स्थलांतरीत पक्ष्यांची गोष्ट

Submitted by फूल on 24 April, 2016 - 22:25

इथे सिडनीत माझ्या आसपास अनेक स्थलांतरीत पक्षी दिसतात. काही अनुभवी तर काही अगदीच नवखे. काहींनी इथं पाळंमूळं रोवलीयेत. पण काहींची स्थलांतरणात दुखावलेली मूळं अजूनही तशीच, ती जपत जपत त्यांचं या मातीत रुजणं चालूच आहे अजून.

पंखात अनामिक बळ घेऊन आणि डोळ्यात उज्ज्वल भविष्याची अगणित स्वप्न घेऊन हे स्थलांतरीत पक्षी एका रात्रीत परदेशात येतात. आसपासची परिस्थिती एका विमान प्रवासात बदलते. प्रत्येकाची कारणं निराळी हं. तेही इथे आल्यावर उमजलं. बक्कळ पैसा आणि सुखवस्तू जीवनशैली त्यांच्या स्वदेशातही असूनसुद्धा इतर अगणित कारणासाठी स्थलांतरीत झालेले अनेक स्थलांतरीत पक्षी बघितले. प्रत्येक पक्षाची गोष्ट निराळी, प्रत्येकाची माती निराळी, प्रत्येकाची झेप निराळी आणि प्रत्येकाचं आभाळ निराळं.

मी अगदीच लहान वयात लग्न हॊऊन माझ्या जोडिदारासह इथे आले. माझं लहान असल्यापासूनचं शालेय, महाविद्यालयीन शिक्षण, नोकरी सगळं एकाच गावी झालेलं. याउलट सखा पायाला भिंगरी लागल्यासारखा गावन्गाव फिरलेला. सिडनीत आलो तेव्हा त्याच्याही मनात हुरहुर असेलच पण माझ्या मुसमुसण्यापुढे त्याला त्याची हुरहुर कधीच दाखवता आली नसावी बहुधा. भौतिकदृष्ट्या आमचं परदेशगमन अतिशय सुखकर होतं. सख्याची नोकरी, आम्ही इथे येऊन रहायचं कुठे या सगळयाचं नाव, गाव, फळ, फूल सगळं आम्ही येण्याआधीच सुसज्ज होतं.

इथे येतानाची जिवलगांची ताटातूट, विमानतळावरची आभाळ कोसळल्यासारखी परिस्थिती, डोळ्यातून अखंड ओघळणारं पाणी आणि त्यानंतरचा भला थोरला विमानप्रवास सगळं सगळं आज अजूनही तस्सं आठवतंय.

काही हजार मैल घरापासून लांब आलो तरी मनातला भारत तो अजून मनातच होता. येताना कस्टम आधिकाऱ्यांच्या तावडीतून सुटतील न सुटतील अश्या भितीने घाबरतच ५ पुरणपोळ्या आणल्या होत्या. त्या कस्टम आधिकाऱ्याच्या तावडीतून सुटल्या आणि हॉटेलवर आल्या आल्या आम्ही भल्या पहाटे पुरणपोळ्या खाल्ल्या. प्रत्येक घास घशात अडकत होता. नातलगांची आठवण तर आयुष्याला चिकटल्यासारखी. हा घास आईचा, हा घास मावशीचा असं म्हणतही खायची सोय नाही.

म्हटलं नं भौतिकदृष्ट्या स्थलांतरण एका दिवसात किंवा रात्रीत होतं आणि मनाला स्थलांतरीत व्हायला अनेक दिवस, महिने, वर्षं लोटतात. स्वदेशाशी जोडलेली नाळ इतक्या सहजी तुटत नाही.

मग तोच मनातला भारत इथे आस-पास वसवायला लागतो आपण. आमच्या नाक्यावर एक वडेवाला उभा असायचा अगदी त्याच्यासारखे केलेत आज वडे, आमच्या लहानपणी माझी आज्जी अश्शी कोशींबीर करायची तश्शी कोशींबीर झालीये आज, मटकीच्या उसळीला हा माझा नेहमीचा मसाला आज कित्ती दिवसांनी मिळाला, आमच्या पुण्याच्या घरी पण अश्याच चादरी आहेत, मला कित्ती दिवस झाले अनारकली घायचाच होता, यावेळी गेले तेव्हा अगदी आईकडच्यासारखा खल-बत्ता घेऊन आलेय, वजन झालं थोडं पण ठिकय, पोह्याचे पापड आणले यावेळी असं एक ना दोन अनेक तऱ्हांनी भारत वसवणं चालू होतं. हे झालं सगळं भारतातलंच.

