सायकलीशी जडले नाते २७: २०१५ च्या लदाख़ सायकल मोहिमेची झलक. .

Submitted by मार्गी on 20 April, 2016 - 06:49

सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक

सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक

सायकलीशी जडले नाते ३: नदीसोबत सायकल सफर

सायकलीशी जडले नाते ४: दूरियाँ नज़दिकीयाँ बन गईं. . .

सायकलीशी जडले नाते ५: सिंहगड राउंड १. . .

सायकलीशी जडले नाते ६: ऊँचे नीचे रास्ते और मन्ज़िल तेरी दूर. . . . . .

सायकलीशी जडले नाते ७: शहरामधील सायकलिंग. . . . . .

सायकलीशी जडले नाते ८: सिंहगड राउंड २!

सायकलीशी जडले नाते ९: दुसरे शतक. . .

सायकलीशी जडले नाते १०: एक चमत्कारिक राईड- नर्वस नाइंटी!

सायकलीशी जडले नाते ११: नव्या रस्त्यांवरील राईडस

सायकलीशी जडले नाते १२: तिसरे शतक- जीएमआरटी राईड

सायकलीशी जडले नाते १३: ग्रामीण रस्त्यांवर सायकल राईड

सायकलीशी जडले नाते १४: "नवीन सायकलने" नवीन सुरुवात

सायकलीशी जडले नाते १५: औंढा नागनाथकडे चौथे शतक

सायकलीशी जडले नाते १६: पाचवे शतक- लोअर दुधना डॅम

सायकलीशी जडले नाते १७: साक्री- नंदुरबार- एक ड्रीम माउंटेन राईड!

सायकलीशी जडले नाते १८: तोरणमाळ सायकल ट्रेक

सायकलीशी जडले नाते १९: उत्साह वाढवणा-या राईडस

सायकलीशी जडले नाते २०: दुखापत व नंतरच्या राईडस

सायकलीशी जडले नाते २१: चढाच्या रस्त्यावर सायकल चालवण्याचा आनंद

सायकलीशी जडले नाते २२: सिंहगड राउंड ३- सिंहगड फत्ते!

सायकलीशी जडले नाते २३: नई हैं मन्जिलें नए हैं रास्ते. . नया नया सफर है तेरे वास्ते. .

सायकलीशी जडले नाते २४: "चांदण्यात फिरताना" एप्रिलच्या ऊन्हात परभणी- जालना

सायकलीशी जडले नाते २५: आठवे शतक

सायकलीशी जडले नाते २६: २०१५ च्या लदाख़ सायकल प्रवासाची तयारी

२०१५ च्या लदाख़ सायकल मोहिमेची झलक. .

लदाख़मध्ये सायकल एक्सपिडिशन! एक स्वप्न खरं होणार होतं. २६ मे ला महाराष्ट्रातून निघालो. मनाली- लेह रस्ता सुरू व्हायला फार जास्त वेळ लागत असल्यामुळे श्रीनगर- करगिलमार्गे गेलो. करगिलमध्ये सायकलिंग सुरू करत असताना मनामध्ये शंकांचं मोहळ उठलं आहे! शंकांमुळे मन पूर्ण अस्थिर आहे. पण तरी सायकल घेतली अणि निघालो. सोबतीला स्वर्णिम नजारे आहेतच.

हळु हळु पुढे जात राहिलो. नंतर चांगली लय मिळाली आणि लेहलाही पोहचलो. पण त्यानंतर फार पुढे जाऊ शकलो नाही. रस्ते सुरू नव्हते आणि हवामानही अनुकूल नव्हतं. लदाख़च्या उन्हाळ्यात मायनसमधलं तपमान अनपेक्षित होतं. आणि तीन दिवस सायकल चालवल्यानंतर मानसिक थकवाही आला. त्यामुळे फार पुढे जाऊ शकलो नाही. पण तरीही, जाण्याआधी जर मला कोणी सांगितलं असतं की, तू लदाख़मध्ये चार अर्धशतक करशील आणि करगिलवरून तिस-याच दिवशी लेहला पोहचशील, तर मला ती लॉटरी वाटली असतील. त्या चार अर्धशतकांवर एक दृष्टीक्षेप टाकूया.

    करगिल ते बुधखारबू (७१ किमी)

हा ह्या मोहिमेचा सर्वांत मोक्याचा दिवस होता. असंख्य शंकाकुशंका घेऊन सायकल सुरू केली आणि लवकरच ब-याच शंका दूर झाल्या. निघताना वाटत होतं की, दिवसभरात ४० किलोमीटरवर मुलबेखला जरी पोहचलो, तरी नशीबवान समजेन. पण दुपारी एकलाच तिथे पोहचलो. शिवाय त्यानंतर ३८०० मीटर उंचीवरचा नमिकेला घाट ओलांडला. एका दिवसात २७०० मीटर उंचीवरून सुरुवात करून ३८०० मीटर उंचीपर्यंत सायकल चालवली. आणि बुधखारबूमध्ये आर्मीच्या जवानांसोबत केलेला अविस्मरणीय मुक्काम! हे सर्व सत्य आहे, हा विश्वासच बसत नव्हता!


नमिकेलाचा नजारा

बुधखारबू ते नुरला (६५ किमी)

पहिल्या दिवशी ७१ किलोमीटर चालवल्यामुळे उत्साह वाढला आणि वाटलं की, आजसुद्दा अशीच चालवली तर तिस-याच दिवशी लेहला पोहचेन. ह्या दिवशीसुद्धा चांगली सायकल चालवली. ४१०० मीटर उंचीवरचा फोतुला घाट ओलांडला. त्यानंतर बराच उतार असून कदाचित कमी खाल्यामुळे फक्त ६५ किलोमीटरच चालवू शकलो. एका लदाख़ी घरात थांबण्याचा अनुभव! सलग दुस-या दिवशी अर्धशतक. उद्या लेहला पोहचण्यासाठी ८२ किलोमीटर सायकल चालवावी लागेल व ते जमेल असा आत्मविश्वास वाटतोय. सिंधू नदीचा निनाद ऐकत ती संध्याकाळ गेली!

