गाऊन उपकारच केले आहेत आणि आता ते मी म्हणायचं. मी डायरेक्ट सूर लावला,'बेखुदीSSSSSS'. तर स्वनिक म्हणाला,' असं नाही त्याच्या आधीचं म्युझिक पण म्हण'. डोंबल माझं. इथे गाडीच्या समोर कोण आडवा येतोय ते बघू, का म्युझिक? सान्वी म्हणाली,'थांब मी म्हणते.' म्हणून तिने सूर लावला. 'mhmhmhmh....' मग म्हणाली,'आता म्हण'. मग माझं 'बे SSSSSSS खुदीSSSSSS मेरी दिलपे... ' . जरा कुठे सुरुवात होणार त्यात मध्ये स्वनिक म्हणाला,'आई अगं ते दोन वेळा म्हणायचं आहे, बेखुदी, एकदा नाही.'
आता आमची गाडी पुन्हा सान्वीवर आली,'mhmhmhmh…. '. पुढे मी, दोन वेळा बेखुदी..' तेंव्हा कुठे गाण्याला सुरुवात झाली. असं करत गाण्याचं एक कडवं कसबसं पार पडलं आणि शाळा आली. सुटले एकदाची. संध्याकाळी संदीपला हे सांगत असताना सानू म्हणाली, 'हो आईने चांगलं गायलं गाणं.' Happy झालं, माझा बेसूर आवाजही तिला चांगला वाटला. Happy
बरं हे काही एकदा नाही. मी कधी चित्र काढून दाखवते किंवा मी चित्र रंगवत बसले की ती बघत बसते. म्हणते, 'आई, यु आर अन आर्टिस्ट. यू शुड नॉट वर्क.' म्हणलं हो माझ्या चित्रांनी जर पोट भरलं असतं तर काय ना? कधी म्हणते, यू आर द बेस्ट कुकर(शेफ) इन द वर्ल्ड.' एकदा संदीपला म्हणाली,'बाबा तुम्ही आईचं ऐका. तिला माहित आहे बरं वाटत नसताना काय केलं पाहिजे. शी शुड बी ए डॉक्टर.' Happy कधी ऑफिसचं काम करत असेल तर म्हणते,'मी कधी तुझ्यासारखं ऑफिसला जाणार?'.
अशा अनेक गोष्टी ऐकून भारी वाटते एकदम. अगदी सुपर वुमन झाल्यासारखे. आजही मला आठवते लहानपणी आमची आई रांगोळी काढायची तेव्हा वाटायचं किती भारी काढली आहे. अर्थात अजूनही वाटतंच. किंवा कुठल्याही महत्वाच्या कामात आम्ही कितीही गोंधळलो तरी दादा अजूनही सर्व शांतपणे करतात. आपल्यासाठी आपले आई बाबा आपले हिरो असतातच, नेहमीच. आपणही कुणासाठी तरी होत आहोत हेही कमी नाही. Happy नाही का?

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नुसतं स्क्रोल करताना हे 'बेखुदी' टायटल वाचून कालपासून ४ वेळा 'बेखुदी मे सनम, उठ गये जो कदम, आ गये, आ गये, आ गये पास हम' हे गाणं बघितलय आणी सतत तेच गुणगुणतोय. Happy

Happy Now you are stuck with that song and me too. Sad Its going to be difficult for me to switch between 2 Bekhudi. Lol

Vidya.

आमच्या कडे ऊलटे आहे, एकदा मी Adele che "hello from the other side" म्हनत होते गाडीमध्ये..तर माझ्या ३.५ वर्षाच्या दोघी मुली एक दम ओरडल्या मागून.. "stoppppp it...." Uhoh
हल्ली मुले अमीर-किरन पेक्षा ही जास्त intolerant झाली आहेत. आई कुठे, Adele कुठे बर्रोब्बर कळते त्याना Wink

फेरफटका, Happy ऐकत रहा.

स्वप्नाली Happy तुझ्या मुली हुशार दिसतायत एकदम. आमच्याकडे अजुन तो दिवस याय्चा आहे, पण खूप दूर नाही. Happy

विद्या.

माझ्या मुलीच्या मते मी आणि माझी आई बेस्ट कूक आहोत. माझी आई तर उत्तम कूक आहेच पण मी नक्कीच नाही कारण मुलीने मला माझ्या आईच्या पंगतीत बसवलं आहे.
दुसरी गोष्ट माझ्या लेकीच्या द्रुष्टीने तिच्या आईला (मला) सगळं येतं आणि तिच्या बाबांना काही येत नाही. ती जेव्हा तिच्या बाबांना म्हणते, "बाबा, तुम्हाला काहीच येत नाही." तेव्हा तिला म्हणायचं असतं की बघा आईला कसं सगळं येतं. तेव्हा खरंच खूप भारी वाटतं. आपण किमान आपल्या मुलांच्या नजरेत खूप ग्रेट नसलो तरी बरेच काही आहोत हेही काही कमी नाही.

छानच लिहिलं आहेत. तुमचे सगळेच लेख हलकेफुलके आणि वाचायला मस्त असतात.

"माझा बेसूर आवाजही तिला चांगला वाटला." किंवा
'आई, यु आर अन आर्टिस्ट. यू शुड नॉट वर्क.' यात आवाज किंवा चित्रकलेला महत्वच नसतं. ती मुलांनी दिलेली उत्तम पालकत्वाची पावती असते.

आपण पालकांच्या दृष्टीनी ह्याहून समाधानाचं दुसरं काय असणार?