पण इथेही अश्या अनेक गोष्टी सापडायला लागतात ज्या भारतातल्या गोष्टींशी अगदी मिळत्या-जुळत्या असतात. आपल्या संस्कृतीशी नाळ जोडणाऱ्या असतात. सुपरमार्केट मध्ये आता बटरमिल्क मिळतं आणून बघ एकदा, त्या सोअर क्रिमचं श्रीखंड मस्त होतं आणि थालीपीठाबरोबर लोण्यासारखं लागतं अगदी सोअर क्रिम, आयाम चं कोकोनट मिल्क आण आणि सोलकढी कर, पिटा ब्रेड अगदी आपल्या नान सारखाच लागतो, हॅश ब्राऊनवर चिंच-गुळाची चटणी आणि कांदा शेव घातली की अगदी आपलं आलू टीक्की चाटच, बार्बेक्यू सॉस अगदी चिंचगुळाच्या चटणी सारखा, टार्गेट मध्ये अगदी आपल्या सारखेच लहान गळ्याचे कपडे मिळतात, भारतीय ब्युटी पार्लर मध्येच जायचं, केसाला डायच्याऐवजी मेहंदी लावायाची.

आम्हा स्थलांतरीत पक्षांची एक मिश्र संस्कृती. थोडं इथलं थोडं तिथलं असं करत करत हळू हळू ही जमीन, ही माती आपलीशी वाटायला लागते. इथेही हाकेच्या अंतरावरले सगे-सोयरे भेटतात. भेटी होतात, गाठी जुळतात. मग वीकेंडच्या गप्पा, रात्र रात्र जागून बॉलिवुड मुव्ही बघणे, पत्ते खेळणे हे सगळं आलंच ओघाने.

त्यातच कुणी एखादा गाणारा असतो, एखादा वाजवणारा, एखादा लेखक, एखादा कवी. आर्थिक महत्त्वाकांक्षेच्या भरात मागे पडलेल्या तरी जिवापाड उरी जोपासलेल्या या अंतरीच्या कळांना इथे वाव मिळतो. त्यातूनच प्रत्येक देशाची, त्यातल्या प्रांताची प्रादेशिक मंडळं स्थापन होतात. मनातला स्वदेश संपूर्ण साकारणं अशक्य असलं तरी तो आसपासच असल्याचा पुरे-पुर आभास आम्ही स्थलांतरीत पक्षी निर्माण करतो.

एका मित्राची आठवण झाली. असंच एकदा म्हणाला लोकांना कळतंच नाही मला काय होतंय ते. मला मुंबईची आठवण येते आणि मी रडतो. लोक सांगतात अरे मग घरी फोन कर, आई-बाबांशी बोल, तिथल्या मित्रांशी बोल पण मला त्यांच्यापैकी कुणाचीच आठवण येत नसते मला मुंबईची आठवण येते. मला त्यामागची मानसिकता अगदी तंतोतंत पटली. माझ्या घरापासून चार पावलांवर राहणारा माझा मित्र, नाक्यावरचा पाणीपुरीवाला, कोपऱ्यावरचा वाणी, घराखालची बाईक आणि तिच्यावर टांग टाकून मनात येईल तेव्हा आणि मनात येईल तिथे भटकता येणं, तसं भटकताना शहरात दिसणाऱ्या आणि वर्षानुवर्ष आपल्याला माहित असणाऱ्या ओळखीच्याच खुणा हे सगळं भोवताली असतानाच्या परिस्थितीची आठवण म्हणजेच त्याच्या भाषेतली मुंबईची आठवण. त्या मित्राकडे मी जाईनच असं नाही पण तो मला इथे चार पावलांवर असायला हवाय, त्या पाणी-पुरीवाल्याकडे मी आत्ता जाईनच असं नाही पण तो तिथे आहे एव्हढी जाणीव खूप काही देऊन जाते. ही पोकळी स्थलांतरीत पक्षांचीच आणि ती त्यांनीच भरू जाणे.

परवाच एक सखी सांगत होती, सिडनीत आल्यानंतर वर्षभराने परत भारतात गेले, रात्री ९.०० वाजता मुंबईत पोचलो, आई-बाबा विमानतळावर घ्यायला आले होते. घरी गेलो, अंघोळी केल्या आणि आईच्या हातचा गरमागरम आमटी-भात समोर आला. ती आईच्या हातची तश्शीच अजूनही न बदललेली चव, पहिला घास तोंडात टाकला आणि डोळ्यांतून पाण्याची धार. जवळ जवळ वर्षाने मी घरी आल्यासारखं वाटलं गं मला. घर म्हणून उराशी बाळगलेल्या किती गोष्टी असतात त्या चार भिंतींच्या आत? त्यातलं काय काय आणि कसं कसं बरोबर आणायचं?