    नुरला ते लेह. . . (९० किमी)

सायकल चालवण्याचा तिसरा दिवस! हा दिवस ह्या पूर्ण मोहिमेतला सर्वांत विलक्षण राहिला. मोठा कोणताही घाट वाटेत नव्हता, पण छोट्या चढांनी अतिशय छळलं. नंतर संध्याकाळ होऊनही सायकल सुरू ठेवण्याचा साहसी निर्णय घेतला व त्यामुळे रात्री दोन तास अंधारात सायकल चालवावी लागली आणि थोडं मिसमॅनेजमेंट होऊन लेहमध्ये शब्दश: रस्त्यावर रात्र काढावी लागली. त्यातही खूप मजा आली आणि थोडासा पश्चात्तापही झाला. ह्याच दिवसात सिंधू- जांस्कर संगम बघितला. पण खूप वेळ सायकल चालवण्याचा हट्ट केल्यामुळे नंतर शारीरिक आणि मानसिक थकवा आला.

     हेमिस गोंपा राईड (७२ किमी)

तिस-या दिवशी लेहमध्ये पोहचल्यानंतर पुढे फार सायकल चालवता आली नाही. एक तर रस्ते सुरू नव्हते, हवामान विपरित होतं. आणि शारीरिक व मानसिक थकवाही आला होता. लगेच पुढे जाण्याचा उत्साह उरला नव्हता. पण नंतर लगेच आणखी एक अर्धशतक केलं. हवामान थोडं अनुकूल झालं तेव्हा हिंमत केली आणि प्रसिद्ध हेमिस गोंपा बघायला गेलो. ह्या राईडमध्येही मस्त नजारे दिसले. पण हेमिस गोंपाच्या छोट्या चढानेही थकवमं आणि त्यामुळे मग खर्दुंगला- चांगलाकडे जाण्याची हिंमतही उरली नाही.

ह्या चार अर्धशतकांशिवाय लेह शहर व आसपास सायकल चालवली. लदाख़चा आनंद घेतला. एक स्वप्न काही प्रमाणात पूर्ण होताना बघितलं. किंवा खरं तर एक सत्य स्वप्न होताना बघितलं! एकूण ३८२ किलोमीटर सायकल चालवली. संर्व मोहीम अगदी विशेष होती. मिलिटरीच्या टीसीपीमध्ये केलेला मुक्काम, लदाख़ी घरातला मुक्काम, ४१०० मीटर उंचीवर सायकल आणि सिंधू नदीची सोबत! सर्व काही स्वप्नवत्!

त्यात हेसुद्धा शिकायला मिळालं की, 'डर के आगे जीत' असते, त्याप्रमाणे जीतनंतरही भिती येते परत. जर कोणी म्हणत असेल की, तो फार हिमतीचा माणूस आहे, तर ती हिंमत अनंत नसते. जसं शरीरात जितकी ऊर्जा असेल, तितकं ते काम करतं. त्यानंतर थकतं. तशीच ही हिंमत आणि असा उत्साहसुद्धा थकतो. प्रत्येकाची सीमा वेगळी असते. करगिलमध्ये असंख्य शंकाकुशंका असूनही पुढे जाऊ शकलो, पण तसं लेहमध्ये करू शकलो नाही. कदाचित असं असावं की, जर आपण शिडीच्या दुस-या पायरीवर असू तर चौथ्या पायरीवर सहज उडी मारू शकतो. पाचव्या पायरीवरही उडी मारू शकतो. पण एकदम दुस-या पायरीवरून सहाव्या पायरीवर उडी मारू शकत नाही. उडी मारली तर आपटतो. जर मी फक्त एक ट्रेक हिमालयात ४००० मीटर उंचीवर केला असता किंवा कधी हिमालयात कुठेही टेंटमध्ये राहिलो असतो, तर मी कमीत कमी त्सोमोरिरीकडे जाण्याची हिंमत तरी करू शकलो असतो. पण ते नाही जमलं.

पण तरीही, इतक्या कमतरता असूनही २०१५ ची लदाख़ मोहीम एका शिखरासारखी राहिली. ४१०० मीटर उंचीसुद्धा कमी नसते आणि तिथे सायकल चालवण्याचा अनुभव घेतला. हलक्या बर्फवृष्टीमध्ये सायकल चालवली. नजारे तर सगळेच अपूर्व होते! लोकांशीही छान भेटी झाल्या. स्वत:शीही थोडी भेट झाली. अजून काय हवं.

. . . पण शिखर पार केल्यानंतर नेहमी दरी येते आणि लदाख़वरून परत आल्यानंतर हेच झालं. दोन महिने टायफॉईडमुळे सायकल चालवता आली नाही आणि त्यानंतर पुन: नव्याने सुरुवात करावी लागली. हळु हळु फिटनेस वाढवत नेला. लदाख़च्या शिखरानंतर इतर शिखरांचा मार्ग मोकळा झाला होता. पण झालं उलटं. समोर दरी आली आणि सायकल थांबून गेली. . .

  पुढील भाग २८: परत नवीन सुरुवात

अशा इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशाच एका निवांत ठिकाणी जायचे आहे, जिथे कोलाहल नसेल आणी डोक्याला कुठलाच ताप नसेल.

सुरेख फोटो आणी सुरेख वर्णन आहे.