प्रत्येक भारत भेट हे नवीन स्थलांतरणच असतं. त्यानंतर पुन्हा इथे परदेशात आलं की पहिले काही दिवस तसेच दोलायमान परिस्थितीतले, ना इकडचे ना धड तिकडचे. पुन्हा एका दिवसातलं स्थलांतरण पण मन अजूनही जुने संदर्भ, जुने धागे शोधतच राहतं. भारतात जाताना मज्जा वाटते पण तिथून परत येऊन इथलं आयुष्य पुन्हा सुरू करणं त्याचा त्रास जास्त होतो त्यापेक्षा इथे चालंलंय ते चालू द्यावं असं वाटतं कधी कधी. हे मी अनेकविध लहान-मोठ्या पक्षांच्या तोंडून अनेकदा ऐकलंय. त्यामागची कळकळ ही जावे त्यांच्या देशा तेव्हा कळे.

पण या सगळ्याचा सुवर्णमध्य गाठणारी एक सखी भेटली. माझ्यापेक्षा वयाने खूप मोठी पण तरीही सखीच. इथे हेही एक वैशिष्ट्य आहे कुठल्या माणसाला आपण कोण म्हणून बघतो त्यावर इथे नाती ठरतात. मावशी, काकू, ताई, सखी, बहिण ही नाती इथेही सहज चिकटतात पण त्या नात्यांचा आणि वयाचा काहीही संबंध नाही.

तर त्या सखीबद्दल, तीही अशीच तिच्या सख्यासोबत इथे आलेली, कुशीत एक-दोन वर्षाचं लहानगं घेऊन. सासू-सासरे, नणंदा, दीर, जावा आणि सगळ्यांची चिल्ली-पिल्ली असल्या भरल्या घरातून उठून परदेशात तिघांच्याच कुटुंबात राहणं म्हणजे महत्संकटच होतं तिलाही. पण सावरली अगदी सराईतासारखी. म्हटलं काय गं केलंस तर म्हणाली, माणसं आस-पास असणं म्हणजे काय याचा नेमका अर्थ एकदा कळला की ती नसण्याचं दु:ख होत नाही. कळायला अवघड आहे पण तरीही, माणूस या नामरूपाधारी आकारापलिकडे जाऊन काय उरत असेल तर त्यांनी जपलेले विचार, त्यांची नीती-मूल्य हे सगळं. एखादं काम करताना जर मी हे केलं तर माझ्या आईला आवडेल का? हा विचार डोक्यात येत असेल किंवा अश्या परिस्थितीत माझे बाबा कसे वागले असते हे जर योग्य वेळी आठवून आपण तसं वागत असू तर ती माणसं आपल्या आस-पासच आहेत की. आई-वडील जवळ असूनही त्यांचं तुम्ही काहीच ऐकत नसाल तर ते परदेशात असले काय, परगावात असले काय किंवा शेजारच्या घरात असले काय सगळं सारखंच की. प्रत्येक नातं अनुभव म्हणून उरतं. तेच अनुभव आपल्या गाठीशी आहेत म्हणजे ती माणसं आपल्याचबरोबर आहेत असं नव्हे का? मला कळलं पण वळणं फार फार कठीण आहे नै.

आम्हा स्थलांतरीत पक्ष्यांचं कसंय माहितीये का? कुणी कितीही सांगितलं नं की गणेशोत्सवापेक्षा मानसपूजेत अधिक शांती लाभते तरीही गणपतीतली घरातली लगबग, पंचामृत, गंध, उदबत्ती, फूलं या सगळ्यांचा घरात येणारा एक मिश्र वास हे सगळं गणपती म्हटलं की आठवतंच. मन कित्येकदा स्वदेशात डोकावतं त्याला गणतीच नाही. झाड मूळासकट उपटून नवीन जागी रुजवण्याच्या प्रयत्नात मूळाबरोबर चिकटून आलेली जुनी माती ती आजन्म तशीच मूळाला चिकटून राहते, स्वदेशाच्या आठवणी जोपासत राहते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे तर फार वेगळेच पक्षी निघाले. Proud
स्थलांतरीत पक्षी म्हटल्यावर काय वाटलं होतं आणि काय निघालं !

जुन्या आठवणीच्या पानाफ़ुलात शिरल्यानंतर स्थलांतरीत पक्ष्यांना कशाकशाची आठवण होत राहते याचे अतिशय सुंदर, काव्यात्मक आणि हद्य असेच हे लिखाण फ़ूल यानी केले आहे. टंकनासाठी बोटे कळफ़लकावर घेतल्याक्षणीच त्यांचे मन भुर्रदिशी इकडे आले आणि येथील संगतीनेच त्यानी सध्या ज्या गावातील झाडाखाली त्यानी आपले घर केले आहे, त्याच्याशी त्या मिसळून गेल्या आहेतच, तरीही मूळ घरच्या मातीचा सुगंध त्या नाही विसरू शकत. ओढ म्हणतात ती हीच....पाऊले जरी दूर भटकत गेली तरी घरच्या पुरणपोळीची चव जिभेवर रेंगाळत राहातेच त्यातीलच हा प्रकार.

पु.ल.देशपांडे याना त्यांच्या पौर्वात्य देशातील सफ़रीमध्ये सुमारे ४० वर्षे परदेशात राहिलेले एक उद्योगपती भेटले होते...तेही स्थलांतरीत पक्षीच होते. रात्री भोजनाच्यासमयी हा पक्षी कारवारचा आहे हे पु.लं.ना समजल्यावर त्यानी त्याच्याशी सहजगत्या चक्क कोकणी भाषेतून संवाद साधला....पहिल्या वाक्यानेच पक्षी आनंदाने नाचूच लागला....४० वर्षानंतर त्याला कोकणीतून बोलणारा कुणीतरी भेटला त्याचा त्याला अतोनात आनंद झाला....हरखूनच गेला. अशी ही मजा असते स्थलांतरीत पक्ष्यांची.

छानच सारे.

फ़ारच सुरेख लिहिलय. लेखाचं नावही समर्पक आणि फ़सवं. Happy

स्थलांतरीत पक्षी म्हटल्यावर काय वाटलं होतं आणि काय निघालं !>>>>>>>>+१

मलाही वाटलं खऱ्या पक्षाविषयीच लिहिलं आहे . छान लिहिलय .
मायबोलीवर असे बरेच पक्षी आहेत Proud
मी अगदीच लहान वयात लग्न हॊऊन माझ्या जोडिदारासह इथे आले. >>> तुमचा बालविवाह झालाय की काय ? Light 1 Proud

खरेखरे स्थलांतरीत पक्षी
रूतू बदलला की परत माय देशी जातात...तुम्ही लिहिलेले स्थलांतरीत पक्षी पिन्जर्यात आडकलेल्यन्सारखे स्थलांतरीत जागीच राहातात माय देशाची स्वप्ने पहात.. Sad

खुपच छान लिहीलं आहे!
प्रतिसादात काही जणानी स्थलांतरीत पक्षी परदेशात अडकलेल्यांसारखे राहतात वगैरे निराशाजनक सुर दिसत आहे जो आवडला नाही! इतक्या सुंदर लेखावर असे निराशाजनक प्रतिसाद का!

आहा... फुला. हे अगदी म्हणजे अगदी माझंच झालय की.
ऋणानुबंध नव्यानं रुजवायला शिकतात हे पक्षी.. आगळी मेहनत आहे त्यात.

खूप आभार.... मज्जा येतेय संमिश्र प्रतिसाद वाचून... हे अपेक्षित होतंच... Happy

श्री: बाल विवाहच म्हणायला हवा... ज्या वयात हल्ली मुलं शिकायला परदेशात जातात त्या वयात मी लग्न करून गेले... Proud

अशोकजी : कित्ती छान समजून घेतलंत.... तुमच्या प्रतिसादातल्या प्रत्येक वाक्याला अगदी अगदी झालं...

स्वप्नालीजी: खरंच की... स्थलांतरीत पक्षी परतही येतात हे लक्षातच नाही आलं माझ्या... नाव देण्याआधी हा ही विचार करायला हवा होता नै?

पण पिंजरा मात्र नाही हं... दाद म्हणतात ते खरंय... ऋणानुबंध नव्यानं रुजवायला शिकतात हे पक्षी.. आगळी मेहनत आहे त्यात आणि आगळी गंमत सुद्धा... Happy

छान लिहिलंयस फूल!

<<जर मी हे केलं तर माझ्या आईला आवडेल का? हा विचार डोक्यात येत असेल किंवा अश्या परिस्थितीत माझे बाबा कसे वागले असते हे जर योग्य वेळी आठवून आपण तसं वागत असू तर ती माणसं आपल्या आस-पासच आहेत की. >>

हे आवडलं.